Wednesday, 12 April 2017

सुट्टी घ्यायची कशाला ? आरामाला ?  अं , हं, तुला न्याहाळायला.  झोपेचं सोंग घेऊन लोळत पडलेल्या मला कमरेला ढोसतेस उठ म्हणत, आणि अस्फूट हसतेस, त्या ढोसणाल्या अनुभवायला.
  आवरायला संथ सुरूवात केली की बबडीची ,”बघ की बाबू किती स्लोsssय” तक्रार ऐकलीस की लटकी ओरडतेस “आवर , रे, बबडीला पळायचय,तुझ्याकडे बघितलं की तुझं ते  आर्जवी डोळे मिचकावणं बघायला. 
सुस्नात , ओलेत्या केसांना पंचा बांधून , लगबगीने आवळतानाची तुझी सळसळ, आणि तुझ्या सळसळीने होणा-या माझ्या तगमगीकडे , निव्वळ दुर्लक्ष करून किचनमधे पळतेस ते अनुभवायला.  तुझ्या ओढीनं ,आवरून तुझ्यामागं उभारल्यावर, खुदकन हसत, खांद्यावरचा हात झटकला जाणं, अनुभवायला.

दुपारपर्यंत , सरावाने , लयबद्ध हालचाली करत गाणी गुणगुणत , घराला आवरतेस, काय काय सावरतेस , ते पुन्हा लोळत , डोळे मिटून , ऐकत पडायला.  मधेच कधीतरी जवळ आलीस, की ओढून घेतल्यावर, स्सsss, हूंकार देत लाजतेस, तेव्हा दुनियेचा वैशाख वणवा पेटलेला असताना , फणका-याने मुडपलेल्या खालच्या ओठाला , माझ्या ओठी बंदिस्त करायला तुझ्या चांदणचु-याच्या मिठीत विरघळून जायला…….

सुट्टी घ्यायची कशाला ? आरामाला ?  अं , हं, तुला न्याहाळायला,तुझ्या लावण्याची रंगपंचमी खेळायला

No comments:

Post a Comment