“माणसानी मनाशी ठरवलं तर काहीही अशक्य नाही” हे वाक्य पेटंट झालं होतं आमच्या शैल्याचं , शैल्या आतेभाऊ, एका वर्षानी मोठा. लहानपणापासून संभाजी, शिवाजींच्या गोष्टी ऐकलेला, सरळ मनाचा मनस्वी शैल्या. शाखा, भिडे गुरूंजीचे शिवप्रतिष्ठान सगळीकडे जायचा. दरवर्षी सुट्टीत नाशकात यायचा. तसा नववीत आलेला. मी , शैल्या , आणि धाकटं शेंडेफळ सिमु , आतेबहिण. मस्त त्रिकुट जमलं होतं आमचं. शैल्या उत्साही वीर, कधी ७०, ७४ जोर मारेल, कधी च्यालेंजवर भाजी करेल, रामकुंडावर पोहून दमून आला आणि पीन मारली की पुन्हा उडी मारणारा शैल्या. मी आणि सिमु दोघं पीना मारायचो. शैल्या पेटायचा. पण जेवायला तिघांनीच बसायचं, थम्सप आईस्क्रीम मिक्स करून खायचं , शैल्याचे फटके खायचे , मापं काढायची , धमाल होती. तर ह्या सुट्टीत नवीन वाक्य ऐकवायला लागलेला. मनाशी ठरवलं की अशक्य काही नाही. असंच रामसेतू पूलावरून आम्ही तिघही येत होतो. बाजारात काय काय मनात आणलं आणि केलं चं तुणतुणं अखंड चालू होतं, गोष्टी छोट्याच होत्या पण त्यानी केल्या होत्या. उदा. दोन्ही हातात पाण्याच्या भरलेल्या बादल्या घेऊन लाकडी जीना नॉनस्टॉप ७ वेळा चढायचा उतरायचा वगैरे. ( प्रचंड पॉझीटीव्ह एनर्जी होती शैल्याकडे , पण हे आता कळतय , तेव्हा वैतागच ) शैल्याचं चालू, सिमुनी मला डोळा बारीक करून खुण केली. मी पेटलो. “चले , शैल्या फेकू नको “ “परशु, चल सांग काय करून दाखवू, मनांत आणिन ते करून दाखवीन, सांगलीचं पाणी हाय, अंहं , नाद करायचा नाही, आम्हांला अशक्य काही नाही.” आजुबाजीला बघितलं , बालाजी मंदिराखाली गाढवं उभी होती. त्यातलं एक शिंकत होतं . पटकन ट्यूब पेटली. “शैल्या, चल बे, फोकल्या नको मारूस , चल सांगतो ते करशील काय ?” “ हां, हां, सांग की , नाही करून दाखवलं तर नाव शैलेंद्र नाही सांगणार, अशक्य काही नसतं “ नंतर जे मी शैल्याला विचारलं त्याकडे दृष्टी जाताच , जाम खवळलं, भर बाजारात पाठीत गपागपा तीसेक गुद्दं घातलं , पण निरूत्तर झाला शैल्या. त्याला एवढंच विचारलं “शैल्या , बघ समोर, ते गाढवं एका शिंकेत वीतभर लोळी काढतय , चल तु निम्मी तर काढून दाखव “ मजबूत मार खाऊनही आमचं त्रिकुट घरी येईस्तोवर, डोळ्यात पाणी येईस्तो खिदळत होतं.😂
No comments:
Post a Comment