सांगलीत आल्यावर दोनेक महिन्यांनी बापू हरदास यांच्या हरदास भवन मधे जेवायला गेलो होतो. कार्यक्रम होता तीस तीन मेहूणांचा. पाहूण्यांचाच कार्यक्रम असल्यानी बोलावलेलं. बापू हरदासांचा आग्रह हा प्रत्येकानी अनुभव घायचाच विषय आहे.😜 माझे जीजाजी शेजारी बसले होते. बापू मसालेभात घेऊन आल्यावर जीजाजींनी सांगीतलं " बापू , नाशीकचे पाहूणे आहेत. तीर्थक्षेत्री आग्रहाची सवय आहे, जरा लाजल्यासारखं करतील पण लक्ष द्या हं" बापूंनी सर्व कळले अशी मान हलवली. श्रीखंडाची पहिली वाटी संपली. तोवर बापू हजर , दुसरी वाटी निम्मी संपवली, बापूनी डाव भरला , नको म्हणून वाटीवर हात ठेवला तर पोराला हाक मारून वाटी आणायला लावली ती वाटी शिगोशीग. पुन्हां वर दोन डाव. हबकलो. म्हंटलं "काय बापू ? एवढं नाही सरणार " "छ्या , आरामात सरेल, सांगतो तेवढं करा" बापूनी गरम साजुक तुपाची धार श्रीखंडावर धरली. थोडा वेळ लागला पण तेवढं श्रीखंड संपलं. बडिशोप हातावर देताना बापू म्हणाले " श्रीखंड , आम्रखंडावर तूप घेतलं की गळ्यातून उतरतंय झरकन , पचायलाही सोपं " बापूंची सुचना लक्षात राहिली. आणि तेव्हांपासून श्रीखंड, आम्रखंडावर तूपाची सवय लागली.सांगलीकडे ही सवय ब-याच जणांना आहे तुम्हीही करून बघा
No comments:
Post a Comment