Wednesday, 26 July 2017

सुसूत्रपणे सुचणारी चित्रं असतील तर सुचतही तसंच, हा माझा ठाम विचार ( नेहमीप्रमाणे भंपक 😀)

तर

नक्की आठवत नाही , पण कधीतरी या सगळ्याला अर्थ होता. ऐंशी पैंच्यांएशी दरम्यानचा काळ. हसलात ना? , मागचं शतक.  म्हणूनच म्हणालो कधीतरी.

तर त्या काळात ह्या सगळ्याला अर्थ होता, कारण मनासारखं खिडकीत, अंगणात, वाड्यातल्या मोकळ्या जागेत, पळापळी करावीशी वाटायची तेव्हा, हां तेव्हाच , शाळेत घातलं होतं. कंटाळा , कंटाळा आणि खुप सारा कंटाळा.

बाई शिकवायच्या शाळेत. अ अ अननसाचा, आठवण यायची आज्जीची, घुळसुळ, घुळसुळ ताक करत असेल, कावळ्यात रवी फिरत असेल, लोण्याचा गोळा. हं जाऊ दे , ते विसरायचं , अ अ अननसाचा , मान खाली औटी बाई, औटी  कसल्या खौटी बाई.

वरचे वर्गात ढकलला च्या जागी गेला आहे म्हणजे प्रगती.
मग आलो पाचवीत. आणि आलं पुतनामावशीसारखं भीती दाखवणारं ईंग्लीश, A for Apple वालं.

आजपावेतो जमलंच नाही .

अक्षरं महत्वाची, अ ते ज्ञ, A to z

त्यांचा बनतो शब्द, ईंग्लीशमधे वर्ड.

पुढे शिकतच गेलो.

वाटेवरले आनंद मनात दाबत. दिसायची नाजूक फूलपाखरं , रंगीत रंगीत, पण बघायची नाहीत. ऐकायचा असायचा वासूदेव, ऐकायचा नाही, पावसाच्या झडीत ऑक् छी होईस्तो भिजायचं, पण तेही नाही.

अभ्यास, अभ्यास, अभ्यास .

मेंदूला मुंग्या येईतो.

शिकलो, अक्षरं, शब्द, वाक्प्रयोग, धडा, कविता, निबंध, सारांश.

मोठ्यांचा आदर करावा, लहानांना सांभाळून घ्याव, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, लहानपण दे गा देवा , मुंगी साखरेचा रवा. दगड, धोंडे .

मोठं होण्यासाठी करायचं असतं असं मोठी माणसं सांगायची, करत गेलो.

आणि आजच्या घडीला झालो मोठे. 😁😁😁

हे हे आता आमचं ऐकायला पाहिजे की नाही लहानांनी, तर गंमत म्हणजे आत्ता आम्ही मन मारून शिकलो यालाच अर्थ उरला नाही. का ? तर तुम्ही जुन्या पीढीतले.
😂😂😂😂

अक्षरं जुळली तर होतात शब्द
शब्द जुळले तर होतात अर्थ
पुर्वीचा काळ अक्षरं जुळविण्यात गेला
आणि आताचा जातोय तो व्यर्थ शब्दांच्या केलेल्या जुळणीतून लहान पीढीनं उडवलेल्या खिल्लीचा अर्थ शोधण्यात.

आहे सगळंच जवळ, पण योग्य जुळणी तेव्हाही जमली नाही, जेवढी जमली त्याला फारशी किंमत उरली नाही, आणि या दिसणा-या विस्कटलेल्या अक्षरांच्या ठोकळ्यांसारखी स्थिती झालीस बस..

एकंदरीत असो….. किंवा असोच

तळटीप-
का बाबा Aarushi Adwait यांनी आपणा सर्वांकरता दिलंय चित्र तर का बाबा लिहावंसं वाटलं , पण, परंतू, किंतू , परंतू , हे विस्कटलेले अक्षरांचे ठोकळे बघितल्यावर, का बाबा जे सुचलं ते लिहीलं. विस्कळीत अक्षरं, विस्कळीत  शब्द, विस्कळीत विचार वेग्रे वेग्रे.
का बाबा पोस्ट पटली नाही तर चिन्हांत दिलंय एक चिन्ह 👎👎👎 चं तेवढंतरी कमेंटा. नाहीतरी विस्कळीत अक्षरांना अर्थ कुठे उरलाय 😄

No comments:

Post a Comment