ब-याच दिवसांनी आचार्यांना सामोरा गेलो. ते सचिंत मुद्रेत. नेहमीप्रमाणेच. आमच्या येण्याकडे दुर्लक्ष.
मी -” नमोनमः आचार्य”
ते -”..” (नजर वळवून बघतात, मंदस हसतात [ आणि मंद दिसतात, हे मनात ])
मी -”फार विचारात दिसताय, काय नवीन ?”
ते -” हं……, विचार करतोय , लिखाणाच्या नव्या आयामांबाबत.”
मी-”आया म्हंटलं असतं तरी कळलं असतं आचार्य, पुन्हा मां कशाला ? ही द्विरूक्ती नाही का ?.पिवळा पितांबर सारखी” (है शाब्बास, हे मनात )
ते-(थंडगार पडलेल्या म्यागीइतक्या गिळगिळीत नजरेने आमच्याकडे पहात)”आयाम, आयाम म्हणजे नवीन व्हिजन, नवा अँगल. नवीन परीमाण “.
मी -” बरं, बरं कोणता आयाम , लिखाणाबाबत ?” आचार्य मुखविक्षेप करतात (त्याला ते स्मीतहास्य म्हणतात)
ते- “ मी खुप चिंतन केलय, म्हणजे बघ, मराठीतल्या प्राचीन लेखक म्हणजे , कुसुमाग्रज, कानेटकर ते तुमच्यासारख्या फुटकळ , क्षुद्र लेखकांनी एकाच प्रकारचे लिखाण केले “
मी - “ऑ ?, सगळ्यांनी एकाच प्रकारचे लिखाण केले ? आचार्य मला उमगले नाही. अहो त्यांच्या लिखाणाच्या जवळपासही पोहोचता येणार नाही आम्हांला. अाचार्य आजमीतीस फेसबुकावर लिखाण करणारे ही उच्च जातकूळीचं लिखाण करतायत. मग सगळ्यांनी एकाच प्रकारचे लिखाण केले , हे शक्य आहे ? जरा इस्कटून सांगा.(आम्ही क्षुद्र काय ?ठाकूर ये कर्जा रहा हम पे )
ते - (गुढगर्भीचे आंतरीक उमाळे स्टाईलची तंद्री लावत ) “हे बघ, पेरू, चिंच, नारळ आंबा ही वेगळाली असली तरी जातकुळी एकच, फळझाडे, शरद, मनमोहन, नरेंद्र, उद्धव , राज, असले तरी जातकुळी एकच, राजकारणी ,तद्वत लहानमोठं लिखाण करणारी एकाच जातकुळीतील लिखाण करतात ती म्हणजे , सुत्रबद्ध सुरळीत”.
मी - “म्हणजे ?”
ते - सर्वसमावेशक हास्य करून [ कुजकं ]) “ सुरळीतपणाच्या एका सुत्रात लिखाण करतात. आता मला सांग , पहाटेची वेळ आहे , असं लिहीलं की पुढे काय ?”
मी -”सोप्पय, सहस्त्ररश्मी किरणे फाकू लागलाय, पक्षी किलबिलाट करू लागले आहेत. नशेचा आपलं निशेचा अंमल सरू लागलाय”
ते-”बरोबर , किंवा पेपरवाली पोरे पेपर, पुरवण्या जुळवतायत, चहा पोह्यांच्या गाड्यांवर पोह्यांची तयारी सुरू झालीय. मॉर्नींग वॉक करणारी घराबाहेर पडलीयत, असं . म्हणजे जे लिहाल त्या लिखाणाला एकामागोमाग सुरळीत मुद्दयांच्या सुत्राने बद्ध केलेलं असतं , तेच सुत्रबद्ध सुरळीत. ते तुझ्यासारख्या मंदमतीला कळणं जरा अवघड आहे, पण चिंतन केलं की कळेल”
मी -”छ्या , त्यात काय कळायचं?मुद्दयातूंन मुद्दे निघत जाणारं लिखाण , त्यात काय ?कळलं कळलं , पुढे ?
(मंदमती ?ठाकूर ये दूसरा कर्जा रहा हमपर )
ते -” मग हे बदलायचं असेल तर सूत्रबद्ध विस्कळीत लिखाण करावं लागेल. तोच नवा आयाम, नवीन व्हिजन. त्याबाबत चिंतन सुरू आहे.”
मी -”सूत्रबद्ध विस्कळीत कसं असेल? विस्कळीत ते विस्कळीतच.” (हा प्रश्न गनीमी काव्याने, बर्वेंच्या फोटोतले, वाघ्ज, बिबळेज, चित्तेज, सावजावर हल्ला करण्यासाठी दबून बसतात तसे आम्ही सरसावून, उत्तराची वाट बघत)
ते- (सखोल चिंतनींक गुह्य उकल पद्धतीच्या नजरेनं [समोरच्याला येड्यात काढणा-या नजरेने ]) “ हीच तर गंमत आहे, मुढमती, प्रत्येक विस्कळीत लिखाणामागे एक सुत्र असते. सहज दृश्य असे एक, आणि एकच सुत्र.”
मी -” कसे ?”(मुढमती ? ठाकूर यु जस्ट वेट, हे मनात )
ते-” सांगतो, हे बघ नीट ऐक, तुला विस्कळीत ओळी सांगतो , त्यांना बद्ध करणारे एक आणि एकमेव सुत्र ओळखून दाखव , ही तीन वाक्ये अशी
पहाटेची वेळ आहे.
भाजकाने भाज्याला भागल्यावर उरते ती बाकी.
राणी सरदेसाईची भूमीका चांगली वठवली असली तर पटकथेत मालीका ढिसाळ होती.
को हं ? को हं ? चा गजर शेवटी अहं ब्रम्हास्मीपर्यंत येऊन संपतो.
सांग, या विस्कळीतपणात दृश्य असे एकच सुत्र आहे , ज्यानी या विस्कळीतपणाला बद्ध केले आहे”
मी - (हताशहोत्साता होत, म्लान वाणीने )” आचार्य , नम्रपणे सुचवू इच्छितो , ही चार वाक्ये आहेत. विनम्रपणे सांगु इच्छितो, यात दृश्य स्वरूपातील सुत्र मला दिसत नाहीये.”
ते- ( विश्वविजयी हास्य करत) “ ते एकमेव सुत्र म्हणजे हे सगळं मी लिहीलय. माझ्या लिखाणात जन्म हेच त्यांना बद्ध करणारे एकमेव सुत्र, कळलं ?”
मी -” आचार्य , असं असेल तर तुमचं चिंतन चुकीचं आहे , तुमच्या म्हणण्याप्रमाणे या चारही वाक्यांना एक आणि एकच सुत्र आहे की तुम्ही लिहीलय पण या व्यतिरीक्त आणि एक सुत्र आहे , जे अदृश्यरूपात आहे, जे या चारही वाक्यांना एकसमयावच्छेदेकरून बद्ध करते” ते -( विस्मयचकीत, वैचारीक, उठलाबाजार नजरेने )
”शक्यच नाही, अशक्य , सांग बरे असे कोणते सुत्र आहे , जे अदृश्य स्वरूपात आहे ?
मी - (क्षुद्र, मुढमती, मंदमती, ठाकूर ये तीनो कर्जा चुकाने की बारी आयी है, सावज टप्प्यात आलंय, एकच झेप, डायरेक्ट फडशा )“ ऐका, पहाटेची वेळ आहे. भाजकाने भाज्याला भागल्यावर उरते ती बाकी. राणी सरदेसाईची भूमीका चांगली वठवली असली तर पटकथेत मालीका ढिसाळ होती. को हं ? को हं ? चा गजर शेवटी अहं ब्रम्हास्मीपर्यंत येऊन संपतो. या चारही विस्कळीत वाक्यांना अदृश्यपणाने बद्ध करणारे सुत्र म्हणजे . . . . . . तुम्ही निव्वळ खुळे असून जन्मजात डोक्यावर पडलेले आहात, ह्या ह्या ह्या “
No comments:
Post a Comment