“अहो, जरा कोपभर रसायन मिळेल का ?”
हे वाक्य तात्यांनी म्हणायला आणि टिपॉयवर जरा जास्तच ‘प्रेमाने’काकूंनी चहाचा कप ठेवायला एकच गाठ पडली.
“आदळताय कशाला?”
“नाहीतर काय करू ? सकाळपासून तिस-यांदा उकळवलय रसायन”
“होते तलफ , इतकं काय “
“अहो ढोसा की , माझं काय जातंय मेलीचं, पण दोन तासात तिस-यांदा झालंय. लेकानं कौतुकानं दिलयंन खरं चेटूक, पण तुम्हांला कळायला नको. दिवसभर बसताय समोर, भानामती केल्यागत”
“अहो काकू , या एकदा बसा माझ्याशेजारी”
“इथं दिक्षीताला आर्डर द्यायची वेळ आलीय ,अडीच मणाची मयताच्या पासासकट, आणि तुम्हांला चाळे सुचतायत, कर्म माझं “
हातातला कप सावरत ल्यापटॉप उघडून बसलेले तात्या मिशीतल्या मिशीत हसायला लागले, काकू आणि कावल्या.
“काकू, अहो ही आजकालची मुलं बघा किती छान लिहीताहेत, मजाय हो यात, या एकदा आणि वाचून बघा.”
“जळ्ळं मेलं लक्षण, नौकरी केली तरी निम्मं लक्ष नाटकातच यांचं, नाटकं आणि वाचन, आणि काय हो इथं बसल्ये तुमच्याशेजारी तर कामं कोण करणारे ? हं सांगता येत नाही तुम्ही म्हणाल लगेच , आणू का एखादी सुकांत चंद्रानना, म्हणजे माझी हौस फिटेल , नी तुझी कामं पण होतील. हसाल मग फिदीफिदी”
पुटपुटत स्वैपाकघरात जाता जाता काकू पुटपुटल्या.
एकीकडे मेथी खुडताना काकूला मधेच श्वास लागल्यासारखं झालं. धपापायला लागलं . त्यांनी जरा जोरातच हाक मारली अहो तात्या, जरा या , तात्या आले. खुषीत होते ते लक्षात येत होतं .
“अहो, जरा त्रास होतोय पाणी देता का, उठवत नाहिये”
तात्यांनी पाणी दिलं .स्वतःही खाली बसले, “काकू , काय झालाय, दुखतंय का काही “
हा स्वर बदललेला होता.
“काही करायचंय का मी ? अहो फेसबुकानी जरा मजा येते. आजकाल गुडघ्याच्या बिजाग-या गंजून खल्लास झाल्यापास्नं , खाली जाववत नाही. पण फेसबुकावर जमतो कट्टा. नका रागेजू”
“अहो, मलाही बरंच वाटतंय , तुमची कटकट नसते डोक्याला, पण अंघोळीचा पत्ता नाही तुमचा , बसलायत तसेच, आवरणार कधी, मलाही आजकाल आवरून पडावसं वाटतं दुपारी दोन घटका, सासूबाईसारखा ऊर धपापतो हल्ली, आवरा आता “
तात्या उठले , काकूच्या लिंबाएवढ्या अंबाड्यावर टपली मारत, युवतीस तपवी निदाघ , जरी तो … लाविली थंड उटी च्या लकेरी मारत , पाणी काढायला लागले ,अंघोळीसाठी.
स्नान, देवपूजा झाल्यावर तात्यांनी न सांगता कपड्यांना वॉशींग मशीनची वाट दाखवली, फिरवून झाल्यावर ड्रायरला लावले. पुन्हा लाविली थंड उटी सुरू झालं होतं. वाळत घालून , टॉवेलला हात पुसत तात्या पुन्हा टेबलवर आले , चेटूक उघडून पुन्हा त्या विश्वात रमले.
इतक्यात काकू शेजारी आल्या “वसंतराव , घ्या मधेच, रसायन आणलंय, आणि पंधरावीस मिनिटात कुकराच्या शिट्टया झाल्या की वाढते हो.”
रिमलेस काचांच्या वरून तात्यांनी विक्रम गोखलेसारखं बघत काकूंना न्याहाळलं.
जेवण झाली , दोघही आडवारली , मधेच कधीतरी जना येऊन लादीपोछा करून गेली.
साडेचारला तात्या उठले. तोंडावर पाण्याचे हबके मारले. पुन्हा टेबलावर गेले. त्यांच्या फेसबुकवरच्या एका पुतणीनं गडद निळे गडद निळे चपल चरण चं रसग्रहण मागीतलं होतं , ते फाईल उघडून हळूहळू टाईप करत बसले.
“शिंची , कल्पना असती आत्ता ऑफीसातली , तर दिले असते डिक्टेशन , हे विचार करायचे पुन्हा टाईप पण करायचं नस्तं त्रांगडं, पण करायला पाहिजे. या वयात ही पोरंबाळं असं काहीतरी मागतात आपल्याकडे , आणि जे खरडू त्याला कमेंत करतात धडाधडा, कपारीतून धबघबा उसळावा तश्या धडाधडा, करायलाच हवं , काय समजलें"
आता रसायनाची तलफ जाणवू लागली. पण काकूच्या वावराची चाहूल काही लागली नाही. तसं ते टाईप करतंच राहिले. पूर्ण केलं बघितलं तर सव्वासहा , साडेसहाचा सुमार होत आलेला. तात्या उठले, काकू गाढ झोपल्या होत्या. काहीतरी वाटलं म्हणून काकूच्या कपाळाला हात लावला तर कोमट वाटलं, तात्या माघारी वळले.
काकूंना जाग आली ट्यूब लावलेली होती. त्या दचकल्या, घड्याळात पाहिलं तर वीस मिनीटं झाली होती आठ वाजून. तात्या चेटूकापाशी. त्या उठून बसल्या पण पूर्ण अंग जड झालं होतं , कानापासली शीरही तडतडायला लागली होती.
“काकू , बसा थोडं टेकून बरं वाटत नाहीये ना. थांबा तक्क्या देतो” तात्यांनी तक्क्या दिला आणि पलंगावर शेजारी बसले.
“काकू दूपारीच लक्षात आलं , कोमट लागलं कपाळ , ऐका माझं , मघाशी घारपूरे रोडवर रहाणा-या श्वेताला फोन केला होता. फेसबुकची एक पुतणी हो, चौकातल्या थालीपीठवाल्याकडून थालीपीठं देत्येस का आणून विचारलं होतं. तिनी विचारपूस तर केलीच पण थालीपीठाबरोबर पालक सूपची दोन पाकीटं आणून दिलीयत”
“कर्म माझं तात्या, वेव्हार कधी कळणार हो तुम्हांला, त्रेचाळीस वर्ष झाली लग्नाला कधी सुधरणार ते देवच जाणे, अहो ओळख ना पाळख कसं वाटलं तुम्हांला फोन करावंसं ? पुतणी आहे होय , ती ही धन्य आणून दिलंनी लगेच, बरं पैसे तरी दिलेत का ?”
काकू आणि काही बोलणार तेवढ्यात तात्यांनी थांबवलं
“हो हो , ऐक माझं यामुळेच तर माझ्या खरडण्यावर विलक्षण प्रेम करणारी श्वेता आज प्रत्यक्ष भेटली नं ? पैसे थालीपीठाचे घेतलेत , बाकी काकू ब-या होऊ देत तांदुळाची उकड खायला येईन परत म्हणून बजावून गेलीय, आता बसा सूप आणि थालीपीठ देतो इथंच, आणि एक सांगा लिंबाचं लोणचं कुठे ठेवलंयत , म्हणजे ते ही देतो”.
तात्यांनी बनवलेलं इन्स्टंट सूप पिताना नाही म्हटलं तरी काकूचे डोळे पाणावलेच जरा.
“काय हो , तिखट झालंय का ?”
“नाही हो , कोण कुठली श्वेता, पण आली हो आत्ता, आणि या बागडंभाऊजी तात्यांनी फोन केलान तिला माझ्याकरता "
थालीपीठ खाताखाता तात्या उद्गारले
“काकू अहो चालायचच, माझा प्रपंच चालवलात तुम्ही, आता थोडंफार करावंसं वाटतं, करीन ही जमेल तसं, पण तुम्हीही धन्य आहात काकू, संसाराला त्रेचाळीस वर्ष झाली तरी एवड्यातेवड्याला डोळे मुताला लागतात तुमचे लगेच, ह्या ह्या ह्या”
कोपरानं ढुशी देत तात्या हसले , आणि कृतककोपानं थालीपीठ लोणच्याचा घास चघळत बसल्या काकू.
हेरंब जोशी
No comments:
Post a Comment