Monday, 24 April 2017

आता आसन स्थिर झालं.
दोन्ही हात पोटावर एकमेकांवर पालथे घेतलेत.
पाठीचा कणा सुरूवातीला ताठरलेला पण आता किंचीत सैलावलेला.कोणताही ताण नाही.
दृष्टी अर्धोन्मिलीत , पापण्या जडावल्यात. बुब्बुळं जणू स्थिर झालीयत.
श्वास आत येतोय , बाहेर पडतोय पण एका शांत सुरेख लयीत.
श्वासाचे आगमन सुखकारक थंडाव्याची जाणीव करून देणारं.
श्वास खोल घेतला जातोय आतपर्यंत , परंतु कुठलाही ताण नाही , मनातील तणाव धिम्या गतीने कमी होऊ लागलाय.
मस्तिष्कात गरगरणा-या विचारांची आवर्तनं हळूहळू मंदावलीत.
आता एक आकाशी, जांभळया रंगाचा काळसर पडदा विरलावस्थेत नेत्रपटलांना सुखावू लागलाय.
एक अपूर्व प्रगाssssssssssढ शांतता

ऊजव्या खांद्यावर थोपटल्याचा आभास,
शांतपणे दृष्टीचा प्रवास उजवीकडे.
गौरवर्ण , व्यक्तीचा क्रोधांगाराने तप्तायमान झालेला चेहरा आणी कर्णपटलावर ध्वनिकल्लोळ येऊन आदळतो
' जोशीकाका कामाच्या पाट्या टाकताय ते माहीती होतं , आता डूलक्या मारायलाही सुरूवात काय ? धन्यैय ,पगार कामाचा मिळतो ध्यानात असू द्या '

तीन मिनिटांनी कण्हत कुंथत कुंथुगिरी आविर्भावाने कारकुनी कामाचा प्रारंभ होतो

No comments:

Post a Comment