थोपट्या काय करेल सांगता येत नाही. सकाळी आमराईला चार चकरा मारल्या की , मी थोपट्याबरोबर त्याच्या बंगलीत जातो. रविवारी तो माझ्या घराकडे. अलिखीत नियमच केलाय. शिस्त म्हणजे शिस्त.
थोपट्या रिटायर्ड सिव्हील इंजीनीयर दोनेक वर्षांनी लहान. जॉली स्वभावाचा. धमाल किस्से पोतडीत जमा. फिरक्या घ्यायची प्रवृत्ती. अनुराधा राजा आपटेची मिसेस. हां, हां, राजाआपटे म्हणजेच थोपट्या. वहिनी म्हणणा-या राजाच्या भावांनी वाटणी करून घेतली तिथपासून वहिनी म्हणून हाक मारण्याचं लायसन रद्द झालं , सरळ नावानी हाक मारायची.
मोरया , लावलं की नाही पाल्हाळ , सांगायचं होतं ते राहिलं बाजूला. आताशा व्हायला लागलंय असं वयामुळं . थोपट्याला सांगायला गेलं की विचारतोय लगेच दाताड दाखवीत ख्या ख्या ख्या करून “काय दिक्षीताकडं बुकींग करू काय ?” ( दिक्षीत तो हो , घाटावरचा लाकडं देणारा ) आणि हे विचारताना , दंड किंवा हातावर थापटी. ह्या थापटी / चापटी मुळेच राजा आपटेचा थोपट्या झाला.
तर मागच्याच आठवड्यातली गोष्ट. आमराईच्या गेटपाशी थोपट्या दिसला नाही. पहिला टू चौथा राऊंड थोपट्या दिसलाच नाही. जरा हातपाय हलवले , थोपट्या त्याला एक्सरसाईज म्हणतो “एक वेळ चालू नकोस , पण एक्सरसाईज मस्ट, आता वयंच असं आहे की सगळ्याच बाबतीत , shake well before use, “ आणि लगेच थोपट्याचं एक डोळा मिचकावीत ख्या ख्या ख्या.
गेलो बंगलीत.
हॉलमधल्या प्रशस्त दिवाणावर , एक तरूण कार्ट बसलेलं , विचारल्यावर म्हणाला , राजाकाका येतायंत , बसा की. बसलो. विचारपूस केली तर घडाघडा बोलायला लागला , थोपट्याविषयी. अनुराधा पण आली , पाणी दिलंन, आणि दोघही ऐकु लागलो. जतीन नाव म्हणे त्याचं, तर तो सांगत होता.
“ अहो काका, राजाकाका जाम माणुस आहे. सिव्हील इंजीनीयर पण औषधांची काय सॉलीड माहितीय हो. चार पाच महिने झाले , ड्यूटीवरून थकून भागुन आलं की पेंगुळायला व्हायचं, जेवलो की नंतर झोपच लागायची नाही, इटस अ हॉरीबल सिच्युएशन काका, रात्री झोप नाही,दिवसा व्हेईकलवर , अँसीडीटीचा त्रास झालेला. पण राजाकाकांनी दहा दिवसात रूटीनला आणलं , ग्रेट आहेत राजाकाका “
हे म्हणेस्तो थोपट्या आला.
“जतीनराजे , आता दहा गोळ्या दिल्या आहेत. चार दिवसांनी एकदा घ्यायची. परत काही यायला लागणार नाही, हां हिच्या हातचे आप्पे खायचे असतील तर ये काय गं ? “ नंतर ख्या ख्या ख्या. जतीनराजेंनी थोपट्याला नमस्कार घातला, नष्ट झाला.
“थोपट्या , हे काय लचांड आहे ? त्याला गोळ्या कसल्या दिल्या ? लेका तु डॉक्टर म्हणून फाडायला केव्हां लागलास”
“ छ्या , मी कुठला डॉक्टर , हा गोकुळचा पोरगा, गोकुळ माझा दोस्त. ऑटो वॉटर लेव्हल कंट्रोलर विकतोय , हा अजिंक्य देव हिंडतो मार्केटींग करत (अजिंक्य देव जगातला खुळा अँक्टर , हे थोपट्याचं मत ) दिवसा हिंडायचं , रात्री मोबाईलवर च्याटींग करायचं दीड दीड वाजेपर्यंत. बोंबलणार नाय तर काय तब्येत”
“पण गोळ्या कसल्या दिल्यास ?
“इटस माय फंडा, (इथे माझ्या मांडीवर थापटी ) त्याला एकदा कोप-यात घेतला , नं मारल्या थापा , त्या ह्याच्या भाच्याचं असंच झालं नि गेला अवेळी ख्या ख्या ख्या, भ्यायलंच जाम”
“थोपट्या , काही लाज? की विकलास पेठवडगावात शनीवार बाजारला ?”
“ त्याचं सूत जुळलंय रे कुठंतरी, दिवसभर हेल्मेट घालून हिंडतोय, उन्हातान्हांत,एक्झर्शन होतंय, रात्री च्याटींग, वयंच रे त्याचं, आपण जरा पिळलं की ऐकतात निमुट. जेवण झालं की अर्धा कप दुध घ्यायला सांगितलं आणि ही निद्रालोचना वटी दिली, पुडीबरोबर घ्यायला सांगितली आठ दिवस”
“निद्रालोचना ? ही कुठली गोळी? वाग्भट रसशाळेची की अर्कशाळेची ?”
ठो ठो हसत, पुन्हा थापटी मारून थोपट्या डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाला “ साध्या गुळाच्या पाकाच्या गोळ्या आहेत लेका, अनुला विश्वासात घेऊन सांगितलं , तीनंही होकार दिला, बरोबर पुडी दिलीय ती जायफळं किसून बारीक करून दिलेली पूड आहे, प्रमाणातलं जायफळ आणि गोळी चघळली की काही वेळात गडी आडवा. हां एक मात्र केलं पहिले दोन दिवस एरंडेल पाजलं चहातून , पोट साफ , ग्यासेस गेले, पहिले पाच दिवस रोज एक गोळी, नंतर दहा दिवस एक दिवसाआड. याच क्रमाने आता चार दिवसांनी एक सांगीतलीय. निद्रालोचनामुळे झोप होतेय. मग दगदग सहन करता येतीय. हा आता मोबाईलचा रिचार्ज वाढलाय, दिवसा गप्पा होतात जेवणाच्या वेळी, ते जाऊ दे, बरं पोहे करायला सांगु नं ?, अनु दडपे पोहे बरे करते”
सांगत होतो नं , थोपट्या काय करेल सांगता येत नाही.
( टीप - थोपट्याचा प्रयोग जतीनराजेंना चालला म्हणून आपण करून बघू नये , प्रत्येकाची तबीयत वेगळी असते, जायफळ न पचल्यास ,ढेंढाळायला लागल्यास , मी.ज.ना. )
रिकामा जोशीकाका
No comments:
Post a Comment