Wednesday, 12 April 2017

क्वचित सकाळी लवकर जाग आली की आवरावं, आणि बाहेर पडावं. घराच्या तीन पाय-या उतरलं की आपोआप उजवीकडे वळायला होतं. शांत डांबरी रस्ता , त्यावर सिटी हायस्कूलसमोर पिवळट प्रकाश पडलेला. चालायला लागावं, एखाद्या xxxदुग्धालयासमोर टेंपोतून कँन उतरवणं चालू असतं, एक दोन घरातून जाग असते. तसंच पुढे यावं शास्त्री उद्यानापाशी, तिथं कोनीका कलर ल्याबच्या कट्टयावर रात्रपाळीचा पोलीसमामा, डूटी संपवून कांबळं ओढून झोपलेला असतो. डूटीवाले मामा एकटेच चकरा मारत असतात. शास्त्री उद्यानापाशी एक दोन पक्ष्यांचे आवाज येतात. (नावं कुठे माहित लेकाच्यांची ?) तसंच पुढे सरकावं. आता झोपेचा असर संपत आलेला असतो, आणि पावलं द्रुत एकतालाच्या ठेक्यात पडू लागतात. हरीपूर नाक्यावर वळलं की मग सराईत प्रभातफेरीकर्स दिसायला लागतात.  एक अप्पू राजाची दुक्कल, अप्पू गीड्डा, राजा लंबू, दोघंही फास्ट चालणारे, हरीपूर पर्यंत जाऊन येणारे, दोघंही चष्मेवाले, ह्यांची एक मजा आहे. दोघांचीही ऊजवी ,  एकाच वेळी पडतात. छान लय पकडून चालत असतात. ही बाजूनी पास झाली की नकळत आपली पावलं ही गती पकडतात.  पिंपळपारावरचे मारूतरायांचं दर्शन होतं, मग पुढे मठ मागे टाकून पुढे सरकतो. एक मावशी , पायात शूज, तोंडी हळू आवाजात मनाचे श्लोक, रामरक्षा . हळूहळू चालणं.  कुणी भरारा चालत असतं, कुणाला घरातून मनाविरूद्ध चालायला बाहेर काढलेलं असतं , त्यांचे चेह-यावरचे भाव बघण्यासारखे असतात, दोनेक किमी जांभया देत, घामाचा अर्धा टिपूस येणार नाही अश्या बेताबेताने चालण्याचं टाकणं टाकत असतात.  पुढं जाईस्तो ६० उलटलेली ८, ९ जणांचं टोळकं झप झप चालीनं परततांना दिसतं ही सगळी पाचलाच सुरू करत असावीत चालणं, वर्षानुवर्ष चालायचा नेम चुकला नसावा यांचा. यांतल्या प्रत्येकाच्या डोळ्यावर पट्टी बांधून सोडलं तरी न अडखळता गणपतीपर्यंत जाऊन येतील इतका परीचयाचा झालाय यांना रस्ता. वैशीष्ठ्य म्हणजे ही सगळी सदैव हसतमुख दिसतात. कुणाची तरी खिल्ली उडवत, चर्चा करत , झपझप चालतात.  एक दोघं जॉगींगवाली दिसतात. फुललेले लयबद्ध श्वास, मान खाली घालून २,२ च्या चरणांत श्वास घेत सोडत जॉगींग सुरू असते. (यातला एक जरा तुंदीलतनू, त्याच्या उदराची प्रत्येक पावलाला होणारी हालचाल …..असो )  एक जुन्या काळी पैलवानकी केलेले, आणि आता सुटलेलं शरीर , आणि झिजलेले सांधे संभाळत जीवाच्या कराराने मॉर्नींग वॉक पूर्ण करणारे. हे थांबलं तर सगळं थांबलं हे जाणवतंय चेह-यावर.  बागेतल्या गणपतीपाशी पोहोचतो, चिंचेच्या झाडांच्या मधलं हे मंदीर. दोन्ही बाजूला लावलेल्या समयांच्या उजेडात लंबोदराचे अभिषेक सुरू असतात. शेंदूरचर्चीत लंबोदराला नमस्कार करावा, फिरावं मागे.  परतताना दिसतात दोन काकवा, फक्त एकमेकींना कळेल एवढ्या आवाजात गप्पा मारत, रमत गमत येत असतात, काल काय काय घडलं ते गुज असावं, सीरीयल सुरू असताना आवाज म्यूट करावा, तसं ते फक्त हावभावांचं चित्र.  आता सूर्यनारायणराव, जागृत होऊन आळोखेपिळोखे देत दर्शन देऊ लागतात.पुढे येतो. या रस्त्यावरचा एखादं मिनीट चाल मंदावणारा पॉईंट.  डाव्या बाजूला चारपाच एकराचा केळीचा डाग, हद्दीला वाढवलेली नारळं, आंबे, सकाळचं हळदुलं तांबुस कोवळं ऊन पिकांवर पसरलेलं असतं, एखाद्या वेळी स्वस्थ आत्ममग्न बगळोबा ही दिसतात. हिरवीगार केळीची बागेतून वर आलेले लांब अंतरावरचे धुळगांवकर मंदीराचे शुभ्र रंगांचे शिखर , आणि चकाकणारा कळस. रस्त्याच्या पलीकडे बेकरीवाला. त्याची पूजा आवरून धूपाचा वास येत असतो. त्यानी एफएम लावलेलं असतं, अवघा रंग एक झाला किशोरीताई म्हणत असतात, लताबाई कधीतरी अगा sss करूणाकरा आळवत असतात , अभिषेकी बुवा आम्हां नाही नामरूप, आम्ही आकाशस्वरूप गात असतात. सगळं मनात साठवावं, पुढे चालावं  आता एक डॉक्टर पास होतात, सायकलवरून. यांचे बूट, सॉक्स, बर्म्युडा, टीशर्ट, आणि डोक्यावरची क्याप , कायम कालच नवीन विकत घेतल्यासारखी कशी दिसतात हे गुढ आहे. मात्र मजबूत सायकलींग करत असावेत हे त्यांच्या पोट-यांवरून कळतं.  एक ताई येतात, पंजाबी ड्रेस मधल्या. शाळा कॉलेजातले एनसीसी परेडचे गारूड अजून उतरलेले नाही. दाया बाया ,दाया बाया , लेफ्ट, लेफ्ट करत , हादरली धरणी व्योम शेषही  शहारला, अश्या थाटात चालत असतात. फक्त बूट कोणते घालतात माहित नाही , पण त्याचा खाड खट आवाजाऐवजी , चप्याक पच्याक चप्याक पच्याक येतो. असो.  तीन कॉलेजकन्या आर्चीसारख्या , मस्त मजेत हसत खिदळत जातांना दिसतात.   उन जाणवायला लागलेलं असतं.  एक अनवाणी चालणारे दिसतात. छान ट्रँकसूट घातलेला असतो पण अनवाणी. निर्धारानं चालत असतात.  परत शास्त्री उद्यानापर्यंत येतो. एव्हांना पेपरवाली पोरांच्या सायकली फिरायला लागलेल्या असतात, पानटप-या , चहा, फुलांची दुकानं उघडलेली असतात. मंजूनाथनी पहिला कोपभर चहा रस्त्यावर ओतून दिलेला असतो.  राजारामबापू ब्यांकेजवळ एक रिक्षावाला , डिस्कव्हरवाल्याला कट मारून जातो. डिस्कव्हर वाल्याच्या तोंडून एक सणसणीत शब्द बाहेर पडतो.  क्वचीतच्या प्रभातफेरीचं वेगळेपण संपून रोजचा रूटीन दिवस सुरू झालेला असतो.  सुप्रभात

No comments:

Post a Comment