Wednesday, 26 July 2017

वाढदिवस राजाचा

पंच पंच उषःकाले पहाटेचा सूर्योदय होऊन बराच कालावधी उलटला होता. मंचकावरील निद्रीस्त राजांची नेत्रकमळे प्रस्फुटीत झाली. गवाक्षातून होणारे सहस्त्ररश्मी सूर्यनारायणाचे हात जोडून दर्शन घेतले आणि त्यांचे लक्ष लीन स्वरूपातील प्रधानजींकडे गेले.

“प्रधानजी आज प्राःतकाळी येणे किमर्थ कारणं ?”

“महाराज क्षमा असावी, कक्षात राजदरबारातील प्रतिष्ठित मंडळी आपली प्रतिक्षा करीत आहेत. दंतधावन, मुखप्रक्षालण करोन अगत्य येणेचे करावे”

प्रधानजी बाहेर गेल्यावर राजानी आवश्यक कर्मे उरकली. आज संपूर्णनिद्रासुख त्यांचे मुखकमलावर विलसत होते.

कक्षात प्रवेश करताच राजाला आनंदाचे भरते आले. साक्षात रामपूरकर शास्त्री .गळाभेट जाहली. ‘शास्त्रीबोवा, न कळवता येण्याचे केलेत , फार काळ तिष्ठावे तर लागले नाही ना ? प्रयोजन काय जे की तातडीने आगमन झाले ?’

“धीर धरा महाराज, कळेल”

शास्त्रीबोवा बोलत असतानांच संपूर्ण कक्षावर एक प्रकाशाची झळाळी पसरली. तेजःपूंज राजगुरूंच्या नयनत्राणावर पडलेल्या सुकोमल किरणांचे परावर्तनाने कक्ष झळाळून निघाला. राजगुरू संथ चालीने राजासमीप आले, सोबत विदेशातील कानडा प्रांतीय शोभावा असा गोरागोमटा युवक . त्याने राजांना कुर्निसात केला.

“राजन, चालू वर्तमानात पूण्यपत्तनी मुकाम्मी हर्षदसेन आपल्या दर्शनास आले आहेत. आजच्या विशेष दिवशी , एका छबीचित्रणाचे पंधरा सहस्त्र रौप्यमुद्रांऐवजी भरघोस सवलत देवून चौदा हजार नऊशे नव्व्याण्णव रौप्यमुद्रांमधे ते छबीचित्रण करण्यास उत्सुक आहेत, आपली परवानगी असावी”

“तथास्तू , परंतू राजगुरू आज काय विशेष ?”

“राजन , धीर धरा कळेल “

ते समयी महाराणीचे आगमनही झाले. सुवर्णतंतूंच्या विलक्षण कलाकुसरीने नटल्या राजवस्त्राचे महाराणींनी परिधान केले होते. त्यांच्या हाती सुवर्णाचे तबक होते. त्या राजांना सामोरी आल्या. सगळीकडे कस्तूरीचा वास दरवळत होता. महाराणींकडून येणारा मोग-याचा सुवास राजांना सुखावून गेला.

इतक्यात सीतल वारीयाची एक झुळूक आलेने तबकातील निरांजनाच्या ज्योती किंचीतक्षणकाल हलल्या.

प्रधानजींनी तत्परतेने हूकूम केला “ गवाक्षाची पारदर्शक आवरणे ओढून घ्या”

त्या आवाजासरशी एक व्यक्ती गवाक्षाकडे धांद्रटपणाने पळत जाताना दिसली. हे तर सांगलीकर शर्मा. इतक्यात रामपूरकर शास्त्रींचा आवाज घुमला

“ सांगलीकर शर्मा , अहो उत्तरेकडे कुठे, पुर्वेचे गवाक्ष “

मग शर्मा बोटभर जीभ बाहेर काढत पुर्वेच्या गवाक्षाकडे धोतर सांभाळत रवाना झाले. त्यांच्या धांद्रटपणाने किंचीत हास्याची खसखस पिकली.

महाराणींनी राजांना कुंकुमतिलक लावला. हिरव्याकंचं पाचूच्या अंगठीचे वळसे घेत औक्षणाला सुरूवात केली.

दरम्यान राजगुरूंनी हर्षदसेनाला खुणावल्याने त्यानी छबीचित्रणाला प्रारंभ केला. प्रधानजीनी टाळी वाजवल्यावर सांगलीकर शर्मांनी त्यांचा सकंपभितीदायक सूर लावून गायनास प्रारंभ केला.

राग विद्यूतकडकडीनी

धन्य अजी उगवला मजा दिवसाचा

ह्याप्पी बड्डे श्री महाराजांचा

रामपूरकर शास्त्रींनी मात्रा मनातल्या मनांत मोजल्या “ धसा धसा धप धप मग रे साधेना” ही चाल कुठे तरी श्रवण केल्याचे स्मरू लागले, आणि आठवले भाऊमहाराज कदमसरकारांनी “स्वागत करूया अध्यक्षांचे “ ला हीच चाल लावली होती. सांगलीकर शर्मा भाबडे. दिली असेल चाल. चालायचच.

गायन संपल्यावर सर्व मंडळी आसनस्थ झाली. राजाला तेव्हा लक्षात आले , आज आपला वाढदिवस.

तोपावेतो महालातील दासी , उत्तमपणे पखरण केलेल्या खोबरे, कोथींबीरीच्या दर्शनाने चित्त प्रफुल्लीत करणा-या , महाराजांच्या आवडत्या साबुदाणा खिचडीच्या ताटांना घेऊन. त्याशिवाय महाराजांना प्रिय घट्ट बासूंदी ही होती पात्रात.  प्रस्तूतचा बेत स्थानकप्रांती (जानपद भाषेत ठाणे )मुक्कामी आहारसल्लागारांच्या सल्ल्याने मुदपाकखान्यात बनविला असल्याची माहिती महाराणींनी दिली.

इतक्यात दोन संदूका घेऊन काही सेवक प्रवेशकर्ते आले. शुभेच्छासह चिपळूणस्वामीनींकडून आम्रफलसंदूका येऊन पोहोचल्या होत्या.

रूचकर पदार्थांचा आस्वाद घेऊन विलक्षण समाधानाने राजा नगरभ्रमणाला , सजवलेल्या हत्तीच्या अंबारीत बसण्यासाठी निघाले, तेव्हा राजगुरूंनी जयघोष सुरू केला आणि प्रधानजी, रामपूरकर शास्त्री , हर्षदसेन या तीन , आणि सांगलीकर शर्मा या अर्ध रत्नांनी जयघोषात सूर मिळवला.

“यशस्वी भव, विजयी भव, दिर्घायुषी भव, सर्वेपि भवतु मंगलम,

सर्वेपि  भवतु मंगलम,

सर्वेपि भवतु मंगलम.

पडघम वाजू लागले, तुतारीने उच्च रव केला. राजांच्या वाढदिवसाचा जल्लोष सुरू झाला.

No comments:

Post a Comment