Wednesday, 12 April 2017

रोजच्या आयुष्यात काही ठरावीक वेळी ठरावीक गोष्टी घडत असतात.   पहाटे जाग येते दुधवाल्याच्या बेलने, त्यापाठोपाठ भांड्याचा आवाज ठरलेला  मॉर्नींग वॉकला गेलंच तर परतताना पेपरवाली सायकलवरची पोरं ठरलेली  हापीसात जाताना कॉर्नरवर बसलेला ए खारीयेssssssवाला ठरलेला.  राजमतीनगरवरून जाताना चित्तवृत्ती प्रफुल्लीत करणारे एकदोन तरी "नजारे" दिसणार हे ठरलेलच  संध्याकाळी दिवेकर हॉस्पीटलमागच्या रस्त्यानं आलं तर, जवळपास डान्स करत असल्यासारखा, स्टार टेक्सास भेळवाल्याचा भेळेच्या पातेल्यात भेळ मिक्स करतानाचा डावाचा काण काण काण काण काण आवाज ठरलेला.  जेवण झाल्यावर टीव्हीबिव्ही मिटून हंथरूणावर आडवारलं की तोंडात माव्याचे तोबरे भरून, पचीक पिच्याक आवाजात पिचका-या मारत जडावलेल्या जीभेतून घरंगळणारे अर्धबोबडे, अर्धघोगरे आवाज कानावर पडणं ठरलेलं  ह्या आणि अश्या असंख्य, ह्यातली एखादी गोष्ट घडली नाही तर फारशी उलथापालथ होत नाही , पण मेंदूच्या कप्प्यात एक नोटीफिकेशन पींग करून जातं "अरेच्च्या, आज असं कसं ?"  फेसबुकवर सक्काळ सक्काळ पडलेल्या पोस्टींवर नजरेचे जॉगींग सुरू असताना एक पोस्ट हमखास दिसते, तीच ती. चष्म्याआडचे डोळे मिश्कील करून मिशीतल्या मिशीत हसणारे काका, आडव्या पट्टयांचा टीशर्ट, हाताची घडी, त्यांची पोस्ट ठरलेली.   आज दिसली नाही आणि मेंदूच्या कप्प्यात एक नोटिफिकेशन पींग करून गेलं "अरेच्च्या , आज असं कसं ?"

No comments:

Post a Comment