पहिला पावसाची सर येऊन गेली होती. राजा मनोजवर्मांच्या शयनकक्षाकडे एक खाजगी निरोप घेऊन जात असतानाच प्रतापसेनांचा धीरगंभीर स्वर कानी पडला. राजा मनोजवर्मांना काही मुद्दयाचं सांगत असावेत .
प्रताप सेन तसे ह्यां ह्यां ह्यां चतूर हं .
राजगुरूंचे उदाहरण देत राजा मनोजवर्मांना ते मार्गदर्शन करीत होते, ते जागीच उभं राहून , चातकाने पावसाचा थेंब असोशीने टिपावा तसे श्रवण करू लागलो. प्रधानजी सांगत होते
" महाराज एखाद्या गोष्टीकडे आपण नकारात्मक दृष्टीकोनातून बघीतल की ती गोष्ट आपल्याला जाचक वाटते. आपले राजगुरू बघा सकाळी फिरायला म्हणून बाहेर पडतात पण उपवनामध्ये जाउन बाकड्यावरती बसून राहतात. तिथे अस नुसतच बसण्याच त्यांनी किती उदात्तीकरण केलय.आताशा इतर लोकांनाही नुसत बसण हाच व्यायाम अस वाटायला लागलाय. तुम्ही ज्याला झोप म्हणता ती समाधीची एक उच्च अवस्था आहे.देवीगौडा सोडले तर कुठल्याही लोकनियुक्त प्रतीनीधीला ही अवस्था इतक्या सहज प्राप्त झालेली नाही तेव्हा ह्या अवस्थेला झोप म्हणून हिणवू नका.तेव्हा जागे व्हा आणि या अवस्थेकडे एक उच्चकोटीची अवस्था ह्या नजरेने बघा..महाराज..........महाराज.........महाराज........."
अहाहा , या जन्मी काही पुण्यप्रद वर्तन मज हातून घडले असावे याचेच हे द्योतक नव्हे काय. भोजनापरती प्रिय असलेल्या निद्रेस अनूसरून मी जी अप्रिय कथने उरीपोटी झेलली होती त्यावर न मागता प्रधानजींचा सल्ला मजला परोक्ष मिळावा हे नवल वर्तले गे माये.
अश्वमेधाच्या वारूसमान दौडत मी माझे महाली परतलो. हस्तपादप्रक्षालन करून प्रवेश करताक्षणी मी घोषीत केले
“आज सहजसमाधी योगाचा योग आहे, तस्मात कुणीही मजला क्षुल्लक व्यवहारी बाबींसाठी हाकारू नये”
मंचकावरी शेषशायी भगवानांना स्मरून मी आलोडनकर्ता जाहलो. जी मज प्रिय ती निद्रा समीप भासू लागली , मजला उच्च सुखाची अनूभूती होऊ लागली.
घटकाभराने येकायेकी भूकंप व्हावा की काय, शिवाने तांडव सुरू करावे की काय येणेप्रमाणे धरतीचा कंप जाणवू लागला.सहजसमाधीतून बाहेर यावेच लागले तो मातुश्रींचा लडीवाळ स्वर कानी गुंजारला
“धीक, धीक , रे कुलदिपका
फाकुनी निद्रीस्तपणाची शोभा
निजलासे, रहा आता उभा
भास्कराची मस्तकी येई प्रभा
(उठ मेल्या सूर्य डोस्क्यावर आला तरी लोळतोयस गाढवासारखा हे मुळ वाक्य येथे देणे अप्रस्तूत ठरेल )
तात्पर्य :- राजगुरू वा प्रधानजींचा सल्ला कितीही मोलाचा असला तरीही तो राजा मनोजवर्माना लागू पडतो , स्वतःस नाही.
No comments:
Post a Comment