Wednesday, 12 April 2017

उन्हाळ्यातही आनंददायी काही गोष्टी होत्या लहानपणी. पाडव्याचं गोडधोड , साखरेची पदकं , माळा, कडी, त्यावरून भांडणं, बहिणीला पिवळ्या रंगाचं कडं आवडलं की त्याकरता मी भोकाड पसरायचो. तेच तीनं केशरी रंगाची माळ समजुतदारपणानी घेतली की दंगा करणार केशरीसाठीच. एकुणात काय भांडून , रडून पदक, माळ मिळाली की गोssssssड लागायची.   गार पाण्यासाठी माठ काढला जायचा तोही पाडव्यालाच. अण्णांचा तांबडा पंचा ओला करून मागच्या दारच्या खोलीत माठाला गुंडाळून ठेवला जायचा. खाली पाण्यासाठी भांडं ठेवलं गेलं की कै-या टाकून ठेवायच्या. माठातून ठिबकलेल्या गार पाण्यात कै-याही गार व्हायच्या.   दुपारच्या उन्हांत पाण्याचं सुख मिळायचं.  ए लाये लिये लाये मलाये वालेय असलं अगम्य ओरडून झाल्यावर पुढचं कुल्फैय तेवढं कळायचं. ताकाचा रिकामा गंज घेऊन तळपत्या उन्हांत कुल्फ्या घेऊन धाड धाड जिन्यावरून पळत येऊन कुल्फी खायला सुरूवात व्हायची ती चैत्रातच.  आंबे बाजारात दिसायला लागायचे. पाडव्याला लालबाग नावाचे देठापाशी शेंदरी लाल आणि बाकी शेवाळी हिरव्या रंगाचे गोड आंबे घरी नैवैद्याला यायचे खरे. पण परिक्षा संपल्यावर दररोज आंब्यांची चैन असायची ( परिक्षेला न पचून आजारी पडला तर ) संपूर्ण सुट्टीत हापूस दोनदा किंवा तीनदा यायचा, तो कापून खायचा. आत्ता आंबा म्हणलं की हापूस एवढंच आठवतं. पण फिकट पिवळ्या रंगाचा मोठं फळ असलेला बदामी आंबा, रसासाठी असायचा तेव्हा. कधी लालबाग, कधी केसर आंबा, तोतापुरी , आणि आजूबाजूच्या गावातून येणारा गावठी आंबा. त्याची चव प्रत्येकाची वेगळी. कधी पूर्ण साखरमिष्टी गोड, कधी गोडांबट. बिटक्या चुपून खाण्यात जे डाग पडायचे सर्वांगावर, कधी कोय चोखताना सटकून उडायची ती धमाल आता नाही.  पाडवा , नंतर रामनवमी , रथाची एकादशी, त्यादिवशी रथयात्रा, नंतर हनुमानजयंती. मोठ्या उत्साहाचे दिवस, अभ्यासाच्या नावानी ठणाणा , पथ्यकर .  रामाच्या नवरात्रात, काळाराम मंदिर, गायरान ट्रस्टला रात्री गीतरामायणाचे कार्यक्रम असायचे. आम्ही काळाराम मंदिरात ऐकायला जायचो. मांडवात स्टेजवर बसलेले करंजीकरबुवा असायचे (नाव बहुतेक मोहन होतं ) पेटी तेच वाजवायचे. तबल्यावर मांडवगणे किंवा दिनानाथ गंधे किर्तनकारांचे धाकटे बंधू. करंजीकर काका “पांढरे झालेले केस सभोवती , मधे थोडूसे  शोभे टक्कल” असे, मस्त ऑफव्हाईट किंवा बदामी नक्षीदार झब्बा असायचा. डोळ्यांच्या पापण्या काजळ लावलय की काय अशी शंका यावी अश्या काळ्या.  त्यांचं गाणं, गीतरामायणातले प्रसंग उभे करणं फार आवडायचं, गुंगून जायचं ऐकताना. सांगतानाचे चेह-यावरचे हावभाव, हातवारे बघण्यासारखे असायचे.   या गीतरामायणातली काही गाणी त्यावेळी कंटाळवाणी वाटायची विशेषतः रडकी. तिथे जांभया यायच्या. पण दोनचार गाणी आवडायची.   त्यातलं पहिलं म्हणजे विश्वामित्र जनक राजाकडे मागणी करणारं गाणं “जेष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा”, त्यातलं  मारीच तो, तो सुबाहू राक्षस तो दीर्घबाहू ठेवतील शस्त्र पुढे राम पहाता  असं वर्णन असायचं अश्या रामाबद्दल ऐकायला मन आतूर व्हायचं, काय पराक्रमी असतील रामराया ? कमालेय ब्वॉ. या गाण्याला तबलजीचा ठेका मस्त असायचा. बसल्याजागी मांडी हलायला लागायची.  पुढचं एक गाणं आवडायचं ते भीषण ताटीकेचा वध करायला सांगणारं,  तप्त आरक्त ही , पाहता लोचने करपल्या वल्लरी, करपली कानने  अतुल बलगर्विता मुर्ती ही क्रुरता ये घृणा पहाता क्रुर मुद्रा मार ही ताटका रामचंद्रा या ओळींना करंजीकरबुवा पेटलेले असायचे .अक्षरश:.  पुढच्या एका गाण्याची ओळ मनांत म्हटली जायची नंतर वर्षभर. इवल्या टिवल्या कारणांवरून मातोश्रींनी डोळे वटारले, की मनांत ती ओळ बुवांच्या आवाजातील आठवायची “ माता न तु वैरीणी”. नंतरचं गाणं म्हणजे रामभक्त हनुमंतांचं. जळे धडधडा ओळ घरांची, राख कोसळे आकारांची, चिता भडकली जणू पुरांची, अशी अवस्था लंकेची करणारे हनुमंत दिसायचे पेटवी लंका हनुमंत.  आणि लास्टात बेस्ट आवडणारं म्हणजे सेतु बांधारे सागरी, या गाण्याकरता वाट पहायला लागायची. कारणही तसंच होतं. सेतु बांधा रे, सेतु बांधा रे सेतु बांधा रे सागरी, सेतु बांधा रे सागरी  नंतरच अट्रँक्शन सीयावर रामचंद्र की जय. कारण करंजीकरबुवा सीयावर रामचंद्र की म्हणून हवेत हात हलवून इशारा करायचे आणि तमाम मंडळी जोरात ओरडायची “जय”. आम्ही बच्चेमंडळी बेंबीच्या देठापासून खच्चून ओरडायचो. नेमक्या ह्याच ओळीवर ढुढुम ढुढुम ढाम ढाम असं डग्ग्यावर मोठ्ठा आवाज काढत तबलजी वाजवायचे. विरश्रीच संचारायची. बरं हे एकदा नाही तर प्रत्येक कडव्यामागून असं साताठदा.   रामनवमीचा घामेजलेल्या हातांनी सुंठवडा खाल्ला की , नंतर रथाच्या एकादशीला दारावरून रथ गेला की गंगाकाठच्या जत्रेत फिरून यायचं , हनुमानजयंतीला मारूतीरायांना नमस्कार करून परिक्षेची लंका करायला बळ दे म्हणून सांगायचं आणि पेढा खाऊन , उन्हाळा अधिक तापदायक करणा-या “अभ्यासाला लागा, गुधडणं आयुष्यात उपयोगी येणार नाहीये “वगैरे वाक्यांना समोर जायला सिद्ध व्हायचं . पण एकुणच उन्हाळ्यातला आनंदही औरच होता तेव्हां

No comments:

Post a Comment