Wednesday, 26 July 2017

नीलकंठेश्वर दर्शन


तो आत्ता रांगेत उभा होता. अगदी हळूहळू रांग पुढे सरकत होती. डाव्या हातात पूजेचं ताट. किती तरी दिवसांची त्याची इच्छा आज पूर्ण झाली होती. नीलकंठेश्वराचं दर्शन घ्यायचं होतं त्याला.

चार पाच वर्षापूर्वी त्याच्या बाबांनी सांगीतलं होतं. आजारी होते तेव्हा. गाव सोडून नोकरी निमित्ताने बाहेर पडल्यावर त्यांचं पुन्हा जाणं झालं नव्हतं नीलकंठेश्वराला. चारापाण्याची वेळ झाल्यावर वासरं जशी व्याकुळतात, तसे बाबा आठवणीनी व्याकुळ झाले होते. त्यांचं जाणं झालंच नाही.

आणि आज न पाहिलेल्या नीलकंठेश्वराचं दर्शन घ्यायला तो श्रावणी सोमवारी रांगेत उभा होता. काळ्या पत्थरांनी घडवलेल्या सभामंडपाबाहेर , तात्पुरत्या रोवलेल्या खांबांना बांधलेल्या दोरांनी तयार केलेल्या रांगेत तो उभा होता.

सभामंडपापाशी पोहोचतानाच एक व्यक्ती समोर आली.

“साहेब , चप्पल काढा साहेब , पलीकडे ठेवतो.”

त्या शर्ट पायजम्यातल्या त्या दाढीवाल्याकडे चपला दिल्या. दिलेलं टोकन त्यानी खिशात घातलं. सभामंडपातून आता हर हर महादेव, शिवशंभोचे स्वर ऐकु येऊ लागले. कुठेतरी आत ओम नमः शिवाय ची धून ऐकू येत होती. बेल, कापूर, उदबत्ती, तुपाच्या ज्योतींचा वास गाभा-यातून येत होता.
पवित्र वातावरणात तो गाभा-याशी पोहोचला. काळ्याशार पींडीवर नीलकंठेश्वराचा चांदिचा मुखवटा, बेल, फुलं, गंध, आणि अभीषेकपात्रातून अखंड सुरू असलेली दूधपाण्याची धार.

हातातलं पूजेच ताट पुजा-यांकडे दिलं. प्रसादाचं नारळ भक्कल, बेलपान हातात देतानाच , पुजा-यानी बघीतलं , त्याने दोन हजारची नोट पेटीत टाकली होती. पुजा-यानी पींडीवरून वाहणारे तीर्थ एका बाटलीत भरून हातात दिलं आणि कपाळी चंदनटिळा रेखला.

तृप्त मनानी तो गाभा-यातून बाहेर पडला. वडीलांची इच्छा पूर्ण केली होती त्यानी.
दिवसभर त्याच आनंदात होता तो. घरी, मित्रांना फोन करून तो भरभरून बोलत होता. कौतुकाचे शब्द कानी पडून त्याला स्वतःला आनंद होऊ लागला. वडीलांची इच्छा पूर्ण करू शकलो याचा अभिमान मनी दाटू लागला.

रात्री बाराची परतीची गाडी पकडण्याआधी तो पुन्हा मंदिरात आला. जाताना पुन्हा दर्शन घ्यायला. मंदिरात आता तुरळक गर्दी होती. त्यामुळे थेट सभामंडपात जाता आलं. थोडा वेळ तो गाभा-यापाशी बसला.

नीलकंठेश्वराला लोण्याची आरास केली होती. काळ्याशार शाळूंकेवर लोणी लिंपून केलेला तो मुखवटा, त्यावर काजळाचे रेखीव डोळे, मिश्या, कुंकु आणि गोपीचंदनानी रेखलेला त्रिपुंड्र , कमळांची आरास, रंगीबेरंगी फुलांची नक्षी , आणि बाजूनी रचलेली हिरवीगार बेलाची पानं. गाभा-यात पुजारी आणि एक शिवमहिम्नाचा उच्चार करत बसलेले. डोळ्यात नीलकंठेश्वराचं रूप साठवून तो डोळे मिटून शांत बसून राहिला. त्याला भरून आलं होतं, एक असीम शांतता मनांत.

काही वेळाने त्यानी डोळे उघडले. नेमक्या त्याच वेळी समया उजळून पुजारी बाहेर आले. मागच्या व्यक्तीचा चेहरा त्याला आधी पाहिल्यासारखा वाटला. त्याच्या आश्चर्याला पारावार उरला नाहि.

सकाळचा चपला उचलणारा दाढीवालाच होता तो. तो गाभा-यात सोवळं नेसून शिवमहिम्न म्हणत होता.

पटकन उठलाच, जवळ गेला. नमस्कार केला हात जोडून.

“तुम्ही तेच ना ? सकाळी चपला घेऊन टोकन दिलं होतं ना तुम्ही ?”

बाजूला उभे असलेले पुजारी म्हणाले
“होय मुला हे तेच आहेत. या मंदिराचे मालक, ही त्यांची पुर्वापार सवय आहे. आम्हांला सवय आहे, सेवेची संधी आहे म्हणतात “

तो पर्यंत दाढीवाले शांत होते ते बोलू लागले
“नीलकंठेश्वराचं दर्शन घ्यायला गर्दी खुप होते. प्रत्येकाला दर्शन घ्यायची घाई असते. मंदिरातले पुजारी, सेवक पुजा महाप्रसादात गुंतलेले असतात. म्हणून मी ही सेवा करतो. देवाच्या भक्तांची सेवा पहिले, रात्री देवाची सेवा.”

“आज नीलकंठेश्वराच्या दानपेटीत जमा होईल ते आम्हा पुजारी आणि सेवकांत दादा वाटून टाकतात.”

“नीलकंठेश्वर देतोय ते त्याचंय , मी फक्त साक्षी. चला आता महाप्रसाद घेऊनच जावा “
दिवसभरातली त्याची विचारांची पुटं क्षणार्धात गळून पडली आणि शंभोच्या प्रसादासाठी रिक्त मनानं तो जाऊ लागला.

तो पानपट्टीवाला

समोरच्या कॉर्नरवरचा पानपट्टीवाला. हो हो तोच समोरचा. आहे तसाच आहे , कितीक वर्ष.

शाळेत जात असतानाही तो तिथेच होता.

गोळ्यांच्या बरणीतनं ५ पैश्याच्या चार गोळ्या काढून द्यायचा बसल्या जागेवर.

कॉलेजच्या दिवसातही तो तिथेच. गल्लीतल्या अंडरआर्म्स क्रिकेटचा बॉल सणकत त्याच्या टपरीत गेला. तरी चिडून बाहेर आला नाही. बसल्या जागीच परत केला. कसंनुसं हसून , फुटकी बरणी टाकून देताना तो पाहिला.

चोरून सिग्रेटी घ्यायचो तेव्हाही तो तिथंच होता. हातातली पानं कापायची कात्री बाजूला ठेवून सेकंदात विल्स हातात द्यायचा बसल्या जागेवरच. उधारी कधी मागीतली नाही, पण होताच असा की उधारी चुकवली नाही असं झालंच नाही.

दंगलीच्या वेळी एक फळी लावून घेत , बसला होता तिथंच. नजरेसमोर पोलीसांनी हाती सापडेल त्याला गुरासारखा तुडवला ते शांतपणे बघत तो तिथंच होता , बसल्या जागी.

लग्नानंतर वर्ख लावलेली मसाला पानं बांधून देताना, एक डोळा मिचकावीत विल्सच्या पाकीटाकडे बघून हसायचा तो बसल्या जागी. चेहरा पडला की म्हणायचा आवो, ते ही बसल्या जागी.

नाना सरपोतदारांना अँम्ब्यूलन्समधून आणलं तेव्हा चौकातलं एका न एका घरातलं माणूस उतरून आलं खाली तेव्हाही तो तिथंच होता.

हल्ली माझ्याकडून मागीतलेल्या पाच दहा रूपयाततून कधी कुरकुरे, कधी वेफर्स , कधी पेनातल्या रिफीली पिट्टया त्याच्याकडून आणतो तेव्हाही तो तिथंच बसलेला असतो.

कालचीच गोष्ट. इंग्रजी सी आकार उलटा करावा तशी देहाची धनूकली झालेली म्हातारी , मधूनच कासवासारखी मान लांब करत , पुन्हां खाली झूकत रस्ता ओलांडायचा सावकाश प्रयत्न करत असताना सुसाट वेगात येणारी इनोव्हा तिला उडवून गेली , गर्दी जमली सगळी. तेव्हांही तो तिथंच होता. फक्त फरक एवढाच झाला . पाण्याचा लखलखीत तांब्या एका हातात घेऊन , शक्य तेवढ्या जलदीत तो गर्दीत घुसला , काखोटीला मारलेल्या कुबडीसह , एका पायावर, धडपडत, म्हातारीला पाणी पाजायला.

आजही तो तिथंच आहे पानं लावत, बसल्या जागी.

फेसबुक , मेसेंजर ही दोन्ही माध्यमे कमाल आहेत. माणसं जोडली जात आहेत या माध्यमातून. चांगल्यापुरता विचार करता खरोखर याचा उपयोग होतोय.

विरंगुळा असो, मनातले विचार पोहोचवणं असो, माहिती देवाण घेवाण, ख्यालीखुशाली कळवणं सगळं सोपं झालंय.

पलीकडल्या गल्लीतलं कामाच्या रगाड्यातलं माणूसही इथं जोडलं जातं. कोण चिपळूणात, कोण मुंबईत , कोण पुण्यात, नाशकात, औरंगाबादेत, नागपूरात, कोण बेंगलोरात, कोण जर्मनी, सौदी, अमेरीका . पण सगळी एकत्र येतात इथे.

कित्येकांशी मैत्र जुळतं.

इथं फेरी मारली की या गणगोताची बित्तंबातमी मिळते, छोट्या छोट्या आनंदाचे प्रसंग,  वेधक वेचक खोचक गप्पाटप्पा होतात. इथं बसून तिथं शुभेच्छा देता येतात. इथं संपर्क साधून काही सल्ले, माहिती मिळते, काही उपक्रमही चालवले जातात. बसल्या जागेवर सहभागी होता येते.

रोजच्या जगण्यातल्या , वाढदिवस, लग्न, नवीन वास्तू , साठीशांती, सहस्त्रचंद्रदर्शन पासून ते मुलाबाळांच्या तक्रारी, गोडूलेपण, पालकांच्या अडचणी, कुचंबलेपण , गोड कडू आठवणी  सर्वांबरोबर शेयर करता येतात.

पण एका बाबतीत मात्र असहाय असतो आपण. दूरवरचं अंतर जोडलं जरी गेलं तरी दुखःद प्रसंगी, अन्य कुणी कळवल्यानंतर, शोकसंदेश पाठवणे किंवा आठवणी लिहीणे या व्यतिरीक्त काहीच करू शकत नाही. फोन हा ऑप्शन आहे परंतू त्यावेळी ती व्यक्ती मुळातच दुखाःवेगात असल्यानी मनमोकळं बोलू शकेल याची अपेक्षाच करू शकत नाही. वास्तविक , च्यामारी बॉसनी लई पीडलाय राव , वैतागलोय म्हणा किंवा अय्या , अरे तुला सांगायची गंमत म्हणजे नं , पालकपनीरला चूकून दोनदा तिखट घातलं, जी बोंबाबोंब इतपत जवळचं बोलणारी व्यक्ती अचानक दिसेनाशी होते . काही वेळाने, दिवसानी कळतं की काही दुखःद प्रसंग घडलाय.

जवळीकीमुळं सतत टोचणी लागते, या वेळी आपण खरंच जवळ असायला हवं होतं, धीर द्यायला, आधाराचा स्पर्श देऊन साचलेलं मनातलं मोकळं करायला.

मुळात जवळची व्यक्ती जाणं म्हणजे आयुष्याचा एक कप्पा कायमचा बंद होणं, अश्यावेळी त्या व्यक्तीलाही हे सगळं बोलावसं , भडभडून येणारं रडू या रोजभेटीतल्या माणसांपाशी व्यक्त करावं वाटतंही असेल. परंतू तसंही करता येत नाही.

मग मात्र हे दूरचं अंतर जास्तच दूरचं वाटतं

“तुम्हां नवीन पीढीला नवीन विचार करायचे कष्ट नकोत, पूर्वसूरींनी काही म्हंटलं की ओढलीच तुम्ही री “ आचार्य सात्वीक संतापाने बोलत होते (म्हणजे उखडून)

“मुळात तुम्हांला विचारच करायला नको. परमेश्वरानं खांद्याचे वर एक पूसायचा अवयव दिलाय, त्याच्याही वर अवयव दिलेत ते वापरा रे, डोळे, कान , मेंदू वापरा”

“आचार्य , संदर्भ लक्षात येईना”

“हे बघा , मुळात संधीप्रकाशात या शब्दाचा अर्थच कळला नाहीये ,संधीप्रकाश संध्याकाळचा,  म्हणून मृत्युशी संबंध जोडताय,लेको, हे घे वाच , संधीप्रकाशात लिहीताना बा.भ.बोरकर पोएट होते हे लक्षात घे, तुमच्यासारखे पोपट नव्हेत, पोपटपंची करणारे”

आचार्यांना उमगलेली संधीप्रकाशात कवीता पुढीलप्रमाणे.

“यां निशां सर्व भूतानां , तस्याम जागर्ती संयमी” सा-या मर्त्य जगातील भूत म्हणजे जीव ढाराढूर पंढरपूर लंबायमान झालेले असतात, बरोब्बर त्याचवेळी संयमी जागृत असतात. जसे की साधूपुरूष आणि कवी.या शांत वातावरणात, चिंतन करून नवनिर्मीतीचे प्रयत्न सुरू असतात. एक वेगळी कल्पना, वेगळे काव्य , वेगळे आयुष्य कवी मंडळी जगत असतात. प्रास, अनुप्रास, वृत्त , मात्रा, स्वच्छंद यात मनातली निर्मीती बद्ध करण्याचा ध्यास असतो. उत्तर रात्री केव्हां तरी कवी निद्रीस्त होतो.

जगाची सकाळ लवकर झाली तरी कवीची निद्रा अपूर्ण असल्याने त्याला पुन्हा झोपावेसे वाटते. नेमकी हीच भावना  संधीप्रकाशात या कवीतेत कवीने यथार्थ मांडलीय.

आयुष्याची आता झाली उजवण
येतो तो तो क्षण अमृताचा
जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब
तुझे प्रतिबिंब लाडेगोडे

__________________

कालच्या रात्री जे वेगळ्या निर्मीतीतलं आयुष्य कवी जगला , त्याची उगवतीला झालेली मावळण म्हणजेच उजवण झाली आहे. नवनिर्मीती साध्य झाल्याने अता प्रत्येक क्षण अमृतासमान गोड. नवनिर्मीत कवीता मनांत घोळते तीची बिंब , प्रतिबींबही गोड , सुखावणारी वाटतात कवीला.

सुखोत्सवे असा जीव अनावर
पिंजर्‍याचे दार उघडावे

__________________

आता त्या निर्मीतीचा आनंदाचा सुखाचा उत्सव सुरू आहे. जगाच्या रूढींचा पिंजरा तोडून भर दिवसा निद्रेचे द्वार उघडावे ही इच्छा कवी नमूद करतो.

संधीप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी
असावीस पास जसा स्वप्नभास
जीवी कासावीस झाल्याविना

____________________

(ज्या शब्दांची उकल झाली नाही तो शब्द म्हणजे संधीप्रकाश. केवळ त्यामुळे पूर्वसूरी एकाच वाटेने विचार करीत राहिले. दोन कालातील संधीतला प्रकाश म्हणजे संधीप्रकाश , कवीला अभिप्रेत , रात्र आणि दिवस यांच्यामधला पहाटेचा संधीप्रकाश  आहे हे नक्की )

या पहाटेच्या संधीप्रकाशात सोन्यासारखं दिसणारं सूर्यबिंब आहे, तोवर पुन्हा माझे डोळे मिटावेत झोपायला. ( नंतरचा टळटळणारा सूर्य बघून डोळ्यांची खाचरं का कराच्चीयेत ) झोप येईस्तो नवनिर्मीत कवीतेचे भास , सहजपणे आठवत रहावेत. आठवणीने कासावीस न होता झोप मिळावी.

तेह्वा सखे आण तुळशीचे पान
तुज्या घरी वाण नाही त्याची
तूच ओढलेले त्यासवे दे पाणी
थोर ना त्याहूनी तीर्थ दुजे
_____________________

डोळ्यावर निद्रेचा अंमल सुरू होताना, कवी सखीला सांगतोय तुळशीचे पान द्यायला.  दंतधावन न करता कवी पुन्हा निद्राधीन होणार असल्याने ,तुळशीचे पान चघळावे ही इच्छा स्वाभाविक आहे. तुळशीबरोबर खरे तर ओव्याचे पानही सखीला मागीतले असावे. दुर्गंधी दूर होण्यासाठी. मात्र मीटरमधे बसत नसल्याने तुळशीचे पानच असावे. सकाळी पुन्हा झोपायचे असल्याने चहा वगैरे पिण्याऐवजी, तूच ओढलेले पाणी दे असे कवी सांगतो. तूच ओढलेले का ? तर तू अन्य कुणाला सांगीतलं , मग त्यानी आणि कुणाला सांगीतलं तर पाणी मिळण्यासाठी उशीर होईल . कवीला तर लवकर झोपायचं आहे. म्हणून तूच ओढलेले , हे ठाम पणे कवी सांगतो.

वाळल्या ओठां दे निरोपाचे फूल
भुलीतली भूल शेवटली
____________________

अश्या रितीने तुळशीचे , ओव्याचे पान खाऊन पाणी पिऊन , कवी भुलीतली भूल सखीकडे मागतो. नाहीतरी वस्सकन तोंडावरचे पांघरूण ओढून निद्रेतून जागी करणारी सखी कवीला माहिती आहे. तिलाच कवीची विनवणी हे शेवटचे झोपू दे. ( कुठलाही हट्ट धरताना , हे लास्ट टाईम म्हणल्याशिवाय हट्ट पूरा होत नाही नं, सो भुलीतली भूल शेवटची. पुढच्या वेळेसही कवी हेच वाक्य पुन्हा म्हणेल)

वास्तववादी समीक्षक आचार्यांचा निरोप घेतला. दुसरं काय करणार

भागवतांकडे जाताना त्याची स्कुटर फार सावकाश चालली होती. जणू जायचंच नव्हतं त्याला. दोनवेळा परतावं असंही वाटलं पण सांगायला तर हवं होतं.

मागच्या वर्षी सहज गप्पातून कळलं , भागवत नियमानं वारीला जातात दरवर्षी, बरोबर पंचवीस तीस जणं असतात.

दरवर्षी पेपरमधून येणारे लेख, वारीची परंपरा, त्या दिंड्या पताका, भजनात तल्लीन झालेले वारकरी, एवढ्या प्रचंड समुदायातून पंढरीला जाणं तेही पावसात. सगळं मोहून टाकणारं होतं त्याच्या देवभोळ्या मनाला. बातम्या, कार्यक्रमातले व्हिडीयो, आणि त्या कुठल्याश्या चित्रपटातल्या विठ्ठल विठ्ठल जयघोषात चालणा-या वारीचं वातावरण बघून भारावला होता तो. काहीही झालं तरी वारी करायचीच ही भावना दृढ होत होती.

आणि गेल्यावर्षी कळालं , भागवत जातात वारीला, शेजारच्या गावातून.

त्याचा मित्र धनू सांगत होता त्याला. धनूचं हे सातवं वर्ष. पाच दिवस चालायचं रोजचं ३० ते ३५ किलोमीटर साधारण, वारीचे अनुभव ऐकताना त्याला उमगत गेलं , एकट्यानी करायला गेलं तर जमणार नाही पण वारीत वारक-याबरोबर गेलं की एकच भावना मनांत ठेवायची विठूराया तुझ्या भेटीला येतोय. तोच सगळं करवून घेईल.

धनूला विचारून ठेवली होती माहिती. आणि ४ मेला भागवत काकांना भेटून नक्की झालं तेव्हा एक अनुपम उत्साह त्याच्या अंगी संचारला. होतंय रे , किंतू नको मनांत हे भागवतकाकांचे शब्द त्याच्या मनातल्या होईल की नाही शंकेचे समूळ उच्चाटनकर्ते झाले.

स्कुटर लावली. अपार्टमेंटचा जीना चढून काकांच्या दाराची बेल वाजवली. भागवत काकूंनी दार उघडलं .

“काय रे, लवकर परतलास का ? तुझी पहिली वारी नं ही , पूर्ण तरी करायची होतीस. काका सांगत होते  ,पोती शिवून घेतलीत , कॉटन लावलय अस्तराला, चालायची सवय करतोय ते “

“काकू  , कसं सांगू ? मी गेलोच नाही “

“का रे?”

“काकू  तयारी सगळी केली, धनूला विचारा . रोज दहा किमी चालायला जात होतो , सवय व्हावी म्हणून, पण……….विठूरायाचं दर्शन दिसत नाहिये नशीबी. तेच सांगून सॉरी म्हणायला आलो होतो.”

“का ? “

“काकू, आई धूणं वाळत घालताना अचानक पाय घसरला, निमित्त झालं , श्रद्धा हॉस्पीटलला नेलं वाटव्यांकडे, खुब्याचं हाड मोडलंय, सहा महिने बेडरेस्ट”

“श्रीराम, घरी कोणकोण असतं ?”

“बाबा आहेत , भाऊ आहे धाकटा, मित्रमंडळी आहेत, मावशी आलीय पण परवा निघायचं आणि आदल्या दिवशी  हे असं झालं, काकू शक्यच झालं नाही जायला”

बोलताना तो खुप गंभीर झाला होता. दोन मिनीटं शांततेत गेली.

“हे बघ जे होतं ते चांगल्याकरता , तु असा गंभीर होऊ नकोस. तुला एक सांगु , अरे विठोबाचं नावं घेताना आपण काय म्हणतो रे ? संतांची नावं घेताना आपण काय म्हणतो रे ?”

“विठोबाराय, विठूमाऊली”

“बस, बस , हेच लक्षात घे. पिता आणि माऊली. अरे आम्ही  काका जातात ते पंढरीच्या विठूमाऊलीचं दर्शन घ्यायला. पण तुला तर संधी मिळालीय स्वतःच्या माऊलीची सेवा करण्याची. तिनं तुझ्यासाठी जे केलं त्याचं पांग फेडायची. उठ वेड्या, बाबांचं वय झालं असेल. मावशी , मित्रमैत्रीणी थोडा काळ येतीलही. पण तु आणि भाऊ दोघंही रहाणार आहात आईजवळ, माऊलीची सेवा हाच नियम करा चातुर्मासाचा. तिला जे समाधान मिळेल त्याचं पुण्य थोर असेल.”

“काकू………….”

“ऐक , आणि मी स्वतः विठुमाऊलीला साकडं घालायला सांगीन काकांना या माऊलीकरता , तेव्हा मनांत विठुमाऊलीचं स्मरण कर आणि या सेवायात्रेच्या वारीच्या आनंदात तल्लीन हो , हो आणि थांबायचं असेल रात्री कधी तर फोन कर , काका , मी आहोतच.”

परततांना त्याच्या स्कुटरचा काटा ७० चा स्पीड दाखवायला लागला होता. ती वारी हुकली तरी या वारीचा वारकरी आता आनंदात होता. मनांत अभंगाची एक ओळ पुनःपुन्हा रूंजी घालत होती “माता विठ्ठल, पिता विठ्ठल”

हि-याला कोंदण साजेसं हवं , खरंच नुसतं कोंदण झळकणार नाही, आणि साजेसं कोंदण मिळाल्याशिवाय हि-याचे पैलू ही दिसणार नाहीत.

गेले सात दिवस हातात मिळालेले कवीतेतले हिरे ठेवले तुमच्यासमोर. पण खरंच मान्य करतो, अर्थ उलगडून सांगणारं कोंदण देऊ नाही शकलो. किंबहूना असंही असेल की ते अस्सल हिरेही नसतील. पण आठवड्याच्या शेवटी एक रचना समोर ठेवतोय. त्यावर भाष्य काहीही करणार नाही. रचना कुणी केलीय माहीत नाही. ज्या व्यक्तीला विचारलं , अस्सल काही पाठवू शकशील का ? प्लीज ? त्या हि-यासारख्या व्यक्तीनी , ही रचना मला फॉर्वर्ड केली. नाव न सांगण्याच्या अटीवर.

तुमच्यासमोर ठेवतोय.  

___________________

तिने विचारलं, तुला कुठलं फुल आवडेल ?
तो क्षणात उत्तरला...
मनात जपायला चाफा आवडेल
आणि ओंजळीत धरायला मोगरा...

वहीत ठेवायला बकुळ आवडेल
आणि धुंद व्हायला केवडा...

बोलायला अबोली आवडेल
आणि फुलायला सदाफुली...

पण, प्राजक्त मात्र आवडेल तो,
देवाच्या पायाशी ठेवायला..आशीर्वादासाठी...

यावर ती थोडीशी नाराज झाली,
कारण तिचं नाव रातराणी होतं...

त्यानं ते ओळखलं... तो पुढे झाला आणि हलकेच हसत म्हणाला,
हे सगळं नंतर आवडेल.. रातराणी खिडकीशी दरवळल्यानंतर...!!

तेव्हापासून ती अखंड दरवळते आहे...
त्याच्या मनात... अंगणात...!!!

आपल्या सावली पासून आपणच शिकावे
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे

शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत?
म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे.!!!

जो चुुकतो तो माणूस , असं कुणीसं म्हणालं आहे. खरच आपण कितीतरी चुका करत असतो, लहान, मोठ्या, बारीक सारीक, गंभीर, कळत नकळत.

चुक झाली की परिणाम भोगायला लागतात. चुक छोटीशी असेल तर ती निस्तरली जाऊ सकते. मोठ्या चूुकीचं प्रायश्चित्तही मोठ्या प्रमाणातच असतं. चुक मुद्दाम घडते का ? बव्हंशी नाही. चुक करावी आणि परिणामाची सजा मिळावी असं कुणाला वाटेल ?. तरीही चुक घडते.काही चुका मात्र तुमचं होत्याचं नव्हतं करणा-या असतात.

माहिती नसल्याने, स्वतःवर वा इतरांवर अति विश्वास असणे, स्वामीत्वाची भावना, भेदरटपणा, बावळटपणा, कितीकदा भावनेच्या भरात चुक घडून जाते.

जे झाल्या चुकीतून धडा शिकतात, आणि मुख्य म्हणजे लक्षात ठेवतात, त्यांची ती चुक पुन्हां घडत नाही. मात्र अन्य चुका घडतात, तरीही त्यांची प्रगती होत रहाते.

चुका टाळण्यासाठी प्रयत्न केला तर उपयोग निश्चित होतो, मात्र प्रयत्न चुकीचा असेल तर मात्र अधिक चुका होत रहातात.

समोरच्याची चुक माफी मागीतल्यावर सजा कमी करता येते खरी, पण त्यासाठी मन मोठं हवं, समोरच्याचं वर्तन ही तसं हवं. अन्यथा झालेल्या चूुकीने नाश अटळ, छोट्या मोठ्या स्वरूपातला.

एकही चुक न करणारा मनुष्यप्राणी मला अद्याप दिसलेला नाही. कारण कोणतीच चुक न करण्याची चुक त्याचेकडून होत असते. चुक या विषयावरची कवीता , सुधीर मोघेंची, वाचूया

______________

पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी

क्षणोक्षणी चुका घडतात

आणि श्रेय हरवून बसतात.

आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला

फार काही शिकवत असतात.

कणभर चुकीलाही

आभाळभर सजा असते

चुक आणि शिक्षा यांची कधी

ताळेबंदी मांडायची नसते

एक कृती, एक शब्द

एकच निमिष हुकतं हुकतं

उभ्या जन्माच्या चुकामुकीला

तेवढं एक निमित्त पुरतं

अखेर हे सगळं घडतं

केवळ आपण काही शिकण्यासाठी

आपण मात्र शिकत असतो

पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी

कवी - सुधीर मोघे

जो चुुकतो तो माणूस , असं कुणीसं म्हणालं आहे. खरच आपण कितीतरी चुका करत असतो, लहान, मोठ्या, बारीक सारीक, गंभीर, कळत नकळत.

चुक झाली की परिणाम भोगायला लागतात. चुक छोटीशी असेल तर ती निस्तरली जाऊ सकते. मोठ्या चूुकीचं प्रायश्चित्तही मोठ्या प्रमाणातच असतं. चुक मुद्दाम घडते का ? बव्हंशी नाही. चुक करावी आणि परिणामाची सजा मिळावी असं कुणाला वाटेल ?. तरीही चुक घडते.काही चुका मात्र तुमचं होत्याचं नव्हतं करणा-या असतात.

माहिती नसल्याने, स्वतःवर वा इतरांवर अति विश्वास असणे, स्वामीत्वाची भावना, भेदरटपणा, बावळटपणा, कितीकदा भावनेच्या भरात चुक घडून जाते.

जे झाल्या चुकीतून धडा शिकतात, आणि मुख्य म्हणजे लक्षात ठेवतात, त्यांची ती चुक पुन्हां घडत नाही. मात्र अन्य चुका घडतात, तरीही त्यांची प्रगती होत रहाते.

चुका टाळण्यासाठी प्रयत्न केला तर उपयोग निश्चित होतो, मात्र प्रयत्न चुकीचा असेल तर मात्र अधिक चुका होत रहातात.

समोरच्याची चुक माफी मागीतल्यावर सजा कमी करता येते खरी, पण त्यासाठी मन मोठं हवं, समोरच्याचं वर्तन ही तसं हवं. अन्यथा झालेल्या चूुकीने नाश अटळ, छोट्या मोठ्या स्वरूपातला.

एकही चुक न करणारा मनुष्यप्राणी मला अद्याप दिसलेला नाही. कारण कोणतीच चुक न करण्याची चुक त्याचेकडून होत असते. चुक या विषयावरची कवीता , सुधीर मोघेंची, वाचूया

______________

पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी

क्षणोक्षणी चुका घडतात

आणि श्रेय हरवून बसतात.

आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला

फार काही शिकवत असतात.

कणभर चुकीलाही

आभाळभर सजा असते

चुक आणि शिक्षा यांची कधी

ताळेबंदी मांडायची नसते

एक कृती, एक शब्द

एकच निमिष हुकतं हुकतं

उभ्या जन्माच्या चुकामुकीला

तेवढं एक निमित्त पुरतं

अखेर हे सगळं घडतं

केवळ आपण काही शिकण्यासाठी

आपण मात्र शिकत असतो

पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी

कवी - सुधीर मोघे