शिंगं फुटायच्या वयात हेम्या शी तासंनतास वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, वाद व्हायचे. निमित्त पाहीजेच असं नाही, जगात कुणाला कळत असेल तर मलाच, अशी दोघांचीही ठाम समजुत. रंगायचं सगळं. एकदा असच हिरीरीने बहीण असणं हे किती वैत्ताग आहे या बाजूने मी सुरूवात केली. हेम्या पटवून देत होता बहिण असणं कसं चांगलं , मुद्द्यांवर मुद्दे निघत गेले, मधेच कधीतरी गर्गे येऊन थांबलेला . तो ही ऐकत होता. मग त्यालाही ओढला चर्चेत. गर्गे सिरीयसली म्हणाला , मी काय दरीद्री , तुम्हां दोघांना बहिण आहे रे, असते त्यांना किंमत नसते . तिथेच जाणवली माझी श्रीमंती. सख्खी एक आणि आत्ये-मामे -चुलत अश्या मिळून पंधरा बहिणी मला. पुन्हा वाड्यातल्या बहिणी पाच . आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण. असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार काळ असू शकत नाही म्हणून असू शकेल कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो. तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं..हा मिडीयावर फिरणारा मेसेज सत्य असल्याच्या प्रत्यय वारंवार येत गेला. एकमेंकांच्या खोड्या , भांडणं होतच रहातात भावंडात ,पण भावाच्या डोळ्यांत जिला मंद मंद तेवणारी स्नेहाची ज्योत दिसते , आणि त्या मायेचा सुगंध जाईसारखा जिला वाटतो , ती बहिणच. सगळं औक्ष भावाला मिळावं हिच इच्छा ती वेड्या बहिणीची इच्छा. भावाच्या मायेनं वेडी झालेली बहिण. आता तर नोकरीच्या निमित्ताने, फेसबुकाच्या माध्यमातूनही ताई, बहिणी मिळाल्या , सख्ख्या पक्क्याचा भेदभाव तिथे नाहीच माझी श्रीमंती वाढत चाललीय. या मायेचं चांदणं पांघरणा-या सर्व बहिणींना, ताईंना, तायडांना, शेंडेफळं असून ताईगीरी करणा-या लहानुल्या तायांना माझ्या खुप खुप शुभेच्छा 🌹🌹
No comments:
Post a Comment