Friday, 21 April 2017

शशिकाकांमुळे गाणं शिकलो नाही तरी ऐकायला लागलो. त्यांनी सांगीतलं की त्यांच्या मागे मागे कार्यक्रमांना जायचं. गणपती मंदिरात शिकणारी मंडळी आठवड्यातून एकदा जमायची. गणपतीपुढे कला सादर करायची. शशिकाकांची गट्टी चांगलीच जमली होती. कार्यक्रमाच्या मध्यंतरात किंवा संपल्यावर चारचौक्याच्या धुम्रसाक्षीने काका किस्से , आठवणी काही अनमोल सल्ल्यांच्या गाठुड्यातून एकेक चीजा काढायचे. 

“काका , दाद म्हणजे काय हो ? “ 
“ छान प्रश्न सांगतो. हे काय केलं मी ?” 
“ तुम्ही माझ्या प्रश्नाला आवडल्यानी छान म्हणालात”
  “ हीच दाद बरं का. मला जे आवडलं, भावलं ते व्यक्त करून समोरच्याला पोहोचवणं ही दाद. दाद कशी द्यायची त्याची पद्धत वेगळाली, प्रत्येकाच्या स्वभावानुसार. “
“काका, एक विचारू का ? “ 
“बेलाशक” 
“ काका, क्लासमधे असु दे , गणपती मंदिरात असु दे, तुम्ही समोरच्याला भरभरून दाद देता. जी शिकतायेत त्यांनी थोड्डसं काही चांगलं केलं की तुम्ही माना काय डोलावता, हातवारे काय करताय, व्वा, भले शाब्बास, यंव , आहाहा , पुन्हा येऊं दे असं सगळं करत असता. पण तेच गाण्याच्या कार्यक्रमात, मैफिलीत मात्र सावध, शांत असता, पाच सहा ठिकाणीच दाद जाते. म्हणजे तुम्हांला ते फारसं आवडत नाही का ?”
  “ह्या ह्या ह्या” ,धुराचे लोट काढत खळखळून हसले काका. 
“ बेरकी नजर आहे,चांगलय. अरे कार्यक्रमात मैफीलीत तर नवीन ऐकण्यासारखं खुप मिळतं. गायक/वादकाची सर्वोत्तम निर्मीती श्रोत्यांसमोर मांडण्याची ती वेळ. ते सगळं साठवायचं असतं.  सरधोपट जे माहिती असतं , जे चांगलच सादर होत असतं त्याला का दाद द्यायची ? ते चांगलं असतं , तयारीचं असतं , मग सतत माना डोलवायच्या का ? नाही नाही आपल्या मनात आपण त्या सादरीकरणाला रिलेट करत रहायचं . घरी अथर्वशीर्षाची आवर्तनं सुरू झाली की मनात आपण म्हणू लागतो त्याच्याशी रिलेट होतो. तसच हे. पण वेगळं , नवीन काही आलं की ते आवडून दाद दिली जाते रे नकळत. कळलं का ? आणि कार्यक्रमात, मैफीलीत गायक वादकाला, अपेक्षा असते अश्या नवीन जागांवर दाद मिळण्याची . कळतय का ?” 
“काका, पण मग क्लासात, गणपती मंदिरात भरभरून दाद देता ते का ?” 
“अरे , शिकणारी मंडळी असतात नं समोर. त्यांची अपेक्षा असते दाद मिळावी, कारण त्यांच्या वकुबाप्रमाणे ते ही चांगलच सादर करायचा प्रयत्न करत असतात. त्याला जोम मिळावा , अधीकाधीक चांगलं त्याच्याकडून निघावं म्हणून , जास्तीत जास्त दाद द्यायची. त्यानी हुरूप येऊन आणि चांगलं करायची इच्छा बळावत जाऊन, प्रयत्न वाढीला लागतात”
काकांचा हा विचार मला आवडला खुप. तुम्हांला काय वाटतं ?

No comments:

Post a Comment