Wednesday, 26 July 2017

नीलकंठेश्वर दर्शन


तो आत्ता रांगेत उभा होता. अगदी हळूहळू रांग पुढे सरकत होती. डाव्या हातात पूजेचं ताट. किती तरी दिवसांची त्याची इच्छा आज पूर्ण झाली होती. नीलकंठेश्वराचं दर्शन घ्यायचं होतं त्याला.

चार पाच वर्षापूर्वी त्याच्या बाबांनी सांगीतलं होतं. आजारी होते तेव्हा. गाव सोडून नोकरी निमित्ताने बाहेर पडल्यावर त्यांचं पुन्हा जाणं झालं नव्हतं नीलकंठेश्वराला. चारापाण्याची वेळ झाल्यावर वासरं जशी व्याकुळतात, तसे बाबा आठवणीनी व्याकुळ झाले होते. त्यांचं जाणं झालंच नाही.

आणि आज न पाहिलेल्या नीलकंठेश्वराचं दर्शन घ्यायला तो श्रावणी सोमवारी रांगेत उभा होता. काळ्या पत्थरांनी घडवलेल्या सभामंडपाबाहेर , तात्पुरत्या रोवलेल्या खांबांना बांधलेल्या दोरांनी तयार केलेल्या रांगेत तो उभा होता.

सभामंडपापाशी पोहोचतानाच एक व्यक्ती समोर आली.

“साहेब , चप्पल काढा साहेब , पलीकडे ठेवतो.”

त्या शर्ट पायजम्यातल्या त्या दाढीवाल्याकडे चपला दिल्या. दिलेलं टोकन त्यानी खिशात घातलं. सभामंडपातून आता हर हर महादेव, शिवशंभोचे स्वर ऐकु येऊ लागले. कुठेतरी आत ओम नमः शिवाय ची धून ऐकू येत होती. बेल, कापूर, उदबत्ती, तुपाच्या ज्योतींचा वास गाभा-यातून येत होता.
पवित्र वातावरणात तो गाभा-याशी पोहोचला. काळ्याशार पींडीवर नीलकंठेश्वराचा चांदिचा मुखवटा, बेल, फुलं, गंध, आणि अभीषेकपात्रातून अखंड सुरू असलेली दूधपाण्याची धार.

हातातलं पूजेच ताट पुजा-यांकडे दिलं. प्रसादाचं नारळ भक्कल, बेलपान हातात देतानाच , पुजा-यानी बघीतलं , त्याने दोन हजारची नोट पेटीत टाकली होती. पुजा-यानी पींडीवरून वाहणारे तीर्थ एका बाटलीत भरून हातात दिलं आणि कपाळी चंदनटिळा रेखला.

तृप्त मनानी तो गाभा-यातून बाहेर पडला. वडीलांची इच्छा पूर्ण केली होती त्यानी.
दिवसभर त्याच आनंदात होता तो. घरी, मित्रांना फोन करून तो भरभरून बोलत होता. कौतुकाचे शब्द कानी पडून त्याला स्वतःला आनंद होऊ लागला. वडीलांची इच्छा पूर्ण करू शकलो याचा अभिमान मनी दाटू लागला.

रात्री बाराची परतीची गाडी पकडण्याआधी तो पुन्हा मंदिरात आला. जाताना पुन्हा दर्शन घ्यायला. मंदिरात आता तुरळक गर्दी होती. त्यामुळे थेट सभामंडपात जाता आलं. थोडा वेळ तो गाभा-यापाशी बसला.

नीलकंठेश्वराला लोण्याची आरास केली होती. काळ्याशार शाळूंकेवर लोणी लिंपून केलेला तो मुखवटा, त्यावर काजळाचे रेखीव डोळे, मिश्या, कुंकु आणि गोपीचंदनानी रेखलेला त्रिपुंड्र , कमळांची आरास, रंगीबेरंगी फुलांची नक्षी , आणि बाजूनी रचलेली हिरवीगार बेलाची पानं. गाभा-यात पुजारी आणि एक शिवमहिम्नाचा उच्चार करत बसलेले. डोळ्यात नीलकंठेश्वराचं रूप साठवून तो डोळे मिटून शांत बसून राहिला. त्याला भरून आलं होतं, एक असीम शांतता मनांत.

काही वेळाने त्यानी डोळे उघडले. नेमक्या त्याच वेळी समया उजळून पुजारी बाहेर आले. मागच्या व्यक्तीचा चेहरा त्याला आधी पाहिल्यासारखा वाटला. त्याच्या आश्चर्याला पारावार उरला नाहि.

सकाळचा चपला उचलणारा दाढीवालाच होता तो. तो गाभा-यात सोवळं नेसून शिवमहिम्न म्हणत होता.

पटकन उठलाच, जवळ गेला. नमस्कार केला हात जोडून.

“तुम्ही तेच ना ? सकाळी चपला घेऊन टोकन दिलं होतं ना तुम्ही ?”

बाजूला उभे असलेले पुजारी म्हणाले
“होय मुला हे तेच आहेत. या मंदिराचे मालक, ही त्यांची पुर्वापार सवय आहे. आम्हांला सवय आहे, सेवेची संधी आहे म्हणतात “

तो पर्यंत दाढीवाले शांत होते ते बोलू लागले
“नीलकंठेश्वराचं दर्शन घ्यायला गर्दी खुप होते. प्रत्येकाला दर्शन घ्यायची घाई असते. मंदिरातले पुजारी, सेवक पुजा महाप्रसादात गुंतलेले असतात. म्हणून मी ही सेवा करतो. देवाच्या भक्तांची सेवा पहिले, रात्री देवाची सेवा.”

“आज नीलकंठेश्वराच्या दानपेटीत जमा होईल ते आम्हा पुजारी आणि सेवकांत दादा वाटून टाकतात.”

“नीलकंठेश्वर देतोय ते त्याचंय , मी फक्त साक्षी. चला आता महाप्रसाद घेऊनच जावा “
दिवसभरातली त्याची विचारांची पुटं क्षणार्धात गळून पडली आणि शंभोच्या प्रसादासाठी रिक्त मनानं तो जाऊ लागला.

No comments:

Post a Comment