#मिशन_अ_किचन
आता विचार केला की वाटतं लिहावं की न लिहावं ? एखादा पदार्थ पहिल्यांदा बनवला किंवा फसला यात काय तीर मारला ?. पण नंतर आठवली एक कमेंट. मी एका गृहिणीला त्यांच्या पोस्टवर पुपोची रेसीपी द्या म्हणून कमेंट केली होती. त्याला प्रत्युत्तरी कमेंट एका सिनियर फ्रेंड नी केली होती “ ते आपलं काम नव्हे, आपण यथेच्छ खायचं काम करायचं “. मान्य आहे अन्नपूर्णा ती अन्नपूर्णाच.खरं तर तिथे बोलणार होतो पण आवरलं. भले हे काम ‘बायकी’ असलं तरी स्वनिर्मीती आहेच की. हॉटेलला, रिसेप्शनला जेवायला गेल्यावर बल्लवाचार्याच्या हातचच मिटक्या मारत जेवतो नं बेंबीला बोट लावून तडस लागेस्तो वगैरे. काही मित्रमंडळी मी काहीतरी बनवत असतो याची टिंगलटवाळी करतात. पण मला बनवायचं ते मी बनवतो, त्यांना टिंगल करायची असते ते टिंगल करतात. वर्षानुवर्ष सुग्रास पदार्थ करणारी गृहिणी चव घेते पदार्थाची आणि पटकन कौतुक करते , मस्तच रे , आता पुन्हा आधी सांगून कर ,म्हणजे येईन परत, तेव्हा त्या टिंगलीचा विसर पडतो. लहानपणापासून घरी सख्खा काका सुट्टीत आला की कांद्याची रूचकर खेकडा भजी करायचा. बाबा ताक , चहा वगैरे करायचे. क्वचित वरणभाताचा कुकरही, त्यामुळे मला पदार्थ बनवताना कधीच वेगळं काही जाणवलं नाही.
मी पहिले शिकलो ते चहा करायला. आज्जीनी शिकवला. सकाळी शाळा असल्यामुळे मी कित्येकदा दूपारी चहा करायचो. अण्णांकडे कुणी आलं आणि आज्जी अण्णा गप्पा मारायला लागले की स्वतःच आधण ठेवायचो. चहाचा फायदा असा झाला की भूणभूण करावी लागली नाही. जब चाहे चहा बना लिया.
पाचवीत असताना दिवाळीला आई फराळाचं करत होती. मी लुडबुडलो. करंज्या, शंकरपाळी कातण्यानं कातली होती. नारळ खोवून दिला होता. नंतर एकदा मी आज्जीजवळ हट्ट धरला होता डिसेंबर महिना असावा. पुरी करता. गोड कडक पुरी. मला फार आवडायची. श्रावणी सोमवारी असायची पुर्वी. पण दोन तीन दिवस झाले आज्जी करूया तर म्हणत होती पण करतही नव्हती.😥 मला पुरी नाचत होती डोळ्यासमोर.
जेवणं झाल्यावर मंडळी आडवारली. दोन वाजले असतील. कानोसा घेतला. आज्जी , आई झोपल्या होत्या, बाबा शाळेत, अण्णांचं वाचन होऊन ते ही लंबायमान झाले होते.
स्वैपाकघरात आलो , दरवाजा लोटून घेतला. कुठल्या डब्यात काय आहे हे सुवर्णकण शोधताना लक्षात आलेलं असायचं. भाजके दाणे आम्हां जोश्यांना अतिप्रिय. सोबत गुळाचा खडा असेल तर फिरकीचा तांब्या केव्हा संपायचा कळायचंही नाही. म्हणून भाजके दाणे लपवून ठेवले जायचे. पण हुक्की आली की सुवर्णकण शोधून ईल्ला व्हायचे.
तर मग मन्याचं ताट घेतलं ( माझंच, 😂😂कडावालं, बाकीची सपाट ताटं , मन्या लाडाचं शेंडेफळ , कुलदिपक , (खिक) )
कणकेचा तीन पायलीचा डबा शोधून दोन भांडी कणीक घेतली, थोडंसं मीठ घेतलं, गुळाचं पाणी करायला हवं . पण किती घालायचा कुणास ठाऊक मग साखरेचा निर्णय पक्का झाला. प्रमाण माहिती नव्हतं. पण पसरलेल्या ताटात कणकेवर, रस्त्यावर मोठ्ठया रांगोळ्या काढणारे बोटांतून रांगोळी सोडत जातात तशी बोटातून साखर पेरत गेलो. पूर्ण ताटावर साखर पेरल्यावर थांबलो. मग दोन चमचे तेल घातलं . लाटण्याकरता आवश्यक असतं ही माझी समजूत. कारण नाईक काकू, वेलदेकाकू, आई कणीक भिजवताना घालायच्या ते पाहिलेलं.
पाणी मात्र बेताबेताsssssनं घातलं. कणीक झाली भिजवून .
पोळपाट घेतला. एका मुठीत मावेल एवढी कणीक घेतली. गोळी बनवली. लाटण्यानी लाटली. हे मोठ्ठा लंबगोल झाला. मग पोळपाट फिरवला. पुन्हा लाटलं. साधारण आयत झाला. पुन्हा लाटलं. मग चौकोन झाला तोही कडेला एक एक बोटाचं अंतर सुटावं एवढा थोरला.
मानेवर घाम सुटायची वेळ आली. पुढं काय करावं हे विचारायला गेलो तर बोडन्ती निश्चीत होती. 🙄🙄
दूधाच्या जाळीदार कपाटाकडे लक्ष गेलं , आणि मनातल्या मनात ट्टॉक केलं. फा.फे. सारखं. नैवैद्याची वाटी दिसली. नव्हे दूधाची बूडकूली वाटी नव्हे तिच्या पलीकडची पुरणाची वाटी. ती घेतली. आणि बेकरीत लाटलेल्या मैद्यावर बिस्कीटाचे छापे मारतात तसं लाटलेल्या चौकोनावर ठसे मारले . कडेला धरलं उचललं. पाच पु-या पोळपाटावर.
पुरी काढायला गेलो तर च्युईंगगम सारखी निम्मी चिकटलेली , निम्मी ताणलेली हातात. ( पीठी लावायची असते हे कुठल्या येडबंबूच्या लक्षात होत😖😖)
छ्या, हे काय भलतंच. मग पाच मिनीटं स्वस्थ बसलो. किलकिल्या फटीतून घडाळ्याकडे बघितलं तर सव्वातीन होत आलेले. पाऊण तास हातात. अालाराम नसला तरी बरोब्बर चारला आज्जी उठणार आणि येणार. पटकन दोन भांडी पाणी प्यायलो. तेव्हा बल्ब पेटला. काकूमंडळी लाटताना कोरडी कणीक लावतात. मग त्या चिकटलेल्या पु-या ती कणीक सगळं तिंबलं .
मग मात्र ए वन १२ पु-या झाल्या. कढईत तेल तापत ठेवलं. तीन तीन पु-या सोडून तळल्या. अगदी लालसर होईस्तो. काही फुगल्या. काही कडक. बरोब्बर शेवटच्या तीन पु-या सोडायला आज्जीनी मागं येऊन उभं रहायला एकच गाठ पडली.
आज्जी टिपीकल घारी गोरी कोब्रा. भेदक घारे डोळे रोखले होते. मी चिडीचूप. संभावीतासारखा झारा हलवत बसलोय.
काहीतरी विचार करून आज्जी मोरीकडे गेली. मी हुश्श.
ग्यास बंद केला. चाळणीत पु-या.
पोळपाट , लाटणं, झारा, मन्याचं ताट, विसळण्याच्या जागी नेऊन ठेवलं थोडं पाणी घालून.
आज्जी आली , चहा करणार नं विचारलं , काय बिशाद नाही म्हणायची. केला .तोपर्यंत सगळी उठलेली. बरं सगळी गप्प. आज्जीनी बाहेर काय सांगीतलं होतं देव जाणे.
चहा गाळल्यावर आज्जी पुन्हा आली, बशीत एक एक पुरी ठेवली. चहा द्यायला सांगितला. चव बघितल्यावर मग कौतुक झालंच. विशेषत एका आकाराच्या बनवल्याचं जास्त. आईनं ऐकवलं परत करशील तेव्हा कुणाला तरी सांगून कर , ग्यासवर तळताना काळजी घे. पुढं वाड्यात कौतुक झालं ते वेगळं.😃😃😃
अश्या रितीने मिशन_अ_किचन सक्सेसफूल झालं आणि स्वैपाकाच्या कट्टयावर पुढे, बिघडलेल्या पुरणाची पोळी, शीरा, पावभाजी, कढी खिचडी, ब.वडा भजी, पासून ते उकडीचे मोदक, स्टफ्ड पराठा, आमरसशीरा, कोयाडं , वगैरेपर्यंत लुडबूड सुरूच राहिली पेक्षा सुरू रहाणार आहेच.
(फोटो गुगलवरून साभार , आमच्यात कुठलं इतकं क्यूटत्व ?😀😀)
No comments:
Post a Comment