Wednesday, 26 July 2017


ठोकळे

तीन वाजले आता पनू येईल. महिनाभर वाट बघत असतो वेड्यासारखी पण अकरा म्हणजे अकरा तारखेलाच येणार. आला की येतो दहा पंधरा मिनीटं बसतो.

गोडबोले वहिनी पण आठवण काढत असतात त्याची. पण पठ्ठा अजीबात जात नाही , किती वेळा सांगून झालं. काय बिनसलंय कुणास ठाऊक. पौर्णीमा किती गोड दिसायची, पनू पोटात असताना. सोनचाफ्याचं टपोरं पावसात भीजलेलं फूल असावं ना अगदी तशी. पण नशिबी नव्हतं तिच्या पनूला खेळवायचं, त्याचे बोबडे बोल ऐकायचं, त्याचे लाड करायचं. श्रीराम. सिझेरीयन झालं आणि पनूला माझ्यासाठी सोडून ती गेली. कायमचीच.

गोडबोले वहिनीनी मात्र पनूला पौर्णीमेची माया दिली. कुठे कमी पडू दिलं नाही. त्यांच्या दूधावरच पनू वाढला. तो वर बसलेला जरा विक्षीप्तच आहे हे माझं मत. बघा नं, लग्न होऊन चौदा वर्ष झाली ,गोडबोलेंच्या घरी चिमणे बोल, लडतड घुंगूरवाळ्याचा नाद किणकिणला नाही. आणि दीड वर्षातले नऊ महिने पनूला पोटी संभाळून जन्मल्यावर पौर्णीमा निघून गेली.

वहिनी आठवण काढतात पण हल्ली पनू तिथं जात नाही.

पनू आला की बसेल आणि वरच्या लॉफ्टवरच्या शोकेसकडे बोट दाखवेल. मी मग स्टूलावर उभं राहून वरचा बॉक्स काढीन. त्यात आहेत पनूचे लाडके इवलू टिवलू प्लास्टीकचे ठोकळे. वजन किती अगदी हलकं. आठ आण्याच्या नाण्याइतकं . त्यावरती अल्फाबेटस् . प्रत्येक ठोकळ्यावर एक.

पनू  ब्रिलीयंट आहेच. निर्विवाद. गोडबोले वहिनीनी त्याला स्पेलींगप्रमाणे ठोकळे जोडायला शिकवलेलं. ए, ई , आय, ओ ,यू सारखी अल्फाबेटस वर्डसमधे पुन्हा पुन्हा येतात म्हणून त्यांनी स्वतः दोन सेट जादा आणले ठोकळ्यांचे.

सीयूपी कप पासून एईआरओपीएलएएनई एअरोप्लेन सारखी स्पेलींग पटापटा जोडायचा पनू. एकाग्र होऊन . वहिनीही खुष व्हायचा. चुलीवरलं दूध उतु जावं तसं समाधान चेह-यावरून उतु जायचं.

हल्ली त्याची डिमांड वेगळी असते. हे ठोकळे मी हातात घेऊन फाश्यांसारखे खुळखुळवतो. आणि दान टाकावं तसं अलगद ढिगारा लावल्यासारखे सोडतो. पाच सहा वेळा करायला लावतो पनू. आणि पनू मधेच मला थांबवतो , त्याला हवं ते मिळालेलं असतं.
तीन महिन्यापूर्वी आला तेव्हा, पाच ठोकळे शेजारी शेजारी होते. एनएएचओएम . बघितलं पनू थांबला टाटा करून गेला मग.

संध्याकाळी टिव्हीला सतत स्ट्रीप फिरत होती. नवकेतन विद्यामंदिराचा विद्यार्थी मोहन तोल जाऊन पडून मृत्यु.

दोन महिन्यापुर्वी, चौथ्या वेळी चारच ठोकळे होते, युजेएआर. तर महात्मा गांधी हायस्कूलचा राजू साळूंखे मधल्या सुट्टीत विहीरीत पडून बुडाला. बुडाला तो कायमचाच.

आता पनू ही नाही का अकरा तारखेला बंडोपंतांकडे जाताना  बोरीवलीच्या  लोकलमधून आम्ही उतरत होतो तेव्हा कुणाच्या तरी धक्क्याने, पटरीखाली गेला होता. अँडमीट केलं. सगळं झालं. ते डोक्यातनं गेलं नाहीये बहुतेक त्याच्या.

आजुबाजुची म्हणतात पनूचे बाबा एकटेच ठोकळे खेळत बसतात स्वतःशी बडबडत . म्हणू देत.माझं काय जातंय .

आज अकरा तारीख आहे, तीन वाजले आता पनू येईल. महिनाभर वाट बघत असतो पण अकरा म्हणजे अकरा तारखेलाच येणार.

No comments:

Post a Comment