Friday, 21 April 2017

बिट्टयाकाका

“राजू तु प्रश्न विचारला होतास नं ? का रडवलीस सायुला जाताना ? ऐक , आत्ताच आनंदचा फोन झाला, आणि धावत तुझ्याकडे आलो. अरे त्या पोट्टीला रडून पाठवताना मला तरी कुठे आनंद झाला होता ?”

बिट्टयाकाकाच्या पापण्या बोलतानाच ओलावल्या.  राजूला प्रसंग आठवला सात दिवसापुर्वीचा. सायली , त्या सगळ्यांची लाडकी सायु , तिच्या मांडव परतणीचा.  अडीच महिन्यांपुर्वी लग्नाचा निर्णय पक्का झाला.साखरपूडा झाला, तयारी आमंत्रणं, केळवणं ,फोनाफोन्या, तया-या, धामधुमीचा काळ , सगळी गडबड आजच्या दिवसाकरता. लग्न झोकात लागलं .

जोश्यांची सायु आज वैद्यांच्या आनंदाची जीवनसंगिनी झाली. जिलबी मठ्ठयाच्या आग्रहानी तुंडूंब झालेली , विधी आवरल्याने, पाच सहा चे गट करून गप्पा मारत, विसावलेली मंडळी.म्हणता म्हणता ती वेळ आलीच.

शकुनाच्या हळदीनं गोरी झालेली सायु, हातापायाला चॉकलेटी काळपट खुललेली मेंदी. आनंदसोहळ्याची लकाकी चढलेली चेह-यावर. बंड्यामामाची हिरवीकंच, भरजरी बुट्टेपदराची पैठणी, पायात पैंजण, जोडवी, केसांत माळलेले मोगरा, जुईचे गजरे, मुंडावळ्या आणि होमामुळे चुरचुरलेले न फ्लँशच्या चकमकाटाने दीपलेले डोळे. नाही म्हंटलं तरी दमणूक झालेली जाणवायला लागली होती. आनंदचीही परिस्थिती वेगळी नव्हती.  जरबेरा, अँथुरीयम फुलांनी, स्प्रींगेरीनं, फुग्यांनी,सजवलेली गाडी हॉलच्या दारात लागली, आणि सगळा गोतावळा दाराशी जमला.

राजू, मनिषानी आधीच कल्पना देऊन ठेवल्यानी , संथपणे प्रत्येकासमोर येणा-या सायुला, हँप्पी जर्नी वगैरे करणं चाललं होतं , सायु कसंनुसं हसत भेटत होती, वडीलधा-यांना नमस्कार करत होती जोडीनं .

  मागच्या आठवड्यात मायलेकीनी बापासहित, उमाळे, आसवांना मुक्त करत रात्र जागवली होती.किती आठवणी …..

वैद्य कुटूंबात सायु पडली ही भाग्याची गोष्ट होती. म्हणूनच मांडव परतणी हस-या चेह-यानी करायचं ठरलं होतं. पण सायु गाडीतून गेली की कायमची वैद्य झाली ही कल्पना मनात असली  , कसनुसं हसत असली, तरी मनात टोचत होतीच.  सायु गाडीत मागच्या सीटवर बसली, दार लावून घेतलं, आनंद राजू मनिषाच्या पाया पडला. राजूनी आनंदला मिठी मारली , पाठीवर थोपटलं आणि तोंडातून शब्द उमटले
“ या, जावईबापू “
आणि नकळत मनिषाचा हात घट्ट पकडला. हातांची थरथर जाणवत होती दोघांनीही, पण हस-या चेह-यानी टाटा केलंन. आनंद पलीकडून गाडीत बसला, गाडी सुरू होणार इतक्यात, भक्कम आवाजात बिट्टयाकाका म्हणाला,
” आनंदराव, कोकोनट हेयर ऑईलच्या बाटल्या जातानाच घेऊन जावा, हो आता आमच्या सायुशी लग्न केलाय, काही दिवसात बिट्टयाकाकासारखं अळूचं पान होईल, केस गळून , ह्या ह्या ह्या “ 

वातावरणातला ताण क्षणार्धात नष्ट झाला, सगळा माहौल हास्याच्या फवा-यात रूपांतरीत झाला.

“बिट्टया, सुधर रे पोट्टी सासरला जायला निघाली नं तुला थट्टा सुचतीय “

हसता हसता राजू म्हणतोय, तोवर पुन्हा धाडकन दार उघडून सायु झटक्यात बिट्टयाकाकापाशी आली आणि कुशीत शिरल्यावर आतापर्यंतचा संयमाचा बांध  तुटला. हलक्या हातानं बिट्टयाकाका थोपटत राहिला. त्याच्याही डोळ्याचं पाणी खळेना.  त्या काही क्षणात कायकाय आठवून गेलं. दहावीनंतर पुण्याला जायचं स्वप्न सायुनं बोलून दाखवलं , तिला फॉरीन लँग्वेजमधेच करीयर करायचं होतं. राजू मनिषा दोघानाही काळजी. पोरगी या छोट्या शहरात वाढलेली , पुण्यात कसं व्हायचं ? त्यापेक्षा तिथेच काय करायचं ते करावं हा साधा मायेपोटी विचार. पण वज्रदेही भीमाच्या आवेशात सायुच्या पाठी उभा राहिला बिट्टयाकाका.

मोहन परांजपे. कधीकाळी पैलवानासारखी असलेली तब्येत आता जरा सैलावून तुंदीलतनू व्हायला लागलेला. केसांचं आता अळूचं पान झालेलं ,लहानपणी घरच्या बिट्टीच्या झाडाची फुले आणि बिट्टया गोळा करायला सायु दुडदुडत्या पायांनी यायची, नाकावरून पालथी मुठ फिरवत म्हणायची
“काका ,बिट्टया हव्या, चल गोला कलू”

मग नावच पडलं बिट्टयाकाका.  तर बिट्टयाकाकाच ठाम उभा राहिला. सायु संस्काराची पोरगी आहे, तु जन्म दिला असशील राजू पण मीही पोट्टी मानलीच नं तीला, काही काळजी करू नकोस , पुण्यात थत्तेंशी झालय बोलणं मगाशी, राहायची सोय होईल तिथच, एस.एन.डी.टी ला घालूया, रानडे इन्स्टिट्यूट जवळच आहे थत्तेंच्या. चार पैशे मोजूया जास्त थत्तेना, घेतील काळजी बिनघोर रहा, माझी सायु शिकतीय शिकु दे मनासारखं”

सायुची जापनीज शिकण्याची इच्छा पुरी झाली ती बिट्टयाकाकामुळेच.  तीन वर्षानी सायु  शिकवायलाही लागली. दरम्यान आनंदचा झंझावातासारखा सायुच्या जीवनात झालेला प्रवेश, गिर्यारोहणावेळी झालेला परिचय, आणि नंतर प्रेमाची कबुली एकमेकांना. सात आठ महिन्यानंतर घरी लागलेली कुणकुण. राजूपेक्षाही मनिषानी केलेलं तांडव, आणि राजूच्या सांगण्यावरून सायु बिट्टयाकाकाकडे येऊन राहिली. बिट्टयाकाकानी, थत्तेंच्या मदतीने परीचयातल्या माणसांकडून काढलेली माहिती. नंतर आनंदशी झालेलं बोलणं , आणि स्वतः वैद्यांकडे जाऊन केलेली बोलणी ,राजू मनिषाला सायुचं भाग्य कसं उजळलय, आणि आनंद सायुचं संयम बाळगून केलेलं प्रेम हे पटवून देणं,  त्याचाच परिपाक आज सायु बिट्टयाकाकाच्या कुशीत हमसत होती.

हळूहळू सगळीच जवळ आली , आणि मग सायुसाठी हमसू लागली. आनंदच्या बाबांनी हळूहळू , राजू , मनिषा, बिट्टयाकाकांचा निरोप घेतला.  गाडीच्या काचेतून गालावर आसवं गळणारा चेहरा, आणि हलणारा हात दूर गेल्यावर राजूने एवढचं विचारलं
“ का रडवलीस सायुला जाताना ? अं ?  

“ ऐक राजू, आज आनंदचा फोन आला होता. म्हणत होता, सायु आणि माझ्या लग्नाशिवाय , लग्न होईस्तो दूसरा विचारच नव्हता मनात काका. पण मांडव परतणीला तुमच्या कुशीतली सायु बघितली, तुम्ही तुमच्या सायुकरता केलेलं सगळं आठवलं आणि त्या क्षणी जाणीव झाली. तुमच्या लाडक्या सायुची काळजी घ्यायची , आनंदात ठेवायची आणि प्रत्येकवेळी तिच्या पाठीशी उभी रहाण्याची जबाबदारी ह्या क्षणापासून माझी झालीय. काका आजपासून बिट्टयाकाकाचा रोल माझ्याकडे आलाय , काका मला मदत कराल नं ?
सायुचा बिट्टयाकाका व्हायला. आनंदला बोललो , जावयबापू, वैद्यांनी आमची पोट्टी नेली, पण वैद्यांचा पोट्टा आता जोशांचा झालाय. सायु आणि तु वेगळे आहात कारे माझ्यासाठी, २४ तास बिट्टयाकाका तुमचाच आहे”
राजू मनिषा भारावून बघत राहिले बिट्टयाकाकाकडे .

No comments:

Post a Comment