Tuesday, 18 April 2017

सकाळची सव्वासातची साडेसातची वेळ, पौर्णीमेनंतरचा रवीवार , वाडीच्या अलीकडे शिरोळच्या मारूती मंदिरापासून पुढे आलाय तो. आणि तिघं आहेत बरोबर. दमलेली, अंगातली ताकद संपलेली पण नेटाने चालतायत. चालताना पायाला आलेले फोड फुटल्यावरही चालत रहाणं सोडलेलं नाही. पहाटे पावणेचारला चालायला सुरूवात केलेली. आता सुर्य तळपायला लागलाय . घामाच्या धारा लागतायत, सुकतायत. स्वामींच्या पादुकांचं दर्शन समीप आलंय. दत्तगुरूंच अस्तीत्व असणा-या पादुका.

पोचलाय तो.

मंदिरात जायला पाय-या उतरायच्या आहेत. समोर अखंड सळसळणारा पिंपळ, बॉटल ग्रीन, पोपटी, जगात प्रवेश केलेल्या लालसर छोटूली कोवळी पानं सळसळताहेत. जात्याला नवीन टाके घालावेत तसे , घाटाच्या पाय-यांना टाके घातले आहेत. अनवाणी सुजलेल्या पावलांमुळे प्रत्येक पावलाला वेदना जाणीव करून देतायत. चौघंही खाली उतरतात.

तो आणि एक , दोघं प्रशस्त घाट , समोरून वहाणारी नदी , पलीकडचा घाट, गाळमातीत उगवलेली रोपं , पाण्यावरून  परावर्तीत होणा-या किरणांचं डोळे भरून दर्शन घेत आहेत. कितीक भावीक श्रद्धेनं दर्शनाला आली आहेत. काही रांगेत उभी आहेत. काही दर्शनानंतर भारावल्या अवस्थेत ,तृप्त मनानं बसली आहेत. काहींचं स्नान चाललंय, कुणी पाण्यात सूर मारतंय, सुस्नात ब्रह्मवृंदापैकी कुणी अंग पुसताना, स्तोत्र म्हणतांना दिसतोय.

ही दोघं , नदीत उडी मारतात. क्षणभर थंडगार वाटणा-या  पण पोटात उबदार पाण्यात डुंबायला सुरूवात करतात. चार तासांपासूनचा घामाच्या थकव्याचा गीळगीळीत सहवासातून मुक्त होतात.  समोर दर्शन देणा-या सहस्त्ररश्मी सूर्यनारायणाला कंबरभर पाण्यात उभं राहून अर्घ्यप्रदान करतात.एखादी मासोळी हलकासा चावा घेते पायाला, खाद्य समजून.

आता तो रांगेत उभा आहे. मनांत “दिगंबरा , दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा” चा जप सुरू झालाय. त्या पादुंकासमोर गुडघ्यावर बसून माथा टेकलाय.  काळ्या पाषाणाच्या पादुंकांचा अभिषेक होवून, त्या पुसून झाल्यावर , सहाणेवर उगाळलेल्या लोण्यागत मऊ चंदनगोळ्यांनी साकारलेली पादुकांची बोटं , त्यावर मन प्रसन्न करणारी विवीधरंगी फुलं ,गाभा-याच्या दरवाजावर नक्षीकाम केलेली , मढवलेली चकाकणारी चांदी ,क्षण दु क्षणांत सात्विकता जागृत करून जातात.  कपाळी अंगारा लावून , तो प्रदक्षिणा करतो. गाभा-याच्या मागे तीर्थ घेतांना कानांवर पडतं तीर्थ देणा-या गुरूजींचं हळु आवाजात गुणगुणलेलं दत्ताचं स्तोत्र.

हा क्षण कृतकृत्य करणारा. सुटलेल्या निश्वासाबरोबरच पटकन मनांत विचार येतो. काळाच्या प्रवाहात कितीक संसारी, विरागी, गरीब ,श्रीमंत हरत-हेच्या नश्वर जीवांना आत्ताची हीच जाणीव वर्षानुवर्ष जाणवली असेल दत्तगुरूंच्या अस्तीत्वाने. त्यातलाच मी एक. एकदा नव्हे अनेकदा ह्या जाणीवेची श्रीमंती उपभोगणारा.

अंगावर सर्रकन काटा फुलतो, हलकीशी वा-याची झूळूक, जिच्या तळी पादुका आहेत तो औदुंबर सळसळतो. एक पान नेमकं सुटून ह्याच्या खांद्याला स्पर्श करून भूमीवर अल्लद उतरतं . जणु औदुंबरानं मनातले विचार वाचल्यावर सहमती दिलीय त्या ईश्वरी अस्तित्वाची.

साष्टांग प्रणिपात करून तो मांडी घालून बसतो.डोळे मिटतो. प्रचंड नीरव शांततेला अनुभवत तो बसतो. बाजुच्या भाविकांचं असणं सुद्धा जाणवत नाही. तलावात दगड भिरकावल्यावर ,एकापाठोपाठ एक उठणा-या तरंगासारख्या , असंख्य ऊर्जात्मक तरंग , खोल , आतून उमटायला लागतात. फकीराच्या उसासत्या धुपाच्या धुरासारखं सगळं हलकंफुल्लं होतं, आनंदाची  संपूर्णावस्था .

कुणीतरी दंडाला धरून हलवल्याने , तो डोळे उघडतो. ते डबडबलेले असतात. गालांवरून ओघळल्याची जाणीव होते. तिघांपैकी एक परतूया ना ? अशी नजरेची खूण करतो. पुन्हा नमस्कार करून घाटाच्या पाय-या चढताना कुणा भाविकाचा आवाज कानी पडतो.

“नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता । त्वतो देव त्वं शरण्योऽकहर्ता ॥ कुर्वात्रेयानुग्रहं पुर्णराते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥”
तो चढत असतो, कुणी आता उतरत असतो, युगानंयुगं असं चालू रहाणार आहे , अखंडितपणे

No comments:

Post a Comment