Friday, 21 April 2017

दिवसातलं शेवटचं काम उरकायला गणू देवळात आला. वेंगुर्लेकर गाडगीळ पुजा-यांना अभिषेक सांगायचा म्हणून गणूला शेठनी पाठवलय.
दर वेळेस शेठ स्वतःच येतात. पण दिवाळी दोन दिवसावर, दुकानात गि-हाईक हूं म्हणून. मग पिटाळलाय गणूला. 
कमरेइतक्या उंचीचा पार, तेवढ्याच उंचीच घुमटीवजा देऊळ पारावर. मागे उंबर. पुढे फ्याब्रीकेटेड शेड , ती मोठी. तिन्ही बाजूला कमानीसदृश डिझाईन . सगळं भगव्या रंगांत रंगवलेलं. पितळी घंटा वेगळपण सांभाळत टांगलेली.
चहूबाजूला निलगीरी, सुरूची झाडं, त्याचा पालापाचोळा. कुणा भावीकानं लावलेल्या दिव्याचा तांबूससर प्रकाश सुस्तपणानं सगळीकडे पसरलेला. गणू टाळ्या वाजवत उभा राहिलाय.
वेंगुर्लेकर धोतर नेसून पंचा खांद्यावर घेऊन पालखीच्या शेजारी चव-या ढाळीत उभे. पालखीच्या पुढे उजळलेला काकडा. गळ्यात मृदंग घेऊन साथ करणारा एक, टाळ घेऊन दोघं, अब्दागीर सांभाळणारा एक. पालखी डौलात सुरू आहे. 
पालखीकरता भावीक सहासातच. पण नेहमीचे असावेत. पालखी उत्तरेला देवळाच्या समोर आलीय. दत्ता येई वो माऊली, परम कृपेची सावली पद सुरू आहे. संसारातल्या त्रिवीध तापांनी पोळलेल्या जीवाची माऊलीला घातलेली आर्त साद , त्या पदातील सुटसुटीत शब्द, त्यातली आर्तता गणूला जाणवते. गणू रंगून जातो. त्याला मनात वाटतं किती भाग्यवान आहेत मंडळी. ज्या माऊलीची आळवणी करायची , तिचीच पाऊलं पालखीत. भोई होऊन वहायची. गणू गुंगून गेला पद ऐकताना.
एकमेकांच्या टोप्यांची आदलाबदल होऊन भोई मंडळींचा खांदेपालट झाला. पालखी हलली दत्तगुरूंचा जयघोष झाला. पालखी पुर्वेला आली. बाकी माणसांचं बघून गणूही पालखीबरोबर पुढे हलला. पुन्हा पद सुरू झालं. गेलो दत्तमयी होवोनी. गणूनी ठरवलं वेंगुर्लेकरांना विचारायचं आणि पालखीला नियमीत यायचं. आता पालखी दक्षिणेला जायला हलणार इतक्यात वेंगुर्लेकरांनी गणूकडे बोलावल्यासारखी नजरानजर केली.   गणू चटकन पुढे गेला. वेंगुर्लेकरांनी पालखीच्या मागच्या भोयाला खूण केली . हातानं दंड पकडून गणूला पालखी खांद्यावर घ्यायला लावली. आधीच्याची टोपी आता गणूच्या डोक्यावर होती. पुन्हा दत्तगुरूंचा जयघोष झाला. पालखी हलली. दक्षिणेला स्थिरावली. गणूला टाळवाल्यानं विचारलं पद म्हणणार का ?.
पालखीचा भोई झाल्यावर कृतार्थतेनं भारावलेला गणू या वाक्यानं भेदरला. मनोभावे गणपतीस्तोत्र, रेणुकास्तुती चार दोन श्लोक म्हणायचा सकाळी तेवढच. गणू अगतीक झाला. मान नकारार्थी हलवताना गणूला गलबलून आलं. वेंगुर्लेकरांनी विचारलं श्लोक म्हणा एखादा.
कानावर पडल्यावर गणू तरारला. पालखीतल्या पदचिन्हांकडे बघत मनाशीच जय दत्तगुरू म्हणाला. स्वच्छ उच्चारात सुरू केलं गुर्रूब्रह्मा गुर्रूविष्णू गुरूदेवो महेश्वरा, गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरूवे नमः मग वेंगुर्लेकरांनी जयघोष करून सुरूवात केली.
श्रीगुरुदत्ता जय भगवंता। ते मन निष्ठुर न करी आता . टाळमृदंगाच्या साथीने. अचानक मिळालेल्या या लाभाने कृतार्थ होऊन भरल्या डोळ्यांनी गणू पुन्हा रंगू लागला.
--------------------------
कधीतरी ज्याची कल्पनाही मनात नसते, अश्या कार्याच्या पालखीचे भोई होण्याची संधी येते, काही उणिवा आपल्या जाणवल्या तरी आजूबाजूची मंडळी संभाळून नेतात, तेव्हा आपलाही गणू झाल्याचं जाणवून येतं  तुमचा कधी झालाय का गणू ? (फोटोसौजन्य - Siddharaj Gosavi )

No comments:

Post a Comment