Wednesday, 26 July 2017

लख्या

श्रावण जवळ यायला लागला आहे ही जाणीव करून देणारा, बग्गीला जोडलेल्या घोड्यांच्या टापांच्या लयीत पाऊस एकसंध सुरू होता. पहिलंच वर्ष होतं माझं, रामुकाका दामूकाकांकडचं. त्यांच्या जुनाट वाड्यातल्या त्या चौकात , पलीकडे दोघंही दोन अडीच फुट उंचीच्या मुर्ती ओतवायला लागले होते. आणि त्यांना मदत करत करत ओतवायला मलाही दोन साचे दिले होते, हाताच्या तळव्याएवढ्या मुर्तींचे, अजींठा छाप आणि बिनलोड चौरंग छोटा. शिकाऊ असल्यानं हात मोकळे, सोंड मोकळी नसलेले साचे मला दिले होते.

इतक्यात त्या पावसातही कुणीतरी जुनाट वाड्याच्या, पावसामुळे हिरवंकाळं शेवाळं उगवल्यासारखी गत झालेल्या दरवाज्यात आलेलं दिसलं. पासष्टी ओलांडून सत्तरीकडे वाटचाल असावी असा, किमान तीन चार दिवसात धुतलेला नसेल असा, कॉलरवर काळपटलेला, चुरगाळलेला नेहरू शर्ट, आणि त्याला साजेसं, तेवढंच मनोरम धोतर, तेलकट कडांनी सजलेली गांधी टोपी, असंख्य सुरकुत्या देहावर, पुरूष नाटकाच्या जाहिरातीततला नाना आठवावा अशी नजर, वेध घेणारी, हातातली जे आकाराच्या मुठीची काड्यांची छत्री मिटत आत आली.

“या, लखोजीराव” अगदी दिलखुलास आवाजात रामुकाकांनी त्यांचं स्वागत केलं.

तीन दगडी पाय-यातल्या पहिल्या पायरीलाच लखोजीराव थांबले.

“भxxनो , अंदर तर येऊ का नको? लग गये चढनेको”

मी चमकलो. पण रामुकाका दामूकाका मिश्कील हसायला लागले होते.
पाय-या चढून , भींतीला मिटलेली छत्री टेकवून, उकीडवं बसावं तसं पण जमिनीवर बूड टेकून, पावलं बोटाच्या पेराइतक्या जाड वहाणांवर टेकून लखोजीराव बसले, शर्टाच्या खिशातून विडी बंडल निघालं, प्लास्टीकच्या पिशवीत गुंडाळलेलं, उडता घोडा माचीसवर काडी घासली गेली, पहिल्या दोन बोटांच्या बेचकीत पकडलेल्या विडीचा लालबूंद झूरका मारल्यावर शब्द आले,

“इज्जत निकालो नै, लख्या येतो तो पेरमानं, चा मिळणार का भxxxनो."

“आलायसा तर बसा घटकाबर, लखोजीराव आलेत चा मागवूया “

थोडा वेळ झूरके मारत लखोजीराव बसले. आम्ही ही कामाला लागलो.

काय चाललंय ते लखोजीराव बारकाईनं बघत होते. मी अजिठ्यांचा साचा रिकामा केला हळूहळू . कोमट लागणारी मुर्ती बाजूच्या अजिंठ्याच्या रांगेत ठेवली.

“ क्या रे दामू , ये कौन”

“आमच्या मिशीसचा पाहूणा, चार दिवस झाले, येऊ का म्हनला तर ये .दोगांना तिसरा , मदत हुतीया “

पहिल्या विडीचं थोटूक बाहेर फेकलं गेलं. नवीन विडी शिलगावली गेली.
तोपर्यंत चायवाला पो-या जाताना दिसल्यावर दामूकाकांनी हाक मारली. कटींगचे कप भरले गेले. मी उठलो .एक कप लखोजीरावांना दिला.

“भxxहो, कौन हाय लडका ? लबाड नै बोलना, दामू मान राखतोय, लख्याची चेष्टा करताय का डूकरांनो? गळ्यात जनाऊ पाहिलंय, जल्दी सांग”

मग दामूनी माझं नाव सांगीतलं. कॉलेजात जाता जाता इथे शिकायला येतो ते सांगीतलं.
मग गप्पा सुरू झाल्या. मधेच रामूकाका म्हणाले

“प्रशांत लहान हाय त्यानी काय हाक मारायची ?”

“लख्या नाम है , वोहीच बोलायचं “
मी विचारलं ,”अहो मी कशी लख्या हाक मारू ? वयानं मोठं आहांत”

“क्या खाक चाटायचंय ? आमी कुंबार, गाडवं वळनारी, ये दोनो मराठा वोभी षाण्णूव कुळी, मतलब आमांपरीस बडी जात. तुम बम्मन मतलब दोनोसे बडी जात, लख्याच कहनेका “

लख्याकडून हेच ऐकायचं असावं दोन्ही काकांना. लख्यानं एकदा उठून आम्ही मुर्ती वाळायला ठेवायचो तिथे डोकावून पाहिलं. रामुकाका , दामूकाकांत नेत्रपल्लवी झालेली मी बघितली. मला कळलं नाही . पण एक शांतता पसरली होती.

लख्यानी टोपीचा कोन चाचपून पाहिला. मग छत्री घेतली, उघडली.

“मंग पुना कवा ?” दामूकाकानी विचारलं.
“आयेंगे ऐसेही. रामु दामू इक इल्म ध्येनात ठेवा. बम्मन जात हुशार. थोडाही काम दिखाओ, भोxxxका मनसे शिकेल, खुदका धंधा चालू करेल ,बसा बोंबलत”

एवढं बोलून एकदा तिरस्कारानं मान हलवली आणि लख्या हळूहळू वाड्याबाहेर पडला.

लख्या गेला , पण माझ्या मनांत विचार लख्खकनआला , रामुकाका दामूकाकांनी मनावर घेतलं तर?

लख्या गेल्यावर मलाच राहवेना.

“रामुकाका , लख्या काय म्हणाला ?”

“प्रशांत मी काई वायटवंगाळ बोललो का तुला, नाय ना , चल कामाला लाग, मर्दा तु आता आमचा हाईस”

माझी भिती चेपली. तोपर्यंत घरातून भेळभत्ता, चुरमुरे, कापलेला कांदा , लिंबू ,मिरचीची बुट्टी घेऊन मोठ्या काकू आल्या.

“लता, प्रशांत इचारतोय लख्याला लखोजीराव का हाळी देतो आमी, सांग तुज्या भाषंत”

लताकाकूनी बोलायला सुरूवात केली. मधून मधून रामुकाका दामूकाका होतेच. भेळभत्ता चमच्यांनी खात खात एकीकडे ओतकाम सुरूच होतं. काका काकूंच्या बोलण्यातनं बरंच काही समजत गेलं.

गाळमातीचे गणपती आणि प्लास्टरचे गणपती यात सुबकपणाचा फरक.  नकळत प्लास्टरच्या मुर्तीला खप जास्त सुरू झाला. शाडूचे गणपती पेणवरून यायला सुरूवात झाल्यावर , महाग असले तरी साच्यातल्या गणपतीला सुबकपणा होता.

कळत नकळत पुर्वापार गाळमातीच्या गणपतींचं गि-हाईक , शाडूमातीच्या महाग किंवा प्लास्टरच्या तुलनेनी कमी किमतीच्या पण सुबक मुर्तींकडं वळलं.

कालानुरूप येणारे बदल काहींनी स्विकारले, काहींनी नाकारले.

लख्याचा बाबा नाकारण्यांपैकी. रामुकाका दामूकाकांचे बाबा स्विकारण्यापैकी. वयाचा फरक पुर्वी असायचाच. सात आठ मुलं असायची पुर्वी.

सुरूवातीला शाडू मातीचे साचे दोघांनी मिळून घेतलेले. पण लख्याच्या बाबांना ते गणीत जमलं नाही. सगळे साचे काकांच्या बाबांना देऊन , गाळमातीसाठी नवीन साचे विकत आणून गाळमातीची परंपरा त्यांनी सुरू ठेवली.

पुढच्या पीढीत मानसीकता तीच राहिली.
परीणाम, लख्या गाळमातीचे गणपती करीत राहिला आणि काका लहानपणी शाडू नंतर प्लास्टरचे गणपती करू लागले.

दोन्ही काकांना आपल्या बाबांना मदत केल्याची जाणीव होती. शाडूचे साचे विकत घेतानाची. म्हणून लख्याला सहन करत होते.
मात्र निराशेपोटी लख्या मात्र जळफळायचा. लख्या यायचा ते शिव्या घालायला. आणि काकांना मदत करणारे किंवा खप वाढवणारे दिसले की त्याना बाजूला कसं करता येईल हा विचार करत राहिला.

वर्षभर फक्त मुर्ती करणे हाच व्यवसाय असणा-यांच्या बाबतीत हे घडत गेलं. त्या कहाण्या खुप आहेत.

मी नंतर तीन वर्ष काकांकडे जात होतो. रामुकाका दामूकाकांनी कधीही वेगळं वागवलं नाही.

लख्या यायचा  त्याचं भxxनो, भोxxxडीच्यानो सुरूच राहिलं.

वीत दिड वीतभर उंचीचे प्लास्टरचे गणपती थोडा प्रयत्न केला तर परत ओतवू शकेन. पण पुन्हा लख्याचे शब्द आठवतात. आणि हातानं शाडूचा ओबडधोबड गणपती करायचा प्रयत्न करीत राहतो.(२१.०७.२०१७)

न जाणो माझ्यामुळे कुणाचं नुकसान होऊ नये. लख्यानं एवढं शिकवलं

No comments:

Post a Comment