Wednesday, 26 July 2017

आयुष्य मनमुराद जगावं. हां येतात काही अडचणी, काही मिळवावं , काही गमवावं, पण आयुष्य मनमुराद जगावं.

मला अभिषेकीबुवांच्या आवाजातली एक रचना खुप आवडते; नाही पुण्याची मोजणी ;नाही पापाची टोचणी, खुप सुंदर शब्द आहेत हो.

खुप सोसलेली गाठीची लाकडं  म्हणायची कधीतरी ‘ प्राक्तन रे बाबा, प्राक्तन ‘

त्याच प्राक्तनाने दिलेलं जगायचं, मस्तपैकी. कधी आवरायचं , कधी सावरायचं ,तसं जगावं,

जगलो काही बेधूंद क्षण

अन उधळलो पर्वा नाही

द्राक्षांची लुटली मजा

रूद्राक्षांस अव्हेरणे नाही

एक सुंदर आयुष्य, तिच्या सोबतीनं जगलेलं , तापल्या मुशीचे चटके सहन करत सोन्यासारखं झळाललेलं.

संपन्न आयुष्य, आता कुठली देणी नाहीत, मागणेही नाहीच. इतकी सुरेल साथ सोबत की जाणवावं, झाडातच निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया हे शब्द जणू त्या ग्रेस नी या दोघांकरता लिहीले. पिंपळपानं लटकतात वेगळाली, ह्यांचं तसंही नाही, जोडपानांगत ,रसरशीत आयुष्य असे जगलेत की कुणीही आधी गळालं, तरी म्हणतील , पुजेतल्या पानां फुला मृत्यु सर्वांग सोहळा, कृतार्थ मी,संपूर्ण मी , तुझ्यासह ची जाणीव.

इथेच पुलंनी दिलेल्या उपाधीसारखे आनंदयात्री बाकीबाब, ज्यांनी जपानी रमलाची रात्र ही लिहीली आणि उतरवली ‘त्या’च्या दर्शनाची अनूभूती, अनंता तुला कोण शोधू पहातो, ते बाकीबाब लिहून जातात एक गाणं

आयुष्याची आता झाली उजवण
येतो तो तो क्षण अमृताचा

________________

भाजलो, होरपळलो , पण आयुष्य उजळले, आता तृप्तीची शांती , जगू तो प्रत्येक क्षण अमृताची चिरःशांती देणारा

जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब
तुझे प्रतिबिंब लाडेगोडे
सुखोत्सवे असा जीव अनावर
पिंजर्‍याचे दार उघडावे

______________

आता काळ असा आहे की डोळे मिटले कीे कायमचे तरी मिटतील, त्याची खंत नाही पण जे जे दिसेल त्यात मी तुलाच पाहिन, पाहीन तुझं लाडानी पहाणारं, गोड वाटणारं प्रतिबिंब या जळी स्थळी काष्ठी पाषाणी ,तुला अनुभवत सुखाच्या या सोहळ्यात प्राणपाखरू देहरूपी पिंजरा त्यागून जावं

संधीप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी

_________________

उजळलेल्या सोन्यापरीस जगलेलं लख्ख आयुष्य सामोरे आहे तोपर्यंतच ,जीवनरूपी दिवस आणि मृत्युरूपी काळरात्र यातला हा संधीप्रकाश पावन व्हावा , आणि माझी लोचने निववावी.

असावीस पास जसा स्वप्नभास
जीवी कासावीस झाल्याविना

_________________

सखे ,आयुष्यभर साथ दिलीस, या वेळी त्रास नाही देणार, तु असावीस ,प्रत्यक्ष नसलीस तरी स्वप्नं पडावे, त्या स्वप्नांचा भास ही खरा वाटावा अशी तु असावीस. देहभानांचे सगळे सोहळे भोगले ,उपभोगले आहेत तुझ्यासवे, तु असावीस जवळ , मग तु भासातली ,विदेही असशील तरीही.

तेव्हां सखे आण तुळशीचे पान
तुज्या घरी वाण नाही त्याची
तूच ओढलेले त्यासवे दे पाणी
थोर ना त्याहूनी तीर्थ दुजे

________________

हे सखे ,त्या स्वप्नभासांत येशील तेव्हां एक तुळशीचे पान आण, म्हणतात मोक्ष मिळतो. पण श्रीविष्णूंसाठी तुळशीचे जे महत्व तशीच तु माझ्यासाठी , तु जीवन कुरवंडी केलंस माझ्यासाठी, देशील ते पान तुळशीचेच मजसाठी, तुझ्या घरी वाण नाही त्याची , मंजुषा , मंजूषा , दोन शब्द , एक स्मृती जपून ठेवणारी पेटी, एक तुळशीची मंजीरी. तुळशीच्या पानासम काही विशुद्ध आठवणी , तुझ्यापाशी आहेत. पवित्र ,शुद्ध. म्हणून म्हणतोय , तेव्हां सखे आण, तुळशीचे पान

आणि मग तु विहीरीतून ओढलेले पाणी तेच घाल माझ्या ओठी.

कृमी किटक मी , क्षुद्र वळवळता, अर्पीलेस सर्वस्वची ज्याला,

कसे म्हणू मी नाला तुजला,

तु तर शिवाच्या माथी गंगाजला

अशी तु , तुझ्या हातांनी विहीरीचे ओढलेले पाणीही तीर्थ होईल माझ्यासाठी.

वाळल्या ओठां दे निरोपाचे फूल
भुलीतली भूल शेवटली

______________

दिलेस मलां ते तीर्थ की मृत्योच्या जाणीवेनी सुकलेले वाळलेले ओठही तृप्त होतील. मात्र माझ्या देहभावनेची भूल संपताना शेवटची भूल तु द्यावीस, द्यावास निरोप , कसा ? फुलासारखां, द्यावीस मजलां फुले कशी? आंग्ल रितीरिवाजा प्रमाणे मातीचा देह मातीत मिळताना, शेवटी फुले वहातात ना तशी, किंवा  पुजापाठाच्या आपल्या संस्कारांप्रमाणे  पुजेतल्या पानांफुलांचा निरोप दे, ज्यामुळे या जीवनाला धन्य निर्मल्याची कळा लाभून हा मृत्यु सर्वांग सोहळा होईल.

________________________

आयुष्याची आता झाली उजवण
येतो तो तो क्षण अमृताचा
जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब
तुझे प्रतिबिंब लाडेगोडे
सुखोत्सवे असा जीव अनावर
पिंजर्‍याचे दार उघडावे

संधीप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी
असावीस पास जसा स्वप्नभास
जीवी कासावीस झाल्याविना

तेव्हा सखे आण तुळशीचे पान
तुज्या घरी वाण नाही त्याची
तूच ओढलेले त्यासवे दे पाणी
थोर ना त्याहूनी तीर्थ दुजे

वाळल्या ओठां दे निरोपाचे फूल
भुलीतली भूल शेवटली

-बा. भ. बोरकर

(संधीप्रकाशात ही रचना बा.भ.बोरकरांनी लिहीली, सलील कुलकर्णीनी तितक्याच उत्कटतेनं सादर केली. माझ्या एका भाचीनी, मामा , जे सुचेल तसं लिहीशील का ? लिही नं. म्हणून सांगीतलं होतं, जे सुचलं ते लिहीलं )

1 comment:

  1. फारच सुंदर ....बोरकरांच्या कवितेइतकच उत्कट ....उत्कृष्ट .....

    ReplyDelete