फेसबुक , मेसेंजर ही दोन्ही माध्यमे कमाल आहेत. माणसं जोडली जात आहेत या माध्यमातून. चांगल्यापुरता विचार करता खरोखर याचा उपयोग होतोय.
विरंगुळा असो, मनातले विचार पोहोचवणं असो, माहिती देवाण घेवाण, ख्यालीखुशाली कळवणं सगळं सोपं झालंय.
पलीकडल्या गल्लीतलं कामाच्या रगाड्यातलं माणूसही इथं जोडलं जातं. कोण चिपळूणात, कोण मुंबईत , कोण पुण्यात, नाशकात, औरंगाबादेत, नागपूरात, कोण बेंगलोरात, कोण जर्मनी, सौदी, अमेरीका . पण सगळी एकत्र येतात इथे.
कित्येकांशी मैत्र जुळतं.
इथं फेरी मारली की या गणगोताची बित्तंबातमी मिळते, छोट्या छोट्या आनंदाचे प्रसंग, वेधक वेचक खोचक गप्पाटप्पा होतात. इथं बसून तिथं शुभेच्छा देता येतात. इथं संपर्क साधून काही सल्ले, माहिती मिळते, काही उपक्रमही चालवले जातात. बसल्या जागेवर सहभागी होता येते.
रोजच्या जगण्यातल्या , वाढदिवस, लग्न, नवीन वास्तू , साठीशांती, सहस्त्रचंद्रदर्शन पासून ते मुलाबाळांच्या तक्रारी, गोडूलेपण, पालकांच्या अडचणी, कुचंबलेपण , गोड कडू आठवणी सर्वांबरोबर शेयर करता येतात.
पण एका बाबतीत मात्र असहाय असतो आपण. दूरवरचं अंतर जोडलं जरी गेलं तरी दुखःद प्रसंगी, अन्य कुणी कळवल्यानंतर, शोकसंदेश पाठवणे किंवा आठवणी लिहीणे या व्यतिरीक्त काहीच करू शकत नाही. फोन हा ऑप्शन आहे परंतू त्यावेळी ती व्यक्ती मुळातच दुखाःवेगात असल्यानी मनमोकळं बोलू शकेल याची अपेक्षाच करू शकत नाही. वास्तविक , च्यामारी बॉसनी लई पीडलाय राव , वैतागलोय म्हणा किंवा अय्या , अरे तुला सांगायची गंमत म्हणजे नं , पालकपनीरला चूकून दोनदा तिखट घातलं, जी बोंबाबोंब इतपत जवळचं बोलणारी व्यक्ती अचानक दिसेनाशी होते . काही वेळाने, दिवसानी कळतं की काही दुखःद प्रसंग घडलाय.
जवळीकीमुळं सतत टोचणी लागते, या वेळी आपण खरंच जवळ असायला हवं होतं, धीर द्यायला, आधाराचा स्पर्श देऊन साचलेलं मनातलं मोकळं करायला.
मुळात जवळची व्यक्ती जाणं म्हणजे आयुष्याचा एक कप्पा कायमचा बंद होणं, अश्यावेळी त्या व्यक्तीलाही हे सगळं बोलावसं , भडभडून येणारं रडू या रोजभेटीतल्या माणसांपाशी व्यक्त करावं वाटतंही असेल. परंतू तसंही करता येत नाही.
मग मात्र हे दूरचं अंतर जास्तच दूरचं वाटतं
No comments:
Post a Comment