Wednesday, 12 April 2017

रजनीताई

खरं तर काय ओळख करून द्यायची या ताईची ? माझ्यापेक्षा तुम्हीच जास्त ओळखत असाल या ताईला. तरीही मी लिहीणार आहे या ताईबद्दल. ज्यांना माहीती नाही ही ताई , त्यांना थोडुशी ओळख होईल.  एका ग्रुपमधे मी पुर्वी होतो. त्याच ग्रुपमुळे फेसबुककरांची ओळख झाली . खुप सुंदर ग्रुप . तर त्या ग्रुपवर एक पोस्ट होती , एका यंग जनरेशन चँप ची, एका धार्मीक परंपरेमधे त्यानी बदल सुचवले होते.  त्यावेळेस या ताईच्या कमेंटसनी लक्ष वेधून घेतलं.   त्यावेळी काय डेंजर काकु आहे, असं मत झालेलं, कारण सुरूवातीला सौम्य भाषेत ही एकटी काकु विरोध करत होती. साताठ लटकी समर्थनं केल्यावर ,मग पोस्टकर्ते महाशयांना आवरलं नाही , आणि एक गैरशब्द त्याच्याकडून लिहीला गेला, बस, तिथे या रणरागीणीने , जो सात्विक संताप बाहेर काढला त्याला तोड नाही.   रूढी, परंपरांमागची धारणा तर समजावलीच, पण हे ही सुनावलं, भेटूयात रे, अस्सल कोंकणी ऐकवते, जाशील पळून.  म्हंटलं ही डेंजर काकु दिसतीय.  पुढे हळूहळू ओळख व्हायला लागली.   ग्रुपसंमेलनात, जेवणाच्या वेळी ही समोर.   “ जोशी , या , काय म्हणताय “ हे वाक्य तीच्या तोंडचं ऐकलं, तेही सस्मित हास्यासहित. आणि सगळे भ्रम निमाले. एखादी मामी, मावशी , भाच्याला बोलवेल नं , अगदी तसं. खरंच तशीच आहे.  ( पुढे ओळख वाढल्यावर झापलं एकदा मला, म्हणे “ तु म्हातारा झाला असशील, मी नाही, मला काकु म्हणालास तर देईन दणके दोन , ताई म्हणालास तर ठीके” 😃😃मग झाली माझी ताई )  ते हल्ली बर्वेसारख्या निसर्गप्रेमींनी एक चांगलं केलंय, घरबसल्या, माहिती देतात, वन्यजीवनाची. वाघ, सिंह वगैरेची माहिती देतात. फोटो टाकतात, व्हिडीयो टाकतात. त्यामुळेच मला ही ताई वाटते , जातीवंत वाघीणीसारखी. कुणी आगावपणा केला, तर वाघिणीसारखी फाडून टाकेल , पण चच्याबच्च्यांची मानगुट पकडली योग्य जागी न्यायला , तर दात त्या कोवळ्या त्वचेला खुपणार सुद्धा नाहित. नशीबवान आहे मी मला ही आईस्वरूपातली वाघीण ताई म्हणून लाभली.  गप्पांमधून, मागच्या बारा डिसेंबरला वाढदिवसाच्या दिवशी पुर्ण दिवस , ताई ख-या अर्थी दिसली , जाणवली, कडकडून भेटली. आणि यापुढेही संगती रहाणार आहेच.  कितीक वेळा संघर्षाचे योग आले, पण संयमानी ही सामोरी गेली. एकतर कोकणच्या लहरी निसर्गात आयुष्य गेलेलं, दुसरं म्हणजे , आजोबांच्या काळात घरात , काही आजारपणामुळे, वा अडचणीमुळे , त्या काळच्या देवधर्माच्या प्रथेला असमर्थता दर्शविली प्रामाणिकपणे आणि गावानी वाळीत टाकलेलं, वेळ आली तशी निघून गेली. देवधर्म सुटला नाही उलट स्वतःला सक्षम बनवण्याची संधी मिळाली अश्या जीन्सची ही पुढची पिढी.  ताई म्हणते, "वेळ येते रे प्रत्येकावर , तिला येऊ द्यायचं , दोन दिवस रहा म्हणायचं , कायमची थोडी असते. आपण आपल्या व्यापात रहावं, डोकं शांत ठेवावं , आली तशी जाते निघून."  जितकी ताई खंबीर , तितकीच वेळही चिकट, पुनःपुन्हा आली न गेली. ताईनी काय केलं नसेल ? वेळेला सामोरं जायला.  कधी पिग्मी गोळा केली, कधी जर्मन सिल्वरची घाटदार भांडी विकली, कधी गुंतवणुकीचं काम केलं, येणा-या कुठल्याच कामाला वा आपत्तीला टाळलं नाही. कुणाला खरेदीपत्र करायचंय जागेचं, करून दिलं, कुणाला वाटणी पाहिजे, तर ती करून दिली, कुणाला प्लॉट पाहिजे तर तोही घेऊन दिला. संपर्कात येईल त्याला आपलंसं करत ताई चालतीय, पुढे जातीय.  ती सांगते आम्ही बहिणीच सगळ्या, भाऊ नाही. ती खंत आहे. पण बाबांच्या आजारपणात मुलगा काय करेल अशी ट्रीटमेंट मुलगा होऊन बाबांना दिली, घराच्या सुधारणेत ( रिनोव्हेशन म्हणतात नं हल्ली ते ) सिंहाचा वाटा.  बरं हे सगळं करताना मनांत काय असतं , तर , मस्तपैकी आयुष्य जगावं हा विचार.  फेसबुकवर बघाना जाऊन ताईच्या भिंतीवर.  कोकणातल्या पुर्वापार परंपरांची माहिती देते , मग ती कालभैरवाची पालखी असो, पारध असो, वा चैत्री पुनव  जी नव्याची पौर्णीमा असो त्यांची माहिती देत असते. निसर्गातील नवलाई दिसली की ती नवलाई शाळकरी पोरीसारखी सगळ्यांना सांगत सुटते.  मग फुटलेली काटेसांवर असो, समुद्रफळ असो, पानफुटीचे तुरे असो, ओले काजु असो, बकुळीची फळं असो त्याचा फोटो काढून माहितीय का कुणाला विचारून बोलतं करायचं , आणि प्रश्नांना उत्तरं देत माहिती द्यायची. फोटो पण असा काढायचा की हे कलींगड की शहाळं असा प्रश्न पडावा. आणि गंमतीने भांडतांना मधे कुणी पडलं तर म्हणावं “ जाऊ दे रे तो भाव आहे माझा, भांडोरा भाव “ भांडणारा भाऊ. 😃  नवरात्रात नऊ रंगांचं महत्व असतं तर या ताईबाई आजुबाजुची त्या रंगांची फुलं, त्याचे फोटो, दोन वाक्यात माहिती त्या त्या दिवशी टाकणार. ( ह्या बाबतीत संध्या साठे जोशी या चिपळूणकरीण सखीशी साम्य )  कधी ओल्या काजुची उसळ करणार, कधी घमघमणारी सुरंगी फुलतेय म्हणून निरोप देणार, कधी सोनचाफ्याची वेणी गुंफुन दाखवणार, कधी अबोलीच्या नाजूक फुलांचे वळेसर कसे लोण्यासारख्या मऊ बोटांनी वळायचे ते सांगुन व्हिडीयो वगैरे टाकणार. असल्या निसर्गरंगाचे विचार मनांत, आणि आल्या वेळेला , आल्या आपत्तीला हसतमुखानी सामोरी जाणार.  ताईचं लेकरू  पण आईच्याच वळणांवर गेलेलं, तेच गुण आत्मसात केलेलं, हां आता जनरेशन ग्याप मुळे वेगळं वाटतंय, पण वळचणीचं पाणी , वळचणीला जाणार हे नक्की. एक याक दे मज माते असं याकच्या पाठीवर निवांत आडवारून जगावेगळं मागणं मागणारं लेकरू, आणि वयात येतांना “ माणुस म्हणुन जगावं” असे जगावेगळे आर्शीवाद देणारी ही त्याची आई. रोपट्यांच्या सुरक्षेकरता जाळी पसरलेली. त्यात दोन सर्पकुलातील दोन अडकल्यावर या लेकरानी जाळी कापून त्यांना योग्य जागी सोडून दिलं , मायलेकरांनी जाळी गुंडाळून टाकली. रोपं आहेतच पण जीवही आहेत. त्यांचा विचार करणारी ही मायलेकरं .  गेल्या मार्चपासून ह्या ताईनं वेगळा ध्यास घेतलाय. काही एकर जमीन घेतलीये , सगळी सव्यापसव्यं केलीयेत. अगदी कर्जासकट. घरही बांधलंय तिथं , तेही स्वतः सुपरव्हिजन करून, योग्य ते मालमटेरीयल पुरवून , त्याकरता खेपा, चिपळूण ते वाडी पोयरे, फक्त तीन तासांचा रस्ता म्हणे.   आजन्म दिवस असो वा रात्र, एकटीने लाल डब्यातून प्रवास केलेला. वाडी पोय-याला काम सुरू केल्यावर , चारचाकी शिकुन घेतली अन पिटाळतीय ( धन्य आहे ताई  )  भारताबाहेर ५ देशात , शेवग्याच्या शेंगा पाठवणारे, बाळासाहेब मराळे दादांची माहिती मिळाली. ६ महिन्यात शेंगा धरतात कळल्यावर ही बहाद्दरीण ताई, नाशिकजवळ जाऊन माहिती घेऊन , सेंद्रीय पद्धतीने शेवगा शेतीच्या मागे लागली, आजरोजी तीच्या २००० रोपांना फुलं यायला लागली. तीही तिनेक महिन्यात.  जागा घेणे, ती जेसीबी लावून साफ करणे, देवाची तळी जी वर्षोनुवर्ष काडीकच-यांनं, विसर्जीत प्लास्टरच्या गणपतींनी बुजली होती , ती साफ करून , देवाकरता आवश्यक प्रार्थना करून , विरोध पत्करून पुर्नजीवीत करणं , वीज कनेक्शन वेळेत मिळण्याला दिरंगाई होतीय लक्षात आल्यावर थेट उर्जामंत्र्यांना दखल घ्यायला लावणं हे येरागबाळ्याचं काम नव्हे.  लेकाला त्याच जागेत विसावा नाव देऊन उपहारगृह सुरू करून दिलंय, पुढेमागे चार पाच गायी पण पाळायच्या आहेत. सेंद्रीय पद्धतीने शेती करायचीय. शेवग्याचं महत्व पटवून द्यायचंय. खुप स्वप्नं आहेत ताईची. हजारो ख्वाईशे ऐसी, की हर ख्वाईशपें दम निकले, अश्या स्वप्नांना पुरं करत आलेली ताई , पुढेही तिची वाटचाल सुरू रहाणार आहे.   मी पोस्ट लिहीलीय खरी, पण जे तिच्या सहवासात आले आहेत ते  कमेंटमधे नक्कीच एकेक पैलु आणी उलगडून दाखवणार आहेत. आणि त्यामुळेच तु भेटसी नव्याने हा अनुभव या ताईच्या बाबतीत सार्थ ठरणार आहे.  ताईला विचारलं म्हटलं या निमित्तानी काहीतरी मार्गदर्शन करशील ? तर लगेच सांगितलं " बेदम कामं करा, आजुबाजुचा निसर्ग शिकवत असतो त्यातून शिका, आईवडलांना विसरू नका. आणि शक्यतो दुस-याला दुखवु नका, पैसा येतो जातो, जोडलेली माणसं कायम बरोबर असतात. तेव्हा माणसं संभाळा "  तिचीच सख्खी नाही पण पक्की बहिण , Swati Joshi यांनी Rajani Joshi ताईला वाढदिवसाला शुभेच्छा देतांना जी पोस्ट टाकली होती त्यातले काही शब्द उधारीने घेऊन थांबतो  “नेहमीच खंबीर, कणखर, हसतमुख, ऊत्साही. नेहमीच सत्याच्या बाजूने ऊभी रहाणारी, त्याकरता कशाचीही भीड भाड किंवा तमा न बाळगणारी विशेषणं संपून जातील, पण तरी तिच्याविषयी लिहायचं अजूनही काहीतरी राहिलंच असेल  या हसऱ्या चेहऱ्यामागचा करारी कणा, लढाऊ बाणा आणि अपरिमित हिंमतीने दिलेला लढा समजत गेला तसं अनिवार कौतुक आणि आदरही दाटून येऊ लागला.  परमेश्वर, तुला भरभरून प्रेम, आनंद, यश, मान, सन्मान, संपत्ती, आरोग्य आणि ऊदंड आयुष्य देवो, हीच मनापासून प्रार्थना”.  ( पोस्ट वाचल्यावर ताई हसत नक्की म्हणणार आहे ,” मुलाखत कशाला घेत बसलास अशी. त्यापेक्षा पटाककन आला असतास तर मस्त आंबे खाल्ले असतेस, चांदण्यात गप्पा मारत दिली असती मुलाखत, वेडा आहेस तु “ किमान ते हसणं बघायला तरी जायला हवं पोय-याला )

No comments:

Post a Comment