Saturday, 10 September 2016

गणराय

गणराय
……………………….

त्याच्या येण्याची चाहूल लागते आषाढ सरता सरता. श्रावणात तीन रवीवार बाहेरगावी जायचय हे नक्की झालं की मग मनात  विचार येतो यंदा मुर्ती करायलाच नको, वेळ कमी आहे, त्यापेक्षा आपटे, फडकेंकडे जावं न पेणची मुर्ती ठरवून यावी. कशाला गडबडीत गडबड. आणि नेमकी त्याच दरम्यान बाप्पा येणार अमुक तमुक तारखेला म्हणून पोस्ट टाकतात  कुणीतरी, पेप्रातून फोटो छापले जातात कामाला सुरूवात झाली, ओबडधोबड रचलेल्या मातीच्या आकाराचे फोटो पाहिले की हुक्की उठते, आठवडा आहे की अजून , प्रयत्न करायला काय हरकत आहे.

मग एक दोन दिवसातच भूरभूर पावसात , गाडी वळते सिटी हार्डवेअरकडे, दुकानात पाऊल टाकलं की मधूबुवा वझे सुहास्य मुद्रेने सानुनासीक आवाजात विचारतात “ कांय मातीला मुहुर्तं लागलां कांय ?”
ते स्वतःही रेखीव मुर्ती करीत असल्याने त्यांच्या प्रश्नाने हुरूप येतो, शाडूचे पुडे घेऊन घरी येतो.

शनीवारी रात्री माती भिजवली जाते, पोळपाट, पाट काय असेल ते धुऊन कुंकवाचं एक बोट लावून, कामाला सुरूवात होते, पहिले पाट, नंतर उभा लंबुळका गोळा अंदाजाने लावायचा, मांड्या , पोट, हात लावायचे , पाठ , मान करायची, तोंडवळा करायचा. हे सगळं करताना आपण दिनानाथ वेलींग, राजन खातू , राजाभाऊ देवधर, मदन गर्गे, लोंढें बंधूं प्रभृतींच्या बारश्याच्या घुग-या खाल्ल्याच्या ऐटीत उगाचच तीन तीनदा मुर्ती खालून वरून, उगीचच जरा बाजूने बघत रहायची .सवय , दुसरं काही नाही, ( एवढी शायनींग करूनही दोन्ही कान, मुगुटाच्या कडा असमान, कधी लंबोदर जलोदराकडे वळणारा होणे, कधी पोटापेक्षा छाती पुढे , बजरंग स्टाईल असे व्हायचे ते प्रकार होतातच , असो) मग कान, सोंड, मुगुट, हाताच्या मुठी, उपरणं करायचं , रचत जायचं. शनिवार रवीवार यातच जातो. एक मात्र नक्की गणराय आकार घेताना बाकीच्या जगाचा विचार बाजूला पडतात. एकीकडे वसंतराव, जसराज, भीमण्णा, हरीप्रसाद कानांवर पडत असतात आणि एकीकडे काम सुरू असते.

घर तळमजल्यावर असल्याने, काका काकू लोक्स, चिल्लर पार्टी वगैरे आपापल्या नात्याप्रमाणे मधेच लहान बाळाला कूक करताना जसं डोकावतात, तसं डोकवत “काय गणपती का ? ह्या ह्या ह्या , चालू दे चालू दे नंतर येतो /येते बघायला” असं काहीसं बोलून जातात.( भावनेचा पार्ट अपार्ट, कधीकधी हे ह्या ह्या ह्या असह्य होतं )

पुढच्या रवीवारपर्यंत थोडा थोडा वेळ देत गणराय साकारले जातात. आता दिवसातून दोनदा तरी मुर्तीवरचं ओलं फडकं दूर करून रूप निरखत रहायचा छंद जडतो, नुकतचं रांगायला लागलेलं लहानुलं बघताना त्याच्या आईला जे काही वाटत असेल तशीच भावना उरी दाटलेली असते.

श्रावणातल्या दोन शुक्रवारच्या पुरणपोळ्या हादडून होईस्तो, मुर्ती खडखडीत वाळलेली असते. ती वर्तमानपत्राने झाकून ठेवायची मग.

 श्रावण संपला की दुस-या दिवशी पांढरा रंग, बॉडी कलर, शेडींग, पितांबर, उपरणं , दात नखं, कान, केस रंगवायचे, डोळे, सोंडेवरची उभी रेघ रंगवायची, आर्शीवादी हातावर स्वस्तीक, पाटावरची गादी, उंदीरमामा, एका फराट्यात त्याची शेपटी रंगवायची, अन वॉर्नीशचा हात, गळ्यातली माळ, कडी, मुगुटाला लावूनच मग लंबायमान व्हायचं. दुसरे दिवशी सकाळी वॉर्नीश वाळलेलं असतं , मग सोनेरी काम करायचं आणि गणरायाच्या त्या लोभसवाण्या मुर्तीकडे लुकूटूकू बघत बसायचं.

गणेशचतुर्थीला सोवळं नेसून चातुर्मासाच्या पुस्तकात बघून प्राणप्रतीष्ठा करायची. नेत्रोन्मीलनं कृत्वा म्हणत तुपाने गणरायाचे डोळे उघडायचे, स्वतःचा प्राण त्या मातीच्या पार्थीवात उतरावायचा,डोळे मिटून  ओंकाराचा जप करून झाल्यावर नजरभेट होते तेव्हा सर्वांग शहारून जाते, क्षणभराचा अवधी पण निर्गुणाच्या संगाने काय जाणवू अन काय काय नको होतं.

आरत्या, मंत्रपुष्पांजलीचा दणका उठतो, गौराईच्या संगतीत गणराय खुलून जातो. या जीवीच्या जिवलगासाठी नैवेद्य काय, सजावट काय, आवर्तनं काय , काय करू न काय नको हौऊन जातं , घावन घाटल्याचं आकंठ सेवन सुखाची ग्लानी चढवतं. आणि संध्याकाळच्या आरतीला काळजात हूरहूर दाटून येते.
नंतरची सकाळची पूजा जाणीव करून देते, गड्या वेळ कमी उरलाय आता.  आवर्तनाच्या फलश्रृतीला नाकपुड्या थरथरायला लागतात.
संध्याकाळ होते, भेंडबत्तासे, तळीवाचे मोदक, दहिभाताचा नैवेद्य दाखविला जातो. पुनरागमनायच म्हणताना डोळे घळाळा होऊ पहातात. गणरायाच्या मुखी हसू तसेच असते. टोपी घालून घरातून गणरायाला निरोप देतानाचा गणपतीबाप्पा मोरयाचा गजर करताच येत नाही, भाचरं मंडळीच करतात गजर रस्त्यावर, अनवाणी पायाने मोरया मोरयाचा गजर करत घाटावर जायचं, वा-यानं थरथरणा-या कापराच्या ज्योतीने त्या तेजाची आरती करायची, मोरयाचा गजर करायचा, गुडघाभर पाण्यात जाईस्तो , स्वत: विसर्जन करायची मानसीक ताकद गमाऊन , वीतभर ओल्या चड्डीत कुडकुडणा-या एखाद्या पो-याच्या हाती गणरायाला स्वाधीन करायचं, लोकांच्या गर्दीत मुखदुर्बळासारखं मनातले कढ मनातच रीचवत रहायचं, तीनदा गणराय पाण्यातून पुन्हा पुन्हा दर्शन देतात, आणि चौथ्यांदा पाण्याबाहेर येते रीकामे ताम्हण, मनातला आनंद उत्साह रितं केल्यासारखं.

मनात किर्तनकारांचा आवाज येत रहातो “ गणराय येतात ते जगाचा क्रम जाणवून द्यायला, येणा-या जीवाला उत्पत्ती, स्थिती आणि शेवटी लय या चक्रातून क्रमाने जायचच आहे, कालांतराने पुन्हा नव्याने उत्पन्न व्हायला” मनात विचार चालू असतो आणि जडशीळ बेड्या अडकवल्यागत संथ गतीने अडखळत पावलं माघारी वळतात. आजुबाजूला चुरमुरे उधळत गजर घुमत असतो ” पुढच्या वर्षी लवकर या”

No comments:

Post a Comment