बाल्कनीत चकरा मारणा-या अनिलकडे सुरेशराव पलंगावर पडल्या पडल्या बघत होते. साडेदहा वाजत आले तरी अनिल अजून खोलीत परतला नव्हता. खोलीतला लाईट चालू होता म्हणजे अपर्णा ही जागीच असणार. बाल्कनीच्या दरवाज्याशेजारी विराजचं नोटस् काढणं चाललं होतं.
उद्या टेस्ट आहे म्हणल्यावर तो रात्री जागणार हे होतंच. खरं तर सुरेशरावांना जिन्यातून खाली घेऊन जाणं , रिक्षातून गणपती मंदिरात नेणं आणि परत आणणं ही सगळी दगदगच होती अनिल अपर्णाची. पण गणपतीनंतर आज बाहेर पडल्याने , मंदिरात चार ओळखीचे गाठ पडल्याने आणि गणपतीचे मनोहारी रूप पाहिल्याने सुरेशराव प्रचंड खुष झाले होते.
पंधरा वीस मिनिटांनी अनिलनी येरझा-या थांबवल्या, बाल्कनीच्या कठड्यावर दोन्ही हात ठेवून स्तब्ध उभा राहिला. एकदा विचार झटकल्यासारखी मान हलवली आणि परतला. आला तो सुरेशरावांच्या पलंगाजवळ.
“बाबा, दुखत नाही नं काही ? काही लागलं तर सांगा, हाक मारा काय.”
सुरेशरावांनी नकारार्थी मान हलवली.
“अन्या , बैस जरा इथे”
अन्या बसला.
“ काय विचार ?”
“काही नाही , आमरसामुळे जरा फे-या मारल्या हो”
“अन्या, तु सांगतोयस की मी बोलु ?”
“हं , बाबा, खरच विचार करत होतो, तुमच्यापासून लपून काही रहात नाही. ही दुसरी अक्षयतृतीया. नोकरीला लागल्यापासून दरवर्षी एक ग्राम सोनं घ्यायचं आई सांगायची ते करत आलो. तेच लक्ष्मीपुजनाला पुजायचं. दिवाळीला खर्च जास्त म्हणून आज. त्यात कधी खंड पडला नाही .पण या दोन वर्षात झालं नाही हो “
“अन्या , वाटलंच होतं मला, हिच्या क्यान्सरला तु किती काय केलंस माहित नाहि का मला ? मागच्या जानेवारीचा अँक्सीडेंट , मी पायानं पंगू झालो, कमी का केलंस ? “
अन्या, एक सांगतो तुला , हि नं सवय लावली ती सोन्याची गुंतवणूक व्हावी म्हणून .आज तुला सांगतो , अक्षय तृतीयेची खरेदी अक्षय रहाते घरात. तसंच आज काही दिलं , दान केलं तर तर ते ही अक्षय होतं हे माहितीय का ? “
“ म्हणजे काय ?”
“अन्या , अप्पा सांगायचे आजच्या दिवशी जे द्याल, अर्पण कराल, दान कराल त्याचं पुण्य अक्षय होतं ,आणि आज तु दोन गोष्टी दिल्या आहेत. निश्चिंत रहा. असं दिलंयस की जे अक्षय रहाणार आहे”
अनिलचा विचारात पडलां. खरेदी तर करता आली नाही आणि बाबा काय म्हणताहेत. काही चुकलं तर नाही नं ? म्हणून आडमार्गानी सांगताहेत. दिलं काय मी ? काहीच नाही.
तोपर्यंत अपर्णा ,अजून अनिल कसा आला नाही विचार करत , अर्धवट जांभई देत अनिलच्या मागे येऊन उभी राहिलेली. सुरेशरावांचं बोलणं तीनं ही थोडं ऐकलेलं.
“अन्या, आज तु काय दिलंयस ठाऊकाय ? एक म्हणजे खोलीत आधाराशिवाय उभा राहू शकत नाही मी, ते गणपतीचं दर्शन घडवलंस , एका वृद्ध पंगूला ईश्वरदर्शन घडवलंस, माझ्या मनांला आनंद दिलास. लहानपणी तुला आम्ही देवदर्शनाला न्यायचो आज देवाचं दर्शन तु मला घडवलंस. हा पुण्याचा ठेवा , माझे आशिर्वाद कायम तुमच्या पाठीशी रहातील “
बोलतांना सुरेशरावांचे डोळे चमकत होते, आवाज भरून यायला लागला होता.
“बाबा, अहो आम्ही जाणारच होतो नं ? तुम्हालाही नेलं , एवढं काय ?”
“अपर्णा , तु ही अन्याला साथ देते आहेस हे खुप छान वाटतं गं. आजकाल आईबापाला जसं झिडकारतात त्यातले तुम्ही नाहीत हाच नशिबातला ठेवा आहे आमचा.
अन्या , अप्पा माईंशी आम्ही जे वागलो ते पाहून आज तसंच तुम्ही दोघं वागता आहात. आमचा वारसा तुम्ही घेतलाय याची जाणीव आज करून दिली. आणि दुसरं म्हणजे, तोच वारसा तुम्ही विराजपर्यंत पोहोचवलात. आज आपण घरी आल्यावर, तुम्ही दोघंही दमलेले पाहून , नोटस बाजूला ठेऊन ,पटकन विराजनी चहा केला न विचारता, ते पाहिलं आणि चटकन जाणवलं “
“अन्या अपर्णा, सोनं घेता आलं नाही म्हणून वाईट वाटणं सहाजिक आहे , पण पोरांनो या गोष्टीचं जे दान तुम्ही दिलंत यानी मी तृप्त झालोय. हा संचिताचा ठेवा अक्षय राहिल , कधीही न संपणारा.”
अनिलच्या हातावर अलगद थोपटून सुरेशराव म्हणाले “चला, झोपा आता , पहाटे उठायचं नं ? “
एक मनाला लागलेली टोचणी निवळल्याने , अनिल अपर्णा खोलीकडे जाऊ लागले.