Wednesday, 26 July 2017

काही माणसं जवळपास वावरणारी ,अगदी वेगळीच असतात. छान असतात ती, अगदी प्रामाणीक. मनही स्वच्छ असतं त्यांचं. काही तत्वं बाळगलेली असतात, प्रसंगी स्वतःला त्रास करून निष्ठेने ती तत्वं बाळगतात ही, दुस-याला सांगायला.

आपण कसे जगतो , आपल्या तत्वांचा फायदा कसा झाला हे ही सांगत असतात, इथपर्यंत ठीक आहे. पण पुढे आपल्या तत्वाने , विचाराने इतरांनीही चालावे असा धोशा धरून बसतात. आणि अतिरेकी अट्टाहास करीत बसतात. बरेचदा अप्रिय होतात.

एकीकडे बिचारी प्रामाणीकपणे तत्वंही सांभाळतात, नाईलाजाने व्यवहारही. वारंवार विसंगती लक्षात यायला लागली, अट्टाहास जास्त व्हायला लागला की

स्वाभाविकतः ही मंडळी हास्यापद होतात.

त्यांनाही माहित असतं की कुठंतरी  आपलंही काही चुकतय, पण तत्वाचा झेंडाही घेतलेला असतो हातात.

टवाळा आवडे विनोद हे समर्थांचं वाक्य श्रद्धेनी, तत्वानी बिंबवलेलं असतं मनांत. पण नंतर जन्म आणि मृत्यू ह्या आपल्या हातात नसणा-या गोष्टी. ह्या फसवणूकीत हसवणूक करण्याशिवाय आपल्या हाती काय असतंय, असंही काही वाचल्यावर ही मंडळी , कधीतरी मित्रांच्यात , निकटवर्तीयांच्यात मनमुराद ह्या ह्या ह्या ही करून जातात. आणि अचानक आठवतात समर्थ, मग कूटजारीष्ट प्यायलागत स्थीती होते.  नसतात त्यांची तत्व वाईट, पण कश्याप्रकारे सांगावीत हे कळत नाही.

खरच वाईट वाटतं हो ह्यांच्याविषयी, काळानुरूप काही बदलायला हवं हेच बहूतेक यांना कळत नसावं.

आमच्या मंगुअण्णा पाडगावकरांनी १९९० सालात बोलगाणी प्रसीद्ध केली . त्यातलं एक गाणं अश्या व्यक्तींवर लिहीलं आहे बघा पटतंय का. तुमच्या माहितीत आहे का अशी व्यक्ती ?

_____________________

यांचं असं का होतं?

यांचं असं का होतं कळत नाही,

किंवा त्यांना कळतं पण वळत नाही?

निळं निळं वेल्हाळ पाखरू

आभाळात उडणार;

रूपेरी वेलांट्या घेत

मासा पाण्यात बुडणार!

याचं सूख नसतंच मुळी

कधी यांच्यासाठी!

एकच गोष्ट यांची असते :

कपाळावर आठी!!

कधीसुद्धा यांची पापणी ढळत नाही !

यांचं असं कां होतं कळत नाही,

किंवा त्यांना कळतं पण वळत नाही ?

मोठ्याने हसा तुम्ही :

यांना नैतिक त्रास होतो !

वेलची खाल्लीत तरी यांना

व्हिस्कीचा वास येतो !!

यांचा धोशा सुरू असतो :

“अमकं खाणं वाईट, डोकं जडसं होतं,

तमकं मुळीच पिऊ नका,

त्याने नक्की पडसं होतं !!”

संयमाचे पुतळेच हे !

यांचं मन चुकूनही चळत नाही !

यांचं असं कां होतं कळत नाही,

किंवा त्यांना कळतं पण वळत नाही ?

सगळेच कसे बागेमधे

व्यायाम करीत असणार ?

किंवा गीता हातात घेऊन

चिंतन करीत बसणार ?

बागेतल्या कोप-यात कोणी

घट्ट बिलगून बसतंच नां ?

गालाला गाल लावून

गुलूगुलू करीत असतंच ना ?

असं काही दिसलं की

यांचं डोकं सणकलंच !

यांच्या अधात्माचं गळू

अवघड जागी ठणकलंच !!

नैतिक सामर्थ्याचं यांच्या

वेगवान घोडं असतं ;

पण यांना मुलं होतात

हे एक कोडं असतं !!

या कठिण कोड्याचं उत्तर मात्र मिळत नाही !

यांचं असं कां होतं कळत नाही,

किंवा त्यांना कळतं पण वळत नाही ?

कसल्याही आनंदाला

हे सतत भीत असतात ;

एरंडेल प्यावं तसं

आयुष्य पीत असतात !

एरंडेल प्यालावर

आणखी वेगळं काय होणार ?

एकच क्षेत्र ठरलेलं !

दुसरीकडे कुठे जाणार ?

कारण आणि परिणाम

यांचं नातं टळत नाही !

यांचं असं कां होतं कळत नाही,

किंवा त्यांना कळतं पण वळत नाही ?

मंगेश पाडगावकर

(ज्यांनी मंगुअण्णांचं कवीतावाचन ऐकलंय त्यांना हे वाचताना मंगुअण्णांचे ते डोळे , भूवयांचे आविर्भाव आठवतील )

No comments:

Post a Comment