Wednesday, 26 July 2017

#चित्रातून_शब्दाकडे

बाई मी पेन्सील आणलेली, ह्यानी मधल्या सुट्टीत खाल्ली असं माझ्याबाबतीत बाईंना सांगून, बाई ओरडताना, खिडकीतून दिसणा-या मधमाशीच्या पोळ्याकडे बघत बसणारा तो.

आईनी डब्यात पोहे दिले की वाटावाटीत, मी शेंगदाणे गट्टम करतो म्हणून हळहळणारा तो.

निळी सायकल काळ्या रामाला दाखवून आणल्यावर, मार पैडल पैला, मी बसतो मागे, आपली सायकले म्हणणारा तो.

जी माझी अर्धांगीनी होईल अशी स्वप्नं मी उरांत साठवली, तीलाच, हाेय ,तिलाच गटवून, वहिनी म्हणायला लावणारा हलकट साला पाजी  तो.

आणि त्याच्या हनीमूनला , बॉक्सात बॉक्स, बॉक्सात बॉक्स करत सातव्या बॉक्सात , त्या विशीष्ठ वस्तूचे उत्तान चित्रासहचे पाकीट, दोन वट्ट १६० रूपयांची क्याडबरीची पाकीटं, सोबत चिठ्ठी , भावा दमल्यावर क्याडबरीच लागतीय रे, असलं गिफ्ट दिल्याबद्दल दुसरे दिवशी, खुदूखुदू हसणा-या तीची पर्वा न करता, माझी आईमाई उद्धरणारा  तो.

परवडत नसतांना एचडीएफसीचं कर्ज घेऊन नवीन घर बांधणारा तो, परसदारी झोपाळा असावा ही माझी ईच्छा नव्या घरी पूर्ण करणारा तो.

माझ्या पिल्लाच्या लग्नात, व्याह्यांशी पैज लावून पन्नास गुलाबजाम खाणारा तो.

आणि गेल्या  जन्मीचं वैर असावं तसं आता ऊर फाटेस्तो आकांत करतोय तरी, तोंडी तुळशीचे पान, कपाळी बुक्का लावून , पांढ-या चादर पांघरून निवांत झोपलेला तो.

थोडं थांब, मी ही येतोय तुझ्यापाठी , असा सोडेन व्हय

कौन कहता जेरी गया ?
जेरी गया नही, जेरी जाता नही.

No comments:

Post a Comment