Tuesday, 21 February 2017

पहाट होती उजाडलेली
झोपेमधे होतो छान,
दरदरून मज घाम फुटला
ऐकुनी कुणाची भीषण तान 
हादरला पलंग जरासा
खिडक्या भिंती थरारल्या,
कुणी एकानी लावता सा
काचाही घाबरे हादरल्या 
ओळखुनी लक्षणे पुढची
पायी लागलीच चढवले बूट
वदलो हिला फिरून येतो
आश्चर्यचकीत ती पैल्या झूठ 
दोन किलोमीटर फिरूनी आलो
येताना भाजी आणली थोडी
कुणा एकाच्या भीषण तानेने
पहाटे फिरण्याची कळली गोडी

ढमी

राममंदिर कडून कॉन्ग्रेस भवनला वळसा घातला, स्टेशनरोडनी घराकडं जायचं होतं. सिग्नल लागला , भूक जाणवायला लागलेली, सिग्नल क्लीयर झाला ,   प्लाटीनाला लाथ घातली, सिध्धे निघालो. जाताना जाणीव झाली, कुणी टी शर्ट, जीन्स वाली ड्यूयो पिटाळतीय , साधारण प्यारलल, एक दोनदा मिरर व्हू घेतलाच. राजवाडा चौकातल्या सिग्नलला थटलो.शेजारी ड्यूयो, मान वळलीचं, तीने गाडी सुरूच ठेवलेली, एका हातानं गॉगल काढला, मी चमकलो , ये नैना पैचानके लग रहेले है यार, पण कुठे ?, तोपर्यंत ते तोंडाला गुंडाळलेलं फडकं ही काढलं, एका क्षणात मी जवळपास किंचाळलोच 
“ ढमे, तू ?” 
नेहमीच समोरच्याला येड्यात काढणारं हसू उमटलं
“ वेड्या , खुळ्या, कुठल्या तंद्रीत गाडी चालवतोस रे , मठ्ठ “
सिग्नल सुटला, दोघंही एक्सायटेड, नजरानजर अन मिरर व्यू तून बघत आजमावत , दोघांच्याही गाड्या नीट वळसा मारून आल्या रूटनी माघारी फिरत कॉन्ग्रेस भुवन कडे वळल्या, नकळत.  नटराज हॉटेलला लावल्या गाड्या. 
ढमे, कुठे होतीस ?, लग्न झकास मानवलय, इकडं कसं काय? 
वेडोबा, अरे कायतरी कामानी आले रे, बरं तु उपाशी राहू शकतोस, मला माहिताय, पण मला तरी काय तर मागव. 
ओके, ओके 
वेटरला बोलावला, सांगीतलं ओनीयन उत्ताप्पा, सांबारमधले वांग्याचे पीसेस नको. लगेच ढमी बोलली, एक इडली वडा, डब्बल हं, आणि चटणी वाटी एक्स्ट्रॉ  दोघंही गाढवं खिंकाळल्यागत , खळखळून हसलो. दोघांच्या आवडी निवडी लक्षात होत्याच. काही माना वळलेल्या जाणवल्या, गेल्या  त्या ह्याच्यात. बस , ढमी आणि मी बरेच दिवसांनी एकत्र , किसको फिकीर.  ढमी वतवतायला लागली ( वटवट) , मी हं हं करत होतो, धबधब्यासारखं , अखंड वतवतणं, सवय होतीच. मधेच जाणवल वाटतं तीला, म्हणाली 
वेडोबा,बोल की , हं हं काय नुस्तं ?  
लावली क्यासेट, मी ही वतवतलो.  शिवकुमार शर्माच्या संतुरच्या आलापीला, झाकीरभाईनी पखवाज ईस्टाईल घनगंभीर साथ तबल्यावर करावी, तसा माहौल क्रियेट झाला. मधेच कधीतरी ऑर्डर आली, खाता खाता गप्पांची मैफील सुरूच.  
अडचणी, समश्या, वैत्ताग, दोघांनाही होताच, आपापल्या परीने पीळ्ळेलो. माझा झोका तुला घे, तुझा झोका मला करत चाललेलं, सगळं  वेटरबुवा, अचानक उगवले ढमी बोलली, रिपीट ऑर्डर, एक्स्चेंज डीश वेटरबुवा मावळले.  ढमी बरेच दिवसांनी वतवतून हलकी झालेली , नजरेत जाणवली. बाहेरचा गुलमोहर , पलीकडचा बहरलेला चाफा ,त्याकडं आसूसल्या नजरेनं पाहू लागली मी शांत. य सेकंद गेले असतील. नजरानजर झाली दोघांची. बरंच काही बोलायचं , न बोलता कळून गे  डीशेस आल्या, पुन्हा चरायला सुरूवात.
काय? बोल ना.   वेडोबा, मी पळून जाणारे जगापासून.  
बरं. 
अरे, स्वप्नात रे. 

बेश्ट, किमान झोपशील तरी गाढ, स्वप्नं पहायला.  

ए मठ्ठ हो रे,  मला नं एक पायजेल तुझ्याकडून  ढमी ज्याम एक्सायटेड आवाजात बोलली  काय? ( आयला ढमे चारचौघं बघतायत, त्यांची तर ठेव मनात, हे मी मनातच )  चादर हवीय मला 
जन्मजात जोशी आडनाव इफेक्ट, नजर ओशाळवाणी, जरा साशंक, चहूबाजूस दीडेक सेकंदात फिरली. सगळी गिळण्यात मग्न होती, क्याश काऊंटरवरचा शंभो हर हर पैलवान , राज जाने, उद्धव जाने स्टाईलीत नजर अंतराळी लावून कायतर चघळत बसलेला. 
कस्ली चादर, ढमे चटणी दे 

अरे वेडोबा ,आता ज्याम कंडा रिल्याक्स मुडमधे ढमी बोलली  मठ्ठ, लहनपणच्या परीकथेतली ती उडणारी चादर हवीय मला. 

ढमे, गधडे , चादर नाही सतरंजी होती ती.  हां रे , तीच ती , मी चादर बोलणार.

ब्र ब्र 

ढमी शांत, ठीकाय, ब्र ब्र केव्हां नीपजतात माझ्या तोंडी तीला पक्कं ठाऊक.  अशीच य सेकंद गेली. 

ढमे , मलाही हवीय एक चादर  ढमी खुलली  मी कित्येकदा घट्ट वैतागलो, चीडचीडलो, बॉसनी करवादली माझी की , घरी येतो, आडवारतो नं , सोडावाट्टर भिंगामागल्या, डोळीयांच्या दिठीसमोर चादर आणतो
ऐला , वेडोबा , सेम रे सेम , मी पण इटूकली होऊन बघते ती चादर. 
ढमे , अशी चादर उडणारी, आपण एकटेच, मिठाई, कुर्रमकुर्र, सुक्की भेळ, पिझ्जा , सरबतं हवीत.  वेडोबा, क्लास रे, मस्त गॉगल , मऊ रजईची उशी हवी, डोस्क्याच्या दगडाखाली. खा,प्यायला हवच हं  मस्तपैकी शीडी प्लेयर हवा, अभंगवाणी, ओल्ड क्लासीक्स, गझल्स 

मठ्ठ, ते ह्यायंयायं ह्यायंयायं रडगाणी क्लासीकल नक्कोच हं

ठीकाय  ब्र ब्र ( परत हसू खळखळून ) असू दे तुझ्या चादरीवर, मुळ्ळीच नको मला 

पुन्हा वेटरबुवा अवतरले दोन कॉफी ढमी वदली, साखर कम , एकदम कड्डक, मामा आपकी मुछों माफीक वेटरबुवा मावळले. 
ढमे, मला पुस्तकही हवीत , चादरीवर

ऐला, वेडोबा , उल्कापाग व्हावा चमकावं तसं पैलेझूठ दिलखुष बोललास 

ढमे उल्कापाग नै काय, उल्कापात, मस्त वाचत लोळायचं सश्यासारखं, मधून खायचं, तहान लागली की सरबत, जोडीला आमीरखां चा दरबारी,मारवा, मालकौंस  गजल्स, चुपके चुपके, ये दिल तो पागल दिल मेरा, जख्मे तनहाईमे खुशबू अये हिना, मेरा कुछ सामान, दर्द ही तेरी अता है तो गीला किससे करे,   ढमे, मला फेस्बुकही हवं हां 

अरे हो रे, मग चार्जर पण लागणार.  
ए वेडाबाय, ग्याज्जेट असणार की, जेम्स बॉन्डासारखं, हवेत हात छाव केला की , ३८ इंची स्क्रीन समोर , पोस्टायचं , लाईकायचं, स्माईलायचं .  कमेंटायचं , वतवतायचं, कंटाळलं की पुन्हा छाव, स्क्रीन गायब,

करेक्ट नां मठठ , सॉल्लीड कल्पना.
आणि ढमे पाऊस पडला तर? 
सोप्पय वेडोबा, पुन्हा हवेत छू ः, सी- थ्रू ग्लास प्यानेलची इग्लूटैप झोपडी आपल्या चादरीभोवती, पाऊस बदाबदा पडणार, काचेवरचे थेंब टपकून उडताना दिसणार , मागे आशा प्रेममय विव्हळणार नभ उतरू आलं , अंग थरथरवलं , झिम्माड झालं हिरव्या बहरा.
ढमे, एक विचारू  हो रे विचार की  बघ हं , नंतर विस्फोटशील  ना रे  खरच विचारू
J1 झालं का ? सोडून काहीही ( पुन्हा हसू खळखळून ) 
अय सिरीयसली  हं   दिवसभर चरणार, लोळणार, मग सकाळच्या प्राप्तविधीचं काय?
य सेकंद शांतता, य सेकंद शांन् तता, य सेकंद शांन्तता  ढमी चिवित्र मुडमधे, सगळं चित्र इस्कटलय, आता संयमानं भौतेक डोळे ढेंडाळणार टीपीक टुपूक टीपीक टुपूक  अचानक विद्यूल्लतेत्या कडकडाटासम हसणं , निरभ्र , स्वच्छ , गंगौघासारखं 
मठ्ठ , ग्याज्जेट आहेच की , तरंगता कमोड येईलच की.

बील येतं , मी देतो,   हॉटेलच्या बाहेर 
ढमे, पुन्हां कधी ?  वेडोबा , मठ्ठ , खुप पकपकशील तेव्हा येईन मी अशीच, तुझ्या मनातच आहे  मी, हे तुला कळतय, पण वळवून घेत नाहियेस, प्रत्यक्ष येणं शक्य नाही तुलाही माहितैय. परत भेटीन अशीच . तोपोत्तर एकावर एक चादर मिळतीय का बघ.ती सुद्धा फ्री.  ढमी गेली.  मी हसलो, प्लाटीनाला लाथ घातली . हलकेच वतवतलो, कशाला लागतीय चादर? माझ्याकरता ढमी आहेच की.  ( समाप्त, दि एन्ड, जावा घरला )

एटीम च्या लायनीत उभा होतो. 
माझ्यापुढच्या माणसाने मागे वळून पाहिलं मी ओळखीचं हसलो. ( ओळख नसताना ). 
तो ही हसला.🙄🙄
  थोड्या वेळानी त्यानी विचारलं काय काय ?  मजेत   हल्ली बरेच दिवसात गाठभेट नाही 

हं हं अहो व्यापच एवढे वाढलेत काय करणार  देशपांडे काय म्हणतात ?  (मी सावध, हायला हे बेणं ओळखतय मला )

अहो त्यांचीही गाठभेट होत नाहीये. 

अच्छा  तोपर्यंत त्याचा नंबर आला पैसे काढले, मी आत गेलो २००० काढले . समोर तो माणूस थांबलेला मी म्हणालो
चला ओक्के भेटूया 
ओक्के  सुंदर हास्य प्रसवत तो - भावड्या आज सकाळीच तुझ्यासारखाच मीही कायप्पाचा मेसेज वाचलाय  रोज कुणातरी अनोळखी व्यक्तीकडे बघून हसत जा ( म्हणजे तो बुचकळ्यात पडेल याला कुठं पाहिलय ) 😁😁😁😁😁😁😁😁,

शाळा कॉलेजचे दिवस कायम आठवणीत रहातातच. धमाल दिवस. फक्त कंटाळवाणा कार्यक्रम एकच. शिकणे. पण जायला लागायच तें त्याकरताच. लाकडी बेंचवर एकाजागी बसून शिकण्यासारखा जुलूम नाही. मास्तर, मास्तरणी खूप छान शिकवणा-या होत्या. पण आमच्या अकलेची करवंटी उपडीच सदैव. आत काय शिरणार. माझे मित्र ही माझ्यासारखेच.मग विरंगुळ्याचे काही प्रकार सुचत गेले.  

सोहोनी सर हिंदीचे. अस्सल सानुनासीक हिंदी, मराठी कॉम्बीनेशन नी शिकवणं असायचं त्यांना नाव पडलं उंट. एखाद्याला उभं रहा सांगताना “अरें उंठ, तकल्लूफ कां मंतलब क्यां? समजलं का ? असं शिकवायचे.त्या उंठ वरून नाव उंट. फळ्यावर गिरगिटायला लागले की कुणीतरी मागनं ओरडायचा उंट, शिकवणं सोडून सानुनासीक अपशब्दांचा भडीमार २० मिनीटं , तास संपायचा. 

एकतारे सर, अत्यंत अभ्यासू, रसायनशास्त्र मुख्य विषय. आणि पार हस्तसामुद्रीक, तारे ग्रहगोलापर्यंत वैश्वीक माहिती मन लावून शिकवायचे. विद्यार्थी सर्वांगीण तयार व्हावा ही इच्छा. एकदा बेडूक विषय शिकवताना , हाताच्या तळव्यावरचा अमूक उंचवटा शुक्राचा असून तो फुगीर मांसल असेल तर सौंदर्याचा उपभोक्ता असणारी व्यक्ती असते, असं सांगितलं तिथून त्यांचं नाव पडलं शुक्राची चांदणी. 

मराठीच्या बाईंना लडिवाळ नाव पडण्याचं कारण , “कळलं नं मी काय म्हणतेय “अश्या चालीत म्हणायच्या जणू अहोंना गडे पैठणी  हवीय मला द्याल ना असं विचारतायत. 

पी.वाय.कुलकर्णींना बाळू नाव पाडणा-याला शंभरपैकी ९८ गुण. पर्फेक्ट शामची कॉपी, सत्शील मास्तर . सुंदर मला समजेल असं शिकवणा-या मास्तरांना बाळू नाव ठेवल्याबद्दल २ गुण कट.

आता आडनाव आठवत नाही , पण इतिहासाला सर होते, नाजूक चणीचे , गोरे घारे, रात्रीच्या जागरणांमुळे असेल पण शिकीवताना जांभया द्यायचे , आळस झटकायचे. बाळ्या पेंडश्यानी “क्या यार ये बंदा तो अनारकली की तरह अंगडाईया ले रहा है, असं म्हंटल्यावर नाव पडलं ,अनारकली . 

शेक्रेट्रीयल प्राक्टीस शिकवणा-या बाई एकारांत. शिकवायच्या मन लावून . पण उकारी शब्द उच्चारताना ओठांचा चंबू करायच्या , हल्ली सेल्फ्या मारताना करतात तसा. त्यांचं नाव पडलं पप्पी. 

गोगटे म्याडम , विनायक गोविलकर , वि.भा. देशपांडे आदराची स्थानं . विनायकराव संघाच्या मुशीतले .स ष श क्ष चे सुस्पष्ट उच्चार सुधीर फडकेंसारखे. स इतक्या स्पष्टतेनी यायचा जणू शीळ वाजतेय. मग त्यांना नाव शिट्टी.  इकॉनॉमीक्सचे वाय.के. डेंजर प्रकार, डायसवर एकदम सेफ माणूस, पण डिक्टेशन देत क्लासरूमला हिंडायला लागले की हात, नोटबुकं सांभाळायला लागायचे, चक्क दाताच्या ठेवणीमुळे बारीक बारीक थेंब उडायचे थुंकीचे, वाय.के . ओळखले जायचे तुसिंमा ( तुषार सिंचन मास्तुरे ) 

वास्तवीक ज्यांच्यामुळे आमचे विरंगुळ्याचे क्षण सफल झाले असते त्यांच्याबाबतीत नाव पाडलच गेलं नाही. कारण त्यांचा प्रांजळपणा मनात घर करून गेला. वर्गातलं पहिलच बोलणं होतं “ मी यंगनाथ, मला लहानपणापासून य म्हणता येत नाही. माझा य चा उच्चाय य असा होतो. तुम्ही समजून घ्याल इतपत मोठे झालायत. तय पुथ्वी सूय्याभोवती गयागया फियताना चंद्यामुळे ग्यहण कसे होते ते आज शिकूया.  ( गुरूजनांनी शिकवले त्यांच्यामुळेच दोन घास खावू शकतोय. आदर मनात होता, आहे. त्या वयाचा परिणाम होता इतकच)

तुटली युती, झाले मोकळे एकमेकांचे चांगले फावले शिमग्याचे लैसन म्हैनाभर आधीच आगावू घावले

सकाळी लोक्स मित्रमैत्रीणींना, गुडमॉर्नींगच्या पोष्ट टाकतात , ते चांगलच आहे. दिवस चांगला जावो ही भावना सक्काळच्याला व्यक्त करणं छानच . या पोष्टीत चहाचे कपाबीपाचे फोटोबिटो टाकतात. गरम वाफाळता चहा, बिनदूधाचा काळाशार चहा, गवती चहाच्या काढ्याची आठवण करून देणारा ग्रीन टी चांगलय सगळं कधी कुणी प्रसन्न ,टवटवीत फुलांचेबिलांचे फोटोबिटो टाकतात. जळातले नितळ कमळ, पिवळाधम्म चाफाबिफा, मोग-याबिग-याची फूलं, आणि कॉमन गुलाबाचे फूल चांगलय सगळं पण काही दिव्यकल्पनादृष्टीचे महाभाग, दोन्हीचं कॉम्बो टाकतात ते डेडली असतं😀😀😀😀 वपु म्हणायचे तसं , बायको छान, मित्र ही छान , पण बायकोचा मित्र हे खतरनाक अगदी तसच

सकाळी चिंतनगृहात जीवनावश्यक कृती करत असताना एक प्रश्न मनात आला. पुस्तकं काढावीत का ? . चिंतनगृहाचं एक वैशिष्ट आहे. सहसा इथे मनात आलेले प्रश्न उत्तर सापडून त्यावर निर्णय होईस्तोवर मनातून जात नाहीत. तसाच हा प्रश्नही ही मनात रेंगाळला. पुस्तकं काढावीत का ?. पुस्तकं काढणं सोपं नाही हो. तरीही काढावीत का ?. केलेल्या कृत्यावर स्वहस्ते पाणी सोडून मी चिंतनगृहातून बाहेर आलो. आणि मग असंख्य उपप्रश्न फेर धरून नाचू लागले. कषायपेयसेवन करताना तर या उपप्रश्नांनी भंडावून सोडलन. १. पुस्तकं काढावीत का ? घरचे , ओळखीचे काय म्हणतील ? २.नाही काढली तर आत्ता काही अडलय का ? ३. पुस्तकं काढण्याचा विचार मनात यावा इतपत काही घडलय का ? ४. नाही पुस्तकं काढली तर कुणाचं काही बिघडेल काय ? ५. पुस्तकं काढणं विचार सोपा असला तरी आपल्याला काढता येतील का ? ६. पुस्तकं स्वबळावर काढता आलं नाही तर कुणाची मदत मागावी लागेल काय ? ७. पुस्तकं काढण्यासाठी आवश्यक मानसिक तयारी झालीय काय ? ८. स्वबळावर पुस्तकं काढता आली नाही तर मदतीला कुणाला बोलवायचं ? ९.पुस्तकं काढायला मदतीला कुणाला बोलावलं तर येतील का ? १०. मरो ते पुस्तकं काढणं एवढा विचार केलाच पाहिजे का ?. इथे गरमागरम व्यवस्थित फुललेल्या रव्याचे, कांदाटॉम्याटोशेंगदाणेमिरचीकढीपत्तायुक्त उप्पीट समोर आले. उप्पीटाचे दोन घास उदरी स्थिरावल्यावर पुनश्च प्रश्नोपनिषदाला तोंड फुटले. ११. पुस्तकं काढण्यासाठी मदतीला आलेला निस्वार्थ वृत्तीने मदत करेल काय ? १२. कि या मदतीत त्याचाही स्वार्थ दडलेला असेल का ? १३.स्वार्थी वृत्तीने मदत करणारा आला तर त्याला मे़हनताना द्यावा का ? १४. मेहनताना देऊन त्याचे समाधान होईल का ? १५. मेहनतान्याऐवजी तो नफ्यात वाटा मागेल काय ? १६. मेहनताना असो वा नफा तो किती द्यायचा ? १७.हे देणं परवडेबल असेल काय ? १८. मुळात पुस्तकं काढून नफा मिळेल का ? १९. काढलेली पुस्तकं घेणार कोण ? २०. पुस्तकं काढली आणि ती घेतली तर ती कितीला द्यावीत ? २१. घेणा-याला पुस्तकं घेणं आपल्या नफ्यासहित परवडेल का ? २२. पुस्तकं काढलीच तर ती किती काढावीत ? २३. याबाबतीतही मार्गदर्शन घ्यावं का ? २४. मार्गदर्शन करणारा व्यवस्थित मार्गदर्शन करेल की दिशाभूल? २५. च्यामारी इतका विचार करण्यापेक्षा धाडकन काढलीच पुस्तकं तर काय हरकत आहे. या उपप्रश्नापाशी मी थबकलो. सारं आभाळ मोकळं झालं. ज्यानी दिली चोच, तोच देईल दाणा, सक्काळच्या रामपारी का उगा ठणाणा ? तुरंत भाच्याला फोन लावला. त्याचा होकार आल्यावर निर्णय झालाच. भाच्याला डगमगतं स्टूल पकडून ठेवायची मदत मागायची आणि असंख्य महिन्यांपासून माळ्यावर विसावलेली पुस्तकं काढायची. रद्दीत घालायला. चिंतनगृहात मनात आलेला प्रश्न उत्तर मिळून निर्णयाप्रत आलाच.

काल सायकलवरून एक दाढीदिक्षीत पास झाला आणि एकदम क्लीक झालं ‘अरे, व्वा, छान होsss’. निळुभाऊ आठवले. संघकार्याला वाहून घेतलेले. शाखा सुरू केली तेव्हा मार्गदर्शन असं नव्हे पण प्रोत्साहन द्यायला निळुभाऊ यायचे. आठवड्यात एकदा. पावणेसहा फुटाच्या आसपास उंची, खादी ग्रामोद्योगचा हाफ बाह्यांचा शर्ट, खाली विजार (पायजमा ).गोळवलकर गुरूजींसारखी वाढवलेली दाढी, केस ही वाढवलेले. स्वच्छ विंचरलेले, तेलाची चकाकी असणारे. दोन्ही भुवयांच्या मध्यात अष्टगंधाचा टिळा. सौम्य आवाज, नजरेत जरब. आले की दर वेळेस उंच आवाजात गाणी म्हणायचे. एकेका ओळीमागे आम्ही सगळी कोरसमधे म्हणायचो. पद्य म्हणायचं त्या गाण्यांना. निळुभाऊंचं, विश्वगुरू तव अर्चना में और पूजन क्या करें? जब की तन मन धन तुम्हारे और अर्पण क्या करें? हे गुरूपुजनाच्या दिवशी भगव्या ध्वजासमोर सांगितलेलं पद्य शब्दन शब्दांनी डोळ्यासमोर उभं रहातं , अजूनही. एका दिवशी दोन पद्य, एकही रिपीट नाही. शाखा विकीर झाली की, संघस्थानाजवळ (मैदानाजवळ) पिंपळाचा पार होता तिथं आम्ही पाच सहा जणं आणि निळुभाऊ बसायचो. केशव , माधव ही संघाची प्रातःस्मरणीय दैवते . त्यांचे ,विवीध प्रचारकांचे अनुभव सुटसुटीत शब्दात सांगायचे. मग आठवड्यात गणसंख्या , स्वयंसेवकांची उपस्थिती वाढवण्याबद्दल काय प्रयत्न केले, शाखा कशी चालवली याबद्दल एकेकानी बोलायचं , अडचणी , चांगलं काम , नवीन आयडीया यावर चर्चा व्हायच्या. निळुभाऊंचं वैशिष्ट्य म्हणजे एकदा त्यांचं बोलणं संपलं की मग सावधान श्रोत्याची भुमिका घ्यायचे. आम्ही बोलत असताना दाढी कुरवाळत हे दाढीदिक्षीत स्वतःच्या विचारांमधे मग्न व्हायचे , पण नजरेचा क्यामेरा फिरत असायचा. कुणी अडचण सांगत असेल तर तिथे लक्ष देऊन , ऐकुन ती दूर कशी करायची त्यावर बोलायचे, पण चांगल्या कामाबद्दल बोलताना निळुभाऊ विचारांच्या ट्रान्समधे जायचे. समोरच्या बोलणा-याच्या देहबोलीवर (बॉडी ल्यांग्वेज) लक्ष असायचं ,अशा वेळी ‘अरे व्वा, छानच होssss’अशी दाद मिळायची. हुरूप वाढायचा आमचा. मग आणी बोलायचो. शाखा वाढावी या साठी काय करता येईल, त्यावर बालबुद्धीने आवेशाने बोलायचो. आणी निळुभाऊंची दाद मिळत जायची. ‘अरे व्वा , छान होssss’ एकदा असेच बसलेलो. उम्या नव्हता फक्त. शाखेत आला नव्हता , पण नंतर आला उशीरानी, आम्ही पारावर बसूनही तास उलटला होता. निळुभाऊ विचारांच्या ट्रान्समधे, दाढी कुरवाळत. उम्या आला, बसला, नजरेनी दोघा तिघांनी इशा-याच्या भाषेत विचारलं , ‘का रे उम्या , उशीर ?’ उम्या म्हणाला, ‘ पिंटूची सासू गेली रे , अडकलो होतो, झालं , आवरलं सगळं आणी आलो ‘ सांगताना निळुभाऊ किंवा आम्हांला त्रास नको म्हणून असेल, उम्या नेहमी वचावचा करायचो, त्याच टोन मधे बोलला. आणि आम्हां सगळ्यांची देहबोली नजरेच्या क्यामेरातून बघणारे निळुभाऊ पटकन म्हणाले, ‘अरे व्वा ,छानच होsss’ उम्यासकट आम्ही बुचकळ्यात पडलो, अर्थात निळुभाऊ वावगं वागणार नाहीत खात्री होतीच. पण विरोधाभासानं हसायचं तर अवघड, आणि गंभीर होणं शक्यच नव्हतं, क्षण दोन क्षण शांतता. मग निळुभाऊंच्या क्यामेराने टीपलं वेगळं घडलय काहीतरी. अजयनी स्पष्ट काय ते गंभीरपणे सांगीतल्यावर निळुभाऊंनी सौम्य आवाजात , नजरेच्या जरबेसह उम्याला सांगितलं ‘ चला, पिंटूच्या घरी जाऊया’ सगळी गेलो निळुभाऊंच्या सायकलमागून. पिंटूच्या सास-यांशी काय बोलले, ते ती दोघंच जाणे, परंतू सास-यांइतकीच दुखावलेली नजर निळुभाऊंची बघितली. पुढे दोन अडीच वर्षांनी , मी शाखेत जाणं बंद केलं, राजकारण आणि संघकारणात ,संघकारण उजवं. काल सायकलवरून एक दाढीदिक्षीत पास झाला, आणि अचानक क्लीक झालं ‘ अरे व्वा, छान होssss’ , निळुभाऊंची आठवण झाली. जवळपास १९९३ नंतर. निळुभाऊंनी एक मात्र केलं, संघटन गढे चलो,सुटलं ,तरी माणसांसमोर स्वच्छ मनानी जायची शिकवण दिली. नंतर चढ उतार झाले , जगतांना , काही चुकीच्या गोष्टी घडत आल्या, घडतायेत , पण निळुभाऊंनी पिंट्याच्या सास-यांशी बोलताना, जी नजर बघितली . ती आयुष्यभराची देण आहे

एखादी गोष्ट आपल्याला माहित नसेल तर काय करावं, कसं सांगावं त्या गोष्टीबाबत ? , त्यापेक्षा आपल्याला जी गोष्ट माहिती आहे तीच सांगावी. तुम्ही कोकणात गेलायत का ? विशेषतः श्रावण भाद्रपदात. सणावाराचं वातावरण, झीमझीमणारा ते मुसळधार क्याटेगरीतला पाऊस, आल्हाददायक वातावरण आणि एखाद्या अगत्यशील घरात आग्रहाचे जेवण. स्वच्छ पुसलेले हिरवेजर्द , टाटोळा काढलेले केळीचे पान , घमघमत्या सुवासाचा गरमागरम भात, वरण, वरून तुपाची धार, उजव्या डाव्या हाताला बटाट्याची भाजी, जीरं खोबरं लावलेली आमटी, वाफाळते उकडीचे मोदक, एखादी पातळ, खोबरं घातलेली उसळ, घरच्या गायीच्या दुधाचं , वाढताना डाव दोन तीनदा हलवल्याशिवाय पानात पडणार नाही असं घट्ट जायफळ, केशराचा वास लावलेलं श्रीखंड, मिरगुंडं,शेंगदाण्याची चटणी, एका घासात फट म्हणता जीव कासावीस करणारी भरलेली खाराची तळलेली मिरची, काकडीची कोशींबीर. असं समोर आलं की जग विसरून आडवा हात मारावा. तट्ट झाल्यावर पान खावं , एक प्रकारची धुंदी येते या भोजनंपान्तू ने . एमजेंच्या मार्गारिटाबद्दल असचं म्हणता येईल. एकदा हातात घेतलं की पूर्ण करूनच ठेवायचं. सणकन डोक्यात भिनणारी टकीला, शक्यतो पाचक म्हणून घेतली जाणारी संत्र्याच्या सालीपासून बनवलेली संयत ट्रीपलसेक आणि सर्वांचे आवडते लेमन ज्युस यांच्या मिश्रणातून बनते ती मार्गारिटा, पण यातलं लेमन ज्युस सोडलं तर बाकी दोन्हीचा अनुभव शुन्य. म्हणून या पुस्तकातून मिळणारा आनंदाची तुलना म्या पामरानं कोकणातल्या त्या अद्भुत आनंदाशी केलीय. मार्गारिटातल्या मजेदार लाईम ज्यूस मधले सगळच पुन्हा पुन्हा वाचनीय.प्रेमाची टकीला हा प्रकारही अफाटच. किंबहूना भावनांच्या ट्रीपलसेक मधल्या काही हेलावून टाकणा-या कथा/लेखानंतर नॉर्मलला येण्यासाठी आवश्यकच. एमजेंनी कथांचा/ लेखांचा क्रम अतिशय काळजीपुर्वक लावलाय. पुर्वी वाचल्या असतील तरी स्कीप न करता प्रत्येक कथा वाचलीच जाते हे या पुस्तकाच यश. एक से एक बढकर , एमजे म्हणतात तसं चांगल्या, सकस, नवीन समकालीन कंटेंटचं हे एकत्र सादरीकरण जमलय झकास, संग्राह्य. काही लेखात काही पुरूषी वर्तणुकीवर ओढलेले कोरडे अप्रतीम, थँक यू मि.x , बाप्पा, लेन्स, क्यालिडोस्कोप या चार विशेष आवडल्या.जाता जाता एक सांगावसं वाटतं , जमु /जास्मीन वाचली तेव्हा वीसेक मिनीटे पुस्तक बंद केलं होतं एमजे, डोळे मिटून निशब्द बसून राहिलो. एमजे एक सर्वांगसुंदर, संग्राह्य पुस्तक आम्हांला दिल्याबद्दल मनापासून आभार. 💐 ( ज्या नावाचं पुस्तक आहे ती शिंची मार्गारिटा एकदा भेटायलाच हवी असं वाटायलय आता 😜)

प्रपोज डे चे लफडे आता असा मी मुळी मागे पुन्हा फिरणार नाही जे आहे मनात माझ्या बोलल्याशिवाय राहणार नाही. गेलो होतो तीच्या घरी सारे काही बोलायला दारात उभी तीची आई धीर लागला सुटायला. तरळला चेहरा पुन्हा अधीर आणि लोभसवाणा😍 निश्चय अधीक दृढ झाला ताठ झाला माझा कणा. केली टेहळणी तीच्या घराची बाब एक लक्षात आली वरच्या मजल्यावरच्या गच्चीत दिसली हलताना तीची सावली. भक्कम होते झाड चिंचेचे गेलो चढूनी असा सरसर गच्चीत मारली उडी अलगद सावरले स्वतःस भरभर. झोपाळ्याच्या कॉलममागे दिसली तीची सावली चकीत करावे म्हणून गेलो दबकत्या पावली. धडाधडा मग सांगून टाकले जे होते माझ्या मनी कॉलममागून हास्याचा स्वर😂 नव्हता तो परिचीत ध्वनी.🙄🙄 पुढती आली मालकीण सावलीची, ती होती वेगळी बहिणीसमोर बोलून गेलो फसली पुरती खेळी. घडले ते ही वाईट नव्हते झाले शुभमंगल सावधान चार वर्षांनी तीने दिधले हाती माझ्या भाचुकले छान.

चॉकलेट डे च्या चॉकलेटमुळे एक माझी आठवण शेयर करावीशी वाटतेय. तुम्हांला कुणी चॉकलेट बॉय, स्वीट किंवा चॉकलेट गर्ल , स्वीट , अशी हाक मारलीय ? कधी असं वर्णन केलय तुमचं कुणी. असं कानांवर पडलं तर कित्ती कित्ती कृत्यकृत्यात्मक फिलींग येईल नं ? तर मंडळी मला कुणीतरी म्हणालं अगदी चॉकलेट बॉय आहे , स्वीट. ऐकल्यावर अगदी हेच झालं क्षणभर अवघ्या आयुष्याचे कृतकृत्यात्मक सार्थक झालं. कॉमेडी एक्सप्रेसमधला तो स्वीट टकलू चार्ली चँपलीनच्या भूमीकेत जसा नाचतो तसा मी नाचलो ( अर्थात मनांत ). त्याचं असं झालं , आमच्या शेजारी आत्याबै नावाचं एक स्यांपल आहे रहायला. घरात दोघच , आत्याबै आणि आत्योबा. झुरळं खाऊन पोटशूळ उठलेल्या चीन्यासारखे भाव चेह-यावर. कामं वगैरे सांगायच्या शेजारणीच्या , हक्कानं, आईनही सांगीतलेलं , दोघच आहेत , जाऊ दे जमलं तर करत जा कामं. आमची झकाझकी कायम ठरलेली. एकदा काही कारणानं सगळे शेजारी जमलेलो. एक सरकारी काम सगळ्यांतर्फे मी करायचं ठरलं. मला जमेल की नाही खात्री नव्हती. जरा पुढे मागं चाललं होतं. इतक्यात आत्याबैंचा स्वर आदळला कानावर , “अगदी चॉकलेट बॉय आहे, स्वीट, जोशीकाका करेल काम “( त्यावेळी उपरोक्त वर्णनाप्रमाणे क्षणभर…). गहिवरून आलं , या कामामुळं आत्याबै बदलणार असतील , तर काम करायला काय हरकत आहे ? मी काम स्वीकारलं. दुस-या दिवशी एका तैलबुद्धी शेजा-यांनं विचारपूस केली, In Fact मधलं सत्य सांगीतलं, “ जोशीकाका, तुमचं चिपांझी केलंन आत्याबैनी, अहो चॉकलेट मुळात चवीला कडू, साखर घातलीन त्यात की गोड होतंय, चॉकलेट बॉय म्हणून आत्याबैंनी तुम्हांला कडू बेणं ठरवलंय, ते स्वीट वगैरे तुम्ही काम करावं म्हणून हो.” खरच काम झाल्यावर शेजा-यांचं म्हणणं खरं झालं तळटीप :- फारच गद्य पोस्ट आहे मान्य आहे, पण आहे ते आहे

Aniruddha Damleयांच्या वॉलवर बसमधून उतरणा-या उतारूंच्या निरीक्षणावरून अनुमान कसे बांधायचे अशी पोस्ट आहे त्यासंदर्भात आमचीही एक निरीक्षणात्मक पोस्ट. दंडावरचा भाग झटकण्यासारखा झाला असला तरी न झटकता , खाली उतरल्यावर उन्मनी अवस्थेतले भाव चेह-यावर असतील, आणि वारंवार हात केसामधून फिरला (स्वतःच्याच) क्षणभर येडचापागत हसला तर समजायचं , शेजारी एखादी तरूणी बसलेली होती. दंडावरचा भाग झटकण्यासारखा झाला असला तरी न झटकता , खाली उतरल्यावर उन्मनी अवस्थेतले भाव चेह-यावर असतील, आणि वारंवार हात केसामधून फिरला (स्वतःच्याच) क्षणभर येडचापागत हसला , परंतू केस, दाढी , खांद्यावरच्या पिशवी (यातून एखादी जुनी बिसलेरी, एखादं फडकं डोकावत असतं )आणि कपड्यांइतकी मेणचट आणि कळकट असेल तर समजायचं , त्याच्याशेजारी एखादी तरूणी बसलेली नसून तो वेड लागलेला पिव्वर येडचाप आहे. इचलकरंजीहून सांगली वा तासगाव सांगली येष्टीला हे निरीक्षण करता येतं

इस्लामपुरात बसमधे बसल्यापासून प्रज्ञा विचारात गुंतली होती. तिच्या डोक्यातून दुपारचा हर्षलचा फोन काही केल्या जात नव्हता, दोन अडीचच्या दरम्यान हर्षलनी केलेला फोन “ऑफीस सुटलं की डायरेक्ट कम टू होम “ बरं म्हणून तिनी मोबाईल कट केला. नक्की काय झालं असेल ?. ऑफीस सुटलं की सांगलीची बस पकडायची, मनपा पाशी उतरायचं वाचनालयात जायचं , काही पुस्तकं चाळायची, एक सिलेक्ट करायचं, आणि वडापनी टाटा पेट्रोल पंपाला उतरून घरी जायचं हे आठवड्यातून तीनदाचं रूटीन. हर्षलनी १६ वर्षात एकदाही ऑब्जेक्शन घेतलं नाही मग आजच काय झालं ?. हर्षलनी लवकर यायला सांगितलं त्याचं विशेष काही वाटलं नाही पण विचार करायला लावला तो त्याच्या आवाजानी, मोबाईलवर त्याचा मित्र “कार्यक्रम “झाला की बोलायचा तसा आवाज आज दुपारीच त्याच्या तोंडून बाहेर पडला होता. त्या आवाजानी ती सैरभैर झाली. हर्षलची ड्यूटी फिरस्तीची. महिन्यातून चार पाच दिवस घरात मिळायचा. सांगली , कोल्हापूर, सातारा , कराड, कोकण पट्टा त्याच्याकडे होता. हर्षल फिरायचा पल्सर घेऊन. तसाही कामाचा व्याप वाढला तसं दोघातलं बोलणं कमी होत गेलं, सुयशच्या जन्मानंतर प्रज्ञा ,सुयशमधेच गुंतली. हळूहळू हर्षलही घुमा होत गेला. लग्नाआधीचे पाच महिने, नंतरची दीडदोन वर्ष सुखाच्या काळात गेली. संसाराची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मग हर्षलनी फिरस्ती लावून घेतली. संसारात उणं नव्हतं , सर्वसामान्य चाकोरीनी आयुष्य पुढे सरकत होतं. बरं हर्षलला सहकारी पण झकास मिळाले होते. मग काय बिनसलं असावं ? मनपा पाशी उतरून वडाप पकडली. वाटेत एसएफसी मॉलपाशी प्रेम दिनाला बहर आलेला दिसला. क्षणभर खुलली ती. आता किती मोकळेपणाने व्यक्त होतात मुलं. पुढे डॉमीनोजपाशी मुद्दाम केलेली सजावट, गप्पांना आलेला ऊत, काही रंगात आलेल्या जोड्या , तरूणाईचा बहर, वडापमधून काही सेकंदातही जाणवलाच. गेले ते दिवस म्हणत ती मंदसं हसली. काही जुन्या आठवणी तरळून गेल्या. हलकंफुल्ल झालं तिचं मन. वडापमधून उतरल्यावर मात्र ती भानावर आली, दुपारचा आवाज पुन्हा आठवला. अंदाज घेऊन हर्षलला सुनावलं पाहिजे, आज संकष्टी आणि….छीः ,कुठून अवदसा सुचली ह्याला. तिचा पारा चढू लागला. फ्ल्याटचं ल्याच उघडून आत आली ती. हर्षल , सुयश दोघही सोफ्यावर, समोर कुठलातरी विन डिजलचा पिक्चर बघत, वेफर्स खात दोघही बसलेेले. “सुयश, होमवर्क ? “ सुयशनी नजर न हटवता, फक्त थम्सअपची खुण केली. झालाय या अर्थी. ती आली तरी हर्षलनी तिची दखल घेतली नाही. या गोष्टीनी तिचा भडका उडाला. हर्षल निवांत पिक्चर पहाण्यात गुंगला होता. पहिले फ्रेश व्हावं, आणि किचनमधे बोलावून हर्षलचा सोक्षमोक्ष लावावा असा विचार करून ती आत गेली. फ्रेश होऊन बाहेर किचनमधे आली तर ओट्यापाशी हर्षल पाठमोरा. ती त्याच्यापाठी गेली आणि सुयशला ऐकु जाणार नाही अश्या आवाजात पट्टा सुरू केला “हर्षल, काय चाललंय हे ? इतक्या वर्षात थेरं सुचली नाहीत ते केलंस तेही आज संकष्टीला तु केलंस , पुन्हा मला चालणार नाही, मला खंबीर होणं भाग आहे, तु नाराज झालास तरी चालेल, पण यापुढे ही थेरं चालणार नाहीत. करायचं ते केलंस, मला लवकर कश्याला बोलावलंस ? हर्षल मी भींतीशी बोलत नाहिये, ऐकु येत नसल्यासारखा वागू नकोस” तिची कपाळाची शीर आता तडतडू लागली होती. मधेच हर्षल वळला, त्याच्या हातात टपोरा लाल गुलाब “ प्रज्ञू , डार्लींग, थंड घे, मी करेन का असं ? तु दुखवली जाशील असं ?” कमालीच्या गोड आवाजात हर्षल. तिला विश्वासच बसेना काना डोळ्यावर. चेह-यावर खट्याळ हसू आणत हर्षलनी शीळ वाजवायला सुरूवात केली “ दिल का आलम मैं क्या बताऊं तुम्हे , एक चेहरेने बहोत, प्यारसे देखा मुझे, दिलका आलम मैं क्या बताऊं तुम्हे” “प्रज्ञा, दुपारी फिरत होतो , लक्षात आलं आज वँलेटाईन , किती तरी वर्षात मी तुला वेळ देऊ शकलो नाही. आवाज तसा मुद्दामच लावला, आजची लज्जत वाढली पाहिजे ,प्रिये तुजसाठी मी काय आणलय त्यावर कृपाकटाक्ष फिरवून मजला उपकृत करशील का?” असं विलक्षण म-हाटी नाटकी हेल काढत हर्षल नी विचारलं , आणि तिच्या दंडाला धरून डायनींग टेबलपाशी नेलं, समोर चंदेरी रँपीग केलेल्या दुरडीत तिच्या आवडीचे आलू पराठे,रामविश्वासचा दह्याचा डबा, बाऊलमधे हिरवी चटणी , व्हेज बिर्याणी आणि बघता क्षणी मुंह मे पानी लानेवाले गुलाबजाम चांदिच्या भांड्यात , एक मखमली लाल डबी. अनिमीष नेत्रांनी तिनं डबी उघडली, बदामाच्या आकाराचं भरीव पेडंट असलेली चेन . “डार्लींग ?”हर्षलनी विचारताच त्याच्या छातीवर गुद्दे घालत ती त्याच्या मिठीत शिरली. त्याच्या कुरळ्या केसांमधून तिचा हात फिरू लागला. शीळ पुन्हा घुमू लागली “दिल का आलम …..” , सोळा वर्षांनंतर.

ब-याच दिवसांनी आचार्यांना सामोरा गेलो. ते सचिंत मुद्रेत. नेहमीप्रमाणेच. आमच्या येण्याकडे दुर्लक्ष. मी -” नमोनमः आचार्य” ते -”..” (नजर वळवून बघतात, मंदस हसतात [ आणि मंद दिसतात, हे मनात ]) मी -”फार विचारात दिसताय, काय नवीन ?” ते -” हं……, विचार करतोय , लिखाणाच्या नव्या आयामांबाबत.” मी-”आया म्हंटलं असतं तरी कळलं असतं आचार्य, पुन्हा मां कशाला ? ही द्विरूक्ती नाही का ?.पिवळा पितांबर सारखी” (है शाब्बास, हे मनात ) ते-(थंडगार पडलेल्या म्यागीइतक्या गिळगिळीत नजरेने आमच्याकडे पहात)”आयाम, आयाम म्हणजे नवीन व्हिजन, नवा अँगल. नवीन परीमाण “. मी -” बरं, बरं कोणता आयाम , लिखाणाबाबत ?” आचार्य मुखविक्षेप करतात (त्याला ते स्मीतहास्य म्हणतात) ते- “ मी खुप चिंतन केलय, म्हणजे बघ, मराठीतल्या प्राचीन लेखक म्हणजे , कुसुमाग्रज, कानेटकर ते तुमच्यासारख्या फुटकळ , क्षुद्र लेखकांनी एकाच प्रकारचे लिखाण केले “ मी - “ऑ ?, सगळ्यांनी एकाच प्रकारचे लिखाण केले ? आचार्य मला उमगले नाही. अहो त्यांच्या लिखाणाच्या जवळपासही पोहोचता येणार नाही आम्हांला. अाचार्य आजमीतीस फेसबुकावर लिखाण करणारे ही उच्च जातकूळीचं लिखाण करतायत. मग सगळ्यांनी एकाच प्रकारचे लिखाण केले , हे शक्य आहे ? जरा इस्कटून सांगा.(आम्ही क्षुद्र काय ?ठाकूर ये कर्जा रहा हम पे ) ते - (गुढगर्भीचे आंतरीक उमाळे स्टाईलची तंद्री लावत ) “हे बघ, पेरू, चिंच, नारळ आंबा ही वेगळाली असली तरी जातकुळी एकच, फळझाडे, शरद, मनमोहन, नरेंद्र, उद्धव , राज, असले तरी जातकुळी एकच, राजकारणी ,तद्वत लहानमोठं लिखाण करणारी एकाच जातकुळीतील लिखाण करतात ती म्हणजे , सुत्रबद्ध सुरळीत”. मी - “म्हणजे ?” ते - सर्वसमावेशक हास्य करून [ कुजकं ]) “ सुरळीतपणाच्या एका सुत्रात लिखाण करतात. आता मला सांग , पहाटेची वेळ आहे , असं लिहीलं की पुढे काय ?” मी -”सोप्पय, सहस्त्ररश्मी किरणे फाकू लागलाय, पक्षी किलबिलाट करू लागले आहेत. नशेचा आपलं निशेचा अंमल सरू लागलाय” ते-”बरोबर , किंवा पेपरवाली पोरे पेपर, पुरवण्या जुळवतायत, चहा पोह्यांच्या गाड्यांवर पोह्यांची तयारी सुरू झालीय. मॉर्नींग वॉक करणारी घराबाहेर पडलीयत, असं . म्हणजे जे लिहाल त्या लिखाणाला एकामागोमाग सुरळीत मुद्दयांच्या सुत्राने बद्ध केलेलं असतं , तेच सुत्रबद्ध सुरळीत. ते तुझ्यासारख्या मंदमतीला कळणं जरा अवघड आहे, पण चिंतन केलं की कळेल” मी -”छ्या , त्यात काय कळायचं?मुद्दयातूंन मुद्दे निघत जाणारं लिखाण , त्यात काय ?कळलं कळलं , पुढे ?(मंदमती ?ठाकूर ये दूसरा कर्जा रहा हमपर ) ते -” मग हे बदलायचं असेल तर सूत्रबद्ध विस्कळीत लिखाण करावं लागेल. तोच नवा आयाम, नवीन व्हिजन. त्याबाबत चिंतन सुरू आहे.” मी -”सूत्रबद्ध विस्कळीत कसं असेल? विस्कळीत ते विस्कळीतच.” (हा प्रश्न गनीमी काव्याने, बर्वेंच्या फोटोतले, वाघ्ज, बिबळेज, चित्तेज, सावजावर हल्ला करण्यासाठी दबून बसतात तसे आम्ही सरसावून, उत्तराची वाट बघत) ते- (सखोल चिंतनींक गुह्य उकल पद्धतीच्या नजरेनं [समोरच्याला येड्यात काढणा-या नजरेने ]) “ हीच तर गंमत आहे, मुढमती, प्रत्येक विस्कळीत लिखाणामागे एक सुत्र असते. सहज दृश्य असे एक, आणि एकच सुत्र.” मी -” कसे ?”(मुढमती ? ठाकूर यु जस्ट वेट, हे मनात ) ते-” सांगतो, हे बघ नीट ऐक, तुला विस्कळीत ओळी सांगतो , त्यांना बद्ध करणारे एक आणि एकमेव सुत्र ओळखून दाखव , ही तीन वाक्ये अशी पहाटेची वेळ आहे. भाजकाने भाज्याला भागल्यावर उरते ती बाकी. राणी सरदेसाईची भूमीका चांगली वठवली असली तर पटकथेत मालीका ढिसाळ होती. को हं ? को हं ? चा गजर शेवटी अहं ब्रम्हास्मीपर्यंत येऊन संपतो. सांग, या विस्कळीतपणात दृश्य असे एकच सुत्र आहे , ज्यानी या विस्कळीतपणाला बद्ध केले आहे” मी - (हताशहोत्साता होत, म्लान वाणीने )” आचार्य , नम्रपणे सुचवू इच्छितो , ही चार वाक्ये आहेत. विनम्रपणे सांगु इच्छितो, यात दृश्य स्वरूपातील सुत्र मला दिसत नाहीये.” ते- ( विश्वविजयी हास्य करत) “ ते एकमेव सुत्र म्हणजे हे सगळं मी लिहीलय. माझ्या लिखाणात जन्म हेच त्यांना बद्ध करणारे एकमेव सुत्र, कळलं ?” मी -” आचार्य , असं असेल तर तुमचं चिंतन चुकीचं आहे , तुमच्या म्हणण्याप्रमाणे या चारही वाक्यांना एक आणि एकच सुत्र आहे की तुम्ही लिहीलय पण या व्यतिरीक्त आणि एक सुत्र आहे , जे अदृश्यरूपात आहे, जे या चारही वाक्यांना एकसमयावच्छेदेकरून बद्ध करते” ते -( विस्मयचकीत, वैचारीक, उठलाबाजार नजरेने )”शक्यच नाही, अशक्य , सांग बरे असे कोणते सुत्र आहे , जे अदृश्य स्वरूपात आहे ? मी - (क्षुद्र, मुढमती, मंदमती, ठाकूर ये तीनो कर्जा चुकाने की बारी आयी है, सावज टप्प्यात आलंय, एकच झेप, डायरेक्ट फडशा )“ ऐका, पहाटेची वेळ आहे. भाजकाने भाज्याला भागल्यावर उरते ती बाकी. राणी सरदेसाईची भूमीका चांगली वठवली असली तर पटकथेत मालीका ढिसाळ होती. को हं ? को हं ? चा गजर शेवटी अहं ब्रम्हास्मीपर्यंत येऊन संपतो. या चारही विस्कळीत वाक्यांना अदृश्यपणाने बद्ध करणारे सुत्र म्हणजे . . . . . . तुम्ही निव्वळ खुळे असून जन्मजात डोक्यावर पडलेले आहात, ह्या ह्या ह्या “