Wednesday, 26 July 2017

कंटाळलेल्या चेह-यानीच तो तिच्या ज्युपिटरवर मागे बसला. दोन दिवसापासूनची कणकण आज फणफण्यापर्यंत गेली तेव्हाच त्यानी मेडीसीन्स घेऊन नंतर मेल्स पाठवून ,ऑफीसला कळवून दिवसभर पडून राहिला होता. संबंध दिवस झोप लागली होती खरी पण घामाच्या धारा लागल्यामुळे हलकं हलकं अशक्त वाटत होतं.संध्याकाळी ऑफीसातन तिही दमून आलेली. पण पटकन किचनमधे जाऊन ती बाहेर आली ,गरम लेमनजिंजर टी घेऊन.

चौकशी करत त्याला बळजबरी प्यायला लावला. पुन्हा थोडा घाम आला.

ह्याला सगळं कोंदट, आळसावलेलं, सूंद वाटत होतं. तिनं मग त्याला ड्रेस चेंज करायला लावून , कुठलंसं परफ्यूम दिलं. जरा फ्रेश झाला तो. पण चल फिरून येऊ म्हणल्यावर तो नको म्हणाला. तरी पाचसहा आर्जवानंतर कंटाळलेल्या चेह-याने तो मागे बसला.

तिनी ज्युपिटर चक्क देवळाच्या मागच्या रस्त्याला लावली तसा तो ही आश्चर्यचकीत झाला. ह्या रस्त्यावरून फिरायचे दिवस त्याला आठवले. लग्नाआधी ती दोघं इथेच यायची. ती सायकलवरून , तो स्कुटरवरून. पुढे पिंपळाचा घडीव पार, तिथून खाली नदीकडे जाणारी लाल मातीची पायवाट. आणि संथ वाहणारी नदी. दोन्ही तीरांवर हिरवळ , संध्याकाळी हातात हात घेऊन या ह्रदयीचे त्या ह्रदयी करणं चालायचं ते सूर्यास्त होऊन चंद्रबिंब हातभर वर येईपर्यंत

तिनी ज्युपिटर लावली स्टँडला. आणि काही न बोलता पारावर जाऊन बसली मागोमाग तोही. नदीवरनं येणा-या गार वा-याच्या झुळका घेत दोघंही बसली पारावर अबोल. दोघांची नजर संथपणे वाहणा-या पाण्यावर. मधेच कधीतरी तिनं त्याचा हात हातात घेतला. मुकपणानं दोघंही बसून. मात्र दोघांच्याही मनात जुन्या आठवणी होत्याच. त्यांनी दोघांनी मिळून पाहिलेलं घराचं स्वप्न पूर्ण झालं होतं मागच्याच महिन्यात. आणि चेह-यावर माशीही हलणार नाही असे भाव वागवित तिनं दिलेली गुड न्यूज. त्याला कळायलाच अर्धा मिनीट लागला पण नंतर ति जी धबधब्यासारखी हसली ते हसणं कायमचं कोरलं गेलं.

जी जी स्वप्नं पाहिली होती ती पुरी व्हायला लागल्याची समाधानाची तृप्ती आत्ता त्या दोघांच्या चेह-यावर होती. याच पारावर लग्नाबाबत बोलताना असहायतेने त्यान विचारलं होतं तिला, मला होकार दिलायस पण मी करू शकेन का काही?  त्रास खुप होणार आहे तुला. पण तेव्हाही असाच हात हातात घेऊन म्हणाली होती, होकार दिलाय नं, बघू पुढचं पुढे. आज त्याचीच फळं त्याला मिळाली होती.

कलकलणा-या दिवसाचा निरोप घेत दिनकर अस्ताचली गेल्यावर , तिनं त्याच्या खांद्यावर डोकं टेकलं. त्याचा हात तिच्या केसात.

चल निघूया, ति म्हणाली, तसा तो ही उठला.

“तु कंटाळला होतास, औषधं घेऊन तु पडून राहिलाही असतास, पण खात्री होती मला पुन्हा पारापाशी आणलं तरच आज सुखानी शांत झोपशील रात्री”

उत्तरादाखल त्यानी एक दीर्घ श्वास घेऊन सोडला. आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला बिलगून तो ज्युपिटरकडे चालू लागला.

आकाशात चंद्रबिंब उगवलं होतं आणि आजाराचं कंटाळलेपण जाऊन शुभ्र चांदणं जोडीच्या मनांत अलगद उतरलं होतं

No comments:

Post a Comment