इंजिनियर असो वा डॉक्टर , ही रसायनं वेगळीच असतात. अंहं, अंहं , गैरसमज नकोत. रसायनं म्हणतोय ते अश्या अर्थी की रसायनांमधे कित्येक पदार्थांचा समुच्चय असतो , तसंच या इंजिनियर , डॉक्टर मंडळींचं. तुम्ही तुमच्या मित्रयादीतले, पैचानमधले आठवून बघा. काय गणित असतं कळत नाही , पण इंजिनियर नुसता इंजिनियर, किंवा डॉक्टर नुसता डॉक्टर असलेला /ली बघितलंय कधी ?. मुळ व्यवसायाशी इमान राखून काही ना काही जास्तीची अँक्टीव्हिटी असतेच असते. मग ते ड्रॉईंग असो, लिखाण असो, किरकोळ/भरपूर धडपड असो, वेगळं काहीतरी करण्याची आवड म्हणा, छंद म्हणा असतंच, आणि मुळ व्यवसायाइतकंच नैपुण्यही त्यात मिळवलेलं असतं. हेक्टीक शेड्यूलमधूनही वेळ काढत जोपासतात. आणि सुरूवातीला ज्याक ऑफ ऑल असलेली ही मंडळी नंतर मास्टर ऑफ ऑल होत जातात. असाच एक मित्र, फेसबुकवर ओळख झालेला. अरे , तुरेचं स्वातंत्र्य त्यानीच वागण्यातून दिलंय म्हणून, नाहीतर , अरे, तुरे करण्यासारखी एकही गोष्ट नाहीमाझ्याकडे, केवळ वयानं ६ महिने वाढीव असण्याव्यतिरिक्त कोणतंच मोठेपण माझ्याकडे नाही. ब-याच गोष्टीतला हा बापमाणूस. अवलिया म्हणतात तसा हा “एचबी”, कळलं नं कुणाबाबत बोलतोय, तुमचा आमचा देवा, त्याच नावानं संबोधणारा, कुठे कुठे पोस्टमधून , तुकड्या तुकड्यात भेटणारं हे अजब रसायन. जास्त परिचीत रोल उत्कृष्ठ फोटोग्राफर, वाईल्ड लाईफ हे वैशिष्ठ्य, एकसे एक डोळ्यांची पारणे फेडणारी फोटोग्राफी, शेतीमधे इंटरेस्ट, बल्लवाचार्याची भुमिका घेतली की, कैरीच्या लोणच्याचा खार ही कल्पनेपलीकडच्या पदार्थात वापरणार, बरं त्याला दाद असते त्याच्याच बायकोची, म्हणजे शंकेला वाव नाही, बरं , हाच सदगृहस्थ जेव्हा टूर घेऊन जातो, जंगलात बिंगलात, तर सोबत गेलेली मंडळी फिदा होतात याच्यावर, तेही आहेच, प्रदर्शनं भरवतो फोटोंची तर त्यालाही तुंडूंब गर्दी, आणि रोज फेसबुकावर दोन तरी पोस्टी, खुषखुषीत ते आरोएफेल, एलोएल पर्यंत हशे वसूल करणार , देशभक्तीच्या पोस्टीत अंतःकरण ढवळून काढणार, फिल्मी संगीतात एकेका गायकाचं, संगीतकाराचं , गुणावगुणांचं कौतुक करणार, चुकलं असेल तिथं बडवणार, कधी त्याच्या आवडत्या वपूंसारखं गहिवरून टाकणार, कधी गझल लाजेल असं हिंदी लिहून जाणार. मयासूरासारखं जे पाहिजे ते शब्दसामर्थ्यानं उभं करणार, अगदी बै च्या अरेरावीपासून ते लाडक्या लेकींचं कोडकौतुकापर्यंत वाटेल ते. स्वतःची पुस्तकं छापतो, तर विश्वविख्यात फोटोग्राफर असोत किंवा डॉ. प्रकाश बाबा आमटेंसारखी उत्तुंग देवस्वरूप माणसं प्रस्तावना लिहून जातात. तरीही माझ्यासारख्या किंचीत माणसांना हा जवळचा वाटतो. नव्हे धरून ठेवतो. हे सगळं हा कसं करू शकतो याचंच विलक्षण अप्रुप आहे. हे सगळं भडाभडा बोलण्याचं कारण , ८ फेब्रुवारीची याची पोस्ट. दीपस्तंभ म्हणून पुस्तक आणतोय. पुस्तकाबद्दल लिहील्यायत चारच ओळी. मला माणसं जमवता आली , आणि ती नसती तर मी , मीच झालो नसतो असं सांगतोय. म्हणजेच या रसायनांनी ज्यांचा उल्लेख दीपस्तंभ म्हणून करावा, अफाट भरतीच्या समुद्रात, थैमान घालणा-या निसर्गाच्या रौद्ररूपात , भरकटलेल्या तारूच्या खलाशाला आधार देणा-या दीपस्तंभाप्रमाणे या माणसांनी ,आधार वा मार्गदर्शन केलंय आणि म्हणून आजचा मी आहे असं एचबी चं म्हणणं. नक्कीच या दीपस्तंभांचं कुतुहल मनात दाटून आलंय. आणि दुसरं पुस्तक , हाऊ टू फेल इन लाईफ. वर सांगितलेलं सगळं करताना , चुकलो कुठे हे सांगणारं पुस्तकही लिहीलय म्हणे. कमालेय, पण ज्या चुका मी केल्या , तश्या तुम्ही करू नका हे सांगणं असावं किंवा अश्या चुका घडूनसुद्धा माणूस इतकं काही करू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न असावा. मला अनूज म्हणणा-या या एचबी च्या दोन्ही पुस्तकांची तिव्रतेनं वाट पहातोय. प्रकाशनापर्यंतचे सर्व सोपस्कार पार पडोत, आणि अतिशय काळजीपुर्वक केलेली पार्सलं हातात पडोत. एचबीची दोन्ही पुस्तकं काहीतरी शिकवण देणारी असणार हे नक्की. हातात येईस्तो वाट पहावी, एवढंच आपल्या हाती आहे. एचबी , ऑल द बेस्ट💐💐💐💐
No comments:
Post a Comment