आमचं नाशकातलं घर मातीच्या भिंतींचं होतं. वाड्यातलं , जुना पेशवेकालीन वाडा. वर कौलं. भिंती होत्या मोठ्याला. त्यात कोनाडे, महिरपदार. आणि भिंतीतली कपाटं.
त्यातलं एक पुस्तकाचं कपाट. तळाच्या कप्प्यात माझी आणि बहिणीची अभ्यासाची पुस्तकं. वरच्या कप्प्यात , मासीकं, पाक्षिकं आणि पुस्तकं.
अण्णांना वाचनाचा नाद. केळकरांच्या लोकमान्यांच्या आठवणीपासून ते वामनपंडित, मोरोपंत , गीतादर्शन , व्याकरणमिमांसा , किर्लोस्कर, स्त्री, ( इंग्रजी पुस्तकंही होती, गुरूदेव रानडे, आर्टीक्ट होम इन वेदाज, विलीयम्स शेक्सपीयर्स, १२ ट्राजेडी प्लेज, ही नावं आठवतात, एक ढीग रीडर्स डायजेस्ट) पुन्हा , संगीत मानापमान, भाऊबंदकी, नटसम्राट, काचेचा चंद्र, संगीत संशयकल्लोळ, शांता जोग वगैरे बरोबर बसवलेली , दिग्दर्शीत केलेली लग्नाची बेडी, मोपल्याचे बंड, माझे सत्त्याचे प्रयोग,काय काय होती पुस्तकं. साठून ,काही साठवून ठेवलेली. एक ढोली ट्रंकही होती. गुडघ्याइतपत उंच आणि तीन माणसं बसतील असली. त्यात निम्मी पुस्तकं ,आणि मोडीत लिहीलेली अण्णांची टिपणं.
पावसाळ्यात कौलांमुळे पाणी पूर्ण वाहून जायचं नाही आणि भिंतींना ओल धरायची. अश्याच एका पावसाळ्यात अण्णा गेल्यानंतर ओल धरली असावी पुस्तकं न हालल्यानी बुरशी धरली असावी जुन्या पुस्तकांना , आणि नंतर कधीतरी उघडल्यावर लक्षात आलं वाळवी लागून ती पोकळ झाली होती. गंगास्तृप्यन्तू केली.
नंतर मुंजीत आलेली, विकत घेतलेली, भेट मिळालेली पुस्तकं जमा झाली आहेत आता. लॉफ्टवर वेगळी जागा आहे. वाचू या परत असं वाटत असतं पण मुहूर्त लागत नाही
शंकर वैद्याची अश्या पुस्तकांच्या प्रवासावरची कवीता वाचली. जाणीव झाली , पुस्तकं जपायला हवी. तुम्हालाही देतो वाचायला.
________________________
पुस्तके स्वप्नांत येतात आणि विचारतात
तु आम्हांस ओळखले का ?
बोलता बोलता पुस्तकं वितळतात
आणि अथांग पाणी होऊन हेलावत विचारतात
तु आमच्यांत कधी न्हालांस का ? पोहलास का ?
पुस्तके घनदाट वृक्ष होतात आणि विचारतात
आमची फळे खाल्लीस का ?
छायेत कधी विसावलास का ?
पुस्तके भूरूभूरू वाहणारा वारा होतात नि विचारतात
श्वासाबरोबर आम्हांला कधी उरात साठवलंस का ?
पुस्तके असेच काही विचारत रहातात एकामागून एक
प्रत्येक प्रश्नाला माझे काही उत्तर नसते.
मी गप्प बसतो , त्यांच्याकडे नुसतं पहात.
तेव्हा पुस्तके सजावटीच्या कपाटात जाऊन बसतात नि म्हणतात
म्हणजे एकंदर आयूष्य व्यर्थच नां?
पुस्तके मूक होतात, झूरत जातात
स्वतःला वाळवीच्या स्वाधीन करतात
शेवटी आत्महत्या करतात ती…….
घरातल्या घरात
बंद कपाटाच्या कारागृहात
कवी - शंकर वैद्य
No comments:
Post a Comment