Friday, 21 April 2017

टप्प्याटप्प्याने झालेला प्रवास, वर्षातून एकदा मिळणारं निवांतपण, बरोबर दगड , विटा, सिमेंटातले म्हणजे बांधकामाशी संबंधीत मित्रमंडळी. तीही आपापली पाट्या दप्तरं कंपासपेट्या घरीच सोडून आलेली. यहां के हम सिकंदर , चाहे कर लो दुनिया अपनी जेब के अंदर अश्या मुडात आलेली.

संध्याकाळी हर्णेच्या सागरकिनारी , क्रिकेट, आबाधुबी खेळून, लाटा अंगावर घेऊन ,परत ठिय्यावर आलेली.  चार लाकडं, पालापचोळा , काटक्या पेटवून , गोलाकार बसलेली. निवांत होण्यासाठीची सर्व “तयारी” सुरू झालेली. गप्पा स्थानीक राजकारणावर आल्या. समोर अथांग समुद्रकिनारा असताना या विषयावर वेळ घालवण्याची माझी तरी इच्छा नाही. 

थोडं पलीकडे चि-यांचा एक कट्टा, नारळीच्या खाली. समोर पुळण. अंधारल्या वातावरणात ,मधूनच गार झुळूका. कटट्यावर बसण्याऐवजी, कटट्याला टेकून वाळूत बसलो. खुप दिवसांनी एकांत. अविरत गाज कानावर. समोर अगणित आश्चर्य पोटात दडवलेला, उसळत्या लाटांनी फेसाळणारा समुद्र, हातात फेसाळणारी फोस्टर्स. तंद्रा न लागावी तर नवल. 

थोडी सळसळ, हालचालीची चाहूल.

पलीकडचं कौलारू घर. समोरचं अंगण, कुणी एक सुकोमल तन्वांगी अंगणात. अंधारल्याने स्पष्टता नाही.

कट्टयावर बसलेला नसल्याने माझी जाणीव तिजला नाही. निशंक . जराश्याने सोप्यात बसलीय. बाजूला काही फुलं, पलीकडच्या म्लान ट्यूबलाईटची एक तिरीप तिच्या थोड्या अंतरावर. पिंगट केस मोकळे सोडलेले. सराईत बोटांनी फुलांची वेणी गुंफणं सुरू. आकृतीबंध वेडावणारा, मधेच कुणी मारलेल्या हाकेला ओ देऊन , सळसळणा-या नागीणीसारखं सरसरत घरात जाणं. जाताना क्षणभर दिसलेला चेहरा, अप-या नाकाची नोंद मनात. 

अवघ्या पंधरा वीस मिनीटांचा खेळ . ती गेल्यावर थोडावेळ सागराकडं दृष्टी लावून .मनात सौख्यकारक विचारांच्या लाटा.काही कधीच पूर्ण न होणा-या स्वप्नांची मालीका. 

असाच काही काळ जातो. मी पुन्हा मित्रांच्यात. समोरचे चषक ही नाकारतोय. आगळ्याच धुंदीत मी. असेच शब्द सुचू लागतात. आणि र ला ट जुळू लागतात 

धुंदी कशाची मजला कळेना
आले कशाने हे झिंगलेपण
पुन्हा पुन्हा का धुंद कळेना
विसरून जाई मी माझे मीपण

चाहूल अल्लड  येई सोनेरी
अलगद मनास सुखवून जाते
नयनी साठवू सळसळ पानेरी
की काय करावे मज ना गमते 

सहवास तुझा गं पळभराचा
परि गात्रे अवघी उचंबळती
क्षण अवघा मत्त आनंदाचा
ह्रदयमंदिरी सौख्याच्या ज्याेती 

या मत्त घटकेची धुंदी आगळी 
क्षणाक्षणाने झिंगून जावे
आयुष्य आठवणीची झळाळी
कुरवाळीत तिजला बसावे

No comments:

Post a Comment