Friday, 14 April 2017

नाट्यगृहातल्या खुर्चीवर बसलेलं असावं, रंगमंचावरच्या लाईटच्या उजेडात आजुबाजूच्या अंधारल्या जगातले काही चेहरे अंधुकसे दिसत असावेत. कुणी लावलेलं सेंट, मोगरीचे गजरे, काही सोनचाफ्याची फुलं बारीक लावलेल्या एसीमधेही संमीश्र वासानी घमघमत असावी.   रंगमंचावर दोन तंबो-याच्या मधे त्या बसलेल्या असाव्यात हातात स्वरमंडल घेऊन. आजुबाजुला  तबलजीं, हार्मोनीयम  संगत करणारे अप्पा जळगावकर, स्टेजपुरते लाईटसचे झोत. तंबो-याच्या तारा , स्वरमंडल , समोरचे माईक चमकतायत. स्टेजच्या उजव्या बाजूला प्रज्वलीत केलेल्या समईचा मंद उजेड, हलणा-या ज्योती. स्टेजवर मागे मोरपीसांचं कटआऊट आणि संस्थेचं नांव.  अनाऊंसरचं लाडीक आवाजातलं निवेदन संपल्यावर त्या एक मंद स्मीत करतात. आणि डोळे मिटून सुरूवात करतात. स्वरमंडलावर बोटं फिरू लागतात.   लांबट उभा चेहरा, सरळ नाक पटकन जाणवणारं ,सैलसर केस एका बाजुनी अलगद कानांवरून ओघळतायत,  अधोवदन, नेसलेल्या पाचवारीचा पदर दोन्ही खांद्यावरून आटोपशीर रितीने घेऊन खाली खोचलेला.  स्वर लावायला सुरूवात होते. एकाग्रता साधत संपूर्ण एकरूप होत, स्वरसाधना सुरू होते.   लावलेल्या स्वरांवर जाणकार दर्दींच्या हललेल्या माना, सौम्य फलकावले गेलेले हात,अंधुकश्या वातावरणातही जाणवतात.विलंबीत तीन तालात , झुलत जाणा-या       रेंगाळणा-या , वजनदार हत्तीच्या चालीसारखा , झुलत , रेंगाळत रागेश्री खुलायला लागतो. पलकन लागी वर एकेक स्वरपुंज उलगडत जातात. पिंजत असलेल्या कापसासारखे. कुठलीही घाई नाही. संथ , शांत , पलीकडच्या समईसारखी मंद उबदार आलापी. किंचीत सानुनासीक स्वरात.   त्या आता गुंगल्या आहेत. सुरांशी एकरूपता साधत. त्यांनीच गायलेल्या अभंगातल्या “ मी माझे मोहीत, राहिले निवांत , एकरूप चित्त देखिले गे माये “या  शब्दांची अवस्था अनुभवत. रागविस्तार करतायत त्या, त्यांच्या सूुरांसमवेत , आमचीही यात्रा सुरू झालीये. तालमात्रांचा गंध नसलेलेही हळूहळू त्या सुरांशी एकरूप होत आहेत. एका अद्भुत अनुभवाचे साक्षीदार होत. एकेका आलापी बरोबर , स्वरपुंजाच्या दर्शनानी , दूर जंगल्यातल्या एखाद्या तळ्यात , क्षणाक्षणाला एखादा खडा पडावा आणि वारंवार लहरी लाटा निर्माण व्हाव्यात तश्या सुरांच्या लहरी लाटा येतायेत पाठोपाठ. आणि हा सगळा अनुभव देणा-या त्या, आपल्याश्या वाटतानांच , अलग राहून पुन्हा नवे स्वरपुंज आलापीमधून एकतानतेने निर्माण करत आहेत.  हळुहळु या सगळ्याला गती येऊ लागलीय. गुरूगृही संथा देणा-या गुरूंनी एखादा मंत्र सांगावा, आणि सांगताक्षणीच शिकायला तत्पर शिष्यवृंदानी माना, हात योग्य मात्रेवर हलवत त्याचा पुर्नउच्चार करावा , तद्वत, त्या एकेक स्वरांच्या लडी गातात, आणि साथसंगत करणारे तत्परतेने त्याच स्वरांना जीवंत करतात , तेव्हां ऐकणारे त्या शिष्यांसारखेच योग्य वाटेल तिथे माना डोलवत, बोटांनी खुर्च्यांच्या हातांवर आपल्या मगदुराप्रमाणे ताल द्यायचा प्रयत्न करत , किंवा अनिमीष नेत्रांनी दाद देऊ लागतात.   स्वर्गीची अप्सरा पाऊलांचा रूणुझुणु नाद करता करता अचानक एखादी गिरकी घ्यावी , तशी अवचित एखादी तानेसदृश स्वरांची लड त्या अशी फेकतात, तबलजींना एक सौम्यसा इशारा जातो, अप्पांकडेही नजर वळते आणि दोनेक क्षणांचा पॉझ घेतात त्या , जीवघेणा, स्वरमंडल, तानपु-याची दोन आवर्तनं होतात.  आणि खणखणत शुल ये असा दमदार द्रुतएकतालाचा ठेका पकडत , सुरू होते, चतर सुगर बलमा चीज.  पं. बिरजुमहारांजानी कथ्थकच्या शेवटच्या पंधरा मिनीटात , पायातल्या घुंगुरांचा अखंड नाद करत , एकापाठोपाठ गिरक्या घेत जावं , तश्या सणाणत्या ताना गिरक्या घेत , त्या गात असतात. श्रोते ऐकत असतात , देहभान विसरून. बामणी घारीची झडप म्हणावी, की प्रत्यंचेतून कडाडून सुटलेला बाण म्हणावा , की धुंवाधार पावसात कडाडणारी विद्युतशलाका ? अश्या तानांची बरसात होते.   त्या सुरांशी एकरूप झालेल्या असतात, आपण त्यांच्याशी , ओहंसोहंभावाने.  कुठेतरी शांतता होते, स्वरमंडल शांत होते, तानपु-यांचा आवाज सुरू असताना, ते सुरांचं गारूड मनातून उतरायला तयार नसताना, सगळे लाईट लागतात, पडदा बंद होतो. आणि मागुन पुन्हा अनाऊंसरचा लाडीक आवाज येतो” मध्यंतरानंतर पुन्हा सहभागी होऊया , गानसरस्वती किशोरीताई     आमोणकरांसमवेत “ आयुष्यात एकदाच घेतलेला हा अनुभव, पहिला आणि शेवटचा.  किशोरीताईंचा स्वर जेव्हा कानांवर पडेल त्यावेळी राग वेगळे असतील , पण डोळे मिटले तर , पुन्हा ते गारूड मनांवर राज्य करेल

No comments:

Post a Comment