Friday, 21 April 2017

“जोशी ……..😈  “ 
नेहमी छान सुप्रभातचे मेसेज पाठवणा-या एका काकुंचा मेसेज आला. मी दचकलो.  मग एक छानसा पुष्पगुच्छ दिला पाठवून, विथ एक झकास गुडमॉर्नींग मेसेज. रिप्लाय आलाच लगेच, काकु ऑनलाईन होत्या तर. 

“जोशी , तुम्ही ही त्यातलेच निघालात😏”

  “ऑ ? कशातला ? , काकु काय झालंय? आज असा सूर का ?”

“वाटलं नव्हतं हो तुम्ही असे असाल.”

“पण झालय काय?, तब्येत बरी आहे नं ?” 

“करून सवरून मोकळे, तुमचे पाय ही मातीचे निघाले. सांगा जोशी , तुमच्या पोस्ट मी लाईक करत होते नं ?”

“होय, होय” 

“तुमच्या पोस्टवर कमेंट करत होते की नाही?” 

“होय, होय”  तुम्ही ही माझ्या पोस्टला लाईक करायचात नं ?”
होय, होय, अहो चांगलं लिहीता तुम्ही काकु, स्पेसीफिकली पाककृतीच्या पोस्ट, तुमची सांगण्याची पद्धत, फोटो, सुंदरच असतात.त्यावर कमेंट ही करायचो भरभरून”
“तेच तर, म्हणून तर वयानं लहान असूनही , तुम्हांला अहो जाहो करत असते, पण तुम्ही ही त्यातलेच निघालात😥 “

काकुला झालंय तरी काय ?ही बया सांगायलाही तयार नाही. सत्राशेसाठ प्रश्न विचारण्यापेक्षा बोलून का नाही टाकत?

“काकु, माझं काही चुकलंय का ? सांगा तरी”

“कशाला सांगू , तुम्ही प्रसिद्ध लेखक, तुमच्या पोस्टला ५० लाईक्स तरी असतात, ढीगानं कॉमेंट असतात. तुमच्यापुढे मी तुच्छ, मी काय सांगणार ?” 

मला जरा गहिवरून आलं, माझ्या पोस्टला ५०, ५२ लाईक्स आल्यात या कल्पनाचित्रानी मी मनातल्या मनात आनंदानी डँन्स करू लागलो. पण तितक्यात पुढचं वाक्य आलं. 

“तुम्ही का केलंत असं ?” 

“????” 

हायला ही काय भानगड आहे, काकु काय झालंय ते सांगेना, बदडणं चालूच. 

“मी काय मेली, साधी गृहिणी” 

“काकु , त्याचा काय संबंध ?” 

“तेच तर, तुम्ही ही पक्के आतल्या गाठीचे निघालात, पुरूष जात दाखवून दिलीत. लहान मुलासारखा समजत होते , पण मिळणा-या लाईक , कमेंटमुळे तुम्ही ही हवेत गेलात, मला तुच्छ समजायला लागलात.” 

“काकु , अहो काही चुकलं असेल तर सांगा की, उगा का भाव खाताय?” 

मी पण वैतागलो होतोच. 
“मला मेलीला कोण भाव देणार? मला काय लाईक, कमेंट मिळतात का तुमच्यासारखे? पण एकच सांगते , एवढं हवेत जाणं बरं नव्हे, मला दुखावलंत ते दुखावलंत, मी पडले हाडाची गरीब. काल चांगली तुम्हांला आवडेल अशीच रेसीपी टाकली होती नं, तुम्ही असेच वागा, मी काय बोलणार? माझ्या जागी दुसरी असती तर तुम्हांला झापडून टाकलं असतं.😁😁” 

दुसरी असती तर झापडून टाकलं असतं? मं आत्ता तुम्ही तरी काय करताय? मरें ते, सरळ जावं पोस्टवर बघूया काय झालंय म्हणून काकुच्या वॉलवर गेलो. छान लाल भोपळ्याचं दह्यातल्या भरीताची पोस्ट होती. माझी कमेंट शोधली. दिसलीच नाही. मग लाईक दिलाय का ते बघितलं  आणि लक्षात आलं गडबडीत wow च्या स्माईलीऐवजी ha ha ची स्माईल गेली होती.  परत आलो तर काकुंचा मेसेज 

“एवढं बोलतीय तरी रिप्लाय नाही तुमचा,माझ्या पोस्टची टिंगल उडवडल्यासारखी स्माईली टाकलीत ती टाकली. पण लक्षात ठेवा जोशी, तुमच्या टिंगलीने खच्चीकरण होण्यातली मी नाही. मी पोस्ट टाकत रहाणार, पण तुमची एकही पोस्ट लाईक करणार नाही, जोशी वाटलं नव्हतं तुम्ही असे निघाल “ 

काकु आता फिरकणारही नाहीत.  मित्रांनो, मैत्रीणीनो, लाईक करतांना जपून करा ब्वॉ, 😂एखादी लाईक कायमस्वरूपी बंद होऊ शकते.

No comments:

Post a Comment