भागवतांकडे जाताना त्याची स्कुटर फार सावकाश चालली होती. जणू जायचंच नव्हतं त्याला. दोनवेळा परतावं असंही वाटलं पण सांगायला तर हवं होतं.
मागच्या वर्षी सहज गप्पातून कळलं , भागवत नियमानं वारीला जातात दरवर्षी, बरोबर पंचवीस तीस जणं असतात.
दरवर्षी पेपरमधून येणारे लेख, वारीची परंपरा, त्या दिंड्या पताका, भजनात तल्लीन झालेले वारकरी, एवढ्या प्रचंड समुदायातून पंढरीला जाणं तेही पावसात. सगळं मोहून टाकणारं होतं त्याच्या देवभोळ्या मनाला. बातम्या, कार्यक्रमातले व्हिडीयो, आणि त्या कुठल्याश्या चित्रपटातल्या विठ्ठल विठ्ठल जयघोषात चालणा-या वारीचं वातावरण बघून भारावला होता तो. काहीही झालं तरी वारी करायचीच ही भावना दृढ होत होती.
आणि गेल्यावर्षी कळालं , भागवत जातात वारीला, शेजारच्या गावातून.
त्याचा मित्र धनू सांगत होता त्याला. धनूचं हे सातवं वर्ष. पाच दिवस चालायचं रोजचं ३० ते ३५ किलोमीटर साधारण, वारीचे अनुभव ऐकताना त्याला उमगत गेलं , एकट्यानी करायला गेलं तर जमणार नाही पण वारीत वारक-याबरोबर गेलं की एकच भावना मनांत ठेवायची विठूराया तुझ्या भेटीला येतोय. तोच सगळं करवून घेईल.
धनूला विचारून ठेवली होती माहिती. आणि ४ मेला भागवत काकांना भेटून नक्की झालं तेव्हा एक अनुपम उत्साह त्याच्या अंगी संचारला. होतंय रे , किंतू नको मनांत हे भागवतकाकांचे शब्द त्याच्या मनातल्या होईल की नाही शंकेचे समूळ उच्चाटनकर्ते झाले.
स्कुटर लावली. अपार्टमेंटचा जीना चढून काकांच्या दाराची बेल वाजवली. भागवत काकूंनी दार उघडलं .
“काय रे, लवकर परतलास का ? तुझी पहिली वारी नं ही , पूर्ण तरी करायची होतीस. काका सांगत होते ,पोती शिवून घेतलीत , कॉटन लावलय अस्तराला, चालायची सवय करतोय ते “
“काकू , कसं सांगू ? मी गेलोच नाही “
“का रे?”
“काकू तयारी सगळी केली, धनूला विचारा . रोज दहा किमी चालायला जात होतो , सवय व्हावी म्हणून, पण……….विठूरायाचं दर्शन दिसत नाहिये नशीबी. तेच सांगून सॉरी म्हणायला आलो होतो.”
“का ? “
“काकू, आई धूणं वाळत घालताना अचानक पाय घसरला, निमित्त झालं , श्रद्धा हॉस्पीटलला नेलं वाटव्यांकडे, खुब्याचं हाड मोडलंय, सहा महिने बेडरेस्ट”
“श्रीराम, घरी कोणकोण असतं ?”
“बाबा आहेत , भाऊ आहे धाकटा, मित्रमंडळी आहेत, मावशी आलीय पण परवा निघायचं आणि आदल्या दिवशी हे असं झालं, काकू शक्यच झालं नाही जायला”
बोलताना तो खुप गंभीर झाला होता. दोन मिनीटं शांततेत गेली.
“हे बघ जे होतं ते चांगल्याकरता , तु असा गंभीर होऊ नकोस. तुला एक सांगु , अरे विठोबाचं नावं घेताना आपण काय म्हणतो रे ? संतांची नावं घेताना आपण काय म्हणतो रे ?”
“विठोबाराय, विठूमाऊली”
“बस, बस , हेच लक्षात घे. पिता आणि माऊली. अरे आम्ही काका जातात ते पंढरीच्या विठूमाऊलीचं दर्शन घ्यायला. पण तुला तर संधी मिळालीय स्वतःच्या माऊलीची सेवा करण्याची. तिनं तुझ्यासाठी जे केलं त्याचं पांग फेडायची. उठ वेड्या, बाबांचं वय झालं असेल. मावशी , मित्रमैत्रीणी थोडा काळ येतीलही. पण तु आणि भाऊ दोघंही रहाणार आहात आईजवळ, माऊलीची सेवा हाच नियम करा चातुर्मासाचा. तिला जे समाधान मिळेल त्याचं पुण्य थोर असेल.”
“काकू………….”
“ऐक , आणि मी स्वतः विठुमाऊलीला साकडं घालायला सांगीन काकांना या माऊलीकरता , तेव्हा मनांत विठुमाऊलीचं स्मरण कर आणि या सेवायात्रेच्या वारीच्या आनंदात तल्लीन हो , हो आणि थांबायचं असेल रात्री कधी तर फोन कर , काका , मी आहोतच.”
परततांना त्याच्या स्कुटरचा काटा ७० चा स्पीड दाखवायला लागला होता. ती वारी हुकली तरी या वारीचा वारकरी आता आनंदात होता. मनांत अभंगाची एक ओळ पुनःपुन्हा रूंजी घालत होती “माता विठ्ठल, पिता विठ्ठल”
No comments:
Post a Comment