रविवार दुपारी पोटात कावळे कोकलायला लागले होते. मोबाईल किणकिणला. राहूल्या कॉलींग.
“काय रे ?”
“काका, कुठे आहात ? क्रिटीकल प्राब्लेम आहे” राहूल्याच्या तोंडी क्रिटीकल वेग्रे, हे म्हणजे डायरेक्ट सनबर्न सहभागी मेंबराचे तोंडून भीमरूपी महारूद्रा ऐकण्यासारखेच. विषय सिरीयस असला पाहिजे.
“अरे संध्याकाळी नाही का चालणार ? जेवायची वेळ झाली आता”
“ काका , या नटराजला, वाट पहातोय” गेलो तर राहूल्या हताशहोत्साता होऊन बसलेला.
“काका, मला सल्ला हवाय. आहे हा जॉब सोडायची इच्छा आहे” ( राहूल्या स्टांपव्हेंडरकडे हरकाम्या पोरगा आहे, भाषा बघा ) मला इथे अर्नींग आहे पण जॉब स्याटीसफ्याक्शन नाही. मेन्टल बॉदरेशन नसलं तरी फिजीकल स्ट्रेस फार आहे हो. तुम्ही एकाच जॉबवर इतकी वर्ष कसा काय टिकलात”
वेटरला स्वीट कॉर्न सूप आणि पनीर मांचूरीयनची ऑर्डर देऊन मी विचारलं
“ राहूल्या , हे बघ इथं फायनान्शीयली साऊंड आहेस नं ? असणारच. मग थोडं सहन करायला हवं , आत्ता तर आठवा महिना आहे जॉबचा “
“काका, टिकायचं कसं ते तर सांगा” ( डोळ्यात बारा सश्यांची व्याकुळता साठलेली किंवा सिदन्ती मम गात्राणी , मुखंच परिशुष्यती अशा स्वरूपातला अर्जुन ) इथे माझी सॉल्लीट गोची. भुमीका उपदेशकाची , पण मलाच ठाऊक नाही मी नोकरीवर टिकलो कसा ? साहेबांनी इतकी वर्ष नोकरीवर ठेवलाच कसा हे नकळलेल्या असंख्य कोड्यातलं एक कोडं आहे. असो .
मग एक दीर्घ श्वास घेतला. दृष्टी अंतराळी स्थिर केली. मनी परमश्रद्धेय Aniruddha Damleबापू डोम्बवलीकरांचं स्मरण केलं . एक दिव्य विचार मनःपटलावर उमटला आणि शब्दांचं रूप घेऊन वाणीतून अमृतरूपाने स्त्रवू लागला.
“हे अजाणा, तुजला सांप्रत प्राप्त कर्माविषयी घृणा उत्पन्न झालेली दिसत आहे. “
“काका , मला अन्डरस्टँन्ड होईल असं बोला हो , विनंतीलाईक रिक्वेस्ट समजा “
“तर आता मला सांग , माझ्या आंतरदृष्टीने दिसतय की कामाबद्दल त्रास नाही , त्रास आहे तो बॉसचा करेक्ट? “ “हो , हो , एक्झाक्टली, काका यू आर ग्रेट”
“ हं, तर पहिले एक कर , बॉस आणि जॉब प्रेयसी आहे असं समजायला सुरूवात कर.लव्हर रे लव्हर, हं छावी समज.”
“ऑ ?????”” (आ वासल्यावर माव्याने गंजलेल्या दातांचं विश्वरूपदर्शन झालं तिकडे दुर्लक्ष करीत )
“हे मूढमती सांगतो. फार प्राचीन काळी महर्षी किशोरजींच्या सुस्वरात गायलेलं , लेखनाचार्य गुलशनजींच्या लिखाणातून साकार झालेलं गीत समजून घे. निव्वळ तुझ्या कल्याणासाठी लिहीले गेले आहे. तु जिथे विद्वान समजलां जाशील ते यांस प्रेमगीत संबोधतात.त्यांच्या अल्पस्वल्पबुद्धीला नगण्य काळातले युवावयीन छचोर प्रेम जाणवते, तो त्यांचा नसून त्यांचे बुद्धीचा दोष आहे. हे बंधूपुत्रा खरा अर्थ सांगतो तो समजून घे.”
कितने भी तू कर ले सितम
हँस हँस के सहेंगे हम
ये प्यार ना होगा कम
सनम तेरी कसम
एकदा बॉसला प्रेयसी मानले की मग एक दृढ भावना मनी जागृत होते, कितीही कामं सांगा, वैतागणार नाही, हसून सहन करू. पण एक लक्षात ठेवायचं पटकर्न हो म्हणायचं नाही,छावी नखरे करते तेव्हा कसे करतो ? तसच आढेवेढे घेत, नकारात होकार दाखवत. अरे हम भी कुछ है के नही.
जितना तडपाएगी मुझको
उतना ही तड़पेगी तू भी
जो आज है आरजू मेरी
वो कल तेरी आरजू होगी
ये झूठ नहीं, सच है सनम
सनम तेरी कसम
कामामुळे जेवढा त्रास देशील तेवढाच त्रास तुला होईल , तो मी देईन ना, ह्या ह्या ह्या. मला जशी निवांतपणाची इच्छा आहे ती इच्छा उद्या तुम्हालाही होईल, ही धमकीवजा सुखाची कल्पना स्पष्ट करायची
नफ़रत से देखना पहले
अंदाज प्यार का है ये
कुछ है आँखों का रिश्ता
गुस्सा इकरार का है ये
बड़ा प्यारा है तेरा जुल्म
सनम तेरी कसम
शेवटी जाता जाता शॉट लावायचा, तुम्ही सांगीतलेली कामं त्रासदायक असूनही मी का करतोय तर आत्ता डोळे वटारता, रागावता , पण मला माहितीय कितीही नाटकं केलीत काम करवून घेण्यासाठी तरी प्यार के तोहफे मे आप मुझे इन्क्रीज इन स्यालरी एन्ड बोनस अँट दिवाळी टैम देणार आहात.”
तस्मात हे बंधूपुत्रा, लेखनाचार्य गुलशनजीनी लिहीलेल्या या जॉबतारक गीताचे, मनन ,पठण , आचरण समजून उमजून चर आपलं कर की जेणेकरून मारवाड्याचे बूड वर्षोनवर्षे गल्ल्यावरच स्थापीत रहाते, तद्वत तुझेही बूड एके ठिकाणी स्थीरस्थापीत होईल, जॉब सँटीसफँक्शन मिळू लागेल. ( तळ टीप - या रविवारी दोन महिने झाले.पुन्हा मोबाईल किणकिणला नाही. राहूल्या सुखात असणारच , हल्ली आसपास दिसला तरी आदराने नजरेला नजर देत नाही. आजूबाजूला बघत जातो. एक नक्की पण या दिव्य संदेशापोटी मेथी मटर मलाई, व्हेज हैद्राबादी [ इन सांगली स्टाईल ] बटर रोट्या, कर्ड राईस, पोटी पक्षी उदरी स्थिरावलं, जय हो परमश्रद्धेय अनिरूद्ध बापू डोम्बवलीकर __/\__)
No comments:
Post a Comment