काय बरं टाकावी पोस्ट? कोणत्या विषयावर टाकावी? डॉक फाईल उघडून बसलेला तो, त्याची बोटं शिवशिवतायेत. पोस्टचा विषय नक्की झाला की शब्दसडे किबोर्डद्वारे घालायला. कशावर लिहावं , दारात उमललेल्या सुंदर टपो-या फुलावर? कालची देवीची पालखी आठवतेय, दोन कथा आठवतायत. एक सकारात्मक विचार, एक नकारात्मक विचार करायला लावणारी. लिहावं का ? की करावा जरासा शब्दच्छल, किंचीत हसू वाचणा-याच्या चेह-यावर आणणारा, त्यालाही शब्दच्छल करावा असं वाटायला लावणारा. इतक्यात बाहेरून बारीक आवाजातलं सामुहिक श्रीराम जय राम जय जय राम ऐकु येते. जगातून एक विषय संपलेला असतो. मग लिहावंसं वाटतं, जीवनाच्या क्षणभंगुरत्वाबद्दल. पण मग आठवतो, गुरूतुल्य व्यक्तीचे वचन, जगात संपुर्ण खरं असं नसतं, संपुर्ण खोटं असं नसतं , फक्त त्याचं असणं हेच असतं. इनसिंक च्यानेलवरचा भटीयार , संतूर तबल्याची हातात हात घालून भटीयारची रंगत वाढवताहेत. मनाच्या कँनव्हासवर एक एक विचार येऊन जात आहेत.रँम्पवॉक करणा-या मॉडेलसारखे, एक से एक बढिया. मग कशावर लिहावं ? कि लिहूच नये. हेच छान , नाहीतरी प्रत्येक विचार शब्दरूप लेवून लिहीलाच गेला पाहिजे असं कुठे आहे? तो डॉक फाईल बंद करतो, पुन्हा मन एकाग्र करतो विचारांच्या रँम्पवॉकवर
No comments:
Post a Comment