विल्श्याला नवश्या गणपतीच्या इथं बघितलं अन चक्रावलो. समोरच्या नदीपात्राकडे एकटक बघत बसलेला विल्श्या फार गंभीर दिसत होता. रविवारी दुपार ढळायला लागली की सायकल काढून पिटाळत बसे. तेव्हां नवश्या गणपती पण छोट्याश्या देवळा़त होता. पुढे नदीपात्रापर्यंत शेती होती. पंपींग स्टेशनपुढे जवळपास निर्मनुष्य परीसर. सोमेश्वरला जायचं ते श्रावणसहलीत.
विल्श्याचं तसं स्तब्ध बसणं , चरकलोच जरा. सावळेपणातून काळेपणाकडे झुकणारा, धारदार नजर, स्वच्छ चमकणारे हसल्यावर दिसणारे दात, बोलता बोलता कोट्या करत हसवणारा विल्श्या. कुठंही लठ्ठालठ्ठी झाली तर , प्रसंगी दोन रट्टे स्वतः खाऊन मिटवणारा विल्श्या. पाणीदार डोळे आणि पाणीदार मोत्यांसारखं एकसारखं अक्षर. जींदादिल विल्श्या. नाव विलास आणि कॉलेजातला विल्स रूबाबात ओढणारा म्हणून विल्श्या.
शेजारी बसलो. विल्श्या तंद्रीतच. जराश्यानं एक दीर्घ उसासा सोडला त्यानं. तेव्हा माझी जाणीव झाली असावी. काय रे विल्श्या असं म्हणत खांद्यावर थोपटलं. दोन अश्रू ओघळले गालावरून. परत थोपटलं. दोघंही बघत बसलो नदीपात्राकडे.
“चल, तुला वेळ आहे का ? “ विल्श्यानं विचारल्यावर मी नाही म्हणणं शक्यच नव्हतं. नवश्याला नमस्कार करून रस्त्याला लागलो. विल्श्या कसा आला होता ते लक्षातही आलं नाही. सायकलवरून गेलो ते सीव्हील हॉस्पीटलला. तिथे गेल्यावर साताठ लोकांनी त्याला घेरलं. मी बाजूलाच. विल्श्या तिथे एखाद्या पोक्त माणसासारखा वागत होता. रंग उडलेल्या पोक्तासारखा. मग सगळी त्याच्यामागे गेलो.
शवविच्छेदन कक्षापाशी गेलो. विल्श्यानी कुठल्या कुठल्या सह्या केल्या. एका भिकारीण वाटावी अश्या बाईचा देह ताब्यात घेतला, आणि टाळकुटेश्वर मंदीराजवळ नेऊन दहन केला आम्ही सर्वांनी. हो असच म्हणायचं नं? मला विल्श्या सोडला तर कुणीच ओळखीचं नव्हतं .
दहनाआधी लाकडं रचतानां अचानक राजूशेठ आले. विल्श्याचे बाबा. शेंगतेलाचं दुकान त्यांचं, लक्ष्मी घरी पाणी भरत असल्याची सगळी लक्षणं त्यांची. बाप लेकात एकच फरक. बाप सौम्य नजरेचा. विल्श्या धारदार नजरेचा. राजूशेठनी चितेला दोन्ही हात जोडून नमस्कार केला. गेले, जाताना विल्श्याला थोपटून गेले. विधी झाला. एकेक करत आलेली निघून गेली. विल्श्या आणी मी , दोघच. समोर भगभगलेली चीता. मला सगळं वेगळं घडतय , असच वाटायला लागलो.
सायकल हातात धरून गाडगेमहाराज पूलापाशी आलो. मग बसलो थंडगार गोदामैय्याच्या पाण्यात पाय बुडवत , हलवत, डोळ्यातली उष्णोदके ओघळवत. विल्श्या मोकळं बोलू लागला.
तुला माहितीय, आमच्या वाड्यावर रोज भिकारी येतात. बाबांना कमी कशाचीच नाही, आलेला भिकारी रिकाम्या हाती जात नाही. साई स्वतः किंवा भिकूच्या हाती काही ना काही भिक घालतेच. ( साई हे विल्श्याच्या आईचं नाव, सायीसारखा गोड स्वभाव साईचा, म्हणून म्हणतो सांगायचा ) पण प्रसन्न , मला आठवतय तसं एक भिकारीण लहान असल्यापास्नं दारावर यायची. दर शुक्रवारी, तिचं काहीतरी वेगळं होतं रे, साई असू दे , बाबा असू दे , तिला दोन वाट्या तांदूळ, दोन वाट्या तूर , एक खोब-याची वाटी , दोन रूपये, मला द्यायला लावायचे. प्रत्येक वेळी ती बघायची, आणि भिक घेतली पिशवीत की माझ्या गालावरून हात फिरवून त्या बोटांचं चुंबन घ्यायची, शिषारी यायची रे, पण एक होतं ,नंतर हवेत हात फिरवून कानशीलावर बोटं मोडायची, दृष्ट काढल्यासारखी, अगदी साई सारखीच दिसायची तेव्हा.
विल्श्या , असं कसं रे ? ती भिकारीण असं कसं करू शकते ? कारण ती माझी आई होती “ माझ्या आईला, आईला दहन केलं .जन्म जिच्यापोटी झाला तीला. पटत नाही नां ?
मी ढसाढसा रडायला लागलो. साई तुझी आई नाही ? काय बोलतोस रे ?
एकेकाळची वणीजवळच्या संपन्न घरातली पोरगी माझी आई. घरी चोवीस गाईं गोठ्यात होत्या. चारीत्र्यशील , घराणं. तुझ्या माझ्या वयात जीव जडला बापावर” कितीक मिनीटं विल्श्या स्फुंदत होता. “आईला प्रेमाच्या आणाभाका घातल्या, नाशीकला पळवून आणली.त्र्यंबकेश्वरला लग्न केलं. पोटच्या पोरीखातर आज्यानी सगळी इस्टेट जावयाच्या नावावर केली, एकुलती एक होती आई . तिस-या महिन्यात आईच्या माहेरी जळीत झालं, कुणी केलं माहीतीय पण..., सगळं संपलं. “
“विल्श्या, शांत हो , झालं गेलं , सावर , नको रे बोलूस .मलाच सहन होत नाहिये तुझं बोलणं “
“ प्रसन्न, ऐक बोलू दे मला, उद्या आईची राख गोदेत गेली की ….” “ऐक , माहेर तुटलं, आई राहिली इथेच. राजेंद्र लाटलेल्या इस्टेटीवर राजूशेठ झाला. दरम्यान मी आलो जगात. मला इतकच आठवतय, आई आई म्हणून रडत असताना मला राजूशेठनी माजघरात कोंडलं.आई वाड्याबाहेर पडली. माझी वाड्यातली आई बघतोस ती दुसरी , आई यायची घराजवळ , या चांडाळानी तिला शुक्रवारी घरी दरवाज्याशी यायची परवानगी दिली होती मला बघण्यासाठी. आणि केवळ त्याकरता भीक मागत आई असायची शुक्रवारी दरवाजात. म्हणून तर एवढी भिक तिला मिळायची”
पुढे आईची शपथ घालून विल्श्या बोलत राहीला. चारचौघांत त्याच्या आईवर चारीत्र्याचा संशय घेऊन , संपत्ती मिळाल्यावर ,शेठनी, विल्श्याच्या बापानी दुस-या बाईच्या नादानी तिला घराबाहेर काढली होती. ती साई, सावत्र आई, पण दुर्देव तिचही , कळल सगळ तिलां तेव्हा तिला टोचणी लागली. शपथेमुळे मी जास्त काही सांगु शकत नाही.
पण विल्श्याची धारदार नजर शांत झाली होती. उठताना डोळे पुसले , त्याला वाड्यापाशी सोडला. पंधरवड्यानी विल्श्या कुठे गेला कळलच नाही. एक कहाणी कायमची संपली. अचानक परागंदा झाला. खरं तर चुकलं माझं, त्यादिवसानंतर एक दोनदा चक्कर मारायला हवी होती. पण हे कळत नव्हतं तेव्हा.
------------------------------------------
मित्र मैत्रीणींनो , कुणाच्या नशीबात काय असेल सांगता येत नाही. पण कुणी रोजपेक्षा वेगळं वागताना दिसलं तर काही वेळ द्या त्याच्याकरता.बरेच वेळा मनातलं साठलेलं बोलायलाही हक्काची , विश्वासाची माणसं मिळत नाहीत. वेगळं वागतोय म्हणून सोडून देऊ नका. विल्श्या बोलला तसं इतर बोलतील असही नाही पण बोललं तर काहीश्या प्रमाणात हलकं होऊ शकतील. आपल्या माणसांसाठी, मैत्रीसाठी इतकं तर करू शकतो, थोडा वेळ देऊ शकतो ना ?
No comments:
Post a Comment