Friday, 21 April 2017

सुहासकाका समोर आडवा, टिपीकल जाड्याभरड्या हिरव्या बेडशीटवर, हाताला सलाईन, नाकाला ऑक्सीजनची नळी, राईसट्यूब आणि कायकाय, लाईफलाईन दाखवणारं मिशीनं, टीक टीक क्लीक क्लीक आवाज. श्वासागणीक वरखाली होणारी छाती, १५ दिवसांपुर्वी हार्टआट्याकनं कोसळला. 

रात्रभर जागरणं करायला लावून काल आयसीयूतून स्पेशल रूमला शिफ्ट झालेला.सुहासकाका खुटखुटीत पहिल्यापासून, चारपाच किमी फिरणं, चोवीस समंत्रक सूर्यनमस्कार चुकले नाहीत कधी. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. मि.यमाजीरावांची द्वारघंटिका टिंगटॉंग करून परत आला.

रूममधे नेहा,पराग आणि सकाळचा चहा, नाश्ता घेऊन गेलेलो मी.   डोअरवर नॉकींग ते ही जोरात, धाडकन एन्ट्री, दारात ५’२”, ५’३” ची ९०-९२ किलोची पाचवारी .लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा स्टाईल गात्रं सांभाळत, तोंडाने हाश्श हुश्श करत. हातात वॉकींग स्टीक, सावकाश पावलं टाकत शेजारच्या बेडवर बसते , लांबची आत्या.

नेहा-” आत्या दम कशानं लागला?”
  आत्या-” दोन मजले चढायचे , मं दम लागणार”
“अहो लिफ्टनी यायचं नं “
“ते काही खरं नाही, मधेच अडकली असती तर मी शेजारीच, सुहासच्या ह्या ह्या ह्या “  (असं का झालं नाही? मी मनात) 
परागच्या चेह-याकडे लक्ष गेल्यावर काहीतरी मनाशी ठरवतात. उठतात. सुहासकाका जवळ जातात, आपादमस्तक न्याहाळतात .( लूक असा जणू उद्धव आगीनडागाआधी बाळासाहेंबांकडे बघतोय, संपलं सगळं ). क्षणात खळ्ळकन पाणी डोळ्यातून, हमसून हमसून हुंदके, त्याचा आवाज असा की क्षणभर सुहासकाकाही डोळे किलकिले करून ग्लानीत काय झालं समजून घ्यायचा प्रयत्न करतो.
नेहा उठते, पाठीवर थोपटते, दंडाला धरून परत बेडवर बसवते.
  “कसं नं झालं , धट्टाकट्टा सुहास , बघवत नाही. तुमचं आता कठीणे “
“आत्या , होतील बरे बाबा, आयसीतून आलेत नं बाहेर, संकट टळलं” 
“हो ना, मी बोललेच होते रामाला, सुहास बरा होऊ दे , साखरफुटाणे वाहीन १२ रू.चे “  (च्यामारी, इतका स्वस्त केला हिनं सुहासकाकाला ?मी मनात ) 
“पण सांगते तुला नेहू , खरं नाही गं काही, आमचे बापट, चार लाख घालवून आले आयसीयूतून बाहेर. नळ्यातलं अन्न पण बंद केलन, आम्ही सुटले म्हणून श्वास सोडला , तवर हे गेलेच , पुटूककन , कशाची खात्री नाही गं”   आता पदराने डोळे पुसून नेहाच्या खांद्यावर हात. भडभडून आलं तिला. बघवेना तीचा चेहरा.
म्हातारीची टँणटँण चालूच.
  “एकबोटेंची सुलू ही तशीच. अगं घरी आणलेलनं , स्वतःच्या पायानं लिफ्टमधून गेली चौथ्या मजल्यावर, दोन आठवडेही बघितले नाहीत , पहाटेच गेली. हल्लीच्या डॉक्टरांना निदान नाही, कमवायला बसलेत” 

परागची माझी नजरानजर झाली. नेहाचा धीर सुटला. पोर रडायला लागली. पटकन पुढे गेलो, वॉकींग स्टीक दिली आत्याच्या हातात.
“बघवत नसेल नं हे सगळं, आत्या पण काय करणार? रामराया निभाऊन नेईल. आता थांबू नका आणि आठवणी येतील , त्रास तुम्हालाच, काय कसं होतय ते पराग , मी कळवतो फोनवरून.” 

पुन्हा बेडजवळ जाऊन मगाचचा लूक टाकून , पराग , नेहाच्या डोक्यावरून हात फिरवून  पुन्हां गात्रं सावरत म्हातारी नष्ट झाली.  दोन वर्ष झालीत. सुहासकाका रोजच्या मॉर्नीगवॉकला जातोय. म्हातारीने मला ओळख देणं बंद केलय.
-----------------------------------
खरच , पेशंटला भेटायला येणारे असले नमूने , मदत करणं दूर , धीर तरी देतील ? पण नाहीच. नातेवाईकांचा धीर आपल्या बोलण्याने खचतो एवढं देखील कळत नाही का ? काय मिळवतात असलं बोलून ही मंडळी , देव जाणे. अशा मंडळींना लवकरात लवकर पाठवून देणं केव्हाही श्रेयस्कर  तुम्हांला काय वाटतं ?

No comments:

Post a Comment