कविता आवडतात कारण काही कविता पुन्हां वाचताना , नविन अर्थ देऊन जातात. आपल्या आसपास वावरणारी वृद्ध माणसं आपण बघत असतो. आयुष्यभर आपापले व्याप सांभाळलेले असतात. काही मौजा , काही दुखः अनुभवलेली असतात. कालांतराने संध्याछाया , भिववीती ह्रदया चा खेळ सुरू होतो. शरीराचं कमजोर होत जाणं, अगतिकता, परावलंबित्व सहन करत जीवन रेटणं एवढंच हातात असतं. कुसुमाग्रजांची ही कविता , पाचोळा. निसर्गात घडणारी एक नेहमीची किरकोळ गोष्ट, वा-याने पाचोळा उडणे, पण कुसुमाग्रजांनी त्यावर कविता केली. झाडावरून गळलेल्या पानांचा पाचोळा, त्याची स्थिती कशी असते , उडून जाईस्तवर हे मांडणारी कविता. याआधी वाचली होती, पण निसर्गकविता म्हणून. पण पुन्हा वाचतांना वाटत गेलं, पाचोळा हे रूपक आहे , अगतिक वृद्धांचं. किती समर्पक आहे ते वाचतांना कळत जातं. कुसुमाग्रजांच्या मनात ही कविता लिहीतांना हाच विचार असेल का ? ----------------------------------
पाचोळा
आडवाटेला दूर एक माळ
तरु त्यावरती एकला विशाळ
आणि त्याच्या बिलगूनिया पदास
जीर्ण पाचोळा पडे तो उदास
उषा येवो शिपिंत जीवनाशी
निशा काळोखी दडवू द्या जगासी
सूर्य गगनातूनी ओतू द्या निखारा
मूक सारे हे साहतो बिचारा
तरूवरची हसतात त्यास पाने
हसे मूठभर ते गवतही मजेने
वाटसरू वाट तुडवीत त्यास जात
परी पाचोळा दिसे नित्य शांत
आणि अंती दिन एक त्या वनांत
येई धावत चौफेर क्षुब्ध वात
दिसे पाचोळा घेरूनी तयाते
नेई उडवुनी त्या दूर दूर कोठे
आणि जागा हो मोकळी तळाशी
पुन्हा पडल्या वरतून पर्ण राशी - कुसुमाग्रज
No comments:
Post a Comment