Saturday, 10 September 2016
पालखी कृष्णजन्माष्टमी, दहीहंडीचा दंगा करून झाला की वेध लागायचे ते गणेशोत्सवाचे, मंडळाचे उत्साही कार्यकर्ते वर्गणी, डेकोरेशन , कार्यक्रमाच्या तयारीला सुरूवात करायला लागलेले असायचे. सराफ बाजार, पगडबंद लेन मधे काही दुकानात गणरायांचे आगमन झालेले असायचे. माळा, मखरं,झिरमिळ्यांचे स्टॉल सजायला लागायचे.कृष्णजन्माष्टमीपासून पाऊस रिपरिप करत पडत असायचा. थोडा वेळ तडतड बाजा वाजवून झाला की आळसावून संंथगतीच्या बातमीपत्रासारखा सुस्तपणे रिपरिप करत असायचा. तशातच श्रावणाच्या निरोपाची चाहूल घेत, शेवटचा सोमवार उजाडायचा. आमची चंगळ, कारण शाळा मधल्या सुट्टीपर्यंतच. हुर्यो करत घरी आलं की, जरा आज्जीच्या मागं मागं, मांजरीच्या पिल्लागत घोटाळून, उपजे म्हणा, तांबड्या भोपळ्याच्या पु-या म्हणा, त्या तिखटमिठाच्या असू देत नाही तर गोडाच्या, सोबत भाजके शेंगदाणे ( घरी सुवर्णकण म्हणायचो) घेऊन, घराच्या जुन्या पेशवेकालीन पद्धतीच्या, खाली लोखंडी गज वर मोकळ्या खिडकीशी ताटली ठेवून , मांडा ठोकून बसायचं कसं कोण जाणे पण शेवटच्या सोमवारी ११.३०, १२ वाजेपर्यंत रिपरिपणारा पाऊस थांबलेला असायचा, आणि अंधारल्याश्या वातावरणात तयारी सुरू व्हायची पालखीची. श्रावणी सोमवारी दोन पालख्यांचा सोहळा असायचा, गंगेपलीकडे पंचवटीत कपालेश्वराची, अलीकडे तिळभांडेश्वराची. नेहरूचौकातल्या घराच्या समोरच होता नीरंतरांचा वाडा. धार्मीक घराणं. या नीरंतराच्या प्रेस आणि शीरवाडकर सराफांच्या दगडी कट्ट्यावर पालखीची तयारी सुरू व्हायची. खिडकीतून टूकूरटूकूर बघत बसायचो आम्ही, वाड्यातली बच्चेकंपनी बाजूच्या खिडक्यात. सुरूवातीला पालखीचा दांडा, पालखी, वेगवेगळ्या खोळी, गाद्या, गिरद्या, गोंडे , नीरंतरांच्या घरातून हळूहळू खाली यायचे. पालखी बांधून, सजून व्हायची. लाल कापडानं लाल रंगात रंगविलेल्या पालखीचा दांडा गुंडाळला जायचा. वर गादी, पालखीत खाली सतरंजी, नंतर गादी, जरतारी आसन, लोड, तक्के ठेवले जायचे. सोनेरी , चंदेरी गोंडे पालखीच्या दांड्याला आवळले जायचे. वेगवेगळ्या खोळीतून, अब्दागीर, मोरचेल, मध्यम आकाराचे लाकडी, कातडं ताणलेले ढोल, सनई, शिंगं, तुतारी, झांजा बाहेर काढल्या जायच्या. ढोलांचे ताण काढले जायचे, शिंगं , तुतारी पाण्याने धुऊन वाजतीयना बरोबर , तपासलं जायचं. एकेक करून ह्या सगळ्या जंत्रीची वाटचाल तिळभांडेश्वर लेनमधून, दुर्गा मंगल कार्यालयाच्याशेजारच्या तिळभांडेश्वर मंदिराकडे व्हायची. सर्वात शेवटी , पिवळा कद नेसून , कपाळ, दंड, छातीवर भस्माचे पट्टे ओढून, हातातल्या चांदिच्या ताटात, ताम्हनात तिळभांडेश्वराचा चांदीचा मुखवटा घेऊन नीरंतर खाली यायचे. लखलखणारा , साधारण साडेतीन वीत उंचीचा चांदीचा ,श्रींचा कोरीव मुखवटा, डोळे भेदक काळ्या पांढ-या रंगाने रंगवलेले, काळ्या रंगातल्या झुपकेदार मिशा, भस्माच्या कोरीव त्रिपुंड्रावरची उभी रेघ लाल रंगात रंगवलेली, आणि भ्यासूरपणाला जिवंत करणा-या डोळ्यांच्या कडा लाल रंगांत, बाकी मुखवटा, लखलखणा-या शुभ्र चांदीचा. श्रींचा मुखवटा घेऊन नीरंतर निघाले की आई ,आज्जी वगैरे मंडळी अत्यंत नाईलाजास्तव कराव्या लागणा-या दिव्याला सामोरे जाण्यास फर्मावयाच्या, शाळेचा गृहपाठ. लक्ष नसायचच, पण काहीतरी करतोय एवढं दिसलं म्हणजे झालं ( ही सवय हापीसात उपयोगी पडतेय, असो) सव्वा दीड तासाने, चेह-यावर कंटूळवाणे भाव बघून समाधान झाले की फराळाच्या हाका यायच्या. शेवटचा सोमवार, भगर, रताळ्याचा कीस, राजगीरा लाडू, तळलेला बटाट्याचा सुवर्णकणयुक्त चीवडा, जलंस्तर तूंप घालून खजूराच्या उलुश्या बीया, वगैरे फराळ आवरून, तृप्त मनाने आम्ही पुन्हा खिडकीत. तीन साडेतीनला गाडगेमहाराज पुलाकडून येणा-या रस्त्यावर, समोर सोमवार पेठेत लगबग सुरू व्हायची, गजाला नाक लावून बघत असायचो. सडे घातले जायचे, संस्कार भारती रांगोळी हा नंतर आलेला प्रकार, पण पालखीकरता, तीन चार फूट व्यासाच्या रांगोळ्या ठिकठिकाणी माऊलीवर्ग सरसर रेखाटायच्या. रस्त्याच्या दुबाजूला ,वाड्यांच्या दर्शनी दगडी भागांवरच्या पणत्यांच्या कोनाड्याखाली ,औक्षणाची ताटं, तबकं तयार करून ठेवलेली असायची. शिंगं, तुता-यांच्या ललकारात पळापळ सुरू व्हायची, पालखी आली, पालखी आली. सनई, चौघडा वाजवीत , झुल घालून , बैलांच्या शिंगांना रंगविलेली बैलगाडी पुढे यायची. मागून लाल सोनेरी किंवा निळ्या सोनेरी रंगाची कापडं टाकलेले ढोल, झांजा वाजवणारे यायचे. त्या ढोलांनी ढिढीण टीणीक ढीण, ढीढीण टीणीक ढीण चा विशीष्ठ मध्यलयीतला ठेका धरलेला असायचा, आणि झांजा बोलू लागायच्या , छून खळ खळ छन, छून खळ खळ छन. नकळत पाउलं ठेका धरायची. सजविलेल्या पालखीतून श्री यायला लागायचे, आता मस्तकी मुगुट किंवा फेटा धारण केलेला असायचा ,पण जटांमधील गंगामाईचे दर्शनही व्हायचे बर का. येताना फुलांच्या माळा, तांदूळ, डाळ, ओठाला लावलेला गुळ, उधळलेले कुंकु , भंडारा यामुळे एरव्ही उग्र, भ्यासूर वाटणारे श्री सौम्य , स्निग्ध होऊन जायचे. पालखी पुढे पुढे येईल तशी थांबत थांबत यायची, फटाक्यांची माळ लावली जायची, सुवासीनी पालखीच्या भोईमंडळीचे पायावर दूध घालून, श्रींना औक्षण करायच्या, मन गुंतवून नमस्कार करायच्या, पोरांसाठी आयुक्ष मागायच्या, बाप्ये लोक मुखवट्याला हात लावून, गिरदीला डोकं टेकून, कानाच्या पाळीला, गालाला हात लावून नमस्कार करत, शंभो हर हर चा जयघोष करत. चौकात पालखी आली की नीरंतरांच्या घराजवळ रेंगाळायची, पालखीचा दांडा लाकडी घोडीवर विसावायचा, नीरंतरांघरच्या सुवासीनीं औक्षण, आरती करायच्या, धूम गर्दी व्हायची. मग घरातनं आईने दिलेले तांदूळ, फुलं , रूपया दोन रूपयाचं नाणं , त्या गर्दीतून सूर मारून पालखीपर्यंत जायचं आणि वहायचं , गिरदीवर डोकं टेकायचं, बच्चेकंपनीला मिळणारा स्पेशल साखरीफुटाण्याचा प्रसाद, आणि पालखीतलं बेलाचं पानं मिळालं की काहीतरी प्रचंड केल्याचा आनंद मिळायचा, वयच तसं होतं . मिळालेला प्रसाद पुन्हा धक्काबुक्की करत , घट्ट बालमुठीत पकडून घरी , धापा टाकत आणून दिला की मग घाम पुसायचा शर्टाच्या बाहीला. पालखी सोमवारपेठेतून पुढे रवाना व्हायची आणि मग वर्षभर पुढच्या श्रावणापर्यंत अधूनमधून ढोलाचा मध्य लयीतला आणि झांजांता आवाज आठवत रहायचा ढीढीण टीणीक ढीण ढीढीण टीणीक ढीण छून खळ खळ छन छून खळ खळ छन सरत्या श्रावणाच्या आठवणी माझ्या मनात अशा आहेत
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment