काल माणसं आयुष्य शोधणारी आलं , वाचून झालं रात्रीच.
एकदा वाटलं होतं , नेहमीप्रमाणे सुंदर पुस्तक म्हणून पोस्ट लिहावी. पण थांबलो. फक्त सुंदर म्हणून थांबायचं का ?
लहानपणच्या गोष्टी वाचताना , सुरूवात आटपाट नगर होतं आणि शेवट सारे सुखानं नांदू लागले हे ठरलेलं असायचं. शेकडा ७० टक्के गोष्टी सुखांताने संपायच्या. पाणिग्रहणावेळी हातात हात दिला की मरेपर्यंत या जन्मात सोडायचा नाहि ही प्रथा. कहानीमें ट्वीस्ट आला तरी येनकेनप्रकारेण शेवट गोड व्हावा हीच अपेक्षा असायची. आणि तसा व्हायचाही. माणसं आयुष्य शोधणारी मात्र आजच्या युगातील आहेत. जे वास्तविक आणि व्यावहारीक आहेत तेच शेवट.
काहींचा शेवट दुखाःचा, तर काहींचा तसा वाटला तरी परिणामी सुखाचा.काही क्षुल्लक चुका, अहंकाराने बाळगलेले इगो कोणत्या थराला जाऊ शकतात, आणि नशीबाच्या आघातांनी आलेल्या संकटातून वाट शोधून बाहेर पडणारी माणसं , असे दोन्हीही बाजू दर्शवणारे बर्वेंचं हे नवं पुस्तक ,’ माणसं आयुष्य शोधणारी’
यात कोण कोण गाठ पडतं ?
ऐक रे सख्या मधला रेवतीच्या पुर्वीच्या जीवनातला अनुभव ऐकल्यावर हळूवारपणे सांभाळणारा राजन.
जादुची झप्पीचं महत्व सांगणारी कथा स्पर्श, ‘जी गेली ती आजी मग मी कोण रे ‘असं काळजाला हात घालणारी रानडे आजी.
सुंदर फँटसीसारखा होणारा प्रवास आणि अचानक अनपेक्षीत ट्वीस्ट देणारा दोस्त.
स्वतःच्या हेक्यापायी , हट्टापायी बायको, मुलगा गमावणारे नाईक आणि मनोहरपंत.
तत्वाशी तडजोड न करणारा राम, आणि सत्य उमगल्यावर मोठ्या शेठइतकीच माया लावणारे धाकटे शेठ.
रावसाहेब या पुलंच्या व्यक्तिचित्रासारखे परांजपे काका.
राजेश गोविंद राधा या त्रिकुटाची सहजसुंजर मैत्री.
पारीजातनी हात गमावल्यावर तीचा हात होऊन साथ देणारा अमोल.
हसत्या खेळत्या संसारात काही दुखःद घटना घडल्यानंतर हताश झालेला प्रकाश आश्रमशाळेत गुंतवून घ्यायला तयार होणारा, वेगळी वाट दाखवणारा.
कष्टाने खरेदी केलेल्या घरात जायची वेळ येताना अनपेक्षीत बातमीने कोसळलेला अनिकेत नी त्याला सावरणारी मुग्धा, “कदाचित आम्ही शारीरीकदृष्ट्या कमी असतो तुमच्या पेक्षा म्हणून परमेश्वरानी मन जास्त कणखर दिलंय” म्हणणारी मुग्धा.
नशीबाच्या बुडावर लाथ मारून वादळावर उभं रहाता आले की आयुष्य मस्त होतं म्हणणारे विसुकाका , प्रेयसीच्या मृत्युनंतरही तिला योग्य न्याय देणारा झकास जमलेला मन्या.
ऩशीबाचे गोते खाऊन झाल्यावरही बातो में सावरणारा, स्वतःवर काही बंधनं घालून , उरलेली स्वप्नं पूर्ण करण्याच्या मार्गाला लागणारा आनंद.
नवरा वा मुलगा भंपक निघाल्यावर त्यापासून बाजूला होऊन जगणं सुरूवात करणारी वैदेही, राजारामची आई.
वेगवेगळ्या ध्येयासाठी कुतरओढ करण्यापेक्षा विलग होणारी आदित्य आणि किरण. त्यातही लाईफ पार्टनर होऊ शकलो नाही तरी मैत्री जपणारा आदित्य.
लाईफ पार्टनरनी केलेल्या अक्षम्य चुका लक्षात ठेवून योग्य वेळी सूड घेणारे रानडे आणि महेश.
लग्न म्हंटलं की व्यवहार आला आणि व्यवहार आला की दुखः हे आक्सेप्ट करून दोन रूळांसारखं समांतर जवळ असून लांबचं आयुष्य जगणारे आनंदराव.
अफाट विचारानी स्वतःला पुन्हा ताकद देणारी अफलातून मैत्रेयी.
आणि गुण गाईन आवडी च्या चालीवर प्रत्यक्ष जीवनातल्या दोन मीत्रवर्यांचं ,त्यांनी केलेल्या मदतीला, त्यांच्या पाठी उभं रहाण्याला केलेलं वंदन . ती दोघं म्हणजे श्री मंगेशराव देशपांडे आणि श्री श्रीहरी दातेसाहेब.
ज्यांनी हाऊ टू फेल इन लाईफ वाचलंय, त्यात काही चुका सुधारल्या गेल्या म्हणून आयुष्य सावरली गेली असं दिसत होतं , नेमकं त्या चुका सुधारल्या न गेल्याने होणारा अटळ प्रवास माणसं वाचताना जाणवत राहिल.
मला स्वतःला विसुकाका, पारीजात आणि मैत्रेयी तर मनापासून आवडली . भावली.
या तीनातलं सार लक्षात ठेवलं आणि तसं वागायचा प्रयत्न केला तर .........
लहान तोंडी मोठा घास घेतोय तरी दोन गोष्टी नमूद करतो. आजूबाजूला घडणा-या घटनांवर आधारीत, रियल लाईफवर आधारीत या कथा अनिल अवचटांसारख्या तटस्थ भुमिकेतून बर्वेंनी लिहील्या आहेत. काही ठिकाणी मेलोड्रामा , उपमा, अलंकारांचा किंचीत वापर आवश्यक होता असं वाटत रहातं.
कमी जास्त फरकानं सिरीयस असणा-या या ३५ कथांमधे हलक्या फुलक्या काही कथांचा समावेशही हवा होता. कारण सलग वाचताना इम्पँक्ट गंभीर होत जातो. परिस्थीतीच्या अपरिहार्यतेतून आयुष्य शोधणारी माणसं असल्याने कदाचीत बर्वेनी हलकंफुलकं टाळलं असावं ही शक्यता आहे.
संवादातला अवतरणचिन्हांचा वापर टाळण्यासाठीची नवी पद्धत स्वागतार्ह.
हर्षद बर्वेंचं पुस्तक असल्यानं त्यास अनुसरून , मुखपृष्ठ, छपाई, आकार हे ओघानी जमून आलेलं.
माहितीपर पुस्तकांतून बाहेर पडून ( बै आणि मी चा अपवाद वगळता ) आजूबाजूच्या घटनांवर भाष्य करणारी , संकटातून बाहेर पडण्यासाठी धडपड करणारी माणसं कथास्वरूपात आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल बर्वेंना धन्यवाद, पुढील वाटचालीस मनःपुर्वक शुभेच्छा.💐
No comments:
Post a Comment