Friday, 21 April 2017

प्रशांत आणि अप्पांची दिवाळी   प्रशांतची गाडी निवारामधे शिरली. प्रशांत आला होता अप्पांना भेटायला. ७ नंबरची बेल वाजवताना खूप एक्साईट झाला होता. दार अप्पांनीच उघडलं. पाया पडला प्रशांत तसा अप्पांचा यशस्वी भव आशिर्वाद कानावर पडला. समोर नारूकाकाही होते. अप्पांचा स्वर नॉर्मल लागल्यामुळे प्रशांतला आशेचा किरण दिसायला लागला. मनाशी जे योजलं होतं ते पूर्ण होईल ही आशा आणि बळावली. नारूकाका आतून पाणी घेऊन आले. प्रशांतनी जुजबी चौकशी करून मगाचच्या आशीर्वादाचा धागा ओढत अप्पांना विचारलं   अप्पा , माझ्या सारखाच आशीर्वाद मीहीरलाही देणार नं , दिवाळीला चला नं घरी.   अप्पांनी धारदार नजरेचा एकच कटाक्ष प्रशांतकडे टाकला. क्षणभरच काळजात धस्स झालं. पण क्षणभरच, दुस-या सेकंदाला नजर संपूर्ण निवळली होती.  प्रशांत , अरे इथे माझी पहिलीच दिवाळी. म्हणजे आम्हां सगळ्यांची. आठवड्यापासून तयारी चालू. आहे. दोन दिवस दोन गट करून झाड फेेड केली निवाराची. अरे कामट्यांच्या चांदण्याही बनवल्या. वैद्य अगदी एक्सपर्ट आहे हं . त्यानी शिकवलं . मला येत होतीच पण घेतलं गुपचुप सोंग . मीहीरसारखच दोराच का बांधायचा, फेव्हीकॉलने चिकटवलं तर सारखे प्रश्न विचारून भंडाऊन सोडला वैद्याला. मजा आली. आता फराळाचं चालू आहे . माझ्याकडे नारायणचा रोल. असिटंटणटण झालोय. उमाच्या हातचं खाण्यात आयुष्य गेलं, मानसीही करतेय छान. हे सगळं पहिली दिवाळी म्हणून उत्साहात चाललय. तिकडे कसा येणार ?  अप्पांच्या तोंडून उमाचा म्हणजेच आईचा उल्लेख येताच हेलावला प्रशांत .   अप्पा, तुमचा उत्साह दुणावलाय सगळं करताना. पण मीहीरकरता या नं , प्लीज अप्पा, तुमचा धोसरा काढलाय कालपासून.  अरे प्रशांत तु असं बोलतोयस , श्रीराम. अरे तु , मानसी आणि मीहीर. ही पहिलीच दिवाळी ना तुमची. आनंदाने साजरी करायची. पुन्हा आता माझी लुडबूड ही नाहीये मधेमधे. खरं तर तुम्ही सगळी पाडव्याला नमस्काराला येणार असाच माझा अंदाज. अरे आता मी नाही मधे येणार. गया गुज-या पिढीतली तगलेली खोडं आम्ही. आता तुमचे दिवस आहेत मनचाहे मजा करायचे.  अप्पांना मधेच थांबवत प्रशांत म्हणाला अप्पा पाडव्याला येणार होतोच. पण मीहीरच्या हट्टामुळे न्यायला आलोय , चला ना, नारूकाका तुम्हीही या नं ,माझं घर तुमचंही आहेच की. अप्पांच्या नाकपूड्या थरथरल्या, डोळ्याच्या कडांशी आसवं जमा होउ लागली होती.  प्रशांत पाडव्याला येणारेस नां, मग ये आता. अधिक काही सांगणे नाही. नारू अरे चकली आणि शंकरपाळी दे रे थोडी , मीहीरला आवडतात.  हातात अप्पांनी दिलेली पिशवी घेऊन प्रशांत परतला. गाडीत सीडी प्लेयर सुरू करताच अभिषेकीबुवांचा आवाज कानी पडला वैराण माळ उघडा बैचेन तळमळे. पाण्याबाहेर काढलेल्या मासोळीसारखा बैचेन तगमग सुरू झाली प्रशांतची. जुनं आठवलं सगळं.  आई गेल्यापासनं अप्पा एकाकी झाले होते. इव्हीनींग वॉक ला जायचे तेवढाच टाईमपास. निळकंठेश्वराच्या मंदिरात असेच चालत येणारी मंडळी होती. त्यांच्याबरोबर गप्पा व्हायच्या तेवढा विरंगुळा . घरी आले की शांत असायचे, आठवणींचा रियाझ करत.  मीहीर झाला आणि अप्पांनी कात टाकली. चार वर्षात आईबापापेक्षा जास्त लळा लागला होता अप्पांचा, मीहीर न अप्पा त्यांच जगच वेगळं होतं मानसीला ही खुप मदत झाली अप्पांची, मीहीर तिच्या पासून सुटवळ झाला तो ही अप्पांमुळेच. मानसी प्रशांतनी मीहीरबाबतीत खुप स्वप्नं रंगवलेली. त्या दृष्टीने तो वाढावा या करता दोघही झटू लागली. अप्पांना मात्र काही गोष्टी खटकायच्या. घराघरात होतच की असं, पण मागच्या वर्षी मानसीच्या बोलण्याने अप्पा एका क्षणी चमकले. मानसीचं बोलणं नेहमीसारखच विचारी आणि संयत होतं , तीचा मुद्दाही पटण्यासारखाच होता. फक्त अप्पा चमकले एका वाक्यावर ,’अप्पा आमचाही संसार आहे नं.’    बस अप्पांनी तीच्या म्हणण्याला संपूर्ण रूकार दिला. मानसीच्या विचारीपणाचही कौतुक केलं , सून नाहीस माझ्या मुलीसारखीच , माझीच विचारपद्धती उचललीस मानसी अशीच रहा. पण ह्या कौतुकाच्या बोलण्यातही अप्पांचा दुखावलेपणाचा स्वर , वर्ज्य स्वरासारखा प्रत्यक्ष लागला नाही तरी असल्याची जाणीव करून देत होता.  दोन आठवड्यांनी अप्पा सकाळीही बाहेर पडू लागले. तोंडातून अधून मधून श्रीराम उमटू लागला. बाकी बदल नव्हताच. अप्पा नॉर्मल वागायचे, रहायचे. मानसी प्रशांत दुखावलंपण विसरून जाणारे अप्पा बघताना, अप्पांबाबतचं प्रेम वाढत जायला लागलं.  गणपतीत अप्पा मीहीरबरोबर डवरले होते. त्याला मांडीवर बसवून त्याच्या हातात ताम्हण देऊन आणि त्याला आधार देत पाच आरत्या दुमदुवल्या होत्या अप्पांनी. विसर्जन करून अप्पा आले ते न जेवता खाता पिता बेडवर शांतपणे आडवे झाले. मीहीर आलाच अप्पा जे हसले मीहीरही प देऊन निघून गेला.  दुस-या दिवशी अप्पांनी विचारलं जरा फिरूया का प्रशांत गाडीतनं, मानसी तु येणारनं.   अप्पा घेऊन आले निवारात, ही स्कीम आहे नवीन ,कशी वाटतेय, मला आवडलीय , निवारा, इथं आठ, तीन खोल्यांची घरं आहेत, पण प्लॉटस बारा आहेत. रहाणारे आठ , दोन प्लॉट किचन कम हॉल साठी , दोन प्लॉट मोकळे, येणा-या जाणा-यांच्या गाड्या लावण्यासाठी. ही आयडीया इव्हीनींग वॉकवाल्यांची. निळकंठेश्वराच्या कृपेनं तयार झालेली.   आजपासून मी इथे. ७ नंबर मधे. तुमचा संसार तुमचा आहे. आणि दुस-या दिवसापासून अप्पा निवारात आले. ……………...................  घरी आला प्रशांत, दरवाज्यात मीहीरनी खळखळत विचारलेला प्रश्न , अप्पा ?  मानसीनं अलगद उचललं मीहीरला.  काय झालय ते तीघांनाही कळलं  अप्पांचा नातू मीहीर लगेच शांत झाला.  अवघ्या दिवाळीवर सावट पसरल. आणि एक दिवाळी शांत झाली   रात्रभर प्रशांत मानसीची अवस्था……  त्यातच सकाळ झाली , मलूल , लावलेल्या पणत्या विझल्या होत्या. उगवतीच्या सुर्यकिरणांत रात्रभर झगमगणारे आकाशकंदीलही शांत झालेले.  सणाला आलेली विलक्षण भयाण शांतता  प्रशांत मीहीरला आवरून घ्यायच्या प्रयत्नात असतानाच बेल वाजली  दार उघडल्यावर अप्पा दारात उभे   नारूकाका, वैद्य, साठे , चंदावरकर , सोनावणे, अपराध काकू सगळी मागे.  मीहीर वेगानं आला , अप्पानी उचलून कडेवर उचलला मीहीरला  मानसीला अपराध काकूंनी कवळलं नी आनंदाच्या झ-यांत एवढेच शब्द कानी पडले मानसीच्या  मीहीरशिवाय अप्पा ,आणि अप्पांशिवाय दिवाळी होऊच शकत नाही. आणि अप्पा आमचेही भावोजी आहेत रे बाळा. आम्ही आलो आहोत दोन दिवसांकरता. नर्कचतुर्दशीपर्यंत आम्ही आहोत. अभ्यंग करायचं ते लेकरं, नातंवंडाकरता, लक्ष्मीपूजनाला आपापल्या घरी थांबायचं , बाळा पाडव्याला येतोयस नं, नमस्काराला मीहीरलां घेऊन’  आपापला संसार संभाळत,  अशीच सर्वांची दिवाळी साजरी होऊ दे याच शुभेच्छा

No comments:

Post a Comment