Wednesday, 26 July 2017

सुप्रभात

साधारण साडेतीन चार फूट उंची असताना, रबरी स्लीपर पायात, हातात छत्री, तीही बाळ्याची, किंवा कधी माझी, कधी तो तर कधी मी धरणार. पाठीवरची ती खाकी जाडजूड दप्तरे सांभाळायची एवढ्यापुरती छत्री.

चड्डी हाफ.

त्याचाही पायात रबरी स्लीपर.

संततधार पाऊस लागलेला असायचा.

थंडगार हवा

गारेगार वारं

ज्यानी छत्री पकडली त्याचा हक्क, दुस-याच्या खांद्यावर, दुसरा हात ठेवायचा.

पायाखाली मेनरोडवरून धावत येणारं पाणी

पाऊलं सुद्धा स्वच्छं गोरी व्हायची.

हूंडीवाला लेन सोडली की पाण्याचा प्रवाह जाणवायचा. जास्त जाणवला पायाला की विचारायचं , शनीवार आहे का ?

असायचाच तो.

नकळत दोघंही छत्रीचा आवाका बघायचो.

नजरेनी खाणाखूणा व्हायच्या.

मुच्छड दारात उभे असणार.

जरा रमत गमत गेलं , आणि जन गण मन सुरू झालेलं असलं, तर मुच्छडच्या धाकानी दाराबाहेरच उभं रहायचं. वरून पावसाच्या धारा, आणि नंतर मुच्छड हातावर छडी देणार नांव पुकारून ह्या भितीने घामाच्या धारा. बेक्कार बसायची छडी.

पण एकदा नजरानजर झाली, की मग दोघं जरा पागोळी शोधायचो, तीथं जायचो, न बोलता आपोआप स्लीपर हातात यायच्या.  हसायचो, मान डोलवायचो आणि मग पळायचो अनवाणी , त्या पाण्यातून.

भाग मिल्खा भाग बघतांना तेच आठवत होतं.

बरोब्बर न्यू अँन्ड सेकन्ड हँन्ड बुक डेपो पाशी श्वास फुलायचा. आणि समाधान हॉटेलपाशी गरम जिलबीचा वास यायचा. त्यासोबत लता मंगेशकरांचा गोड आवाज कानी पडायचा.

ते दोन किंवा तीन सेकंद.

पण त्या आवाजातले दोन तीन शब्द जरी कानी पडले तरी हूरूप यायचा, आणि मग एबीसी लॉन्ड्रीसमोरच्या बोळातील चढ पळताना जाणवायचाही नाही. कितीही पाणी असलं तरी.

पेठे हायस्कुलमधे प्रवेश केला की धपापत्या छातीनं, फुललेल्या श्वासानं , वसंतराव मुच्छड पासून दहा पावले पुढे, टोलच्या घंटेजवळ उभं रहायचं, छत्री मिटून , शेजारी जिथे टेकेल तिथे ठेवायची. आणि मग जन गण मन सुरू व्हायचं.

ताठ मानेनं उभं राहिलं की समोर टप्प्याटप्याचं कडेला सूरूची निथळणारी आतल्या ग्राऊंडातली झाडं असायची, आणि राष्ट्रगीत कानांवर पडत असलं तरी , मनांत त्या गोड आवाजातले अढळ विश्वास देणारे शब्द असायचे

‘अवघी विघ्ने नेसी विलया, आधी वंदू तूज मोरया’

हल्ली प्लाटीनाला पूर्ण रेनकोटात कीक मारून जातानाही , सावधगीरी बाळगावीशी वाटते.  कुठंतरी तो विश्वास, ती श्रद्धा कमी पडतेय.

कारण , तो आवाज सकाळी कानांवर आता पडत नाही.

पुन्हा एकदा बाळ्या असावा , मी असावं, चड्डी हाफ असावी, त्या मेनरोडवरून अनवाणी पावलानी धावताना, श्वास जास्तच लागेल , पण पळू तसेच , कारण आता पाठीवरचं दप्तर नाहीये.

हां , पण बाळ्या यायला हवा हं

------------------------

गजानना, श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
मंगलमुर्ती, श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया

सिंदुरचर्चित धवळे अंग
चंदन उटी खुलवी रंग
बघता मानस होते दंग
जीव जडला चरणी तुझिया
आधी वंदू तुज मोरया

गौरीतनया भालचंद्रा
देवा कृपेच्या तू समुद्रा
वरदविनायक करुणागारा
अवघी विघ्ने नेसी विलया
आधी वंदू तुज मोरया

No comments:

Post a Comment