रात्री दहा सव्वा दहाची वेळ. मोबाईल किणकिणला. “हँलो , काका , जग्या गेला” “ऑ, शुद्धीत आहेस का रे ? काय सांगतोयस” “काका , संपलं रे सगळं, बरं मी पास काढायला लागलोय, तु डायरेक घाटावर येतोस का ? , नीघ लगेच” “ हो , भडाग्नी की मंत्राग्नी ?” “मंत्राग्नी, पोरगं देणारे अगीनडाग, चल बघ बाकीचं” “ओके, निघालो” शनीवार रात्र, अर्ध्या तासापुर्वी पावसाची जोरदार सर येऊन गेलेली, वीजमंडळानी तत्परतेने लाईट घालवलेले, स्ट्रीट लाईट चालू. गेलो घाटावर, आषाढाचा तिसरा आठवडा. स्मशानात सगळे प्लाटफॉर्म फुल्ल, बारापैकी पाच धगधगताहेत चिता. तीन चार अर्धवट, काही चितांचे निखारे धगधगताहेत. वा-यांनी. दिक्षीतानी अडीच मण दिलेली लाकडं , काही सायकलची टायर्स, मंत्राग्नीचं साहित्य घेऊन , मोबाईलच्या ब्याटरीच्या उजेडात , लाकडांचा गडगडगाडा ओढत, थांबवत खाली आणलेला उतारावरून. प्लाटफॉर्म फुल्ल, म्हणताना पलीकडच्या अंधारलेल्या शेडमधे , जमीनीवर चिता रचायचा निर्णय परस्पर घेतला. पेटलेल्या चितांचे नातेवाईक नमस्कार करत काढता पाय घ्यायला लागलेले. कुणाला तरी आठवण झाली , गुरूजींना फोन लावला, उत्तर आलं बॉडी आली की कळवा. शनीवार मुळे अलिखीत नियमाने बरेच नग “टांगात्मे” झालेले, अर्धवट अंधार , अंदाज पंचे चारोदर्से काम चाललेलं. हळूहळू सगळी गोळा झाली , बॉडी आली. शववाहीकेतून खाली शेडमधे ठेवली. जग्या, वयानी १० वर्षानी तरी मोठा, आत्ता आडवा, तोंडात विडा, तुळशीचं पान, डोळे मिटलेले, सर्वांगावरची सुज दिसतेय, मोबाईलच्या उजेडातही जाणवतंय, कपाळीचा बुक्का, आणि पिवळेपण बॉडीचं, एक सर्वात मिसळणारा, आनंदी जीव , व्यसनापायी संपलेला, शांत झालेला. वातावरण सुन्न, कुणीतरी गुरूंजीना फोन लावला. आले. “११ नंबर आवरून येतो, अर्धी लाकडं रचायला घ्या, अग्नी कोण देणार , हं, जा , आंघोळ करून ओलेत्यानं ये, रानडे , कणीक मळा, सात गोळे , दुपारी पंचक लागलंय” गुरूजी ११ नंबर कडे गेले. आम्ही सगळे सराईत , कामाला लागलो. जग्या गेल्याचा धक्का सहन न करता येण्याजोगा असल्याने बधीरतेने , सुरूवात केली. लाकडं एकमेकाहांती पास केली जात होती. रचणारा जाणकार टांगात्मा , एकेक लाकूड रचत होता. तितक्यात एक स्वीफ्ट थेट शेडपाशी आली, दारं उघडली, क्षणभर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं, जग्याचे बाबा अरविंदकाका वय वर्ष ९३ , उतरले, एक हात एकाच्या खांद्यावर, दुस-या हातात काठी. भग्न ,भकास चेह-याने , सावकाश एकेक पाऊल टाकत आले. जग्याच्या बॉडीशेजारी , सिमेंटच्या कट्टयावर दोन्ही हात , काठीवर टेकून, मुकपणाने आसवं गाळत बसले, थरथरत्या देहानं. पुन्हा रचारची सुरू झाली. काकांना त्रास नको म्हणून जलद गतीनं काम करायच्या खाणाखुणा , नजरानजरेतनं झाल्या. आता ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांनी त्या कुडकुडत्या रात्री टॉर्च चालू केलेले, आणि हलत्या सावल्या जाणवायला लागल्या. अर्धी चिता रचत आलेली, इतक्यात रचणारा टांगात्मा दोन पावलं मागं सरकला, अंदाज घ्यायला, न्यून नाही नां राहिलं, नेमका त्याचा पाय जग्याच्या बॉडीला लागला. झालं , लाकूड देणारा पेटला. ( तो ही टांगात्मा ) “ाxxxx, जग्याला लाथ घातलीस, xxx तुलाच जाळतो बघ” रचणारा टांगात्मा हादरला, दोन्ही कानाच्या पाळीला हात लावून म्हणाला “ अय , लक्ष नव्हतं , स्वारी “ मग टांगात्मा नं २ चा भडीमार सुरू झाला. पब्लीकपैकी एक जवळ जाऊन बोलला, “ ए , चल , सोड , ही वेळ नाई, चुकीनं झालंय , सोड” “ का ? xxxxxx जग्या कुणी न्हाई कारे आपला? @****, xxxx, @*x*......” काय करावं सुधरेना. तेवढ्यात ११ नं आवरून गुरूजी आले. पटकन सगळा प्रकार लक्षात आला. नेहेमीची सवय असल्याने , रोज मरे त्याला कोण रडे न्यायाने , गुरूजी जवळपास ओरडले, आणि त्याही प्रसंगात , टांगात्मा नं १, २ सकट, अरविंदकाका सोडल्यास सगळं पब्लीक फिदीफिदी हसू लागलं. गुरूजी ओरडले, “ आवर रे फोxxx , ल्येका ज्याला लाथ लागलीय तो निवांत पडलाय आडवा, तोडांत पान घेऊन, हूं नाय की चूं नाही, तु का घालतोयस शिव्या, आवरा , भुका लागल्या आहेत. घरी बायको वाट बघायला लागलीय” छ्या, ही जिंदगी केव्हा आसु आणेल डोळ्यात आणि केव्हा हसु आणेल सांगता येत नाही. ( तळटीप - टांगात्मा = टांगा पलटी घोडे फरार झालेला जीवात्मा)
No comments:
Post a Comment