Saturday, 15 October 2016

कोजागिरी शाळा कॉलेजात पोटापाण्यापुरते मार्कस मिळायचे, जवळपास वरचे वर्गात ढकलला असा शेरा मिळाला नसला तरी क्याटेगरी तीच. त्या मागच्या न्यूनगंडातून असेल कदाचीत, पण स्कालर मंडळींशी सुत जमायचं नाही. म्हणजे राग आकस नसायचा पण जमघटटयात स्कालर मंडळी नव्हती हे खरच. एफवायला आमच्यात एक स्कालर यायला लागला. उदु जोशी. गोरंगोमटं, कॉलेजला पहिल्या तीनात, मीतभाषी उदु जोशी. त्याला कटवायचं डोक्यात असायचं पण गोची एकच, नम्र स्वभाव. कटवायचा तरी कसा? एक दोनदा गडबड आहे, अलाण्या फलाण्या ठिकाणी जायचय सांगून कटवला . पण थापा मारतोय कळूनसुद्धा उदु यायचा काही थांबला नाही. असंच जरा जरा थंडी पडायला सुरूवात झालेली, दोन लेक्चर्स करून कॉलेजमागच्या हिरव्या गवतावर बुडाला मऊशार गवताचं आणि टूचूपकन बोचणा-या खड्यांचं सुख देत फतकल मारून बसलेलो. लोकल माधु-या, शिल्प्या, किम्या बघत कुठल्यातरी रटाळाचा विषय फुलवायचं कामं करणं चाललं होतं. आणि उदु आला. खिशातनं रूमाल काढला झटकला ,खाली पसरला न बसला. आमचं रटाळ फुलवणं चालूच मधेच बोलला “ आजचं प्लानींग काय आहे “ प्रश्न ऐकताच साठया खुलला त्याचं टाळं खडखडलं “ ह्या ह्या ह्या, गोलगरगरगीत बघण्यात आयुष्य खपतय, लेका फ्यामीली येऊ तर दे मग करू प्ल्यानींग “ “ते तर आहेच साठे, आज कोजागिरी , रात्री याल का घरी ,त्यानिमित्तानं घरच्यांशी ओळख होईल. आणि आपली आपल्याला मजा करता येईल.” चक्रावून चक्कीत जाळ झाला राव. स्कालर बोलवतय जायचं तर अडचण , त्यांच्या “मजा” काय असणार ? नाही जावं तर स्कालरला वाईट वाटणार. पण शेवटी होय नाही करत जायचं ठरलं. गेलो. घरी स्वागत केलन उदुच्या आईबाबांनी, घरातलं वैभव बघून नाही म्हंटलं तरी झक मारल्याचा फील यायला लागलेला. पण अगदी दोस्तीखात्यात काकांनी ओळखी करून घेतल्या. राव उदुपेक्षा काकाच जवळचा वाटायला लागला. काकूंनी मार्कांचा विषय आडून काढताच, आमच्या प-या नी सांगून टाकलं “काकू उदय ला आम्ही स्कालर समजतो एवढचं पुरे” त्यावेळेस करंदीकरसुत प-याबद्दलचा आदर अमाप झाला. आणि प-याकडे काकांनी टाकलेली नजर, निव्वळ सुरेख, मुर्डेश्वर पाटील मास्तर , मुरडा पोटात साचलेल्या आवाजात ‘अब्द अब्द साठते मनी ‘ वगैरे सीमा के उस पार का काहीतरी बोलायचं ते झर्रकन आठवलं. काका का स्माईल था ही बढीया. उदु प्रकटला, मंद सुवास दरवळला, बाबांना म्हणाला बाबा जातोय हं वर, आईनेही रूकार भरला अन उदुच्या मागे आम्ही निघालो. थेट इमार्तीच्या गच्चीत. साला काय नजारा , गच्ची ही येवढी मोठी , हवेशीर , आणी डोळ्यातली बुब्बुळं तरंगलीच, स्टाईल्स असतात नां? त्या स्टाईल्सच्या तुकड्यांनी गच्ची सजवलेली, दुधाळ पांढ-या कल्लरचे तुकडे ,त्यात ढग सोडून उरलेलं निळं आकाश असतं त्या कल्लरचे तुकडे, आल्टून पाल्टून , आणि कोजागिरीचा लखलख ,पूर्णबिंब चंद्र वर्ती न त्याच्या चांदण्यानं लखलखणारे, खाडीच्या किना-यावर निवांत असल्यासारखं वाटवणारे स्टाईल्सचे तुकडे (मुर्डेश्वरांचेच काही शब्द, प्लस आमचं मराठी ) आम्ही दोस्त यारांच्या सात पिढ्यात नजरेला आलं नसेल ,असलं पावलं गचकन रूतावीत असलं काहीतरी हंथरलेलं, आणि आयशप्पथ , इमार्तीच्या आस्पास असलेल्या बुचाच्या फुलांचा गोsssssड वास, बस्स , कुशावर्तात बुडी मारल्यासार्ख सुख. उदुबरोबर भारावल्या रात्री मनसोक्त भसाडलेल्या, दिलखोल आवाजातली गाणी, त्याला उदुने दिलेली तालानुरूप झंकाराची साथ (उदु मनमें बस गया राव, हे किडू असं असेल ठाऊक्कच नव्हतं) झक्क झक्क मनमुरादलो काका काकू कधी आले, कळलच नाही , एवढच आठवतं काकूंचा गोड आवाज ,उदुची गीटारावर तोल संभाळणारी साथ मी ही दिल खोलके लावलेला आवाज आणि काकूंच्या आग्रहावरून ठणठणीत जमवलेलं, कैवल्याच्या चांदण्याला, परत तो सुर लाग्ला नाही पण ह्याच आठवणींवर जगायचं ना ....................................... जरा जरा लिहीण्याचा टेम्पो बदललाय, लिहायची सवय होती कुणाला, मान्यय , तेव्हां हे काही क्षण लाभलेत, पण असलं काहीतरी आठवतय, ते सर्वांगसुंदर आहे, अश्याच आठवण करण्यासारख्यां तुम्हालाही लाभोत

Monday, 10 October 2016

श्री तात्याकाकांचीच चर्चा चालली होती. डॉक्टरनी छत्तीस तासाची दिलेली मुदत उलटूनही अठ्ठेचाळीस तास उलटून गेले होतेे. गल्लीतलं धाक वाटावा, आधारही असावा असे तात्याकाका. घारे गोरे , संस्कृत स्तोत्रे शेकड्यानी पाठ, इंग्रजी फर्डा, शिक्षकी पेशा, अडल्यानडल्यासाठी भिक्षुकीही करणारे, सतत वाचन चाललेलं , स्मरणशक्ती तल्लख, तापट वाटायचे पण कुणाशी भांडताना बघितलेले नाही. नजर इतकी भेदक की आर्या अपार्टमेंटच्या बेसमेंटमधे तीन पानी सुरू झालाय कळल्यावर तात्याकाका फक्त तिथे गेले आणि कोण कोण आहेत त्यांच्याकडे एकदाच बघून, अवाक्षर न उच्चारता परत आले, पण तीनपानी बंद झालं ते आजतागायत बंदच आहे. मंगलकार्याचे आमंत्रण घेऊन गेलं की यशस्वी व्हा ,मंगल होईल सगळं , हा ठरलेला आशीर्वाद, घेणा-याच्या अंगात उर्जा निर्माण करून जायचा. बाकी बोलणं नसायचं पण अश्यावेळेस नेहरूशर्टाच्या खीशात हात जायचा, हाताला येईल ती नोट बाहेर निघायची आणि आशीर्वादाबरोबरच सुहास्य मुद्रेनं समोरच्याला दिली जायची. चार महिन्यापुर्वी पाय घसरायचं निमित्त झालं , खुब्याचं हाड मोडलं , तात्याकाका अंथरूणाला खिळले. दुखणं बळावत गेलं, दुखण्यापेक्षा परावलंबीत्वाच्या भावनेनं तात्याकाका मनातून खचले. चार दिवसांपासून फक्त लिंबूपाणी चमच्या चमच्याने भरवणं चालू होतं, अंगातले त्राण संपलेले. बोलणं ही बंद झालं ताकद कमी पडत होती. उजव्या हाताची तर्जनी हालत होती तेवढीच हालचाल, कळत होतं ते नजरेवरून समजत होतं, गल्लीवर अवकळा पसरली होती. सकाळपासून तात्याकाका ओठ हलवत होते काहीतरी सांगायचं होतं , पण नियती …. आमची तीच चर्चा चालू होती , काय हवं असेल तात्याकाकांना, सुन, मुलगा, नातू सगळी आली होती. समोर होती पण नक्की काय हवय त्यांना कळत नव्हतं इतक्यात श्री आला. पल्सर स्टँडला लावायच्या पद्धतीवरूनच कळलं स्वारी “कार्यक्रम” उरकून आलीय. वडिलोपार्जीत शेतीचं बक्कळ उत्पन्न , शेयर्सचा किडा , नोकरी धंद्याची गरज नव्हतीच. शेयर्समधून उत्पन्न चालूच , व्याजानं पैसे देतो माहिती कळली होती. श्री त्यामुळे दुपारनंतर रंगातच असायचा, अपवाद संकष्टी, बुधवार, शनीवार संध्याकाळ ह्या तीन वेळेस श्री व्यवस्थित असायचा. बुधवार , शनीवार संध्याकाळचा दोन तीन तास जायचा कुठेतरी नक्की कुणालाच माहित नव्हतं. दारू सोडली तर माणूस सरळसोट होता, तांबारलेले डोळे गैरसमज करून द्यायचे हे नक्की. गल्लीत मंडळाचे कार्यकर्ते वर्गणीला गेले तर मुंहबोली वर्गणी मिळायची. तेवढाच त्याचा संबंध , बाकी दिसायचा नेहमी पण आपल्याच रंगात. श्रीनं पल्सर लावली, त्याच्या लक्षात आलं आम्हा चारपाचजणांच्या चेह-यावरचे भाव कळले की काय देव जाणे , पण श्री निमूट शेजारी येऊन उभा राहिला, खाडीलकरांना विचारलं जड जिभेनं काय झालय ?, बारीकशी आठी आलीच खाडीलकरांच्या कपाळावर , दर्पानी, पण सांगीतलं श्री ला. अरे तात्याकाकांचं अवघड झालय, काहीतरी सांगायचय ,ओठ हलतायत पण कळत नाहीये , कशात तरी जीव अडकलाय त्याकरता जीव सुटत नाहीये, त्यांचं बघवत नाहीये रे. श्री विचारात पडल्यासारखा दिसला. पाच दहा मिनीटे गेले तशी माझ्या खांद्यावर हात ठेवत श्री नजरेत नजर मिसळून म्हणाला, जोशीकाका , चल वर , भेटूया तात्याकाकांना. मी अचानक बोलण्याने हादरलो, आधीच तात्याकाकांच्या नजरेचा धाक होताच, आणि श्री लोड होता. त्या वातावरणात काय घडेल सांगता येत नव्हते, इतक्यात श्री म्हणाला , चल वर, शप्पथ तात्याकाकाला वाईट वाटेल असं काहीच करणार नाही. त्याचा संथ शब्दातला ठाम विश्वास जाणवला, खाडीलकर ओकांना चोरट्या नजरेनी इशारा केला आणि श्री ला म्हटलं चल. वर जायच्या आधी पार्कींगच्या नळावर तोंडावर पाण्याचे हबके मारलेन श्रीनं, चुळा भरल्या खळखळून , आणि पॉकेटमधून खैनीची एक चिमूट गालफडात सरकवून श्री निघाला, मी मागून. खाडीलकर ,ओक माझ्या मागे. एक वेगळाच भाव दिसत होता चेह-यावर . तात्याकाकांच्या खोलीत शिरतानाच म्हणाला, जोशीकाका तू विचार काकांना काय हवय? दडपण बाळगत आत गेलो , तात्याकाकांची नजर वळलीच, तात्याकाका तुम्हाला भेटायला श्री आलाय , बघा , तुम्हांला काही हवय का ? तात्याकाकांचा मुलगा न्याहाळत होता श्री ला. खोलीतली माणसांचीही वेगळी परिस्थिती नव्हती. तात्याकाकांनी मला ओळखलं , त्यांचे ओठ हलायला लागले , तर्जनी थरथरत होती, माझ्या डोळ्यातून अश्रू केव्हा बाहेर पडले कळलच नाही, अगतीक झालो होतो. तात्याकाका काहीतरी सांगतायत पण आपल्याला कळत नाहिये. दोनेक मिनीटं गेली असतील. तात्याकाकांचे ओठ हलणं बंद झालं, त्यांची नजर माझ्यावरच रोखलेली होती, मागून श्री पुढे आला. तात्याकाकांच्या पालथ्या हातावर त्यानी हात ठेवला, दोघांची नजरानजर झाली, श्री चे शब्द आणि दर्प एकदमच आले. तात्याकाकांच्या नजरेत झालेला बदल जाणवला सेकंदभर आणि श्री उद्गारला तात्याकाका, निर्वाणषटक म्हणूयात का ? चारच शब्द, तात्याकाकांच्या भूवया ताणल्या गेल्या ओठ हलले , आणि शांत , संथ आवाजात श्री नी सुरूवात केली मनोबुध्यहंकार चित्तानी नाहं । न च श्रोतजिव्हे न च घ्राणनेत्रे । न च व्योमभूमी न तेजो न वायु । चिदानंदरुप शिवोहं शिवोहं ॥ तात्याकाकांचे ओठ आता हलताना कळत होतं , श्री बरोबर ते ही म्हणतायत. खोलीत सगळीच भारावल्यासारखी श्री ला साथ देऊ लागली. तात्याकाका आणि श्री दोघांच्याही डोळ्यातून पाणी झरायला लागलं . अहं निर्विकल्पो निराकार रूपो । विभर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां । सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंध । चिदानंदरुप शिवोहं शिवोहं एवढं श्री च्या तोंडून ऐकलं आणि तात्याकाकांनी डोळे मिटले पुन्हा न उघडण्यासाठी. प्राणपाखरू मुक्त झालं. श्री खाली आला , ओक्साबोक्सी रडत होता. मधेच बोलला, काका , देवानं सगळी सुखं दिलीत , पण माझी बहिण मुकी आहे रे , अपघातात वाचा गेली. तिच्या ओठांच्या भाषेत बोलण्याचा आज तात्याकाकांना उपयोग झाला, त्यांची इच्छा पूर्ण झाली. नियती फार फार करते, करवून घेते. त्याच्या पाठीवरून हात फिरवीत राहिलो, दोघांचेही उमाळे सुरूच राहिले.

Sunday, 9 October 2016

नवरात्र आणि नवरत्न स्थळ - पंचरत्न हॉटेल, वेळ सव्वादहा , साडेदहा, वेटरनी ईडली चटणी, वाफाळतं सांबार समोर आणून ठेवलय ईडलीचा पहिला घास मुखी पडतोय तोवर शेजारच्या टेबलवर पन्नाशीपार, शोल्डरकट, पंच्याएशी किलो आसपास, मोरपंखी भरजरी साडी, पर्स संभाळत हाशहुश करत, अँक्टीव्हाची किल्ली टेबलवर टाकत बसतात. वेटरला ऑर्डर जाते , पर्सस्थापित मोबाईल हातात येतो बोलण चालू. अगं हो हो, गाडीवर होते, येतेस का नवरत्नला? अग मी आलेय, नाही नाही जेवण नाही नाष्टा नको का गं, सकाळपास्नं मरमर चाललीय, ए अगं तेच गं पंचरत्नच मी केव्हा म्हणाले नवरत्न, बरं , येतेयस का ? सकाळी पप्या कॉलेजला गेली ( माझा घास अडकला, पप्या गेली ??) तिला डबा दिला , मग ह्याची तितीर पितीर, त्याचं सगळं आवरून दिलं न जरा मोबाईल घेतला, अय्या अगं विसरलेलीच मी मोरपंखी, वेळेवर मिळेना, कुठे ठेवलीय कुणास ठाऊक , पप्याला कितींदा ओरडून झालं , आवरावं न माझंही कपाट पण मग कॉलेज आठवतं गधडीला.तर मी काय सांगत होते , मोरपंखी नाहीच , हं हं नाही गं मी तो फापटपसाराच ठेवला नाहिए. दिवा लावा, तेल बघा , घरी असते घरकोंबडी तर केलं असतं नवरात्र रीतसर, पण ड्यूटी करतेय नं? कसं जमणार सगळं , हळदीकुंकू ,फूलं वहायची न नमस्कार करायचा सासुबाई म्हणतातच नाहीतरी भाव तेथे देव , ते जाऊ दे गं मी काय सांगत होते , अप्सराचा सेल लागलाय परवाच पाहिलं होतं नं, जाऊन आले , इतकी क्यूsssssट मोरपंखी मिळालीय, बनारसी गं, पाठवतेच तुला व्हॉटसअपला, पण रेंज नाहिये हं तुला परवडणारी. साडी मिळाली , हरभट रोडला येताना वेणी आणलीचे, आता डीपी चेंज केला की झालं , खुटखुट लागली असती गं मनाला. ए अगं ईडली आलीय, येतेस का? बरं बरं ठेवते हं , पुन्हा दिवसभर सवड नाही मिळणार कामात असले की , ठेवते गं बाssssssय ईडलीआस्वादअधाशीपणा सुरू. ………………............... स्थळ - वॉचमनची पत्र्याची शेड, वॉचमनला हाक मारल्यावर त्याची बायको बाहेर येते, वॉचमन बाहेर गेल्याचे सांगते. मावशी मी येऊन गेलो म्हणून सांगा, फोन करा म्हणावं असं बोलतो तोवर मावशी बोलतात काका नवरत्न हाय दर्शेन घिऊन जावा. निमुट चप्पल काढतो, पोरगं पाणी आणून देतं, पाय धुऊन चुळ भरून, शेडमधे जातो. बारा बाय दहाचा संसार, तिथेच पोत्यावर अंथरूणाची घडी घातली जाते बसायला सांगितलं जातं. लक्ष डावीकडे जातं. लाकडी चौरंग, वर कापडाचा खण , त्यावर कलश, कलशासमोर देवीचा वीतभर मापाचा पितळी नथ घातलेला मुखवटा, समोर देवाचे, मल्हारीचे टाक, कलशामागे देवांचे फोटो, कर्नाटकी नाव लिहीलेली, चौरंगाच्या चारी बाजूला, म्यागी सॉसच्या बाटल्यांना , पतंगाचे कागद रबरब्यांडने गुंडाळून चार चार मोरपिसं खोवलेली, ओंजळभर खळगीचा दिवा, तेलवात, देवीला मोग-याचे गजरे वाहिलेले. दर्शेन घेतो. बेसनाचा लाडू आणि पुरी मिळते प्रसाद म्हणून, पोरगं बघत असतं मी काय काय करतोय, चहाचं आधण चढवलं जातं स्टोव्हवर. मावशी चहा देतात, मला कपात, मुलाला फुलपात्रात निम्मा, मावशी , तुम्ही घ्या की , नाय , आमचं उपास असतं, नऊ दिवस पाणी फकस्त. फक्त पाणी? मग कामाला सुट्टी की काय? नाय वं , परवडत नाय, सक्काळची चार घरां , ब्यांक, लादी फरशी धरलीय, सांजच्याला दोन घरं धुनीभांडी. कराया होवं. पण जमतं का सगळं ? देवी हाय काळजी कराय, देवीचं गानं म्हनायचं आन शंबर आन आठ येळेला कुक्कू घालायचं देवीला, नंतर तेच कुक्कू लावायचं , मंग तरास नाय होत. नऊ दिवस देवीसाठीला खानं सोडायचं, वरीसभर कमी न्हाय पडू देत. उठलो, एक चिक्कू आणि केळं हाती पडलं , आजींना परसाद द्या , तुमचा निरूप सांगतो , ह्यांस्नी, येत जावा काका. मी निघतो. सण एकच नवरात्र आणि नवरत्न

Monday, 26 September 2016

फुलपाखरू फुलपाखरू आलंय, ऑफीसच्या दरवाज्या बाहेरच्या पँसेजमधे. फुलपाखरू आपल्याला नवीन नाही. काही तरी नवीन बघतोय असंही नाही. फुलपाखरं , त्यांचे रंगबिरंगी पंख एका क्षणात मोहवून टाकतात. आत्ताचं आलेलं फुलपाखरू हळदी पिवळ्या आणि काळ्या रंगाचं आहे. लोभसवाणं दिसतय. मधूनच पंख मिटून ध्यानस्थ योग्याप्रमाणे शांत, अविचल, स्तब्ध होतय, तर मधूनच एखादी गिरकी मारतय खिडकीच्या काचेपाशी. काल रात्री आलं असेल उडत उडत. आता दोन दिवस हे इथेच थांबेल, मग आणि एक फुलपाखरू येईल. दोघं गिरक्या मारताना दिसतील. तिस-या दिवशी दोघही उडून जातील. हे असच घडेल असं वाटण्यामागेही कारण आहे. गेली दहा अकरा वर्ष ही घटना घडत आहे. साधारण पितृपक्ष निम्मा सरला की तिथपासून नवरात्रीच्या तिस-या माळेपर्यंतच्या काळात ही फुलपाखरं बरोब्बर येऊन जातात. दर वेळची जोडी वेगळी.सर्वात मनमोहक जोडी गर्द निळ्या रंगाची, पांढरे ठिपके असलेली बघितली. वास्तविक पहाता जशी उडत येतात तशीच लगेच जाऊही शकतात. पण असं होत नाही. दोन दिवस एक फुलपाखरू, तिस-या दिवशी दोन फुलपाखरं , नंतर निघून जातात. आजुबाजूच्या बिल्डींगमधे विचारून बघितलं अशी फुलपाखरं तुमच्याकडे येतात का ? नन्नाचा पाढा. कुतुहल आहे मनात , नेमकी ऑफीसात , नेमक्या काळात येतात अन जातात, प्रश्न पडतो इतर दिवसात कधीच नाही मग आत्ताच कशी ? प्रश्न तसाच सोडून द्यायचा. आता तीन दिवस फुलपाखरांचं लोभसवाणं बागडणं दिसत रहाणार. बघूया या वर्षीही हा क्रम तसाच चालू रहातोय का ?

Sunday, 11 September 2016

नविन ब्लॉग साधारण पंधरा दिवसापुर्वी एका भगिनीने माझ्या लिखाणाची स्तुती केली होती. आवडलं बिचारीला. ज्याची त्याची आवड आपण काय बोलणार, तर तीने एक पिल्लू सोडलं “भावा, तु ब्लॉग बनव स्वतःचा”. मी उडलोच जागेवर. “ब्लॉग ? बयो तुझ्याइतकी नसली तरी थोडीफार भटकंती मी ही करतो , फेसबुकावरची मंडळी संग्राह्य पोस्ट ब्लॉगवर शेफ डिपॉझीटला टाकून ठेवतात ते माहितीय गं, पण त्या पोस्ट संग्राह्य असतात, ते महत्वाचे, काहीतरीच काय , ह्या उगा पिल्लू सोडू नकोस “ तीलाही पटलं असावं , नाद सोडला. कालचीच गोष्ट, इनबॉक्सात पिंग झालं, बघितलं तर , लायका मारणारी एक फ्रेन्ड ऑनलाईन. हाय, हलाव, j1 zale ka, वगैरे उपचार पार पडले. माझ्या मित्रयादीतल्या एका मित्राला बरोबर घेऊन शुन्य सेकंदात, तीनं ग्रुप केलान चँटींगचा. ती -“जोशी , तुम्ही फार सुंदर लिहीता” मी - स्माईली ( दोन्ही गालफडात फुलचंद कटींग चे कटींग तोबरे भरल्यावर, मुखरस ओघळून खाली येऊ नयेची काळजी घेत कसनुसं हसतात तस हसू दाखवणारी ) “ अहो, खरच” “ सुचेल तसं लिहीतो हो ( बाई बाई मन मोराचा कस्सा पिस्सारा फुलला- मनात)” “ हे सुचणंच महत्वाचं, यु नो “ मधेच तो - “करेक्टाय” “ जोशी , माझं एक म्हणणं ऐकणार का?” “बोला” “मी तुमच्या पोस्ट वाचते, खूप खूप आवडतात वाचायला, मराठीचं नॉलेज आहे तुमच्याकडे” “हं ( खंदारे सर , रत्नपारखी बाई, क्षमा करा या लेकराला , कां की ती जी काही बरळते आहे तीची तीजला कल्पना नाही -मनात) “ तुमच्या पोस्ट शोधून शोधून वाचते मी” मधेच तो - “ करेक्टाय” “ काय करेक्टाय ?” “जोश्या तुझ्या पोस्ट शोधायलाच लागतात, कुणाच्या खीजगणतीतही नाहीत, ह्या ह्या ह्या” ( मोराचा पिसारा झडून आता लांडोर झालेली असते) “ ये काय रे ? “ नंतर अनाकलनीय दोन स्माईली. “जोशी माझं म्हणणं ऐकाच, प्लीज रिक्वेस्ट आहे माझी “ “ बोला” “प्लीज तुम्ही ब्लॉग सुरू करा नं “ “ अहो एक तर ब्लॉग करावा असं काही विशेष नाही माझ्या लिखाणात” मधेच तो - “ करेक्टाय” ( रागानी निळंजांभळं थोबाडाच्या स्माईली मनात तरळून जातात, संभाषणात येत नाहीत) “ तसं नव्हे हो जे काही लिहीताय ,ते आम्हांला, आय मीन मला अगदी दीपस्तंभासारखं मार्गदर्शक ठरेल . ते एकत्र वाचल्यावर जो आनंद मिळेल त्याला तोड नाही, प्लीज ही विनंतीवजा रिक्वेस्ट समजा” “खीक” - मधेच तो “ पुन्हा बघाना, ब्लॉगवर एका ठिकाणी लेखन राहील तुमचं , पुनःवाचनाचा आनंद तुम्हालाही मिळेल “ “ अहो आत्ता वाचताय ना माझ्या वॉलवर झालं की मग “( आयला नस्तं लचांड, ब्लॉग करायचं , माहीती नाही कसा करायचा ,बोंबाबोंबेय सगळी) “ बघा बघा विचार करा जोशी, बाळासाहेब मंगेशकरांना कुठे माहिती होती पंचवीस वर्षानी त्यांनी संगीत दिलेली गाणी मराठी गाण्यात अरजामर होतील” तो मधेच- “ खीक खीक अरजामर नाही, अजरामर” दुर्लक्ष करीत ती - “ तसच तुमच्या लेखनाचं आहे , जोशी , तुम्हांला कल्पना नाही तुम्ही काय लिहून ठेवलयत” तो- “मलाही कळत नाही काय लिहीलय” “ जोशी मी कळकळीनं सांगतीय तुम्ही मनावर घ्याच” पुढची सत्तेचाळीस मिनीटे ती ची माझ्या लिखाणाबद्दल स्तुती, नाही म्हटलं तरी भारावून गेलो. आणि एका नेटकिड्याला गणेश नाष्टा सेंटरचा वडासांबार + मिसळ कॉम्बो ऑफर करून प्राथमिक माहिती घेतली. आणि केला ब्लॉग तयार. नेटकिड्यानी दिलेल्या माहितीप्रमाणे कागदावर लिहून दिलेली लींक का काय म्हणतात ती त्या दोघांना सेंडली. दोघांचेही रिप्लाय आले “जोशी तुम्ही इतके भंकस असाल वाटलं नव्हतं, किती बाळबोध ब्लॉग केलायत, सातवीतली मुलं पण बरा ब्लॉग बनवतील, ऐला वाचनाची ईच्छाच मेली”- ती ( नर्व्हस एक, वैताग एक अश्या दोन स्माईली ) “जोश्या अभिनंदन, ब्लॉग कसा नसावा ह्याचं वस्तुस्थितीनिदर्शक उदाहरण असलेल्या ह्या ब्लॉगची लींक पाठवल्याबद्दल. हे निव्वळ तूच करू शकतोस, कितीक लोक्सवर सूड उगवायला ही लींक सेंडता येईल, खी:खी:खी: , ख्या ख्या ख्या “ दुसरं कोण असणार तो च तात्पर्य - ज्याला जसं घ्यायचं तसं घ्या वैत्तागाने काहीही बोलण्याच्या पलीकडे गेलोय

Saturday, 10 September 2016

नृसिंहजयंती नदिवर डूंबणं, नेहरू गार्डन किंवा शिवाजी गार्डनमधे खेळणं , आत्ये मामे मावस भावंड भेटणं , आंबे कलिंगड आणी दुपारी ए आले लिये वाले लाये मलायवाले कुल्फीये असली अगम्य आरोळी मारणा-या कुल्फीवाल्याची मलई किंवा मॅगो कुल्फी खाणं हया सगळया आनंदाच्या गोष्टी घेऊन मे महिना यायचा . याच मे महिन्यात अण्णा आज्जीनी आठवण करून दिली की साने गुरूजींकडे जाऊन यायचे नृसिंह जयंतीच्या पाठाचे निमंत्रण करायला. आमचं कुलदैवत लक्ष्मी नृसिंह . नृसिंहजयंतीला घरी शांतीमंत्राचा पाठ व्हायचा. आधीच्या रविवारी घरातली बैठकीची खोली सारवून घेतली जायची. खिडक्यांच्या काचा ओला खडू फिरवून नंतर ओल्या आणी कोरडया वर्तमानपत्राच्या कागदानी लख्ख केल्या जायच्या. नृसिंहजयंतीला सकाळी बाजारातून कै-या आणायच्या. पण त्या साखरांब्यासाठी खोबरी कै-या आणायच्या तशा नाहीत. कैरी कांदाच्या कोशींबिराला लागतात तश्या आंबट गावठी कै-या. काळाराम मंदिराजवळ आणि तिळभांडेश्वराच्या आवारातल्या दोन्ही काळया पत्थरातील सर्वांगसुंदर लक्ष्मीनृसिंहांचं दर्शन घेऊन यायचं . आज दोन्ही मुर्तींना चांदिचे डोळे. मिशा आणी जीभ लावलेली असायची. ती शोभा वेगळीच , उग्ररूप एकदम शांत घरातल्या वृद्ध मंडळींसारखं आर्शिवादी रूप वाटायचं. घरी दुपारची जेवणं होऊन तासभर आडवारलं की चहा घ्यायचा आणि तयारीला लागायचं. पलंगाखालची अर्धी जागा व्यापणारी पेटारावजा ट्रंक बाहेर निघायची. त्यातून रंगीत नक्षीकाम केलेलं जाजम बाहेर काढलं जायचं . सणावाराची ठेवणीतील बेडशीटं उश्यांची कव्हरं बाहेर निघायची. चांदीच्या वाटया ग्लास तबक ताम्हन पळीपंचपात्र सगळं चांदिचच देवाकरीता काढलं जायचं . हो आणि अत्तरदाणी गुलाबदाणी पण यायची बाहेर. पूजेची उपकरणं अण्णा उजळावयाचे बाकी आम्ही लहान मुलं उजळवायचो. स्वैपाकघरात कै-या उकडणं आणी किसणं चाललेलं असायचं . मधेच लुडबूडत गूळ चिरायला माझा हटट, ( नजर चुकवून एक दोन खडे गटटम) मग गुळ वेलची आणी मोग-याच्या फुलांचा वास असलेलं माठातलं पाणी घेऊन छोटं पिंपभरून पन्हं तयार व्हायचं. अण्णांचा जुना पंचा ओला करून पिळून पिंपाला गुंडाळून ठेवला जायचा. किसलेली कैरी भिजवलेल्या डाळीबरोबर मिरच्यांच्या संगतीने डाळीच्या कोशींबीरीत परावर्तीत व्हायची. वरून चर्र फोडणी काश्याच्या पळीने आणि बारीक चिरलेली कोथिंबीरीची पखरण सर्वात शेवटी. देवाचा नैवेद्य तयार. सहाच्या दरम्यान अण्णा स्नानसंध्या करायचे. आम्ही नव्या कपडयात . आजी आई दागीन्यात. मग एकेक करीत गुरूजी यायचे, नऊ किंवा अकरा. आल्यावर प्रत्येकाची पाद्यपूजा , तांब्याच्या परातीत पायावर दूध पाणी घालून स्वच्छ पुसून कपाळी गंध आणी पायावर गंधांची स्वस्तीके काढली जायची. गुलाबदाणीतून गुलाबजल उडवले जायचे . सुवासीक मोगरा अत्तर फुलाने लावले जायचे . मग पंचोपचार पूजा देवाची . डाळ पन्ह्याचा नैवेद्य दाखवला जायचा . चंदन उदबत्ती आणी मोगरा अत्तराचा सुवासाने वातावरण प्रसन्न व्हायचे. आणि मग गुरूजींचे मंत्रपठण सुरू व्हायचे. पखवाज वाजवताना धिम्या लयीतला पखवाजाच्या घुमा-याशी नातं सांगणारं धिम्या लयीतलं मंत्रपठण . हळूहळू आवाज चढू लागायचे . काही मंत्रानंतर पाच पाच जणांचे गट पडायचे एका गटानी साद दिल्यासारखा मंत्र म्हणला की प्रतिसादाला दुस-या गटाचा मंत्र. समुद्राच्या लाटा जशा किना-यावर एकापरते एक याव्यात तश्या मंत्रोचारांच्या लाटा एकापरते एक यायच्या. तो नाद तो सुवास मंत्रपठणात होणा-या हातांच्या आणी मस्तकांच्या ठेक्यातल्या हालचाली एका वेगळयाच विश्वात घेऊन जायच्या. शेवटी सर्व गुरूजी एक एक शब्द लांबवण्याची शर्थ करीत असत आवाज टिपेला पोहोचलेले असतं . गळयाच्या शीरा तटतटलेल्या असत. ऐकताना अंगावर रोमांच उभे रहायचे मंत्रपठण संपल्यावर दोन मिनिटं सगळेच स्तब्ध निश्चल, एका तृप्त आनंदात नंतर गणपती देवी आणी नृसिंहाची आरती व्हायची. आरतीला वाडयातली सगळी गोळा व्हायची . आरतीवरून हात फिरवून डोक्यावरून फिरवताना जे काय वाटायचं ते शब्दात नाही सांगता येणार आरतीनंतर गुरूजींना आग्रह करकरून डाळ पन्हं द्यायचं त्यांचं झालं की बाकी सगळी प्रसाद घ्यायची काळ सरत गेला तशी मंत्रपाठ म्हणणारे गुरूजी कमी होत गेले शेवटच्या वेळी पाचच गुरूजी आले. नंतर फक्त देवळात अभिषेक करायला लागलो मात्र प्रत्येक नृसिंहजयंतीला आनंद सोहळा आणी समाधानानी तृप्त झालेला अण्णांचा चेहरा आठवल्याशिवाय रहात नाही

फादर्स डे सात वर्ष झाली या गोष्टीला. सांगलीत आल्यावर कामानिमीत्ताने त्यांची ओळख झाली. सुरूवातीला सर म्हणून हाक मारायचो. माणूस दिलदार जिंदादिल. वयानं नउ दहा वर्षानी मोठे. पण स्वतःच्या हिंमतीवर, कुणाचही पाठबळ नसताना व्यवसाय उभा केलेला , अनूभवाने बाप माणूस. वैनीही तश़्याच हसतमूख. दादांना साथ देणा-या. ओळख झाली , गप्पाष्टकं झडू लागली. एका रविवारी सकाळी गेलो घरी, चहा झाला आणि दादांनी विचारलं कँरम बडवूया का ? मी कशाला नाही म्हणतोय, बसलो कँरम बडवत. दूपारचं जेवण, चहा तिथेच. चारपर्यत बडवला कँरम. थोडावेळ डूलकी , संध्याकाळी परतलो ते दर रवीवारी यायच्या बोलीवर. मग महिन्यातले दोन रवीवार मुक्कामपोष्ट तिकडेच. घरचाच मेंबर झालो. आनंदाचे किती क्षण मिळाले या कुंटूंबाकडून पुछो मत. दादांची मुलगी शिकायला पुण्यात होती. तिच्यामुळे नवीन नवीन गोष्टी कळायला लागल्या. वेलेन्टाईन डे ,मदर्स डे, दिवाळीत सगळ्यांनी कल्ला करत किल्ला बनवलेला मातीचा. आणी बरबटलेल्या हातापायांनी आणी हस-या चेह-याने फोटूसेशन. तीनंच सुचवलं, काका उद्या फादर्स डे आहे, मस्त सेलीब्रेट करूयात, आईबाबांना सरप्राईज. केली तयारी गुपचूप, बुके, एक झक्कास लेमन यलो कलरचा शर्ट , पावभाजी आणी आईस्क्रीम. संध्याकाळी दादा घरी आल्यावर सरप्राईज दिलं , तब्येत खूष. गलबलून आलं होतं दादांना, मुलाचे आणी मुलीचे काय करू अन काय नको झालेलं त्या रात्री जेवण झाल्यावर , दादा म्हणाले चल पुष्पराज चौकातून पानं घेऊन येऊ. जाताना सहज विचारलं दादा कसा काय झाला कार्यक्रम आवडला ना. गाडी साईंडींगला घेऊन दादांनी थांबवली. म्हणाले, सोन्यासारखी पोरं दिलीत रे देवानं, मी किती भाग्यवान आहे. माझ्या पोरांनी फक्त माझ्यासाठी काहीतरी केलं . शिस्त लावताना कठोर वागलेलं विसरून पोरांनी आनंदानी रडवलं , शहाण्या आणी तुही सामील होतास पोरांना. पण एक सांगू , आज मला जे भाग्य मला मिळालं ते माझ्या बाबांना नाही मिळालं , मी चौथीत असताना गेले ते, आता अंधूक आठवतायत. मी त्यांच्याकरता काहीच करू शकलो नाही. ऐकताना रडू फुटलं मला, आज फादर्स डे च्या दिवशी , नकळतपणे माझ्याकडून खपली काढली गेली. पण वेळ निघून गेली होती .सुटलेला बाण परत थोडीच येणार होता. वर्मी लागलेला बाण. त्यानंतर प्रत्येक वर्षी फादर्स डे ला शुभेच्छा देण्यासाठी जायचा विचार करतो, मोबाईल कडे हात जातो, आणि तिथंच थांबतो

देशस्थ असूनही गो-या वर्णाची, हिर्वट घा-या डोळ्यांची ,नाजूक जिवणीची , कमरेपर्यंत केसांची जाड घट्ट वेणी शोभून दिसणारी निशा. आवडलेल्या विनोदाला पुरूषी पद्धतीने गडगडाटी डोळ्यात पाणी येईपर्यंत मनमोकळं हसणारी निशा. बोलताना मर्यादा ओलांडली गेली की नजरेच्या धाकावर जरब बसवणारी निशा. वपु , पुल , गोनीदा, कोळून प्यायलेली, लालन सारंग, रणजीत देसाई, जयवंत दळवी, हमोंचे उतारेच्या उतारे घडाघडा पाठ म्हणून दाखवणारी निशा. मंगुअण्णा, यशवंत देव, बालकवी, कुसुमाग्रजांच्या काव्यात रमणारी निशा. मित्रयादीत जमा झाल्यावर ऑफीसातही अरे तुरे करणारी, नाना पाटेकरसारखा भडकू असल्याने  नाना असे नव्याने बारसं करणारी ,माझ्या चुकीच्या एंट्रीचा दैनीक भ्रमर करणारी, चारचौघांत शंख करणारी, पण बॉसनी दिलेल्या चुकीच्या मेमोबद्दल न दिलेले वकीलपत्र घेऊन माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून बॉसला मेमो मागे घ्यायला लावणारी निशा. कंपनीच्या गेटटुगेदरला बॉसला नाना तुमची नक्कल ए वन करतो अशी शिफारस करून बॉसचा “ यु नो नं यार आय ह्याव फायनान्शियल प्राब्लेम न बाबा, सो थिंक फ्रॉम माय अँगल ऑफ व्ह्यू “ त्याच्याचसमोर सादर करायचा प्रचंड टेन्शनच्या प्रसंगात मला ढकलून मज्जा बघत हसणारी निशा. डब्यातला पदार्थ कोक्स स्टाईल दिसला की अखंड डबा ओढून घेऊन, फस्त करणारी, आणि प्यूनला दोन वडापाव आणायला सांगून हक्काने ????माझ्यापुढयात ठेवणारी निशा. ऑफीस सुटल्यावर दिड दिड दोन दोन तास बॉसच्या शिंकरण्यापासून चांदवड नाशिक रस्ता दुपदरी करण्यापर्यंत कुठल्याही भंपक गोष्टींवर आम्हां त्रिकुटाशी वाद घालणारी निशा. कंपनीत ओव्हरटाईम झाला तर रात्री अकरा साडेअकराला घरी बोलावून पोटभर जेवायला घालून , कधी स्वत: तर कधी मला कॉफी करायला लावून खिदळत एंजॉय करणारी निशा. टिप्पीकल मध्यमवर्गीय घरात आई आज्जीला, नाना माझा दोस्त आहे, त्याच्याशी लग्न लावायचा विचार मी करत नाही, त्या लायकीचाच नाही ,तुम्हीही विचार करू नका, त्याला कानकोंडं करू नका हे माझ्यासमोर ठणकावून सांगून , मला एका संपूर्ण घराची मैत्री देणारी निशा. माझ्यासारखा चिंगूस पार्टी लवकर देणार नाही ठाऊक असल्याने क्याशीयर पाटलाला बोलाबोलात गुंडाळून माझ्या पगारातले १७० अँडव्हान्स माझ्या नावे टाकायला लावून स्टाफला माझ्या वाढदिवसाला  पाववडा, ढोकळा फाफड्याची पार्टीचं बिल फाडणारी निशा. माझ्या वन वे प्रेमाचा अपेक्षीत भंग झाल्यावर एखाद्या वडीलधा-यासारखं समजूत घालून नीट मार्गावर आणणारी निशा. आज्जी गेली तेव्हा दोन तीन महिने सैरभैर झालेली फक्त हातात हात घेऊन उमाळून येणारी निशा तिच्याच लग्नात निरोपाचा टाटा करताना आमच्या त्रिकुटाकरता घळघळून रडणारी निशा. फक्त मित्रांचाच सहवास  असणा-या मला मैत्री मैंत्रीणीचीही असते हे जाणवून देऊन माझं जगणं समृद्ध करणारी निशा. मैत्रीदिनाला तिला आठवायचं नाही तर कुणाला?

नेहरूचौकाकडून येणा-या उतारावरून जाताना मुर्तीकार लोंढयांच्या दगडी पाय-यांवर पणत्यांचा मंद प्रकाश दिसला की त्रिपुरारी/ त्रिपुरी पौर्णीमेच्या आनंदोत्सवाची सुरूवात व्हायची. दिवाळीपासून बोचरी थंडी जाणवू लागलेली असायची. गंगाकाठावर फिरताना गार वा-याने थंडी चांगलीच जाणवायची. उतारावरून खाली कपूरथळयाच्या मैदानात आलं की समोर गंगेचं पात्र उजव्या हाताला ठेवून रामकुंडाकडे जायला सुरूवात करायची. खंडोबाचं पाचसात पाय-या खाली उतरून दर्शन घ्यायचं , चहूबाजूनी पणत्या तेवत असायच्या. भंडा-याने माखलेला खोब-याचा प्रसाद घ्यायचा. रामसेतू पुलापाशी जाताना डाव्या बाजूला सत्तर पंच्याहत्तर फूट उंचीच्या संरक्षक कोठावरून जुने वाडे दिसायचे. प्रत्येक वाडयाच्या , घराच्या देवडीत पणत्या आणी समोर आकाशकंदील दिसायचे. एव्हाना अंधार पडून , पौर्णीमेच्या चांदण्याने आणी काठावरच्या हॅलोजनमुळे गंगेंचं पात्र चंदेरी छटांच्या लाटा मिरवायला लागायचं.रामसेतू पूलाखालून जाताना गंगेचा खळाळ आवाज कानावर पडायचा. पुढे चालत आलं की दहाव्याचा पिंपळपार, एरवी तेलाने माखलेल्या मारूतरायाच्या दर्शनाने भितीदायक वाटणारा. आज पणत्यांच्या उजेडात शांत मुद्रा धारण करून असायचा. त्रिपुरी पौर्णीमेला आज गंगेच्या दुतर्फा असलेल्या काळयाशार पत्थरांच्या देवळातून , समाध्यातून पणत्यांची रोषणाई बघायला मिळायची. नारोशंकर मंदिर , तालीम, गो-या रामाच्या पाय-या ,देव मामलेदाराची समाधी , त्यामागच्या वाड्यांच्या पन्नास पन्नास साठ साठ पाय-या , रोकडोबा तालीम , अहिल्याबाई व्यायामशाळेच्या पाय-या सगळीकडे मंद तेवणा-या पणत्या. नी मोठे दिवे. एकमुखी दत्तांच्या प्रांगणात पणत्या ठेवून ॐ 卐 समई, चक्र ध्वज गोपद्मे अश्या आकृत्या उजळवलेल्या असायच्या. गंगा गोदेचा खळखळाट ,बोचरं वारं , पायाखालच्या थंडगार कातळी फरश्यांचा स्पर्श, असंख्य दिवे पणत्यांच्या उबदार अस्तीत्वाने मनावर गारूड व्हायचं . किती पाहू न किती नको व्हायचं. रामकुंडावर आलं की समोर कपालेश्वराच्या पाय-या . पाय-यांच्या दुतर्फा दूई हाताच्या ओंजळीइतक्या आकाराच्या पणत्या, दोन दोन बोटं जाड वातींनी उजळवलेल्या. गंगेच्या खळाळणा-या पात्रात असंख्य श्रद्धाळू माताभगिनींनी सोडलेले पळसाच्या द्रोणांचे एकवाती दिवे तरंगत तरंगत पुढे पुढे जाणारे .अशातच गोदामंदिराच्या पुढे कंबरभर पाण्यात उतरलेले सुस्नात पूजारी आरतीच्या ताटात दोन्ही किना-यावरून दिसेल एवढया मोठ्या प्रमाणात कापूर पेटवून आरती सुरू करायचे " ओम जय जगदीश हरे , स्वामी जय जगदीश हरे , भक्त जनोके संकट , स्वामीजनोके संकट पलमे दूर करे , ओम जय जगदीश हरे". ताल धरत आरती म्हणताना पाय गंगा गोदेच्या पाण्यात .तीच्या प्रेमळ सहवासाने अवघ्या देहावर रोमांच उभे रहायचे . ती गोदामाता , ते भारावलेलं वातावरण , आणी काठांवर असलेल्या देवतांची ही देवदिवाळी संपूच नये असं वाटायचं

छोटूकाका. “मी काय सरणार होतो का मागेssss, जातोच म्हणालो मळ्यात” छोटूकाका सांगत होता आणि अण्णा, राजाभाऊ, आज्जी, संदीप आणि मी ऐकत होतो. आमचे अण्णा सत्तरीतले, छोटूकाका पाचेक वर्षांनी लहान, पण छोटूआबा ऐवजी सगळं घर छोटूकाकाच म्हणायचं, चारपाच दिवसातनं चक्कर मारणारा छोटूकाका आज सतरा अठरा दिवसांनी आलेला. तब्येतही चांगलीच उतरली होती. चांदवडला घरी गेलेला काका सांगत होता. तब्येतीची विचारपूस केल्यावर काका सांगायला लागला “अण्णा तुम्हाला सांगतोssssss, गायकवाडानं बोलवून घेतलेलं मला. विचारा कशाला ?” ही काकाची सवय काही अक्षरं उगीचच लांबवायची आणि मधून मधून प्रश्न विचारायचे, “ अरे मळ्याकडं त्याच्या कोणी फिरकेना काssssssय ?सुंदर स्त्रीची ईच्छा अपूर्ण राहिली तर मेल्यावर म्हणतात ना जखिण का डाकीण होतेssssssss, तशातला प्रकार, मळ्याकडं जाईना कोणी. अण्णा तुम्हांला सांगतोsssssss एकेक कथा, जखिण म्हणे रात्रीची फिरते मळ्याsssssssत , आता विचारा का ? तर दिसला जवान गडी की की येते जवळ , आणि बोलता बोलता हात धरते सांगत होताssssss गायकवाड, आणि दुस-या दिवशी गडी  खिळतोsssssअंथरूणाला “ अण्णा आपलं मधून मधून हं, हं करत होते. “गायकवाडाला काय ठाssssऊक , हा छोटूकाका रोकडोबा तालमीत तयार झालेला गडी, गायकवाडानं विचारलsssss तसं म्हणालो, मी काय सरणार होतो का मागेsssss” काsssssय , विचारा कशाला ? “ते कळलं रे, पुढे सांग” इति अण्णा “ पण सांगीतलं मी त्याला, लेका तमाम करतो तीचं काम, काsssssssय , फक्त भटाला जेवायला दे पोटभर , विचारा कशाला ? अरे काम मी करणार ,मग मिळायला नको काहीsssss.  खीरीचा बेत केलान, गायकवाडानं ,मसालेभात नका म्हणू, पु-या नका म्हणू, चौदा वाट्या प्यायलोय खीssssssssssssssssर , आणि मग गेलो मळ्यात” किर्रर्र रात्र, कळणार नाही डोळ्यात बोट घातलं तरी इतका अंधाssssssर , बसलो चिंचेखाली , विचारा कशाला?” “कशाला ?” “अण्णा, अहो जखीण ती, वड, पिंपळ , चिंच आवडीची ठिकाणंsssssss, तिथं येणार नाही तर कुठं ? खिरीनी अंमल चालू केलाssssssअंमळ, मग झालो लंबायमान तिथचं, विचारा आता पुढे काय झालंssssss?” रात्र वाढत चाललेली, भुंकत होती कुत्रीsssssss, मी निवांतच हो, येईना का , जराsssss डोळा लागलान, शेजारी चुळबुळ ऐकली, झटक्याsssssत झालो जागा.” “विश्वास बसेनाsssssss, का विचारा? अण्णा, अहो गायधन्यांची लिलु शेजारीsssssss” “चल रे बंडला नको मारू, खीर चढली असेल तूला” इति अण्णा. “शप्पथ अण्णा, सुटली म्हणाsssss, लिलुच ती, गोब-या गालाची, दोन वेण्यांची डेरेदाssssssर लिलु, रविवार कारंज्याच्या तिच्या घरावरून कितीदा मारल्यात चकराsssss, आता विचारा कशाला?” “ हं , छोटूकाका ,मी आहे इथं , चचले नाही, लक्षात ठेवा म्हंजे झालं, भर्कटलात तर चहात आलं पडणार नाही सांगून ठेवत्ये” आज्जीनी वेळीच आवर घातला.छोटूकाका मिशीतल्या मिशीत हसला. “हां , हां वैनी, कळ्ळं, तर लिलुच ती, मी तीला विचारलेssssss, इथं गं कशी?, प्रश्न विचारल्याचं बरीक सार्थssssssक झालं अण्णा, आता विचारा कसं काय ? तर अशी फक्कड लाजलीय म्हणता लिलु, आहाहा, म्हणाली छोटूssssssss एकांत रेsssss मिळणार नां. गुलाबीसर गाल आणि नाजुक ओठ , मी विरघळलोsssss” ( डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही अशा किर्रर्र अंधारात छोटूकाकाला लिलुचं एवढं सगळं कसं दिसलं असेल हा प्रश्न मनात आला तरी अण्णापुढं विचारायची टाप नव्हती ) छोटूकाका रंगात येऊन आख्यान सांगत होता “ किती वेळ बोलत बसलोssssss कळलच नाही, जीची स्वप्नं पाहीली होतीsssssss , ती अशी शेजारी, लिलु उठली थोड्या वेळानंssssss, म्हणाली चल की छोटू ,मी उठलोच लागलीच, दहा पावलं गेलो असेनsssssss तर तीनं माझा हात रे हातात धरलान गप्पकन, विचारा काय झालं असेल?” “काय झालं?” “चमकलोच मी, अण्णा, किसलेल्या बर्फासारखा हात थंssssssssडगार, क्षणात भानावर आलो, दिली आरोळी ‘जय बजरंगबली’ ‘पवनसुत हनुमानकी जय, पकडलं मनगट तिचंssss दुस-या हातानं, विचारा कशाला? “ दुस-या हातानं मनगट पकडल्यावर , हात पडला लुळा तीचाsssss, मोकळ्या हातानं वाजीवलीन फाट्टकर्न कानसुलात, आणिsssssss लिलुचा चेहरा बदलला, दह्याsssssssसारखा ठीक्कं पांढरा चेहराssssss, लाल इंगळासारखे डोळे , दात वाजवायला लागली कराकरा, संतापानं फुललेलीssssss” “छोटू , वाईट वागलास, घाsssssssस घेते म्हणत किंचाळली, थरकाप झालाsssss माझा , आता विचारा का ?, अण्णा आवाज ऐकला असता तर जीssssssव गेला असता तुमचाsssss, कायsssss?” “तुझा नाही ना गेला? पुढे…” “ती हिंस्त्र श्वापदासारखी गुरूगुरू लागली, अंगात ताकद आलेली माजलेल्या रेड्याचीssssss, मनगटावरची पकड मजबूत ठेवली होतीsssss , पण आवरेना, मग घेतले हनुमंतांचे नाव, गेलोssssss झपाट्यात पुढेsssss अन मारली करकचून मिठी” “छोटूकाका हं ssssss” आज्जीनं डोळे वटारलेच. “ तर काय सांगतोssssssss वैनी, मिठीतून सुटता येईना तीला, उसळ्या काय मारीत होती, पण दाद नाही दिली लागूssssss विचारा कशाला ? तर थोडी सैल सोडतोsssssतर मेलोच म्हणून समजाsssss, घ्या कशाला विषाची परिक्षा ? घामानं अंग थबथबलेलं पण सोssssssडली नाही जखिणीस , अडीच ताssssssस, पहाटवारं सुटलं तशी म्हणाली , छोटूकाका सोडा मलाsssss, पुन्हा नाही त्रास देणार कुणाला, एकदा फाट्टकर्न कानसुलात वाजीवलीन दिलंsssssss सोडून , अण्णा, काम केलं तमाम “ “ हां एक मात्र झालं , तिला पकडून ठेवताना ताकद संपली माsssssझी, गायकवाडानं पाय पकडले, म्हणालाssssss काय करू छोटूकाका तुम्ही सांगा मी करतो, आता विचारा काय मागीतलं मी ?” “काय मागीतलं ?” “ अहो अण्णा, काय मागणारsssss, खीरीचं जेवण जेवलो होतो ना? कामास आलो तोच आनंदssss, पण अशक्तपणा जाणवतोsssssय” त्या दिवसापासून छोटूकाका मला शूर वीर वाटायला लागला. प्रत्यक्ष जखिणीचं काम तमाम करणारा काका आपल्या अण्णांशी गप्पा मारायला येतो , ह्या अभिमानाने माझा चिमुकला ऊर भरून यायचा. दीडेक महिन्यानी गायकवाडकाका घरी आल्यावर विषय निघालाच, ठो ठो ठो हसत गायकवाडकाका म्हणाले,” चौदा वाट्या खीर खाल्ली पठ्ठयानी, पण पचायला नको, ढेंढाळत होता तीन दिवस, इज्जत जायला नको म्हणून चांगलीच कथा रचली, चांगला कथेकरी दिसतोय छोटूकाका, मानलं त्याला, माझ्या मळ्यात या एकदा अण्णा, दिसलीच जखीण तर पाठवू छोटूकाका कडे ख्यँ ख्यँ ख्यँ “

आताशा  वाटतं कुणी तरी आपल्याशी बोलावं, वेळ द्यावा,कुणाचे चिमणे बोल ऐकावे, पण वेळ कुणाला आहे इथे सगळी आपापल्या कामात, आता कामंही उरली नाहीत पहिल्यासारखी. आधी  नव्हतं असं, रानडे वाडा म्हणजे, दिवस कसा जायचा कळायचच नाहि, घरचीच पाच जणं,आणि वाड्यात , घाटे, बर्वे, कुलकर्णी, भातवडकर तीही घरच्यांसारखीच, सुधीरशी लग्न होऊन वाड्यात आले तेव्हा फुलांच्या पायघड्या काय, अत्तराचे फवारे काय, उखाण्यांचा कल्लोळ,दणाणला होता वाडा. सकाळी सडा घालतानाच बर्व्यांची सुलभा साद घालायची, रचना तर दुपारनंतर माझ्याकडेच असायची, चिव चिव चाललेली असायची दुपारच्या चहानंतर निवडणं टिपणात मदतही व्हायची. श्रावणात विचारूच नका, सणावाराला जेवणाचं एक सोडलं तर वाडा म्हणजे एकच घर होतं, जेवणाचं तरी नाही कसं म्हणायचं? एकमेकींचे मापटी, चिपटीने अन्न जायचेच की एकमेकींकडे. नांदतं गोकुळ होतं, घरात फक्त कान्हा तेवढा नव्हता. पुढे सुधीरचे न माझे बिनसले न सगळंच बदलत गेलं, मेहतांकडे सुधीर जायला लागल्यापासून , घरी पैसा खेळायला लागला, माझ्यावाटेला सुधीर यायचा तोही रात्रीपुरता. सकाळी आवरून बाहेर पडला की रात्री उशीराच घरी.आणि मधे भातवडेकरांच्या मधूने सांगितलं की सुधीर कुणाबरोबर तरी फिरताना दिसला, तशी मी सैरभैर झाले, बघितलं असशील दुस-या कुणाला म्हणून दिलं सोडून. पण चार पाच वेळा कानांवर आल्यावर कडाडलेच, सुधीरनी कबूल केलं नाही पहिले, पण नंतर बांध फुटला माझा तशी झाला कबूल, मागच्या विहीरीपाशीच, चांदण्यात वीज कोसळली त्याच्या शब्दांनी. सुधीरनी त्याच्यापुरता विषय शांत केला. पण नंतर  सगळं चित्रच बदललं, काय सांगितलं होतं सुधीरनी वाड्यात , देव जाणे पण कुजबुजी वाढत गेल्या, मी बघत होते पण कुणी माझ्याकडे बघत नव्हते, जणू मी त्यांच्यांत नव्हतेच. पहिले कुतुहल वाटायचं काय बोलतायेत, नंतर संशय येत गेला, नंतर राग येत गेला पण काहीच करता येत नव्हतं, सुधीर सीमाला घेऊन आला तेव्हां मनाशी ठरवलं आता संपलं सगळं, नशीब म्हणायचं न सोडून द्यायचं. पण वाटायचच, कुणीतरी यावं , विचारपूस करावी , बोलावं तरी दोन शब्द, तशात मधूचं लग्न झालं , आणि गोड, चित्रासारखी प्राजक्ता वाड्यात आली, निरागस अवखळ मन, संसाराची स्वप्नं होती डोळ्यात तिच्या. एका संध्याकाळी जाऊन उभीच राहिले तीच्यासमोर. ओळखलं नाही तीनं मला, पण माझी ओळख तरी कोण करून देणार? मीच बोलले घडाघडा, मारल्या गप्पा, मग गट्टी जमली ,संध्याकाळी प्राजक्ता यायची इथेच विहीरीपाशी, सासुनी हाका मारल्या की जायची, काय करणार नं बापडी, पण यायची रोज, एकदा मग माझ्या मनात आलं , आपण संध्याकाळीच का बोलायचं ? कायम का नाही? मग आठवला मला सुधीर, त्यानी मला बोलून शांत केलं तसच प्राजक्ताला मी बोलून शांत केलं , इथेच विहीरीपाशी. ती असायची मग माझ्याबरोबर. आणि गंमत म्हणजे माझ्यापाशी जशी यायला लागली तशी माझ्यासारखचं तिच्याबाबतीत घडलं, अगदी तस्सच, पहिले कुजबुज, नंतर प्राजक्ता नाहीच असं समजून वावरायला लागली, आम्ही दोघी मग बसायचो गप्पा मारत. एक मात्र झालं ,सुधीरपासून  सीमाला दिवस गेले आणि माझ्या आनंदाला उधाण आलं, काही झालं असलं तरी सुधीरचा अंश होता पोटात. मग नाही रहावलं मला , सीमाकडे गेलेच मी, तिला घाम फुटला, थरथरत होती , पण तिच्याशी बोलले ,घडाघडा सांगितलं , बिनसलय ते सुधीरशी , तुझ्याशी नाही गं, पटलय तिलाही , आता संध्याकाळी मी, प्राजक्ता न सीमा गट्टीच जमलीये चांगली, तिच्या विहीरीकडे येण्याबद्दल कुजबुजत होती मंडळी, आता तर बर्वे, घाटे , कुलकर्णींनी वाडाही सोडलाय. लाघवी आहे हो सीमा. आताशा वाटतय कुणीतरी वेळ द्यावा , बोलावं , सीमाचा कान्हा मजकडे यावा, बसलीय इथे विहीरीपाशी विचार करत, सुधीरनी मला दूर करण्यासाठी विहीरीत लोटलं, मी प्राजक्ताला जवळ येण्यासाठी लोटलं, मंडळी कुजबुजणारच, सीमाचा कान्हा माझ्यापाशी यायचा असेल तर सीमालाही जवळ घ्याव लागेल ना आता. आताशा  वाटतं कुणी तरी आपल्याशी बोलावं, वेळ द्यावा,कुणाचे चिमणे बोल ऐकावे.

पालखी कृष्णजन्माष्टमी, दहीहंडीचा दंगा करून झाला की वेध लागायचे ते गणेशोत्सवाचे, मंडळाचे उत्साही कार्यकर्ते वर्गणी, डेकोरेशन , कार्यक्रमाच्या तयारीला सुरूवात करायला लागलेले असायचे. सराफ बाजार, पगडबंद लेन मधे काही दुकानात गणरायांचे आगमन झालेले असायचे. माळा, मखरं,झिरमिळ्यांचे स्टॉल सजायला लागायचे.कृष्णजन्माष्टमीपासून पाऊस रिपरिप करत पडत असायचा. थोडा वेळ तडतड बाजा वाजवून झाला की आळसावून संंथगतीच्या बातमीपत्रासारखा सुस्तपणे रिपरिप करत असायचा. तशातच श्रावणाच्या निरोपाची चाहूल घेत, शेवटचा सोमवार उजाडायचा. आमची चंगळ, कारण शाळा मधल्या सुट्टीपर्यंतच. हुर्यो करत घरी आलं की, जरा आज्जीच्या मागं मागं, मांजरीच्या पिल्लागत घोटाळून, उपजे म्हणा, तांबड्या भोपळ्याच्या पु-या म्हणा, त्या तिखटमिठाच्या असू देत नाही तर गोडाच्या, सोबत  भाजके शेंगदाणे ( घरी सुवर्णकण म्हणायचो) घेऊन, घराच्या जुन्या पेशवेकालीन पद्धतीच्या, खाली लोखंडी गज वर मोकळ्या खिडकीशी ताटली ठेवून , मांडा ठोकून बसायचं कसं कोण जाणे पण शेवटच्या सोमवारी ११.३०, १२ वाजेपर्यंत रिपरिपणारा पाऊस थांबलेला असायचा, आणि अंधारल्याश्या वातावरणात तयारी सुरू व्हायची पालखीची. श्रावणी सोमवारी दोन पालख्यांचा सोहळा असायचा, गंगेपलीकडे पंचवटीत कपालेश्वराची, अलीकडे तिळभांडेश्वराची. नेहरूचौकातल्या घराच्या समोरच होता नीरंतरांचा वाडा. धार्मीक घराणं. या नीरंतराच्या प्रेस आणि शीरवाडकर सराफांच्या दगडी कट्ट्यावर पालखीची तयारी सुरू व्हायची. खिडकीतून टूकूरटूकूर बघत बसायचो आम्ही, वाड्यातली बच्चेकंपनी बाजूच्या खिडक्यात. सुरूवातीला पालखीचा दांडा, पालखी, वेगवेगळ्या खोळी, गाद्या, गिरद्या, गोंडे , नीरंतरांच्या घरातून हळूहळू खाली यायचे. पालखी बांधून, सजून व्हायची. लाल कापडानं लाल रंगात रंगविलेल्या पालखीचा दांडा गुंडाळला जायचा. वर गादी, पालखीत खाली सतरंजी, नंतर गादी, जरतारी आसन, लोड, तक्के ठेवले जायचे. सोनेरी , चंदेरी गोंडे पालखीच्या दांड्याला आवळले जायचे. वेगवेगळ्या खोळीतून, अब्दागीर, मोरचेल, मध्यम आकाराचे लाकडी, कातडं ताणलेले ढोल, सनई, शिंगं, तुतारी, झांजा बाहेर काढल्या जायच्या. ढोलांचे ताण काढले जायचे, शिंगं , तुतारी पाण्याने धुऊन वाजतीयना बरोबर , तपासलं जायचं. एकेक करून ह्या सगळ्या जंत्रीची वाटचाल तिळभांडेश्वर लेनमधून, दुर्गा मंगल कार्यालयाच्याशेजारच्या तिळभांडेश्वर मंदिराकडे व्हायची. सर्वात शेवटी , पिवळा कद नेसून , कपाळ, दंड, छातीवर भस्माचे पट्टे ओढून, हातातल्या चांदिच्या ताटात, ताम्हनात तिळभांडेश्वराचा चांदीचा मुखवटा घेऊन नीरंतर खाली यायचे. लखलखणारा , साधारण साडेतीन वीत उंचीचा चांदीचा ,श्रींचा कोरीव मुखवटा, डोळे भेदक काळ्या पांढ-या रंगाने रंगवलेले, काळ्या रंगातल्या झुपकेदार मिशा, भस्माच्या कोरीव त्रिपुंड्रावरची उभी रेघ लाल रंगात रंगवलेली, आणि भ्यासूरपणाला जिवंत करणा-या डोळ्यांच्या कडा लाल रंगांत, बाकी मुखवटा, लखलखणा-या शुभ्र चांदीचा. श्रींचा मुखवटा घेऊन नीरंतर निघाले की आई ,आज्जी वगैरे मंडळी अत्यंत नाईलाजास्तव कराव्या लागणा-या दिव्याला सामोरे जाण्यास फर्मावयाच्या, शाळेचा गृहपाठ. लक्ष नसायचच, पण काहीतरी करतोय एवढं दिसलं म्हणजे झालं ( ही सवय हापीसात उपयोगी पडतेय, असो) सव्वा दीड तासाने, चेह-यावर कंटूळवाणे भाव बघून समाधान झाले की फराळाच्या हाका यायच्या. शेवटचा सोमवार, भगर, रताळ्याचा कीस, राजगीरा लाडू, तळलेला बटाट्याचा सुवर्णकणयुक्त चीवडा, जलंस्तर तूंप घालून खजूराच्या उलुश्या बीया, वगैरे फराळ आवरून, तृप्त मनाने आम्ही पुन्हा खिडकीत. तीन साडेतीनला गाडगेमहाराज पुलाकडून येणा-या रस्त्यावर, समोर सोमवार पेठेत लगबग सुरू व्हायची, गजाला नाक लावून बघत असायचो. सडे घातले जायचे, संस्कार भारती रांगोळी हा नंतर आलेला प्रकार, पण पालखीकरता, तीन चार फूट व्यासाच्या रांगोळ्या ठिकठिकाणी माऊलीवर्ग सरसर रेखाटायच्या. रस्त्याच्या दुबाजूला ,वाड्यांच्या दर्शनी दगडी भागांवरच्या पणत्यांच्या कोनाड्याखाली ,औक्षणाची ताटं, तबकं तयार करून ठेवलेली असायची. शिंगं, तुता-यांच्या ललकारात पळापळ सुरू व्हायची, पालखी आली, पालखी आली. सनई, चौघडा वाजवीत , झुल घालून , बैलांच्या शिंगांना रंगविलेली बैलगाडी पुढे यायची. मागून लाल सोनेरी किंवा निळ्या सोनेरी रंगाची कापडं टाकलेले ढोल, झांजा वाजवणारे यायचे. त्या ढोलांनी ढिढीण टीणीक ढीण, ढीढीण टीणीक ढीण चा विशीष्ठ मध्यलयीतला ठेका धरलेला असायचा, आणि झांजा बोलू लागायच्या , छून खळ खळ छन, छून खळ खळ छन. नकळत पाउलं ठेका धरायची. सजविलेल्या पालखीतून श्री यायला लागायचे, आता मस्तकी मुगुट किंवा फेटा धारण केलेला असायचा ,पण जटांमधील गंगामाईचे दर्शनही व्हायचे बर का. येताना फुलांच्या माळा, तांदूळ, डाळ, ओठाला लावलेला गुळ, उधळलेले कुंकु , भंडारा यामुळे एरव्ही उग्र, भ्यासूर वाटणारे श्री सौम्य , स्निग्ध होऊन जायचे. पालखी पुढे पुढे येईल तशी थांबत थांबत यायची, फटाक्यांची माळ लावली जायची, सुवासीनी पालखीच्या भोईमंडळीचे पायावर दूध घालून, श्रींना औक्षण करायच्या, मन गुंतवून नमस्कार करायच्या, पोरांसाठी आयुक्ष मागायच्या, बाप्ये लोक मुखवट्याला हात लावून, गिरदीला डोकं टेकून, कानाच्या पाळीला, गालाला हात लावून नमस्कार करत, शंभो हर हर चा जयघोष करत. चौकात पालखी आली की नीरंतरांच्या घराजवळ रेंगाळायची, पालखीचा दांडा लाकडी घोडीवर विसावायचा, नीरंतरांघरच्या सुवासीनीं औक्षण, आरती करायच्या, धूम गर्दी व्हायची. मग घरातनं आईने दिलेले तांदूळ, फुलं , रूपया दोन रूपयाचं नाणं , त्या गर्दीतून सूर मारून पालखीपर्यंत जायचं आणि वहायचं , गिरदीवर डोकं टेकायचं, बच्चेकंपनीला मिळणारा स्पेशल साखरीफुटाण्याचा प्रसाद, आणि पालखीतलं बेलाचं पानं मिळालं की काहीतरी प्रचंड केल्याचा आनंद मिळायचा, वयच तसं होतं . मिळालेला प्रसाद पुन्हा धक्काबुक्की करत , घट्ट बालमुठीत पकडून घरी , धापा टाकत आणून दिला की मग घाम पुसायचा शर्टाच्या बाहीला. पालखी सोमवारपेठेतून पुढे रवाना व्हायची आणि मग वर्षभर पुढच्या श्रावणापर्यंत अधूनमधून ढोलाचा मध्य लयीतला आणि झांजांता आवाज आठवत रहायचा ढीढीण टीणीक ढीण ढीढीण टीणीक ढीण छून खळ खळ छन छून खळ खळ छन सरत्या श्रावणाच्या आठवणी माझ्या मनात अशा आहेत

गणराय

गणराय
……………………….

त्याच्या येण्याची चाहूल लागते आषाढ सरता सरता. श्रावणात तीन रवीवार बाहेरगावी जायचय हे नक्की झालं की मग मनात  विचार येतो यंदा मुर्ती करायलाच नको, वेळ कमी आहे, त्यापेक्षा आपटे, फडकेंकडे जावं न पेणची मुर्ती ठरवून यावी. कशाला गडबडीत गडबड. आणि नेमकी त्याच दरम्यान बाप्पा येणार अमुक तमुक तारखेला म्हणून पोस्ट टाकतात  कुणीतरी, पेप्रातून फोटो छापले जातात कामाला सुरूवात झाली, ओबडधोबड रचलेल्या मातीच्या आकाराचे फोटो पाहिले की हुक्की उठते, आठवडा आहे की अजून , प्रयत्न करायला काय हरकत आहे.

मग एक दोन दिवसातच भूरभूर पावसात , गाडी वळते सिटी हार्डवेअरकडे, दुकानात पाऊल टाकलं की मधूबुवा वझे सुहास्य मुद्रेने सानुनासीक आवाजात विचारतात “ कांय मातीला मुहुर्तं लागलां कांय ?”
ते स्वतःही रेखीव मुर्ती करीत असल्याने त्यांच्या प्रश्नाने हुरूप येतो, शाडूचे पुडे घेऊन घरी येतो.

शनीवारी रात्री माती भिजवली जाते, पोळपाट, पाट काय असेल ते धुऊन कुंकवाचं एक बोट लावून, कामाला सुरूवात होते, पहिले पाट, नंतर उभा लंबुळका गोळा अंदाजाने लावायचा, मांड्या , पोट, हात लावायचे , पाठ , मान करायची, तोंडवळा करायचा. हे सगळं करताना आपण दिनानाथ वेलींग, राजन खातू , राजाभाऊ देवधर, मदन गर्गे, लोंढें बंधूं प्रभृतींच्या बारश्याच्या घुग-या खाल्ल्याच्या ऐटीत उगाचच तीन तीनदा मुर्ती खालून वरून, उगीचच जरा बाजूने बघत रहायची .सवय , दुसरं काही नाही, ( एवढी शायनींग करूनही दोन्ही कान, मुगुटाच्या कडा असमान, कधी लंबोदर जलोदराकडे वळणारा होणे, कधी पोटापेक्षा छाती पुढे , बजरंग स्टाईल असे व्हायचे ते प्रकार होतातच , असो) मग कान, सोंड, मुगुट, हाताच्या मुठी, उपरणं करायचं , रचत जायचं. शनिवार रवीवार यातच जातो. एक मात्र नक्की गणराय आकार घेताना बाकीच्या जगाचा विचार बाजूला पडतात. एकीकडे वसंतराव, जसराज, भीमण्णा, हरीप्रसाद कानांवर पडत असतात आणि एकीकडे काम सुरू असते.

घर तळमजल्यावर असल्याने, काका काकू लोक्स, चिल्लर पार्टी वगैरे आपापल्या नात्याप्रमाणे मधेच लहान बाळाला कूक करताना जसं डोकावतात, तसं डोकवत “काय गणपती का ? ह्या ह्या ह्या , चालू दे चालू दे नंतर येतो /येते बघायला” असं काहीसं बोलून जातात.( भावनेचा पार्ट अपार्ट, कधीकधी हे ह्या ह्या ह्या असह्य होतं )

पुढच्या रवीवारपर्यंत थोडा थोडा वेळ देत गणराय साकारले जातात. आता दिवसातून दोनदा तरी मुर्तीवरचं ओलं फडकं दूर करून रूप निरखत रहायचा छंद जडतो, नुकतचं रांगायला लागलेलं लहानुलं बघताना त्याच्या आईला जे काही वाटत असेल तशीच भावना उरी दाटलेली असते.

श्रावणातल्या दोन शुक्रवारच्या पुरणपोळ्या हादडून होईस्तो, मुर्ती खडखडीत वाळलेली असते. ती वर्तमानपत्राने झाकून ठेवायची मग.

 श्रावण संपला की दुस-या दिवशी पांढरा रंग, बॉडी कलर, शेडींग, पितांबर, उपरणं , दात नखं, कान, केस रंगवायचे, डोळे, सोंडेवरची उभी रेघ रंगवायची, आर्शीवादी हातावर स्वस्तीक, पाटावरची गादी, उंदीरमामा, एका फराट्यात त्याची शेपटी रंगवायची, अन वॉर्नीशचा हात, गळ्यातली माळ, कडी, मुगुटाला लावूनच मग लंबायमान व्हायचं. दुसरे दिवशी सकाळी वॉर्नीश वाळलेलं असतं , मग सोनेरी काम करायचं आणि गणरायाच्या त्या लोभसवाण्या मुर्तीकडे लुकूटूकू बघत बसायचं.

गणेशचतुर्थीला सोवळं नेसून चातुर्मासाच्या पुस्तकात बघून प्राणप्रतीष्ठा करायची. नेत्रोन्मीलनं कृत्वा म्हणत तुपाने गणरायाचे डोळे उघडायचे, स्वतःचा प्राण त्या मातीच्या पार्थीवात उतरावायचा,डोळे मिटून  ओंकाराचा जप करून झाल्यावर नजरभेट होते तेव्हा सर्वांग शहारून जाते, क्षणभराचा अवधी पण निर्गुणाच्या संगाने काय जाणवू अन काय काय नको होतं.

आरत्या, मंत्रपुष्पांजलीचा दणका उठतो, गौराईच्या संगतीत गणराय खुलून जातो. या जीवीच्या जिवलगासाठी नैवेद्य काय, सजावट काय, आवर्तनं काय , काय करू न काय नको हौऊन जातं , घावन घाटल्याचं आकंठ सेवन सुखाची ग्लानी चढवतं. आणि संध्याकाळच्या आरतीला काळजात हूरहूर दाटून येते.
नंतरची सकाळची पूजा जाणीव करून देते, गड्या वेळ कमी उरलाय आता.  आवर्तनाच्या फलश्रृतीला नाकपुड्या थरथरायला लागतात.
संध्याकाळ होते, भेंडबत्तासे, तळीवाचे मोदक, दहिभाताचा नैवेद्य दाखविला जातो. पुनरागमनायच म्हणताना डोळे घळाळा होऊ पहातात. गणरायाच्या मुखी हसू तसेच असते. टोपी घालून घरातून गणरायाला निरोप देतानाचा गणपतीबाप्पा मोरयाचा गजर करताच येत नाही, भाचरं मंडळीच करतात गजर रस्त्यावर, अनवाणी पायाने मोरया मोरयाचा गजर करत घाटावर जायचं, वा-यानं थरथरणा-या कापराच्या ज्योतीने त्या तेजाची आरती करायची, मोरयाचा गजर करायचा, गुडघाभर पाण्यात जाईस्तो , स्वत: विसर्जन करायची मानसीक ताकद गमाऊन , वीतभर ओल्या चड्डीत कुडकुडणा-या एखाद्या पो-याच्या हाती गणरायाला स्वाधीन करायचं, लोकांच्या गर्दीत मुखदुर्बळासारखं मनातले कढ मनातच रीचवत रहायचं, तीनदा गणराय पाण्यातून पुन्हा पुन्हा दर्शन देतात, आणि चौथ्यांदा पाण्याबाहेर येते रीकामे ताम्हण, मनातला आनंद उत्साह रितं केल्यासारखं.

मनात किर्तनकारांचा आवाज येत रहातो “ गणराय येतात ते जगाचा क्रम जाणवून द्यायला, येणा-या जीवाला उत्पत्ती, स्थिती आणि शेवटी लय या चक्रातून क्रमाने जायचच आहे, कालांतराने पुन्हा नव्याने उत्पन्न व्हायला” मनात विचार चालू असतो आणि जडशीळ बेड्या अडकवल्यागत संथ गतीने अडखळत पावलं माघारी वळतात. आजुबाजूला चुरमुरे उधळत गजर घुमत असतो ” पुढच्या वर्षी लवकर या”