Wednesday, 19 April 2017

माझ्या मित्रानी पोस्ट टाकली , शोभा गुर्टूंच्या गाण्याची, उघड्या पुन्हा जहाल्या.या गाण्यातले दोन शब्द, स्मृतींच्या कलिका. आणि झर्रकन पोहोचलो, अनुराधा टॉकीजमागच्या , बेसमेंटला , ९६, ९७ चा काळ.

टेंपरवारी झालेली पहिली नोकरी, नंतरची अडीच वर्षांची नोकरी. आणि आठवली रेवती, रेवती अय्यंगार. मद्राशी म्हणायचो आपापसात. काँपुटर ऑपरेटर , एक कर्पे, दुसरी अय्यंगार.  टिपीकल मद्रदेशी, सुंदर सावळी, तेलानी चमकणारे केस, म्हशीच्या शिंगासारखी जाडजूड , घट्ट वळलेली वेणी, नितळ , स्वच्छ, पाणीदार डोळे, डाव्या नाकपुडीत हरभ-याच्या डाळीएवढं, लख्ख चमकणारं चांदिचं  , फुलीचं नाकातलं, (मुरणी म्हणायची ती ) जराश्शी गबदूल , मापात काढताना आम्ही चिडवायला ए गबदूल म्हणायचो, मग बागूल बुवांकडे आमच्या अकाऊंटस हेड कडे, पाचवीतल्या पोरीच्या फणका-याने जात तक्रार असायची, देखो , नां, ये लोग मुझे बगदूल करके चिडाते. 

पण लाडकी होती सगळ्यांची, आम्हां सगळ्यांना जीव लावला होता, जवानीची जादू शरीरावर अंमल करीत असली , तरी मन निरागस, निष्पाप. सुंदर निखळ मैत्री अनुभवली तिच्यामुळे, आणि कॉलेजातला ब्रह्मचारी ग्रुप मेंबर म्हणून चिडवायचे तो मी हळू हळू मुलींशी बोलायला लागलो तो रेवतीमुळे. 

नाकातल्या मुरणीइतक्याच चमचमत्या, लख्ख दातांचं दिसणं, ती हसायची तेव्हा जाणवायचं. तसं हास्य नंतर एकीचंच अनुभवलं, ते नंतर कधी तरी.  सुरूवातीला जोशीजी, रेवतीजी झालं , नंतर आपोआप जी ची बंधनं जीच्या जीत गेली , आपसूकच. माझ्यावर तीनं इतका प्रचंड विश्वास कोणत्या गोष्टीमुळे टाकला ते कळलं नाही, अर्थात ते कळून घ्यायचं तरी कुणाला होतं, आमच्या हापीसात , तीन कोब्रे,प्रत्येकी एक, देब्रा, सारस्वत, बेंगॉली ब्राह्मण ,  एक कन्व्हर्टेड किरीस्तांव, एक मुस्लीम, दोन आदर कास्ट, सात लेवा पाटील, एक शहाण्णव कुळी असले मेंबर्स होते. प्रत्येकाचे मराठीचे शब्द, वाक्प्रयोग, लहेजा अलग अलग.

  रेवती समजाऊन घेऊन अर्थ लावायचा प्रयत्न करायची, समजणार नाही ते मला विचारायची
”जोश्यी बता नां , ये गनमन क्या होता ?”
मला हसू यायचं, मनांत मग सांगायचो,
” देख रेवती, आदमीकू कभीकभार कुछ बातें , समझमें ना आती तो पगले जैसा बर्ताव करते, मराठीमें बोलते ना , गोंधळल्यावाणी, मानो चकरा जाते है , ऐसे कू बोलते गनमन” 
शर्माया हुवा हंसी फेकत म्हणायची
“ये बात पुछते वख्त , मै जो हुवी थी वोही गनमन ना ?सही समझा नां जोश्यी”
शार्प होती. नशीब मराठी कमी समजत होतं. नाहीतर आम्हांला लेफ्ट राईट घेतलं असतं तीनं. करीष्माच असा होता, वावगं वागू शकतंच नव्हतो.  मी मास्तरकी करत होतो , ती शिकत होती. वयानी दोनतीन वर्ष मोठी. कधी कधी करवादलों की म्हणायची
“जोश्यी , तुम्हांरा कुच भी नही हो सकतां , जल्दी सटपटा जाते तुम “ 
रेवतीला कधी आपल्यावर अन्याय झालाय असं वाटलं की खैर नसायची, किंवा तीची केलेली मस्करी जी तीच्या मद्रदेशीपणामुळे झाली असेल, तिथे अस्खलीत इंग्लीश , पंचतुंड नररूंडमाळधर , अश्या आवेशात तबल्याची लग्गीचाट म्हणतात , तश्या स्पीडमधे , साण, काण , साण काण फेकायची. अगदी मार्केटींगकरता भारतभर फिरलेले ओझा सर ही अवाक होऊन ऐकायचे, अश्या वेळी शांत करायचे ते ओझा सर , आणि सबनीस मँडम.  पण आवेश ओसरला की परत यायची
“जोश्यी , ये कायकु बोलते रे, मी चिडते मग”

डब्यामधे आठवड्याचे चार दिवस तरी सांबार , राईस. मग हक्कानं मी, निशा, हेम्या धरणगावकरचे डब्यातली, भाजी, चटणी कोशींबीर , मागून घ्यायची. मैत्री आणि सैन्य पोटावर चालतं म्हणतात ते खोटं नाही. बदल्यात तिच्या डब्यात अप्पे दिसले , की तिचा डबा आम्ही ओढून घ्यायचो. गार असले तरी हिरव्या चटणीसोबत मजा यायची. निशा आणि मी किती अप्पे घ्यायचे यावरून वचावचा पण केलीय.  कधीतरी एकदा मिटींग रूममधे , काहीतरी कागद आणण्यासाठी धाडकन आत शिरलो तर, ही सावळी स्फुंदत बसलेली एकटीच.

बधितलं. तीची नितळ नजर बोलली
“जोश्यी किसीको मत बताना”.पण यंपट पैल्यापासून विचारलच”
रेवती , काय हुव्या”. 
डोळे टिपले. दोन तीन दीर्घ श्वास घेतले आणि म्हणाली “ जोश्यी, आजका मेरा लास्ट डे है ऑफीसमें, सुन ये बात बताना मत, पाटीलसाबको बोली मैं, आजारी आहे बोला म्हणून”
“ क्यो ? काय झालं , रेवती , असं अचानक ?”
“ लग्न करते आहे मी, दस दिवसांनी, मुंबयचा नवरा आहे, जोश्यी सही बोला नां मैने., तुमसे माफी मांगती हूं, मेरी शादी हो रही है, बिना दहेजके , यही बात सुकूनवाली है, घरची परिस्थिती बोलते है नं, वो नही है, किसीको बुला भी नही सकती, ज्योशी लेकीन एक बात की कसम, ये बात शादी होने तक किसीको बताना मत, फिरसे नाशीकमें आयी तो जरूर मिलुंगी, देख मै ही गनमन हो गयी”
  “कुछ तो कहो ज्योशी”
“ मेनी वार्म विशेस ऑन युवर , सरप्राईज्ड म्यारेज, रेवती जिथे असशील तिथे सुखात रहा, देख मै भी ईंग्लीश बराबर बोला नां “ 
तीच्या नितळ डोळ्यातल्या भावना समजल्या.  ही अशी पाखरं , दोन दिसांची रंगत संगत करतात , उडून जातात, कायमचं दुरावून, कधीतरी गुर्टूंबाईंचं गाणं लागतं आणि लोण्यातून अलगद सुरी जावी, तसे शब्द काळजात जातात  स्मृतींच्या कलिका

No comments:

Post a Comment